अध्याय २ रा - श्लोक ३६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न नामरूपे गुणजन्मकर्मभिर्निरूपितव्ये तव तस्य साक्षिणः ।
मनोवचोभ्यामनुमेयवर्त्मनो देव क्रियायां प्रतियत्न्यथापि हि ॥३६॥

न टके वाचेचिया जल्पा । न पुरे मनाचिया संकल्पा । तुझा मार्ग विश्वरूपा । सगुण सोपा न म्हणवे ॥९२॥
अनुमानबोधें मनही जाणे । वाचा वाखाणी अनुमानें । तेही निर्गुण परंतु सगुणें । हीं निरूपणीं न टकती ॥९३॥
ब्रह्मया समान हो आयुष्य । शेषाहूनि मुखें विशेष पृथक् वदनीं लक्ष लक्ष । स्फूर्त्तिप्रकाश शारदेचे ॥९४॥
ऐसे जन्म अनंतकोटि । धरूनि नामरूपसिंधुपरतटीं । तुझिया पावेल हे गोष्टी । कोणा ओष्ठीं नुपजेची ॥६९५॥
अनंतगुणीं नामें गौण । अनेक जन्में परिच्छिन्न । कर्मयोगें नामवर्ण । म्हणती विचक्षण यौगिक ॥९६॥
योगसत्तावळें दृढ । तीं तीं नामें म्हणिजती रूढ । तैशींच रूपें प्रकटगूढ । जीं अवघड गणनेतें ॥९७॥
ऐशीं गुणजन्मकर्में अनंत । इहीं नामरूपांचा अंत । न लगे न लगे हा वृत्तांत । देव समस्त बोलती ॥९८॥
ऐसें गुणजन्मकर्में करून । नामरूपांचें अपारपण । यांचें करावया निरूपण । कोणा आंगवण असेना ॥९९॥
सहित समुद्राची खोली । सकळ नभाची पायली । सीग देऊनि भरियेली । अणूरेणूही मोकळा ॥७००॥
तितुक्या अणूरेणूंचें माप । लक्षोलक्ष पूजेकरितां अल्प । परी तुझीं नामरूपें अमूप । अनंतकल्प न गणती ॥१॥
एवं भजनासीच सगुण योग्य । न सरे जाणिवेचा प्रसंग । मनोवाचेचा नाहीं लाग । धरिलें जग एकांशें ॥२॥
तरंग नेणे सिंधुमाना । लिक्षा साकल्यें नेणे गगना । पृथ्वीचिया घनवटपणा । रजःकणा नेणवे ॥३॥
तैसा मनादिकांचा जो साक्षी । मनादि स्वप्रकाशें प्रकाशी । दृश्यें जडें हीं त्यातें कैशीं । जाणावयासी शकतील ॥४॥
उपनेत्र नेत्रां प्रकाशक । शस्त्र हस्ताचें धारक । काष्ठ अग्नीचें दाहक । हा विवेक अघटित ॥७०५॥
ऐसा मनोवाचेसि अगोचर । तेथ कैं प्राप्तीचा विचार । यदर्थीं बोलती सुरवर । तो प्रकार अवधारा ॥६॥
चंद्रकांतीं द्रवे जेवन । सूर्यकांतीं हुताशन । नातरी लोह जैसें अचेतन । पवे चळण चुंबकें ॥७॥
हो कां अधिक बहुतांगुणीं । परीस किंवा चिंतामणि । चंद्रिकास्पर्शें द्रवे पाणी । हे तो करणी त्या न ये ॥८॥
तैसें होत कां सुरवर । अथवा व्युत्पत्तिसागर । नसतां सप्रेमभजनादर । साक्षात्कार न पवती ॥९॥
सप्रेम भक्तीचा जिव्हाळा । तेचि चंद्रकांताची शिळा । तेथ चिन्मात्रचित्कळा । घनसांवळा प्रकाशे ॥७१०॥
चंद्रबिंब प्रकटे व्योमीं । सोमशिळा प्रकट भूमी । द्रवे दोहींच्या संगमीं । साम्य सोमीं जीवन ॥११॥
एथ अगोचर परमात्मा । अगोचरचि भजनप्रेमा । तरी कें साक्षात्कारी यया नामा । भक्तोत्तमा पात्रता ॥१२॥
ये आशंकेचें निरसन । हे देव ऐसें संबोधन । जें तूं बहुधा द्योतमान । म्हणती सुरगण या हेतु ॥१३॥
चंद्र पूर्ण पूर्णिमेसी । पूर्वे प्रकटोनि चरमदिशीं । जात जातां धवळी निशी । असाम्य तुजसीं उपमे तो ॥१४॥
तूं संपूर्ण सर्वकाळ गमागमारहित अचळ । सन्मुख होतां सप्रेमळ । अमळीं अमळ आविर्भवसी ॥७१५॥
त्या प्रेमाची जाति कैशी । ठावी आहे उपासकांसी । काया वाचा मनें धनेशीं । जे अनन्यतेशीं तुज शरण ॥१६॥
गगनींहूनि सुटे पाणी । तें अवंचकत्वें अप्रे धरणी । तैसे सद्भक्त सकळ करणी । तुझ्या चरणीं अर्पिती ॥१७॥
तोचि अर्पणप्रकार । उपासनक्रियासार । जेथ तुझा साक्षात्का । भक्तनिकर पावती ॥१८॥
अगोचर जो वाचामना । तो तूं गोचर होसी भजना । भक्तीवीण साधनें नाना । मोक्षदाना नेदिती ॥१९॥
तस्मात् मोक्षाचें कारण । तुझें सद्भावें सप्रेम भजन । हें प्रतिपादूनि उपसंहरण । करिती सुरगण भजनाचें ॥७२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP