अध्याय २ रा - श्लोक २९ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


बिभर्षि रूपाण्यवबोध आत्मा क्षेमाय लोकस्य चराचरास्य ।
सत्त्वोपपन्नानि सुखावहानि सताभभद्राणि मुहुः खलानाम् ॥२९॥

अखिलांडकोटी ज्याचे उदरीं । तो तूं जगदात्मा श्रीहरि । रूपें धरिसी नाना परी । निर्विकारी निर्लेप ॥९७॥
आम्हीं मायाभ्रमें परतंत्र । तूं मायानियंता स्वतंत्र । आम्ही मायागुणी गुणावतार । तूं निर्विकार निर्गुण ॥९८॥
करावया विश्वमंगल । जैं तूं अवतरसी गोपाळ । तैं सज्जनां सुखकल्लोळ । होय सुकाळ स्वानंदें ॥९९॥
तूं नित्यावबोध ज्ञानघन । क्षमा करणें अवतरोन । करिसी स्वधर्मसंस्थापन । परिपालन विश्वाचें ॥५००॥
अनंत ब्रह्मांडें तुझे उदरीं तो तूं पुत्र कोणाचा श्रीहरि । शुद्धसत्त्वाची सामग्री । नानावतारीं नटनाट्य ॥१॥
तूं अवतरसी जैं स्वलीले । तैं सज्जनां सुखसोहळे । तुझें ज्ञान मायापटळें । न झांकोळे स्वतःसिद्ध ॥२॥
अनंत जन्मांचे सुकृतीं । लहाती नरदेहाची प्राप्ति । तेथ निष्काम सत्कर्में जैं हरिभक्ति । तैं विरक्ति हरिवरें ॥३॥
पूर्ण विरक्ति सानुताप । तैं रजतमांचें उपडे रोप । सत्त्वशुद्धीचा उजळे दीप । होय लोप अनित्या ॥४॥
नित्यस्वरूपानुसंधानें । शमदमसमाधिसाधनें । साधकीं माया निस्तरणें । तुझेनि भजनें गोविंदा ॥५०५॥
त्या तुझिया सत्त्वोपपन्नावतारा । माया नातळे निर्विकारा । सूर्यें प्रार्थिल्याहि अंधारा । त्या सामोरा न ये तो ॥६॥
तैसा खळासि होय अंत । म्हणोनि लंघिती ते दिगंत । तो तूं प्रत्यक अनंत । केवीं सुत देवकीचा ॥७॥
तुझीं रूपें नारायणा । केवळ तोषदेंचि नव्हती सज्जनां । मोक्षदें होती ते विवंचना । मधुसूदना परियेसीं ॥८॥

त्वय्यम्बुजाक्षाखिलसत्त्वधाम्नि समाधिनावेशितचेतसैके ।
त्वत्पादपोतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्संपदं भवाब्धिम् ॥३०॥

ऐसा सत्त्वात्मक मूर्ति । त्या तुझ्या ठायीं प्रेमभक्ति । अनन्यभावें समरसती । पूर्णस्थिति प्रेमळ ॥९॥
आर्त्त जिज्ञासु आणि अर्थार्थी । हे भक्त भजनें भेद स्वार्थी । गुंतले त्रिविधपुरुषार्थीं । अभेद चौथी ज्ञानमयी ॥५१०॥
ते भक्तीसी करूनि महत्त्व । जिहीं शोधिलें शुद्ध सत्त्व । गुरुपरसादें आत्मतत्व । सांख्यानुभव पावले ॥११॥
तत्त्वंपदांचें शोधन । तेंचि पिंडब्रह्मांडविवरण । करूनि जहदजहल्लक्षण । शुद्धचैतन्य निवडिलें ॥१२॥
विचारें कळलें मीचि ब्रह्म । परंतु देहाध्यासाचा न फिटे भ्रम । यालागीं मनोजयाचा नेम । चित्तोपरम तो योग ॥१३॥
सांख्ययोगाची दशासिद्धि । साधावया अलोट बुद्धि । वर्णाश्रम यथाविधि । चित्तशुद्धि निष्काम ॥१४॥
सत्कर्माचें आचरण । करूनि कीजे कृष्णार्पण । प्रेमयुक्त अंतःकरण । भक्तिलक्षण या नांव ॥५१५॥
संसारभोगाची विरक्ति । तरीच ठसावे हरिभक्ति । जंववरि संसारीं विषयासक्ति । तंववरि भक्ति ते माव ॥१६॥
शुद्धि विसरूनि भ्रांत होणें । कीं भ्रांति सांडिजे सावधपणें । भ्राम्ति आणि सावधान । एके समयीं न वसती ॥१७॥
जंववरि प्रपंचीं आवडी मोठी । तंववरी परमार्थीं भक्ति खोटी । देखोवेखीचिया गोष्टी । सर्व चावटी मायिक ॥१८॥
मायाभ्रांतीचा संसार । दुःखप्रचुर भवसागर । तेथ विषय हे जलचर । इहीं दुसतर तरवेना ॥१९॥
येती चिंतेचिया लाटा । भोंवरा तृष्णेचा ओखटा । येतां अभिमानाचिया लोटा । भरितें कांठा उचंबळे ॥५२०॥
अहंतेची फूग धरी । मदाचे उल्लोळ उठती भारी । जेथ जलग्राह साही वैरी । परोपरी तळपती ॥२१॥
असो दुसत्र हा भवार्णव । याचा सर्वांसि अनुभव । असोनि विरक्त न होती जीव । ऐशी माव हरीची ॥२२॥
त्या तुझ्याठायीं श्रीअनंता । सांख्ययोगमार्गें चित्ता । समाधिक्रमें साठवितां । तद्रूपता पावले ॥२३॥
एक तव चरणाचिये नावे । बैसले अनन्यप्रेमभावें । भजना वेगळें आघवें । त्यजिलें जीवें जड ओझें ॥२४॥
भजननैका ही महंतीं । जोडूनि ठेविली आयती । मागें तरले नेणों किती । पुढें तरती अकल्प ॥५२५॥
आयती संपादिली ते कैशी । नारदसनकादि महर्षीं । अनुष्ठिली ते भाविकांसी । भवतरणासी तारिका ॥२६॥
काया वाचा आणि मन । यांचें सर्वही वर्त्तन । अखंड होय कृष्णार्पण । हें लक्षण तेथींचें ॥२७॥
मनासी ध्यानसुखाची चवी । वाचा स्मरणें कीर्त्तनें गोंवी । काया नम्रत्वें लववावी । द्विजीं देवीं सज्जनीं ॥२८॥
ऐशी आचरती रीति । पूर्वीं दाविली महंतीं । तेचि आचरोनि विरक्ति । कैवल्यप्राप्ति साधिली ॥२९॥
जैसें कर्म सांसारिक । भजनही तैसेंचि म्हणती एक । ते ठकले मूर्ख हीनविवेक । ऐसें श्रीशुक बोलतो ॥५३०॥
प्रपंच मिथ्या मायामय । भक्ति उत्कृष्ट तरणोपाय । महत्कृपेनें हा अभिप्राय । शुकाचार्य दर्शवी ॥३१॥
श्रीपदप्रेम महत्सार । येर दुस्तर भवसाग्र । श्रीपादनौकेचा आधार । हा निर्धार पैं केला ॥३२॥
आपुल्या शस्त्रें तंवचि मरे । होय निदसुरें किंवा घाबरें । शौर्य शत्रूच्या संहारें । शस्त्र निर्धारें तारक ॥३३॥
अमृतें त्रीचि मरिजे । नेणोनि विषेंशीं सेविजे । विष सांडूनि अमृत पीजे । तेव्हां जीजे अमरत्वें ॥३४॥
तैसें अनन्य भजनाची करूनि माव । योगक्षेमावरी हांव । तरी तें भजन नव्हे भव - । सिंधु अथाव दुस्तर ॥५३५॥
कैसा भवसिंधु दुस्तर । ऐक तयाचा प्रकार । योगक्षेमाचा विचार । सविस्तर परियेसीं ॥३६॥
मी माझें इतुकेंचि जळ । येणें भवसिंधु हा प्रबळ । योगक्षेमें कीजे पघळ । हाचि केवळ भजनही ॥३७॥
भावें भजोनि भगवंता । क्षेम इच्छी कांतासुता । द्रव्यप्राप्ति योगचिंता । हे अनंता पुरवावी ॥३८॥
मीपण देहीं करी उभें । माझेपणें कुटुंब क्षोभे । भजन कोटाळी ममतालोभें । जगा झोंबे तत्प्रेमें ॥३९॥
तेणें भजनेंचि भवसागर । धांवणेकार होती चोर । औषध मारी होऊनि गर । जेंवी अविचार कुपथ्यें ॥५४०॥
तैसें अविरक्त जें भजन । तेंचि भवाचें भाजन । विरक्त श्रीपदाराधन । भवमज्जन तें चुकवी ॥४१॥
म्हणोनि श्रीपदप्रेमनौके । तरलीं संतवृंदे कितिएकें । त्यांसि भवजळचि नाहीं ठाऊकें । जालेंण असकें कैवल्य ॥४२॥
ऐसा भवाब्धि लंघिला संतीं । सांप्रत भाविकां कोण गति । ऐशिये आशंकेची निवृत्ति । स्वयें बोलती सुरवर्य ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP