अध्याय १ ला - श्लोक ७० ते ७२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मातरं पितरं भ्रातॄन्सर्वांश्च सुहृदस्तथा । घ्नन्ति ह्यसुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि ॥७०॥

प्राणपोषक विषयलुब्ध । राज्यमदें जे मदांध । देहलोभे विधिनिषेध । कर्म विरुद्ध न म्हणती ॥६८॥
राज्यभोगविषयांसाठीं । मातपितरें वधिती कपटी । बंधुसुहृदांचिया कोटी । स्वार्थासाठीं मारिती ॥६९॥
ऐसे राजे वर्त्तमान । याहूनि कलिकाळीं निर्घृण । करिती पिंडाचें पोषण । लज्जादूषण न गणिती ॥९७०॥
वाइलेशीं भांडतां माता । क्रोधें करिती मातृघाता । द्रव्यविभागाचिया स्वार्था । पितृघाता न शिणती ॥७१॥
मातापितरीं महत्त्व ऐसें । बंधुसुहृदां कोण पुसे । देहलोभें केलें पिसें । विषयसोसें नाचती ॥७२॥
राजेचि मातृपितृघाती । तेथ प्रजांची कोण गति । कोण करी न्यायनीति । अधःपाती अवघे ॥७३॥
ऐसे बहुतेक दुष्टजन । कंसावरूनि आठवण । झाली शुकासि म्हणून । निरूपण हें केलें ॥७४॥

आत्मानमिह संजातं जानन्प्राग्विष्णुना हतम् । महासुरं कालनेमिं यदुभिः स व्यरुध्यत ॥७१॥

होणार बळिवंत न चुके कर्म । तेणें कंसासि आठवे पूर्व जन्म । म्हणे माझा वैरी विष्णु परम । हें निजवर्म मी जाणें ॥९७५॥
महादैत्य कालनेमि । वधिला विष्णूनें संग्रामीं । आतां तोचि एथ पैं मी । कंस होऊनि जन्मलों ॥७६॥
अद्यापि मजशीं वैराकार । साधावया हे सुरवर । धरूनि यदुकुळीं अवतार । आले वरि स्मरोनि ॥७७॥
गगनवाक्यें साशंकित । दैवें पातला ब्रह्मसुत तेणें सांगतां वृत्तांत । मग हे मात उमजली ॥७८॥
मग सावध होऊनि मनीं । यादव घातले बंधनीं । करी अनेक जाचणी दैत्यश्रेणीसंग्रहें ॥७९॥

उग्रसेनं च पितरं यदुभोजांधकाधिपम् । स्वयं निगृह्य बुभुजे शूरसेनान्महाबलः ॥७२॥

धरूनि पिता उग्रसेन । तयासि केलें दृढ बंधन । भोज अंधक यादवगण । ज्याअधीन वर्त्तती ॥९८०॥
तो बंदीं घातला यादवसखा । तेथ इतरांचा काय लेखा । शूरसेनादि नाना लोकां । भोगवी अनेकां दळबळें ॥८१॥
कंस प्रतापी भोजकुळीं । बंदीं घालूनि यादवबळी । सामान्य ठेविले आज्ञेतळीं । भोगी महीतळी सकळांची ॥८२॥
इतुकें श्रीमद्भागवतीं । परमहंसाची संवित्ति । अठरा सहस्रांचीये विस्तृति । जे व्यासोक्ति संहिता ॥८३॥
महापुराण याचें नांव । परंतु ब्रह्मविद्येचा ठाव । दशमस्कंधीं प्रथमाध्याय । कथाप्रस्ताव वर्णिला ॥८४॥
प्रत्यक्ष ब्रह्महत्या हरती । ऐशी महिमा आहे भारतीं । परंतु भागवताची ख्याती । अगाध गति श्रवणाची ॥९८५॥
भारतादि सर्व पुराणें । स्वयें कथिली बादरायणें । परंतु परतल्या अंतःकरणें । विश्रांति नेणे स्वसुखाची ॥८६॥
तेणें अनुतप्त अंतरीं । येऊनि सरस्वतीच्या तीरीं । अनशनव्रतधारी । प्रायोपशायी जहाला ॥८७॥
तंव अकस्मात ब्रह्मर्षि । दैवें पातला व्यासापाशीं । तेणें पुसोनि वृत्तांतासी । गुह्य त्यासि बोधिलें ॥८८॥
जें पद्मकल्पीं ब्रह्मयातें । नाभिकमळीं श्रीअनंतें । तप तप ऐसें बोधुनि त्यातें । वैकुंठातें दाविलें ॥८९॥
तें आदिमायाविनिर्मित । नाहीं पंचभूतांची मात । तेथें विधीसि एकांत । रमाकांत प्रबोधी ॥९९०॥
ऐशीच निर्माण करीं सुष्टि । अलिप्त राहें अंतर्दृष्टीं । ऐशी सांगोनि गुह्य गोष्टी । तो परमेष्ठी स्थापिला ॥९१॥
पूर्ण अनुभविया हें कळे । अंतर्निष्ठासि विवळे । शास्त्रयुक्तीचें वाचाळें । त्यांसि न कळे हें गुह्य ॥९२॥
शास्त्रज्ञ आणि अंतर्निष्ठ । अभ्यासशील अनुभवी स्पष्ट । तरी तो सर्वांहूनि श्रेष्ठ । चंदनकाष्ठ ज्यापरी ॥९३॥
परिमळें इतर काष्ठां वेधी । चंदनकाष्ठीं हे स्वयंभू सिद्धि । तैसा वेदशास्त्रज्ञ विशाळबुद्धि । जो समाधिसुखभोक्ता ॥९४॥
असो इत्यादि कडसणी । ब्रह्मा वेधिला चक्रपाणी । तेणें विवरूनि अंतःकरणीं । ग्रथिलें गुणीं चतुःश्लोकीं ॥९९५॥
तें चतुःश्लोकी भागवत । ब्रह्मानुभवें ब्रह्मा ध्यात । नारदातें अकस्मात । तो एकांत फावला ॥९६॥
ब्रह्मा बोधी नारदासि । तेणें बोधें तो ब्रह्मर्षि । नित्य क्रीडतां स्वानंदेशीं । श्रीव्यासासि भेटला ॥९७॥
देखोनि व्यासाची विरक्ति । कळवळला तो करुणामूर्ति । मग नेऊनि एकांतीं । निजविश्रांति बोधिली ॥९८॥
तेंचि चतुःश्लोकी भागवत । नारदप्रबोधें व्यासासि प्राप्त । तेणें निवाला तो महंत । निज एकांत सेवूनि ॥९९॥
मग तो उदार करुणासिंधु । कीं परमामृताचा पूर्ण इंदु । स्वसुखामृतें परमानंदु । मुमुक्षुसुरवरां ओपिता ॥१०००॥
चंद्र आंगींचें निजामृत । देवा देऊनि पडे रिक्त । म्हणोनि असम दृष्टांत । हा महंत आगळा ॥१॥
व्यासरायाचे हृदयभुवनीं । परमामृतफळाची वानी । नारदें देतां पुराणवनीं । केली लावणी श्रीव्यासें ॥२॥
तो परमामृतफळाचा तरु । अठरासहस्र सविस्तरु । त्या पक्क फळांचा घेऊनि आहारु । शुक सत्वरु निवाला ॥३॥
परमामृत जें रसाळ श्रेष्ठ । गलित फळ तें शुकमुखोच्छिष्ट । तेणें परीक्षितीचे हरले कष्ट । झाला पुष्ट स्वानंदें ॥४॥
तें फळ व्यासचि एकला खाता । तरी कोठूनि येतें जगाच्या हाता । तो वृक्ष विस्तारूनि पुरता । केला समस्तां फळलाभ ॥१००५॥
संसारश्रांतासि साउली । भररोगिया पीयूषवल्लि । मुमुक्षु बुभुत्सु स्वानंदफळीं । प्राप्त सकळीं निवताती ॥६॥
एथें श्रोते भृंग जाण । श्रवणें करितां आमोदपान । कृष्णसारूप्यें समाधान । आनंदघन भोगिती ॥७॥
कीर्त्तननिष्ठ कोकिलाकृति । धरूनिया वरी कूजती । नाना वेदान्त व्युत्पत्ति । ते प्लवंगाकृति उप्लवनें ॥८॥
घेऊनि एथिचे सर्वोपचार । मुळीं बैसले तापस धीर । निष्कामकर्मनिष्ठ द्विजवर । करिती घर ये वृक्षीं ॥९॥
ऐसा अमृततरु ब्रह्मांडीं । कीजे सुरतरूची कुरवंडी । न सेवी त्याचे मृत्तिका तोंडीं । घाली अनावडी अभाग्यें ॥१०१०॥
हा निर्धनाचें पूर्ण धन । पुण्यशीळाचें जीवन । प्रतिश्लोकीं कोटी यज्ञ । श्रवणें पान केलिया ॥११॥
यज्ञसुकृत सरतां पतन । एथ जोडे अविनश पुण्य । जें अक्षय्य ब्रह्मनिराण । कैवल्यसदनप्रापक ॥१२॥
प्राश्निक वक्ते आणि श्रोते । प्राप्ति समान अवधियांतें । मागें पुढें भरलें रितें । न्यून एथें असेना ॥१३॥
जेथ व्यासाचा हरला भ्रम । कायसा हा शास्त्रपरिश्रम । म्हणोनि परमामृतद्रुम । हा निष्काम लाविला ॥१४॥
येणें अविद्याचि संहरे । परमामृतें ज्ञप्ति मुरे । अनुभवापुरतें द्वैत नुरे । तें हें खरें परब्रह्म ॥१०१५॥
एके अविद्येचे पोटीं । विपरीत ज्ञानें अनेक सृष्टीं । तेथ पापपुण्याच्या गोष्टी । शास्त्रदृष्ट्या बोलिजे ॥१६॥
तें दृश्येंशीं अविद्या हरे । विपरीत ज्ञान कोठूनि उरे । मग ब्रह्महत्येचीं उत्तरें । कोण निदसुरें वोसणे ॥१७॥
स्वप्नखेळीं अळणी जेवण । त्यासि जागृत होऊनि वाढी लवण । ऐसें जयाचें कोमलज्ञान । तो हें भाशन अनुवादे ॥१८॥
एवं भागवताचिया श्रवणफळा । प्राश्निकां वक्त्यां श्रोत्यां सकळां । पुण्यप्रताप तुकितां तुळा । कोठें आगळा दिसेना ॥१९॥
शुक म्हणे गा परीक्षिति । श्रवणीं सादर सप्रेमभक्ति । तुझेनि जगासि विश्रांति । अगाधकीर्ति तूं एक ॥१०२०॥
पुढिले अध्यायीं गर्भस्तुति । ब्रह्मादि देव येऊनि करिती । तें ज्ञान सांठवावया चित्तीं । सादरवृत्ति असावें ॥२१॥
शौनकप्रमुखां नैमिषारण्यीं । सूतें घालूनि इतुकें श्रवणीं । पुढिले कथेच्या निरूपणीं । करी विनवणी अवधाना ॥२२॥
तें हें आदिनाथवरदें । दत्तात्रेयकृपाप्रसादें । जनार्दनें वात्सल्याच्या कंदें । एकनाथीं सांठविलें ॥२३॥
तेणें वोळला चिदानंदघन । अवघें स्वानंदजीवन । गोविंद वरद गांग पूर्ण । दयार्णवीं तें भरलें ॥२४॥
श्रोते प्राश्निक सुरवर । संवादमथनें चित्सागर । मथितां रत्नांमाजीं सार । अमृतोद्गार हे टीका ॥१०२५॥
एथ करिती अमृतपान । हे म्हणों सुरवरां समान । हा दृष्टांत एथ गौण । ते निर्वाणसुखभोक्ते ॥२६॥
कृष्णसमरण मंगलायतन । हें परम गुह्य करूनि जतन । प्रथमाध्याय कृष्णार्पण । यथाज्ञानें समर्पिला ॥२७॥
छायाव्याख्यान केलें फार । म्हणोनि न मानावा विस्तार । हा अवघाचि परिहार । जगदुद्धार जाणतसे ॥२८॥
अच्युतानंतगोविंद - । स्मरणें भवरोगाचा कंद । तुटोनि प्रकटे परमानंद । तो हा वरद चिन्मूर्ति ॥२९॥
मी - तूं रहित जें चिन्मात्र । त्याचें तेणेंचि निजचरित्र । कथिलें स्वतःसिद्ध स्वतंत्र । सुधापात्र श्रोतयां ॥१०३०॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कृष्णावतारोपकथनं नाम प्रथमोध्यायः ॥१॥

( इतर भागवतप्रतींत ‘ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे पूर्वाधें श्रीकृष्णावतारोपक्रमे प्रथमोऽध्यायः ’ अशी प्रथमाध्याची पुष्णिका आहे. )

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥७२॥ टीका ओव्या ॥१०३०॥ एवं संख्या ॥११०२॥

पहिला अध्याय समाप्त.


N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP