अध्याय १ ला - श्लोक ४४ते ४७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ज्योतिर्यथैवोदकपार्थिवेष्वदः समीरवेगानुगतं विभाव्यते ।
एवं स्वमायारचितेष्वसौ पुमान्गुणेषु रागानुगतो विमुह्यति ॥४४॥

आतां जीवदशेची गति । दृष्टान्तें सांगेन भूपति । ते ऐकोनि स्वप्रतीति - । माजीं निगुती आणावें ॥७२०॥
जैशी चंद्रसूर्यादि ज्योति । ऊर्ध्व असोनि अधोगति । उपाधियोगें आभासती । विपरीतमति देखतां ॥२१॥
पृथ्वीसंबंधी जलाशय । कां शरावादि सकल होय । घृततैलादि तृतीय । धातुमय अश्मादि ॥२२॥
ऐशा अनेक उपाधि । तितुकी प्रतिबिंबाची वृद्धि । वायुवेगें पृथग्विधि । चंचलता त्या होय ॥२३॥
स्वमाया म्हणिजे जीवोपाधि । आत्मप्रभा ते अहंबुद्धि । हें मी म्हणोनि नाना विधि । चेष्टा त्रिशुद्धि ममत्वें ॥२४॥
राग म्हणजे प्रीति प्रेमा । त्यासि वायूची उपमा । तेणें गुणें चांचल्यधर्मा । नाना कर्मां आचरवी ॥७२५॥
अविद्योपाधिविषयस्फुरण । तेंचि स्वमायारचित गुण । त्याच्या ठायीं प्रेमबंधन । देह होऊन परिणमे ॥२६॥
विषय आणि विषयज्ञान । संग्रहूनि अंतःकरण । पावे जन्म अथवा मरण । जीवलक्षण हें राया ॥२७॥
प्रेमास्पद होऊनि मन । मरणीं राखे जेथें स्मरण । तेंचि देह परिणमोन । मग जन्मोन व्यवहारे ॥२८॥
मग ते प्रीतीच्या वालभें । तेथ आत्मत्व उपलभें । अन्योन्य प्रेमभावक्षोभें । शुद्धि न लभे मागिली ॥२९॥
मग त्या देहाची जे जाति । ते आपुली म्हणे अहंमति । देहाची जे कुटुंबवसति । स्वप्रतीति कवळीत ॥८३०॥
देह दीर्घ पीन रोड । देह चतुर चपळ मूढ । पापी पुण्यात्मा कर्मजड । तें तें दृढ मी मानी ॥३१॥
जेव्हां जेथ ज्या देहाची प्राप्ति । तेथ त्याचीच अत्यंत प्रीति । श्वान शूकर हो भूपति । सुखसंपत्ति ते ठायीं ॥३२॥
त्याचि देहासि इच्छी राज्य । तोचि देह मानी पूज्य । त्याचि देहासि भक्ष्यभोज्य । रूपगामज्य मानितो ॥३३॥
देह टाकितां त्रिवेणीं । मनीं चिंतिलें पावती प्राणी । ऐशी ऐकतां ही कहाणी । देह कोणी न टाकिती ॥३४॥
अत्यंत प्रियकर जरी देह । तथापि काळें पापें क्षय । पुढें नूतन तैसाचि होय । तरी भय काय मरणाचें ॥७३५॥
देहरक्षणीं पाप घडे । देह तो यथाकाळें पडे । पाप अवश्य भोगणें पुढें । तरी हें कुडें न करावें ॥३६॥
जशी मार्गीची शिदोरी । बरवी संग्रहावी घरीं । विष मिळवितां माझारीं । तैं आपुला वैरी आपणचि ॥३७॥
म्हणोनि करितां शुद्ध पुण्यें । जन्मांतरीं सुख भोगणें । भूतद्रोह नाना विघ्नें । दुःखें दारुणें न चुकती ॥३८॥
ऐसा कथूनि सामोपाय । पुन्हा भेदाभिप्राय । इहामुत्र द्विविध भय । तो उपाय बोलतो ॥३९॥

तस्मान्न कस्यचिद्द्रोहमाचरेत्स तथाविधः । आत्मनः क्षेममन्विच्छन्द्रोग्धुर्वै परतो भयम् ॥४५॥

कृतकर्माचें फळ भोगणें । जयासि अचुक जन्ममरणें । त्यासि भूतद्रोह करणें । जीवें प्राणें अयोग्य ॥७४०॥
जैसा पक्षी गगनीं उडे । तो न पाहे पृथ्वीकडे । तैसा जन्ममृत्यूसि जो नातुडे । तयापुढें भव मिथ्या ॥४१॥
कां पृथ्वीवरी जो चाले । तो पाहूनि ठेवी पाउलें । ज्यासि भोगावें लागे केलें । तेणें द्रोहिलें न पाहिजे ॥४२॥
ज्यासि आपुलें क्षेम करणें । भूतद्रोह न कीजे तेणें । दर्पणींचें अलंकरणें । तेंचि लेणें स्वमुखाचें ॥४३॥
देहलोभें धरितां मोहो । संपादिजे भूतद्रोहो । तेणें वैरासि होय रोहो । तो द्वेष हो नुपसवे ॥४४॥
जयाचा द्रोह करणें घडे । तेंचि उसणें देणें पडे । परस्परें उतरे चढे । आंगगाडें चाकाचें ॥७४५॥
आपण ज्यां दिधला खेद । ते स्नेह सांडूनि करिती द्वंद । साधूनि करिती छेदभेद । आप्तवाद न धरिती ॥४६॥
साह्य करूनि बलिष्ठासि । वैर स्मरोनि निजमानसीं । संधि साधूनि एके दिवशीं । विपत्तीसी भेटविती ॥४७॥
आणि यमाची जाचणी । अचुक भोगावि मरोनि । कुंभीपाकादि नरकश्रेणी । तेथ कोणी न पवती ॥४८॥
पंचभूतें चंद्रसूर्य । काल आणि कर्तृहृदय । ऐसा नवांचा समुदाय । साक्ष होय शुभाशुभां ॥४९॥
म्हणोनि भूतद्रोहगुणें । पात्र होइजे यमयातने । मग तें अपकीर्तीचें जिणें । तुज हें करणें अनर्ह ॥७५०॥
ऐसा द्विविध भेदवाद । जो कां उभयभेदप्रद । तो उअपसंहरूनि कोविद । साम विशद संहरी ॥५१॥

एषा तवानुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा । हन्तुं नार्हसि कल्याणीमिमां त्वं दीनवत्सलः ॥४६॥

तूं तंव दीनदयाळ कंसराजा । प्राणिमात्रासि आधार तुझा । कृपापांगें पाळिसी प्रजा । हे तवानुजा प्रिया तुज ॥५२॥
तुझिये कृपेचें भाजन । कन्येतुल्य प्रतिपालन । बाला अज्ञान परम दीन । इचें हनन अनर्ह ॥५३॥
निरपराध हे वेल्हाली । अप्रतिकारी अचेतनपुतळी । ऐशी मारितां विवाहकाळीं । अकीर्तिटाळी वाजेल ॥५४॥
अष्टवार्षिकी कल्याणी । नववार्षिकी ते रोहिणी । दशवार्षिकी पाणिग्रहणीं । गौरी म्हणोनि बोलिजे ॥७५५॥
द्विजकुलींचे कुमारीस । अब्दमर्यादा एकादश । होतां स्पर्शला रजोदोष । नाम तीस वृषली हें ॥५६॥
वृषली म्हणजे शूद्रयाति । त्याचिसमान तिचा पति । हव्यकव्य त्याच्या हातीं । कदा न घेती सुरपितर ॥५७॥
हे तो यथोक्त कल्याणी । तुझी लडिवाळ धाकुटी बहिणी । प्रवर्ततां लक्ष्मीपूजनीं । तुज हे करणी अयोग्य ॥५८॥

श्रीशुक उवाच - एवं स सामभिर्भेदैर्बोध्यमानोऽपि दारुणः । न न्यवर्तत कौरव्य पुरुषादाननुव्रतः ॥४७॥

कौरवकुलवृद्धिगौरव । म्हणोनि नामें कौरव्य । त्या परिक्षितीसि श्रीशुकदेव । म्हणे अपूर्व हें राया ॥५९॥
मूर्खचित्ताचें समाधान । करूं न शके चतुरानन । शक्र भास्कर कां ईशान । वृथा श्रमोन रहाती ॥७६०॥
पंच लक्षणें सामोपाय । भेद उभय लोकींचें भय । बोधिलें तें वृथा जाय । न धरी सोय करुणेची ॥६१॥
कुरुभूषणा परीक्षिति । कंस बोधिला नानायुक्तीं ।जैसा असुर मनुष्यघाती । राक्षसवृत्ति निष्ठुर ॥६२॥
तैसें न मानीच दुरात्मा । जैसा दावाग्नि न करी क्षमा । न परतेचि कारुण्यधर्मा । दारुण यमासारिखा ॥६३॥
तेणें गजबजिला वसुदेव । कांहीं न चलेचि उपाव । कैसा देवकीचा जीव । श्रीकेशव रक्षील ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP