अध्याय १ ला - श्लोक २६ ते २९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


विष्णोर्माया भगवती यया संमोहितं जगत् । आदिष्टा प्रभुणांशेन कार्याथें संभविष्यति ॥२६॥

सावध ऐकिजे गीर्वाणीं । ऐशी वदे विरिंचि वाणी । जे कां वैष्णवी भवानी । विश्वमोहिनी जगदंबा ॥६३॥
महामोहाचें पाजूनि पेहें । विश्व विमोहिलें आहे । लाघवें ब्रह्मांड नाचविताहे । नाना देह लेववी ॥६४॥
लक्षचौर्‍यांशीं जीवयोनि । तितुकीं नटनाट्यें देवऊनि । खेळविते एकलेपणीं । जे गवसणी सत्तेची ॥५६५॥
ते वैष्णवी आदिमाया । आज्ञापिली अवतारकार्या । तीं तीं कार्यें साधावया । नंदसदनीं जन्मेल ॥६६॥
आदिपुरुषें आज्ञापिली । जे गुणत्रयाची माउली । विश्व जयेचे साउली - । माजीं आधारें निर्बुजे ॥६७॥
ते निजांशें भूमंडळीं । अवतरोनि दानव बळी । निर्दलूनार्थ करील कळी । श्रीवनमाळीक्षोभक ॥६८॥
तेचि होऊनि गगनवाणी । शंका ओपील कंसमनीं । भगिनीबंधुबालहननीं । पापश्रेणी तो करी ॥६९॥
देवकीगर्भाचें कर्षण । रोहिणीजठरीं तो घालून । गर्भगोपन करील ॥५७०॥
तेचि द्वास्थां पाडील भ्रांति । मथुरे गाढमूढ सुषुप्ति । यशोदेची हरील स्मृति । स्वप्रसूति विसरवी ॥७१॥
तेचि रुक्मिणीसत्यभामा । रूपें शिशुपालादि भौमा । रति क्षोभवूनि कामा । शंबरनामा निवटवी ॥७२॥
उषारूपें प्रक्षोभून । बाणबाहूंचें खंडण । द्रौपदीरूपें निर्दळण । करील पूर्ण कौरवांचें ॥७३॥
अस्तिप्राप्तीचेनि नांवें । जरासंध चढवूनि हांवे । काळयवनादि आधवे । दैत्य वघावे भूभार ॥७४॥
ऐशी अवतार अवधि । यदुकुमारांची बसवूनि बुद्धि । निर्दळूनि यादवमांदी । कार्यसिद्धि साधील ॥५७५॥
ऐशिया कार्याकारणें । आज्ञापिलीं नारायणें । अवतार शक्तीचें उपजणें । याचिकारणें गोकुळीं ॥७६॥

श्रीशुक उवाच - इत्यादिश्यामरगणान्प्रजापतिपतिर्विभुः । आश्वास्य चं महीं गीर्भिः स्वधाम परमं ययौ ॥२७॥

शुक म्हणे गा परीक्षिति । अभयें आश्वासूनि क्षिति । आज्ञापूनि देवांप्रति । गेला प्रजापति निजधामा ॥७७॥
सकळ स्वर्गाचिये मुकुटीं । सत्यलोक सत्य रहाटी । परम उत्कृष्ट याचिसाठीं । शुकवाक्पटीं वाखाणी ॥७८॥
यथार्थनामें सत्यभुवनीं । प्रवेशला पंकजयोनि । आज्ञेप्रमाणें निर्जरगणीं । अंशें धरणीं अवतरिजे ॥७९॥
ऐसें वर्तलें गीर्वाणीं । नृपा सांगोनि बादरायणि । म्हणे सावधान श्रवणीं । चक्रपाणिचरित्र ॥५८०॥

शूरसेनो यदुपतिर्मथुरामावसन्पुरीम् । माथुरान् शूरसेनांश्च विषयान् बुभुजे पुरा ॥२८॥

जेथ ध्रुवाचें अनुष्ठान । मोक्षलक्ष्मीचें अधिष्ठान । मथुरापुरी पुण्यपावन । जेथें यदुगण नांदती ॥८१॥
वृष्णिकुळीं शूरसेन । सत्त्वाथिला पुण्यपावन । यादवपति धन्य धन्य । मथुराभुवन तो वसवी ॥८२॥
शूरसेन देश सकळ । समग्र मथुरामंडळ । ऐसा अनेक देशपाळ । होता दळबळप्रतापें ॥८३॥
इत्यादि देशांचें शासन । करूनि भोगी शूरसेन । एथूनि कृष्णकथेचें कथन । अनुसंधान अवधारा ॥८४॥

राजधानी ततः साऽभूत्सर्वयादवभूभुजाम् । मथुरा भगवान्यत्र नित्यं सन्निहितो हरिः ॥२९॥

पुढें यादवकुळीं थोर । पृथक् झाले राज्यधर । नवमस्कंधीं तो विचार । पुनः विस्तार किमर्थ ॥५८५॥
मथुरा पूर्वीच पुण्यखाणी । तेथूनि झाली राजधानी । यादवकुळींच्या भूपाळगणीं । भोगभुवनीं सेविली ॥८६॥
नित्य सन्निध हरि । षड्गुणैश्वर्य जेथ वोगरी । कैवल्यद्वीपींची दुसरी । भवसागरीं तारिका ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP