अध्याय १ ला - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तत्र गत्वा जगन्नाथं देवदेवं वृषाकपिम् । पुरुषं पुरुषसूक्तेन चोपतस्थे समाहितः ॥२१॥

करूनि बाह्य शरीरशुद्धि । आसन वळिलें यथाविधि । विषयांपासूनि इंद्रियमांदी । आत्मसमाधीं परतविली ॥५०५॥
गोधनें विखरलीं डोंगरां । गोरक्ष वळूनि आणी अरा । करणें गुंतलीं विषयचारा । तेवीं धाता परतवी ॥६॥
पंचप्राणांचीं लावूनि दावीं । अंतरवृत्ति खुंटा गोंवी । बैसोनि रोवंथ करिती जेवीं । सुखसंभवीं मनाच्या ॥७॥
मग दोहती गोरससार तूप । निदिध्यासें उजळी दीप । प्रकाशे विधीचा साक्षेप । साक्षात्कारीं प्रवर्तला ॥८॥
ब्रह्मा झाला जरी मोठा । सहित सुरवरां श्रीकंठा । न साधितां अंतर्निष्ठा । न मुके कष्टा कर्माच्या ॥९॥
ब्रह्मा सगुण आकारवंत । तया अगम्य श्रीअनंत । म्हणूनि झाला समाहित । पुरुषसूक्त जपावया ॥५१०॥
जगत्पति जगन्नाथ । देवाधिदेव श्रीसमर्थ । आदिपुरुष पुरुषसूक्त - । पठणें स्तवित विधाता ॥११॥
निरुपाधिक जें कां सुख । तया सर्वगा नाम आक । धर्मरूप तेजें आक । तें वृषाक बोलिजे ॥१२॥
वृषाकपाणि वृषाकपि । एवं सर्वभोक्ता सर्वव्यापी । तया पुरुषसूक्ताच्या जपीं । स्तवी साक्षात् विधाता ॥१३॥

गिरं समाधै गगने समीरितां निशम्य वेधास्त्रिदशानुवाच ह ।
गां पौरुषीं मे श्रृणुतामराः पुनर्विधीयतामाशु तथैव मा चिरम् ॥२२॥

वेधा सांगे त्रिदशांप्रति । ऐकोनि वैष्णवी भारती । गगनगर्भीची आयती । बरवे रीतीं बोलिली ॥१४॥
ते समाधीच्या ठायीं । कानीं पडतां विरिंचि कायी । देवांसि बोलिला ते नवाई । श्रवणालयीं सांठला ॥५१५॥
म्हणे अमरहो ऐका मात । माझ्या मुखें श्रीअनंत । बोलवील जो वृत्तांत । सावचित्त तो ऐका ॥१६॥
देवल मिसें ठेविता फुलें । आंगीं वारें भरोनि बोले । कां नृपाचें निरूपिलें । प्रकट केलें अमात्यें ॥१७॥
कां पत्रीं लिहिले अभिप्राय । तें वाचकाचें बोलणें न होय । तैशी माझ्या मुखें जें जें काय । प्रकट होय ते हरिवाणी ॥१८॥
ते आदिपुरुषाची भारती । मजपासोनि बरवे रीतीं । ऐकोनि तैसेंतैसें पुढती । शीघ्रगतीं अनुष्ठा ॥१९॥
गुरु देव कां भूंपति । जे जे आज्ञा निरूपिती । शुभ आचरिजे शीघ्रगतीं । अशुभाप्रति त्रिप्रश्न ॥५२०॥
कंद मूळें फळ जळ । तीर्थ प्रसाद केवळ । हें सेववितां तत्काळ । विघ्नकल्होळ विलंबे ॥२१॥
शुभ सत्वर ससाक्षेप । अशुभीं कीजे कालक्षेप । ईश्वरकृपेचा लागतां दीप । होय लोप अशुभाचा ॥२२॥
म्हणूनि न करितां कालक्षेप । अचिरें आचरा हरिसंकल्प । ऐसा देऊनि निरोप । गोप्यागोप निरूपी ॥२३॥

पुरैव पुंसाऽवधृतो धराज्वरो भवद्भिरंशैर्यदुषूपजन्यताम् ।
स यावदुर्व्या भरमीश्वरेश्वरः स्वकालशक्त्या क्षपयंश्चरेद्भुवि ॥२३॥

न सांगता गर्भीची व्यथा । जेवीं जाणे गर्भिणी माता । आदिपुरुषें भूआकांता । न सांगतां ऐकिलें ॥२४॥
जो कां सर्वांतरनिवासी । सर्वव्यापक सर्वदेशीं । सर्वदा सर्व विदित ज्यासी । जो हृषीकेशी जगदात्मा ॥५२५॥
पाटें पाणी जेवीं माळी । पाववी सर्व झाडांमुळीं । फुटलें पसरलें सांभाळी । तेवीं वनमाळी स्वधर्मा ॥२६॥
धर्मसंस्थापनेचा जगीं । अभिमान वाहे श्रीशार्ङ्गी । धर्म भंगे युगींयुगीं । लगबगीं अवतरे ॥२७॥
तेणें न सांगतां धराज्वर । पूर्वीं अवधारिला सविस्तर । तुम्ही यदुकुळीं सत्वर । सर्व सुरवर अवतरा ॥२८॥
पुण्यें जोडिली स्वर्गसंपत्ति । तें सांडोनि कैसें जावें क्षिती । ऐशी न करा तुम्ही विनति । ऐका उपपत्ति यदर्थी ॥२९॥
कुंडीं असतांचि पावक । वेगळा कीजे स्फुलिंग एक । दोहीं ठायीं सम दाहक । अंशविवेक तेवीं करा ॥५३०॥
सांडूनि स्वर्गीं अमरभोग । कां भोगिजे जरारोग । हा संशय न शिवो अंग । तो प्रसंग अवधारा ॥३१॥
स्वर्गीं कीजे सुधापान । विनोदवाटिका नंदनवन । रंभाऊर्वशीचें मैथुन । व्योमयान वाहनार्थ ॥३२॥
इतुकें स्वर्गीं आहे सुख । दैत्यदानवक्षोभें दुःख । नित्य निर्दोष निरुपाधिक । मुख्य चित्सुख नेणा रे ॥३३॥
हुंडी न म्हणिजे पत्रखंड । शिक्षा न म्हणिजे शासनदंड । भेषज न म्हणिजे कडू गोड । कर्म अवघड न म्हणावें ॥३४॥
जेणें चित्सुखाची प्राप्ति । त्या जन्माची न म्हणिजे क्षिती । कुर्वंडूनि स्वर्गसंपत्ति । भाग्यें क्षिति सेवावी ॥५३५॥
नेत्र बांधोनि बांधिला शाळे । मुखीं आढळे तें त्या कळे । अनेक रत्नांचे सोहळे । केवीं आंधळे भोगिती ॥३६॥
पंक्ती दिव्यान्नें सेविती । रोगिया पथ्याची परिमिति । अव्युत्पान्नापाशीं पोथी । परि ते व्युत्पत्ति तो नेणे ॥३७॥
देऊनि अमरत्वाची बुंथी । भोगवी स्वर्गीची संपत्ति । देवमायेची हे ख्याति । कदा कल्पांतीं नुमजवी ॥३८॥
श्रीमंत सेविती परमान्न । तें भक्षितां वमी श्वान । मनुष्याचें खातां वमन । तेणें श्वान सुखावे ॥३९॥
दिव्य भोगेशीं इंद्रभुवन । तें विरक्त मानिती वमन । तेणें तोषती अज्ञान । हीन दीन अविवेकी ॥५४०॥
धरूनि नेले राजद्वारीं । नियोजिले कारागारीं । राजैश्वर्यभोगाची परी । तया दूरी बहुतेक ॥४१॥
दुष्टां निगडीं पदबंधन । एका धामीहूनि वर्जिती गमन । एका दृष्टीचें संरक्षण । परि निर्मुक्तपण तें नोहे ॥४२॥
नेमूनि दिधलें तें तें खाती । नेमिल्या ठायापर्यंत जाती । व्यापक सर्वैश्वर्यगति । तयांप्रति दुर्लभ ॥४३॥
तैसें दैवी मायें तुम्हांसि केलें । स्वर्गीं नरकीं संस्थापिलें । स्वकर्मभोगीं नियोजिलें । पुण्यपापभोगार्थ ॥४४॥
तया बंधाची निवृत्ति । होणार तरी हे जन्मक्षिति । फुकासाठीं चारी मुक्ति । या श्रीपतिसहवासें ॥५४५॥
हरिजन्माचा समारंभ । तेव्हां सलोकतेचा लाभ । बालक्रीडेचें वालभ । तेव्हां सुलभ समीपता ॥४६॥
जेव्हां वळाल गोधनें । तेव्हां देवें सरूपता तुमची घेणें । तैशीच आम्हांस आपुली देणें । वत्सहरणप्रसंगें ॥४७॥
यदुकुळीं अवतरावें ही वाणी । तरी कां गोवळ निरूपणीं । ऐशी आशंका मानील कोणी । तिहीं कडसणी ऐकावी ॥४८॥
नंदाद्या ये व्रज गोपा । शुक या श्लोकें सांगेल नृपा । तो अभिप्राय भिडवूनि रूपा । आणूनि सोपा बोलिलों ॥४९॥
एवं यादव आणि गोपाळ । देवची अवतरावे सकळ । म्हणोनि विधीच्या मुखें वर्णिलें फळ । हें भूतल वसतीचें ॥५५०॥
म्हणाल कित्येक काळवरी । सुलभ होईल श्रीहरि । तेंही ऐका वरच्या परें । सविस्तरीं बोलतों ॥५१॥
तृनें गादलिया धरणी । ग्रीष्मक्षोभें शोषी तरणि । पचनपावकांमिलवूनि । करी जाळूनि निःशेष ॥५२॥
तैसा जोंवरी अवनीभार । उतरावया जगदीश्वर । स्वकाळशक्ति महाक्रूर । क्षोभवील स्वसत्ता ॥५३॥
भूभारुतरावयाचेनि मिषें । भूमी क्रीडतां मनुष्यवेषें । तुम्हीं श्रीहरिसहवासें । सुखसंतोषें क्रीडावें ॥५४॥
तो ईश्वराचा ईश्वर । जोंवरी उतरी धराभार । तोंवरी तुम्ही आज्ञाधर । होऊनि सहचर हरि सेवा ॥५५५॥
नित्य नूतन करी लीला । अलौकिक दावील खेळा । खेळतां मारील दैत्यमेळा । हरि यदुकुळा येऊनि ॥५६॥
म्हणाल यादवांचीं कुळें बारा । कोण गणी त्या विस्तारा । कोठें जन्म परमेश्वरा । त्या विचारा परिसावें ॥५७॥

वसुदेवगृहे साक्षाद्भगवान्पुरुषः परः । जनिष्यते तत्प्रियार्थं संभवन्तु सुरस्त्रियः ॥२४॥

शूरसेनाचा औरस । जैसा सद्भाव स्वप्रकाश । तया वसुदेवसदनीं हृषीकेष । आदिपुरुष प्रकटतो ॥५८॥
जो ईश्वराचा ईश्वर । मायाचक्राहूनि पर । तो साक्षात्परमेश्वर । घेतो अवतार वृष्णिकुळीं ॥५९॥
तयाचें करावया प्रिय । सुरस्त्रियांचे समुदाय । भूतळीं उपजोत आनंदमय । आणीक काय विधि बोले ॥५६०॥

वासुदेवकलानन्तः सहस्रवदनः स्वराट् । अग्रतो भविता देवो हरेः प्रियचिकीर्षया ॥२५॥

ज्यावरी हरि करी शयन । पृथ्वी ज्याचें मौलीभूषण । वासुदेवकला संकर्षण । त्याचें जनन हरी आधीं ॥६१॥
हरीसि करावें संतुष्ट । हेचि इच्छा धरूनि श्रेष्ठ । श्रीअनंत भगवन्निष्ठ । होईल प्रकट हरी आधीं ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP