तत्राभवद्भगवन्व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानोऽनपेक्षः ।
अलक्ष्यलिंगो निजलाभतुष्टो वृतः स्त्रीबालैरवधूतवेषः ॥१९॥

तोषोनि रायाचिया प्रश्नें । मुनि विवरिती यथाज्ञानें । कोणी म्हणती मोक्षयज्ञें । योगाभ्यासानें पैं एक ॥२००॥
एक म्हणती पुरश्चरणें । एक म्हणती तनुशोषणें । तपश्चर्या निरपेक्षमनें । कीं अनशनें कोणी म्हणती ॥१॥
एक म्हणती विविध दानीं । एक म्हणती श्रुतिचिंतनीं । एक प्रणवोच्चारपठणीं । तीर्थसेवनीं पैं एक ॥२॥
ऐसें विवरितां समस्त । तों ब्रह्मसभेंत अकस्मात । प्रकट झाला व्याससुत । उडुगणांत जेवीं तरणी ॥३॥
यदृच्छेंकरूनि फिरतां मही । प्रकट न कळे कोणा कांहीं । स्वलाभें संतुष्ट सर्वदाही । यास्तव देहीं निरपेक्ष ॥४॥
जो न गवसे लोकरहाटी । भोंवतीं पोरें धांवती पाठी । भाग्यें परीक्षितीचे संकटीं । पडिला दृष्टी योगिराट् ॥२०५॥
षोडश वर्षांचा सुकुमार । आजानुबाहु विशाळनेत्र । श्याम सुंदर दिगंबर । तपोभास्कर उदेला ॥६॥
त्यासि देखोनि मुनि समग्र । उठोनि घालिती नमस्कार । विष्णुदर्शनीं जेवीं अमर । तेवीं सादर सप्रेम ॥७॥
परीक्षितीनें शुकदर्शनीं । परमाल्हाद मानिला मनीं । बैसवूनियां दिव्यासनीं । अभिवंदूनि पूजिला ॥८॥
बालकें नरनारी अज्ञान । शुकामागील प्राकृतजन । देखोनि सभेचा सन्मान । गेला परतोनि मागुता ॥९॥
मग राज जोडूनि अंजलीपुट । वंदी मस्तकें पाडपीठ । म्हणे माझें भाग्य श्रेष्ठ । स्वयें वैकुंठ तुष्टला ॥२१०॥
तुझिया दर्शनें योगीश्वरा । प्रलय महापातकां घोरां । विष्णूपासूनि जेवीं असुरां । गयप्रवरादिकांचा ॥११॥
आजि गोविंद तुष्टला स्वयें । म्हणूनि देखिले तुमचे पाय । येर्‍हवीं आम्हांसि कळतें काय । गूढ अव्यय हें रूप ॥१२॥
आम्हां ऐशिया लोकांप्रति । सर्वदा असतां सावध वृत्ति । अव्यक्तलिंग तुमची गति । दुर्लभ प्राप्ति सर्वथैव ॥१३॥
विशेषेंकरूनि मरणकाळीं । असतां मोक्षइच्छा झाली । ऐशिये समयीं दृष्टि पडली । चरणकमळीं हें भद्र ॥१४॥
अनंतकल्पींचीं सुकृतें सफळ । तेणें दुर्लभ साधिली वेळ । आतां मरणार जो केवळ । त्यासि कर्तव्य अमल कोणतें ॥२१५॥
काय ऐकावें जपावें । काय स्मरावें ध्यावें भजावें । अंतकाळीं काय करावें । मर्त्यलोकीं मनुजांहीं ॥१६॥
इतुकेंच पुशिलें स्वामीप्रति । सद्यचि कथावें कृपामूर्ति । पुन्हा दुर्लभ दर्शनप्राप्ति । म्हणोनि विनति करीतसें ॥१७॥

श्रीशुक उवाच - वरीयानेष ते प्रश्नः कृतो लोकहितं नृप ।
आत्मवित्संमतः पुंसा श्रोतव्यादिषु यः परः ॥२०॥

शुक म्हणे गा भारतोत्तमा । अमृतावाप्तिकल्याणकामा । वरिष्ठ प्रश्न करूनि आम्हां । आनंदधामा प्रकाशिलें ॥१८॥
आत्मनिष्ठांसि अभीष्ट । श्रवणादि साधनांमाजी जें श्रेष्ठ । तें तूं ऐकें एकनिष्ठ । तव अभीष्ट कथिजेल ॥१९॥
अजें आत्मभूलांगीं कथिलें । तेणें नारदा निरूपिलें । नारदें विरक्त देखोनि भलें । गुह्य प्रबोधिलें मम जनका ॥२२०॥
व्यासें घालितां माझिये श्रवणीं । म्यां दृढ धरिलें अंतःकरणीं । तें तूं कौरवचूडामणी । ऐक निर्याणीं अमृतार्थ ॥२१॥
ऐसें बोलुनि व्याससुत । द्वितीयादि नवमस्कंधपर्यंत । बोलिला श्रीमद्भागवत । तथापि तृप्त नव्हे राजा ॥२२॥
श्रीकृष्णाचें जन्मकर्म । लीला लावण्य गुण विक्रम । प्रेमळ परीक्षिति श्रवणकाम । त्या कथिले रविसोमान्वय ॥२३॥
तरी रायाची न पुरे आर्ति । म्हणोनि प्रश्न करी पुढती । म्हणे कैवल्यें अघदुर्गति । श्रीकृष्णकीर्ति निवारी ॥२४॥
कलि बुडवितां शौनकप्रमुखां । सूतें बोधिली हरिगुणनौका । नारदें व्यासाचिया दुःखा । ज्या व्याख्यांनें निरक्षिलें ॥२२५॥
तो भागवतींचा दशमस्कंध । ज्या माजीं कृष्णावतार शुद्ध । साद्यंत वर्णिला प्रसिद्ध । तो करीं तूं विशद दयार्णवा ॥२६॥
येणें भवरोगनिवृत्ति । श्रवणें कीर्तनें विघ्नोपशांति । अर्थावबोधें अमृतावाप्ति । श्रोत्यां वक्त्यां प्राश्निकां ॥२७॥
ऐसें ऐकोनि संतवचन । सद्गुरु गोविंद अभिवंदून । म्हणे आज्ञापिलें जें मम कल्याण तें कृपेनें श्रवण करावें ॥२८॥
नव्वद अध्याय कृष्णकीर्ति । त्यामाजीं प्रथम धरेची विनति । ऐकोनि विधीनें केली स्तुति । कंसा नभोक्ति भयजनक ॥२९॥
गर्भस्तुति द्वितीयाध्यायीं । तृतीयीं जन्मला शेषशायी । कंसें विवरूनि हरिवधोपायीं । दूत प्रेरिले चतुर्थी ॥२३०॥
पंचमादारभ्य गोकुलभुवनीं । जन्मोत्साह नंदसदनीं । षष्ठीं पूतनेलागुनी । कैवल्यदानीस्तनपान ॥३१॥
सप्तमीं शकट तृणावर्त्त । भंगूनि यशोदेसि अत्यद्भुत । जांभयीमिषें विश्व समस्त । निजवदनांत हरि दावी ॥३२॥
अष्टमामाजीं जातकर्म । रिंगणादि बालक्रीडा उत्तम । भृद्भक्षणमिषें परम । विश्वरूप पुन्हा दावी ॥३३॥
नवमाध्यायीं दामोदरा । उखळीं बांधी नंददारा । दशमीं केलें गुह्यकोद्धारा । यमलार्जुन उन्मूलृनि ॥३४॥
इतुकी गोकुळीं करून कीर्ति । एकादशीं बल्लवा चित्तीं । उत्पातभयाची प्रेरूनि खंती । गेला श्रीपति वृंदावना ॥२३५॥
एकुणचाळीसपर्यंत पुढां । कथिली वृंदावनींची क्रीडा । ब्रह्मादि सुरवर लाविले वेडा । असुर होडां निर्दळिले ॥३६॥
यमुनागर्भीं भगवद्ध्यान । देखूनि अक्रूरें केलें स्तवन । तो चाळिसावा अध्याय पूर्ण । मथुराक्रीडन याउपरी ॥३७॥
अकरा अध्याय मथुरापुरीं । कंसवधादि क्रीडा करी । पुढें द्वारकेमाझारीं । समाप्तीवरी हरिलीला ॥३८॥
ऐका व्याख्यानग्रथनरीति । श्लोकोपक्रम उपसंहृति । द्विवार श्लोकार्थ संकेतीं । ते पुनरुक्ति न मानावी ॥३९॥
मध्यें विस्तृत विवरण । पदसंदर्भनिरूपण । एवं निःसंशय व्याख्यान । सदनुशासन हरिवरद ॥२४०॥
आतां सद्गुरुसंतसज्जनां । अपत्याची हे प्रार्थना । विघ्न भंगूनि देइजे प्रज्ञा । समर्थ अज्ञा व्याख्यानीं ॥४१॥
ऐकोनि उभयवंशकथन । राजा चमत्कारला पूर्ण । तेणें आनंदें करी प्रश्न । श्रीकृष्णकीर्तनश्रवणार्थी ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP