TransLiteral Foundation

शाहीर हैबती - कवन

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


कवन

अर्थशून्य मनाचें चळण । ऊर्ध्व शून्य दुजा तो पवन ।
जिवाची उत्पत्ती मायामय । प्रवाही कारण ।
निश्चय मसुर पांडुरंग पाही । महाशून्य तेच वीट जाण ।
ऐशी शून्याची वाट दाविली । तोची सद्गुरु संपन्न ।
कृपाहस्त शिरीं ठेवुनि दाविली अंतरींची खूण ।

( शून्याकार परब्रह्माचा मार्ग जो दाखवितो तो सद्गुरु होय, असें हैबती या कवनांत सांगतो. )


धन्य आजी सद्गुरुपद जोडिलें ॥ध्रु०॥
सद्गुरुची होतां भेटी । पवित्र झाली माझी रहाटी ।
अचाट कर्म दंडिलें ॥१॥
धन्य सद्गुरुची कला । निजपद दाविलें डोळा ।
आनंदमय बुडालें ॥२॥
सद्गुरु धरितां हातीं । पालटली ही मनोवृत्ती ।
षडवैरी गाडिलें ॥३॥
हैबति पूर्ण माऊली । नाथ हरिनें कृपा केली ।
पूर्वस्थळा धाडिलें ॥४॥


अवघड गुरुरायाचें राहणें मोठें कठीण । रान आऊट हताची गणती । तयामध्यें कीं सावज फिरती । तीं परमार्थाच्या वाटेवरती । बैसली मुख पसरून ॥ध्रु०॥
ज्याला सद्गुरुकृपा नाहीं । तो रान धुंडाया जाई । तो जिता मेला जाळीत गुंतून राही । व्याकूळ होऊन ॥१॥
ज्यानें ज्ञानकुर्‍हाड घेतली । त्यानें अवघी झाडी तोडली । सावजे गेली केले मैदान ॥२॥
ज्यानें रान मैदान केलें । ते आत्मस्वरूपी मिळालें । नाथकृपेनें हैबती बोले । शाश्वतिचें वचन ॥३॥


शिष्याप्रती गुरुनाथ कथितो ब्रह्म स्वरूप ज्ञान ।
सगुण आणि निर्गुण अंतरीं घे हें समजून ॥ध्रु०॥
सगूण म्हणजे ॐकार गुणास अकार विश्वाचा ।
धारण केला ज्यानें ठाव तो सगूण ब्रह्माचा ।
जेथून जाहला असें पहातो उगम त्रिगुणाचा ।
रजतमसत्त्वापासून झाला आकार पिंडाचा ।
पिंडी पद तें पाहा अनुभव घेया स्वरूपाचा ।
आत्माराम तो साक्षी असे या तीनही अवस्थांचा ।
“ ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म ” हें बोले भगवान ॥ध्रु०॥
सगुण साक्षात्कार झाल्यावर मग निर्गूण ।
होय बोध तो सगुण कदा नोहे जाण ।
म्हणून आधीं सगुण ओळखी स्वात्मप्रचितीनं ।
ओळख पटली त्यासी म्हणती तें झालें आत्मज्ञान ।
षड्शास्त्र संभव असे जरी वेदवक्ता पूर्ण ।
आत्मज्ञानाविण जळो तयाचें धिक् जन्म जाण ।
काय करावें बहुत ज्ञान तें न कळे गुरु खूण ।
आतां ऐक निर्गुण बोध घे ओळखून हृदयांत ।
चौ देहामधीं परात्पर तो दावी गुरुनाथ ।
ब्रह्मांडिंचा चतुर्थ देह महाकारण म्हणत ।
त्यांत असे वास्तव्य तेंचि निर्गुण जाण खचित ।
अक्षर ब्रह्म म्हणती अथवा उनमनाही तेथ ।
पूर्ण जरी गुरुकृपा होईल तर येईल प्रचित ।
निरविकार निवृत्ती पदी त्या वृत्ती करी लीन ।
अहंभावें स्फुरण तेची माया जेथुन झाली ।
स्फुरण साक्षीत ओळखी हीच गुरुकिली ।
ज्ञान ज्ञानादित अशाही निज वस्तु कळली ।
आपण तोचि झाल्या द्वैत भावना विरून गेली ।
म्हणे हैबति अद्वैतबुद्धि त्या समरसली ।
परब्रह्म मग वस्तु निरंजन तेचि होऊन ठेली ।
द्वैताद्वैत भान हरपलें गेलें मी - तूंपण ॥

( सगुण - निर्गुणाचा बोध झाल्यावर द्वैतभाव नाहींसा होतो, यावरून हैबती हा अद्वैतमताचा पुरस्कर्ता होता असें दिसतें. )


( गुरुमार्ग )
आपुल्या अर्तिचे देणें देतासी । श्रीसमर्थ सद्गुरु
ध्यानी । तुला मिळविले आपल्या पणी । श्रीसद्गुरुनी ।
दिले बीजमंत्र अक्षर कर्णी पुटी पेरुनी । दाविले
नयनी । उद्धारुनी । स्थूल सूक्ष्म कारण ते तिन्ही ।
देह सारुनी । वस्तिशी केले महा कारणी । ती इति
उन्मनी सतरावी संजीवनी । तया सानंद उन्मनी ।
सहस्रदळा वरुते । प्रतिबिंब भासे दर्पण ॥ध्रु०॥
अनुहत ध्वनी वरती । चंद्रमा आहे मरुथळा ।
अनु आग्रहा समगति । तयामधुनि नेलें मजप्रति ।
औट पिटाचे वरी दैवते पाच असें भासती ।
परंतु एकरूप असती । औट पिटाखाली राहिले
नेले मज वरले खणी ॥ध्रु०॥
तेथुन पश्चिम मार्गांहुन । गगन दिसे । एकली एकच
सुंदर असे । मार्गच नाहीं तेथें । जावें कोण्या युक्ति
कैसे । म्हणून शुन्यक चढतसे । उर्ध्व चिनमनी
नेत्रतुल्य असे । पुढें तिचें फळ भोगून जात असे ।
ते नर नाहीं नपुंसक असे । झाले अवघे पाणि ॥ध्रु०॥
तया नरेशी आंग मधुनी वाट दावील ।
लोट स्वरूपाची ही लागली । तया ठिकाणीं शुद्ध
ब्रह्म निर्वाण । वस्तु सापडली । ज्यातिमध्यें
समावली । हैबती म्हणे हित करारे सद्गुरु ॥ध्रु०॥


( गुरुमार्ग )
गुरुमार्ग मना सावध राहे स्वरूपीं अक्षय ब्रह्म स्मरूनि ।
निशि दिनी मनी ध्यान असु दे गुरुपद आठवोनी ।
भेट भ्रमातें सोडी निरंजन नाथपदा नमुनी ।
परब्रह्म तूं पूर्ण परात्पर ध्यानी हेंचि धरूनी ।
अव्यक्त ब्रह्म हें व्यक्तिस आलें विश्व स्वरूप मानी ।
निर्गुण तेची सगुण झाले अशी वेदवाणी ।
निराकारी आहाकार जेवी ब्रह्मी माया राणी ।
ॐकार झाला पाहतां दिसतो जैसा सुवर्णी ।
तरंग जैसा सोडून नाहीं आंत बाहेर पाणी ॥धृ०॥
पाण्यापासुनि गार झाली गारेमध्यें पाणी
तंतूपासुनि पट झाला पटी न दुजे तंतूवांचुनी ।
मृत्तिकेचा घट, घटीं मृत्तिका समजोनी ।
ब्रह्मापासून विश्व झालें ब्रह्मरूप मानी ।
आकाशापोटीं ढग येती जाती ।
जाती विरुनी तेवी ब्रह्मी विश्व होतसे नाथ असें मानी ।
होत जात हे विकार निर्विकार नसे म्हणुनी ।
होत जात कल्पना ज्ञानानें होत जात त्यासवे ।
जागृतीमाजी इंड्रिय राहती त्यासी जाणे स्वभावे ।
हे माया जेथुनि झाली । स्फुरण साक्षीत ब्रह्म ओळखी
हीच गुरुकिली । ज्ञाना ज्ञानातीत अशी निजवस्तु
जरी कळली । आपण तेचि झाल्या द्वैत भावना विसरून गेली ।
म्हणे हैबती अद्वैतबुद्धि समरसली ।
परब्रह्म मग वस्तु निरंजन तेची होऊन ठेली ।
द्वैताद्वैत मग भान हरपले गेले मी - तू पण ॥


( साकी )
धाव पाव सद्गुरू दयाळा तारका गोविंदा !
तुझें नाम स्मरितां साधुजन गेले वैकुंठीं निजपदा ॥
xx सहा, चार, आठरा, भागले अंत लागेना तुझा कदा ।
बोले गुणी हैबति देवा तुझे चरणावर मस्तक सदा ॥


पार्थ सखया देवकीतनया धाव पाव तूं लौकरी ।
दीन जनकारणें येवुनी उभा राहिला विटेवरी ।
भक्तासाठीं होऊन कष्टी कर ठेवुनी कटेवरी ।
गुणी हैबति म्हणे चला जाऊं पांडुरंगासी पाहुं तरी ॥१॥


पंढरीनाथा श्रीभगवंता नाम तुझें अमृत ।
उदार देहाचा देता झाला तरले साधुसंत ।
भक्तासाठी धरला अवतार या कलींत ।
करा दासावर दया महाराज रुक्मिणीच्या कान्त ।
प्रसन्न नाथ महाराज हैबती गातो नीत ।
धरा गुरूचे पाय तुम्हां दावी विठ्ठलाची मूर्त ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-16T03:39:04.6330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

यादवां कुला नाशाक कांडण पुरो

  • ( गो.) यादवांच्या कुळाचा नाश व्हायला फक्त मुसळ पुरें. सर्व यादव प्रभास क्षेत्रीं एका मुसळाच्या निमित्तानें आपापसांत भांडून नाश पावले या कथेवरुन ही म्हण प्रचारांत आली. क्षुल्लक गोष्टीसाठीं आपापसांत भांडून सर्वनाश करुन घेणार्‍या भाऊबंदांना उद्देशून म्हणतात. 
RANDOM WORD

Did you know?

चातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site