मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
आगबोटीच्या कांठाशीं

आगबोटीच्या कांठाशीं

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


तरंग पहिला
श्लोक
अहा ! गे सृष्टीच्या वरतनु सुते ! निर्भयपणें
पहा अब्धीच्या या तरल लहरीचें उसळणें ! -
मनोराज्यीं जैशा विविध हृदयीं क्लाप्ति
उठती तशा ना अब्धीच्या तरल लहरी या विलसती ? ॥१॥
मनोराज्याला या बघ जलधिच्या, फार विरळे ! ’
कशाला हें तूतें फुकट म्हटलें मी ? नच कळे !
स्वयें अब्धीला तूं बघत असतां पाहुनि, मुळीं,
‘ सुता तूं सृष्टीची ’ मम हृदयिं ही मूर्तिं ठसली. ॥२॥
निसर्गोद्यानीचे अमृतलतिके ! केंवि दिसती ?
कशा या सिंधूच्या चपल लहरी गे उगवती ? -
जशा कांहीं नाड्या अनवरत देहांत उडती
तशा ना सिंधूच्या चपल लहरी या उचलती ? ॥३॥
कसा गे अस्ताला द्युतिपति अहा ! हा उतरतो ?
कसा या दिग्भागीं सदरुणपणा हा पसरतो ? -
जणों, सोडोनीयां धरणिवनिता ही, दिनमणी
विदेशाला जातो, प्रकट करितो राग म्हणुनी ! ॥४॥
पहा आकाशीं गे सुभग तरुणी, या दिनकर -
प्रभेच्या लालीनें खुलत असती हे जलधर !
जसे क्रीडाशैल त्रिदशललनांचे तळपती !
जशीं केलिद्वीपें अमरमिथुनांचीं चक्रमती ! ॥५॥
जिथें सौन्दर्याची तरुणि ! परमा कोटि विलसे,
जिथें आनन्दाची अनपकृत ती पूर्तिहि वसे,
अशा या आकाशोदधिमधिल या द्वीपनिचयीं
रहायाचें तूझ्या अभिमत असे काय हृदयीं ? ॥६॥
मलाही या पृथ्वीवरिल गमतें गे जड जिणें !
इथें या दुःखानें सतत मनुजांला दडपणें !
इथें न्यायस्थानीं अनय उघडा स्वैर फिरतो !
नरालागीं येथें नरच चरणांहीं तुडवितो ! ॥७॥
म्हणोनि, आकाशोदधिमधिल त्या द्वीपनिचया
निचाया, टाकूं या प्लुति अनलनौकेवरुनि या ! -
शरीरें जीं दुःखप्रभव मग तीं जातिल जलीं !
सखे ! स्वात्मे द्वीपें चढतिल पहाया वर भलीं ! ॥८॥
जरी दुःखाचें हें निवळ अवघें सर्व जगणें,
तरी या देहाचा सुखदचि असे त्याग करणें !
सुखासाठीं एका सतत झटतों आपण जरी,
तरी देहत्यागें सुख अनभवूं आपण वरी ! ॥९॥
अशुद्ध स्वार्थें जीं नयनसलिलें मानुष सदा,
शिवायाची देहा मग अपुलिया नाहिंत कदा !
जलस्था त्या देवी, फणिपति सुता सुंदरमुखी,
स्वबाष्पें या देहांवरि हळूहळू ढाळीतिल कीं ! ॥१०॥
पबालांच्या शय्ये निजवितिल त्या देवि अपणां,
प्रबालांला ज्या हा त्वदधर गडे ! जिंकिल पणां; -
तशीं मोत्यांची त्या पसरितिल गे चादर वरी,
सरी ज्या मोत्यांना न तव रदनांची अनुभरी ! ॥११॥
शिराखालीं तूझ्या भुज मम गडे ! स्थापितिल हा,
तसा माझ्या कण्ठीं कर तव सखे ! सुन्दर, अहा !
जलस्था त्या देवी चरण अपुले गुंतवितिल,
मुखें लाडानें त्या निकट अमुचीं स्पर्शवितिल ! ॥१२॥
अशा थाटानें त्या निजवितिल गे सागरतलीं,
नसे याचेमध्यें नवल विमले ! जाण मुदलीं,
जरी या रीतीचें शयन अपुलें योग्य न इह,
नरांच्या जिव्हा तें म्हणतिल जरी पाप अहह ! - ॥१३॥
पयःस्था त्या देवी, फणिपतिसुता पंकजपदीं,
स्वयंभो सृष्टीचे नियमचि सदा मानिति सुधी.
स्वयंभू स्रुष्टीचे नियम सुधरूं पाहत असे
नराच्या ऐसा या कवण दुसरा मूर्ख गवसे ? ॥१४॥
पयोदेवी तूझा बघुनि कबरीपाश निखिल
स्ववेणीसंहारा धरतिवरतीं त्या करतिल; -
तुझी नेसायाची बघुनि सगळी मोहक कला
स्ववस्त्रप्रावारीं उचलतिल गे ती अविकला. ॥१५॥
कदाचित् त्या देवी, अणि, फणिमणींच्या पण मुली,
सजीव प्रेतें तीं करितिल गडे ! दिव्य अपुलीं ! -
पयोदेवी तेव्हां विचरशिल तूं सागरतलीं;
तुझे संगें मीही विचरिन पयोदेव कुशली ! ॥१६॥
प्रबलांची तेथें विलसित असे भूमि सुपिक,
पिकें त्या मोत्यांचीं विपुल निघती तेथ सुबक,
सुवर्णाचीं झाडें, वर लटकती सुन्दर फळें
फुलेंही रत्नांचीं; बघुनि करमूं काळ कमळे ! ॥१७॥
समुद्राच्या पृष्ठीं सखिं ! बघत बालार्कसुषमा
उषीं बैसूं, त्याच्या अनुभक्ति मंदोष्ण तिरमा !
धरूं दोघें वस्त्रा, जवपवन कोंडूं अडवुने,
शिडाच्यायोगें त्या फडकत सरूं सिंधुवरुनी ! ॥१८॥
कधीं लीलेनें तूं बसशिल चलद्देवझषकीं,
फवारे तो जेव्हां उडविल जलाचे मग सखी -
तधीं दावायाला तुजसि मघवा प्रेम अपुलें,
स्वचापाचें तूझेवरि धरिल गे तोरण भलें ! ॥१९॥
कधीं कोणी राष्ट्र प्रबल दुसर्‍याला बुडविण्या,
जहाजें मोठालीं करिल जरि गे सज्ज लढण्या;
तरी, सांगोनीयां प्रवर वरुणाला, खवळवूं
समुद्रा, तेणें त्या सकल खलनौका चुथडवूं ! ॥२०॥
गुलामां आणाया निघतिल कुणी दुष्ट नर ते,
तरी त्यांचीं फोडूं अचुक खडकीं तीं गलबतें ! -
नरांलागीं त्या गे त्वरित अधमा ओढुनि करीं
समुद्राच्या खालीं दडपुनि भरूं नक्रविवरीं ! ॥२१॥
प्रकारें ऐशा या जरि वरुणराज्यांत कुशले !
वसूं आनंदानें समयगणती जेथ न चले;
तशी त्या आकाशोदधिमधिल त्या द्वपिनिचयीं
......    .......     .......    .......    ...... ॥२२॥
शिरीं त्या मेरूच्या विलसत असे नन्दनवन;
अधस्तात् शोभे ती अमरनदि तद्बिम्ब धरून;
वनीं त्या देवांच्यासह अमृततें प्राशन करूं !
तशीं रम्भासंगें चल ! सुरनदीमाजि विहरूं ! ॥२३॥
डिसेंबर, १८८७.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP