श्री कपिलेश्वराचीं पदें
पद १ लें -
नमन तुज कपिलेश्वर देवा । देइं रे मज आत्म भजन सेवा ॥धृ०॥
येइं रे वेगीं धांवुनि उमा रमणा । करुं रे कसि तुजविण मी क्रमणा ॥न०॥१॥
यावया तुज उशिर जरी ऐसा । गावया गुण धीर मजला कैसा ॥न०॥२॥
चरणिं विष्णु कृष्ण जगन्नाथा । दाखविं मज प्रिय निज गुणगाथा ॥न०॥३॥
पद २ रें -
कपिलेश्वर स्वामी नमन तुला । आवरेना मन ये रे ये रे झडकरिं ॥धृ०॥
सदय हृदय निज उदय सदोदित, हृदयिं करुनि देह मीपण हें वारीं ॥क०॥१॥
नायकसी अजुनि काय पाहसि, प्रभु पाय दाखविं वय जाय कृपा करिं ॥क०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ मज, भेट देइं रे नित्य पाहुं डोळे भरी ॥क०॥३॥
पद ३ रें -
प्रभो कपिलेश्वर महाराजा । करिसि तूं वास हृदयिं माझा ॥धृ०॥
वामांकि गिरिजा धरिसि सदा । नमन तुझें नित्य तुझ्याचि पदा ॥म०॥१॥
जप तप साधन नाम तुझें । ना मज प्रियकर अन्य दुजें ॥म०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथाचा । सदोदित आपण प्रेमाचा ॥म०॥३॥
पद ४ थें -
अखंड सुखकर श्रीगिरिजावर, प्रभु कपिलेश्वर साचा । शिवहर शंकर स्मरुनि निरंतर, प्रेम पुरःसर नाचा ॥अखंड०॥१॥
काम दहन हित राम भजनि रत, नाम स्मरणिं जयाच्या । वाम जानुवीर वाम लोचना ध्यानीं राम शिवाच्या ॥अखंड०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथावरि प्रेमपूर्ण सदयाचा । उदय करुनि भजनांत मेळवितो कोमल निज दासांचा ॥अखंड०॥३॥
Translation - भाषांतर
N/A