मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ६५१ ते ७००

करुणासागर - पदे ६५१ ते ७००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


नाना साधनें बोलिलीं । तीं तों तुम्हींच निंद्य केलीं ॥ म्हणोनि लोटांगणें घालीं । चरणीं सद्गुरूचे ॥५१॥
मज कांहींच साधन करवेना । वियोग तुझा साहवेना ॥ आतां कैसेसे योजना । करावी स्वामी ॥५२॥
आतां स्वामींनींच सर्व करावें । मातें हृदयीं वरावें ॥ माझे मनोरथ पुरवावे । शरण आलों म्हणोनि ॥५३॥
माझें कांकूं कांहींच नाहीं । सर्वज्ञ राया पडलों पायीं ॥ आहें सर्वांगीं अन्यायी । परी तुझा असें ॥५४॥
सर्व साधनाचें साधन । तुझे पायीं करितों नमन ॥ तुझें करितों नामस्मरण । हाचि माझा स्वधर्म ॥५५॥
तुम्हांतें भाकितों करुणा । हेंच माझें अनुष्ठान जाणा ॥ धर्म - कर्म - योग नाना । नाम तुझें सद्गुरो ॥५६॥
मुखीं नाम हृदयीं पाय । अन्य साधनाचें काम काय ॥ प्रसन्न होसी दत्तात्रेया । नमस्कार मात्रें ॥५७॥
गजेंद्रें कोणतें साधन केलें । त्यातें कीसें सोडविलें ॥ युद्धीं पक्षिणीचीं पिलें । स्मरण करितां रक्षिलीं ॥५८॥
तुझें प्रेम दाटे पोटीं । याच आमुच्या साधनकोटी ॥ नानासाधन हिंपुटी । वासया व्हावें ॥५९॥
माझें सर्व साधनांचें सार । स्वामीस घालितों नमस्कार ॥ सद्गुरूराया माझा भार । तूंचि वाहसी ॥६६०॥
आतां माझी दीनता । पाहोनि पावावें रमाकांता ॥ नमन करितों क्षमावन्ता । भेट देईं लवकरी ॥६१॥
वेगें देईं दर्शन । करीं माझें समाधान ॥ मागुती करितों साष्टांग नमन । दत्तात्रेया सद्गुरो ॥६२॥
तुजची माझा गौरव । अंगें करणें असे देव ॥ जाणोनि माझा अंतर्भाव । वेगें धांव दयाळा ॥६३॥
कोठें गुंतवूं नको दयाळा । नमन करितों वेळोवेळां ॥ मज कोणाचाही बांधेला । न करीं आतां दयाघन ॥६४॥
चक्षुहीन पादहीन । शक्तिहीन साधनहीन ॥ बुद्धिहीन रानोरान । कोठें फिरूं मी दयाळा ॥६५॥
तुझिये द्वारीं उभा राहिलों । तूतेंच शरण आलों ॥ सद्गुरू तुझेच पायीं पडलों । सर्वज्ञ - समर्था करुणाघना ॥६६॥
आतां कोठें दवडिसी । कोठें कोठें हिंडविसी ॥ कोणत्या राना मोकलिसी । शरआण्गतवत्सल तूं ॥६७॥
शीत उष्ण तहान भूक । मजकरवीं सोसविसी देख ॥ यांत तुझी लक्ष्मीनायक । तृप्ती कायसी ॥६८॥
तूंचि आमुची गती अससी । आम्हां व्याघ्रादिकां हातीं भक्षविसी ॥ कोठें नेऊन मारिसी । उपवासी मज ॥६९॥
तरी माझें चाले काय । मी तों धरिले तुझे पाय ॥ माझे प्राणाचा अपाय । कैसा करिसी शरण येतां ॥६७०॥
माझें तन - मन - धन । सर्व कांहीं जीव प्राण ॥ तूंच आहेस नारायण । देणें घेणें कायसें ॥७१॥
तूंतें द्यावया पाहीं । माझे पाशीं कांहींच नाहीं ॥ सद्गुरूराया सगळा मीही । तुझाचि असें ॥७२॥
मी माझें कांहीं असावें । तें तूतें मी द्यावें ॥ तुमचेंच आहे आघवें । मज समवेत ॥७३॥
आतां तूतेंच सारें करणें । मज मारणें अथवा वांचविणें ॥ माझा समाचार घेणें । तूजचि देवा ॥७४॥
मज जरी दुःख झालें । तरी तुझेंच नांव बुडालें ॥ तुझींच वंदीत असतां पाउलें । दुःखी आम्हीं कां व्हावें ॥७५॥
मी अधैर्यराशी कातर । तूं जाणसी अंतर ॥ लोटोनि द्यावयाचा विचार । कैसा करिसी दयाळा ॥७६॥
मी तुझे वियोंगेच मेलों । मज काय मारिसी दयाळो ॥ दयाळू जाणोनि शरण आलों । उपेक्षूं नको सर्वज्ञा ॥७७॥
मी तों आधींच दुःखी आहें । कधीं येशील वाट पाहें ॥ भरंवसा धरोनि वंदिताहें । पाउलें समर्थाचीं ॥७८॥
आतां मातें भेट द्यावी । पाहिजे तेथें नेऊनि ठेवीं ॥ जैसें पाहिजे तैसें वागवीं । तुझा आहें म्हणोनी ॥७९॥
माझे अंतरींचें गुज । जाणोनि रक्षीं आतां मज ॥ साष्टांग नमस्कार करितों तुज । सर्वज्ञ समर्था सद्गुरो ॥६८०॥
आधींच तुझिये मायेनें भ्रमलों । आणीक भ्रमविसी दयाळो ॥ नामरूपीं भांबावलों । न सुचे कांहीं ॥८१॥
आम्हांस जरी गुंतविलें । तुम्हांसीच पाहिजे सोडविलें ॥ येथें आमुचें कांहीं न चाले । तूंचि जाणसी ॥८२॥
दत्तात्रेया माझें हित । जें काय आहे उचित । तेंचि करावें त्वरित । सर्वज्ञ देवा ॥८३॥
तूं भररोगवैद्य अससी । सर्व चिकित्सा करिसी ॥ तैसेंच त्यातें औषध देसी । अधिकार पाहोनी ॥८४॥
चिकित्सा माझिये रोगाची । तुम्हीं आधीं केली साची ॥ आतां माझे मनोरथाची । पूर्णता करावी ॥८५॥
मी तों कांहींचि नेणें । माझे ह इत सद्गुरू जाणे ॥ तेंचि माझें हातीं देणें । नलगे अन्य ॥८६॥
मज तरी तूंच व्हावा । दुसरा संबंध नसावा ॥ निरंतर तुझीच सेवा । घडावी मज ॥८७॥
जें कांहीं सांगतां येईना । त्याही जाणसी अंतर - खुणा ॥ माझा शेवट नारायणा । तूंचि लावीं निजांगें ॥८८॥
आम्हीं कुपथ्य कीजेल । तें तूतेंचि निस्तारावें लागेल ॥ ऐसें समजोनि न लावितां वेळ । उचित असेल तें करावें ॥८९॥
तुज वांचोनि माझी चेष्टा । कांहीं न होय देवा वरिष्ठा ॥ ऐसें समजोनि सर्वावशिष्टा । योग्य असेल तें करावें ॥६९०॥
जेणें माझें समाधान राहे । जें काय माझें हित आहे ॥ तें तूतेंच माहीत आहे । अंतरसाक्षी सर्वज्ञा ॥९१॥
बरवें जाणोनि माझें हित । जें तुज असेल उचित ॥ तेंचि आतां त्वरित । सद्गुरू स्वामी करावें ॥९२॥
मी तों कांहींच नेणें । परी तूतें माझें हित करणें ॥ व्यर्थ जाऊं न देणें । आयुष्य माझें ॥९३॥
माझे अंतरींची हळहळ । जेणें होईल शीतळ । तुज ठाऊक आहे सकळ । शरणागत हितकरा ॥९४॥
मज अपार ऐश्वर्य दिलें । अथवा इंद्रपद भोगविलें ॥ तेणें माझें समाधान झालें । ऐसें न घडे ॥९५॥
यावत् तुमची भेट झाली नाहीं । मज शब्द सांगितले नाहीं ॥ तावत्पर्यंत माझें पाहीं । समाधान सर्वथा घडेना ॥९६॥
तोंवरी तडफडीतचि असें । परदेशींच एकला वसें ॥ तुजविण माझा कोणी नसे । समाधान करिता ॥९७॥
तोंवरी मी दुःखीच असें । तोंवरी माझें दैन्य न नासे ॥ तावत् माझ्या अंतरीं वसे । चिंता हळहळ तळमळ ॥९८॥
जरी मी तडफडितचि राहिलों । चिंताग्रस्तचि वाहवलों ॥ तळमळतचि मेलों । तरी बिरुदें गेलीं स्वामीचीं ॥९९॥
म्हणोनि आतां कांहीं । विघ्न होऊं न देईं ॥ जेणें माथा तुझे पायीं । ठेवीन ऐसें करावें ॥७००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP