मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ३५१ ते ४०१

करुणासागर - पदे ३५१ ते ४०१

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


जाणते असतां अंत पाहे । आतां आम्हीं करावें काय ॥ वारंवार वंदितों पाय । सर्वज्ञ स्वामीचे ॥५१॥
नमस्कारावांचोन । आम्हीं काय करावें साधन ॥ म्हणोनि आतां करितों नमन । वारंवार स्वामीतें ॥५२॥
देवा आतां कृपा करीं । येऊनि मातें हृदयीं धरीं ॥ शरण आलों तुझे द्वारीं । भिक्षा घालीं उदारा ॥५३॥
उदारपणें घालीं भिक्षा । विलंब न करीं परम दक्षा ॥ आतांच येईं अंतरसाक्षा । आशा माझी पुरवावी ॥५४॥
पुरवीं माझी कामना । भेट देईं नारायणा ॥ अंतरींच्या उर्मी नाना । शांत करीं दयाळा ॥५५॥
दयाळाचें दयाळूपण । जाणोनियां आलों शरण ॥ अनाथ जाणोनि संरक्षण । करीं माझें सद्गुरु ॥५६॥
सद्गुरूचा अंकित झालों । सद्गुरूचे पायीं पडलों ॥ सद्गुरुचेच नांवें विकलों । लोकांमाजी ॥५७॥
लोकांमाजी नांव जाहलें । सद्गुरूंनीं अंगिकारिलें ॥ आतां सद्गुरूचे अंकीं लोळें । ऐसें कीजे ॥५८॥
ऐसें कीजे रामराया । वेगें पाहीन तुझे पायां ॥ आतां माझें आयुष्य वायां । जाऊं न देईं समर्था ॥५९॥
समर्थाचा केला आश्रय । सर्वज्ञाचे धरिले पाय ॥ आतां माझे नाना अपाय । भस्म करीं निजकृपें ॥३६०॥
निजकृपेंच अनंता । माझी रक्षा करीं आतां ॥ उपेक्षूं नको सुखदाता । तूंच मज ॥६१॥
तूंच मजला अंगिकारीं । मी तुझेच दारींचा भिकारी ॥ हेतू माझा पूर्ण करीं । दीनोद्धारणा उदारा ॥६२॥
उदारगृहींचा भिक्षुक । उदारासीच मागतो भीक ॥ आतां देवा मज विन्मुख । दवडूं नको सर्वथा ॥६३॥
सर्वथा माझा समाचार । घेईं आतांच रमावर ॥ भावें करितों नमस्कार । करुणासिंधू जाणोनि ॥६४॥
जाणूनि तुझी दयाळूता । शरण आलों लक्ष्मीकांता ॥ माझी लज्जा विज्ञानदाता । आतांच रक्षीं निजअंगें ॥६५॥
निजअंगें धांवोनि येईं । मस्तक ठेवितों तुझिये पायीं ॥ वेगें आतांच येऊं देईं । कळवळा माझा ॥६६॥
माझा अंत पाहिला । अतिविलंब लाविला ॥ आतां तरी गोपाळा । धांव घालीं ॥६७॥
धांव घालीं दयाघना । आतां मातें राहवेना ॥ देवा शरआण्गताचे प्राणा । घेऊं कैसा पाहसी ॥६८॥
पाहसी दासाचें दुःख । पातकी जाणोनि लपविलें मुख ॥ एकलाचि भोगिसी सुख । उचित कैसें तुज दिसे ॥६९॥
तुज दिसे आकाशपाताळ । अनंतब्रह्मांडगोळ ॥ मीच एकटा दुर्बळ । कैसा न दिसे तुज देवा ॥३७०॥
देवा आतां द्रव वेगें । अनंतभुजें आलिंगें ॥ दास तुझा दुःख भोगे । आतां न करीं विलंब ॥७१॥
विलं देवा न लावीं । आतांच येऊनि चरण दावीं ॥ माझी अंजुळी भरावी । अभयाभिक्षा घालोनी ॥७२॥
तुझी कांस धरिली । मग नाना विरुद्ध कर्में केलीं ॥ नाना पाखांडें माजविलीं । तुझाच म्हणोनि ॥७३॥
तुझा म्हणोनि केलें कर्म । नाना प्रकारचे अधर्म ॥ तूंच जाणसी सकळ वर्म । अंतरींचें दयाळा ॥७४॥
जरी तुझी कास न धरितों । तरी विरुद्ध कर्में न करितों ॥ अंतरीं भयचि पावतों । निराश्रय म्हणोनी ॥७५॥
समर्थाचा केला आश्रय । सर्वज्ञाचे धरिले पाय ॥ आतां मजला शंका काय । नाना कर्में आचरितां ॥७६॥
सार्वभौम राजाचा पुत्र । लोकीं वर्ततां स्वतंत्र ॥ त्यातें म्हणाया अपवित्र । सामर्थ्य नसे ॥७७॥
जरी तो राजपुत्र नसता । तरी स्वतंत्र कासया वर्तता ॥ शिरीं सार्वभौमाची सत्ता । तेणें स्वतंत्र वर्ते तो ॥७८॥
तुझे अनंत पुत्र । तुझे म्हणोनि वर्तती स्वतंत्र ॥ परंतु सकळांचें सूत्र विचित्र । तुझिये हातीं ॥७९॥
त्यांत एक अनर्गळ । अनंत जाहला बाष्कळ ॥ तयाचाही प्रतिपाळ । करणें तुजला श्रीवरा ॥३८०॥
इतरांसारिखा नव्हसी । समर्थ दयाळू समदर्शी ॥ कैसा माझा त्याग करिसी । कुपात्र म्हणोनी ॥८१॥
तुझे अंगीं सकळ कळा । अखंड वागती अनंतबळा ॥ अनंताच्या अनंतलीळा । कोण जाणे ॥८२॥
आतां खराखोटा जरी । दंभी लोभी अहंकारी ॥ कामीक वाचाळ संसारीं । वर्तता झालों ॥८३॥
तथापि सर्व तुमच्या नांवें । केलें तुम्हीं शेवटा न्यावें ॥ रागें भरोनि न त्यागावें । देवें मजला सर्वथा ॥८४॥
मी तों अनधिकारी पापराशी । तूं जरी अंगिकारिसी ॥ सरितासंगम गंगेसीं । जेवीं तेवीं होईन मी ॥८५॥
तूं समर्थांचा राजा । काय भार मानिसी माझा ॥ देवा सर्वथा आहें तुझा । अंगिकारीं मज आतां ॥८६॥
तूं काळाचा काळ अससी । मी दुर्बळ अनाथ परदेशी ॥ मातें दर्शन द्यावया भीसी । दुष्टदानवमर्दन तूं ॥८७॥
जरी मज दर्शन दिधलें । तरी काय तुझें सामर्थ्य गेलें ॥ मातें जरी उपेक्षिलें । तरी अधिक झालें कायसें ॥८८॥
अनंतशक्तीच्या नायका । भेट देतां करिसी शंका ॥ शरण येतां त्यागिसी रंका । लाभ कोणता तुज सांगें ॥८९॥
तुझेसाठीं तळमळीं । विलंब लाविसी वनमाळी ॥ कीर्ती जाइल पातालीं । येतें तुझी सर्वज्ञा ॥३९०॥
आतां कैशा मारूं हाका । कोणतें साधन करूं देखा ॥ ब्रह्मानंदा ब्रह्मांडनायका । कैसा तूंतें रिझवूं मी ॥९१॥
नाना साधनें योग असती । तेणें तुमची होईना तृप्ति ॥ ऐसें संत स्वामीही बोलती । स्वमुखेंची ॥९२॥
तेंही मजला सामर्थ्य नाहीं । आळसी अधैर्यराशी पाहीं ॥ दुःख साहूं न शके देहीं । साधन कांहीं न घडे मज ॥९३॥
तुज भक्तीची चाड । भक्ती तूतें वाटे गोड ॥ तुझी भक्ती परम अवघड । कैसी घडे मज देवा ॥९४॥
तुझे भक्तीचा पारू । नेणे ब्रह्माहरिहरू ॥ मूढ पापी पामरू । कैसा जाणूं मी रामा ॥९५॥
भक्ती नाहीं साधन नाहीं । योग नाहीं तप नाहीं ॥ विद्या नाहीं आचार नाहीं । दैवहीन करंटा ॥९६॥
ऐसा मी दुर्भाग्य दीन । महा पातकांची खाण । चिद्रत्नकैवल्यनिधान । सध्यां इच्छीं अनायासें ॥९७॥
आपण असतां पांगळा । पर्वत उल्लंघूं गेला ॥ मुका असतां अपार लीला । वर्णूं पाहे श्रीगुरूची ॥९८॥
जैसें लघुबाळ । धरूं पाहे शशिमंडळ ॥ अत्यंत दुर्बळ असतां स्थळ । घेऊं पाहे काळाचें ॥९९॥
कंठीं बांधोनि शिळा । प्रलयाब्धीतें तरूं गेला ॥ सूर्यातें पाहूं आला । आंधळा जैसा ॥४००॥
तैस मी हीनाहुनी हीण । दीर्घदोषी कुलक्षण ॥ पुरुषोत्तम स्वामीचें दर्शन । घेऊं पाहें आतांची ॥१॥
इति श्रीमत्परमतपःपरायण श्रीमन्नारायणविरचिते करुणासावरे प्रथमभागः समाप्तः ॥
॥ श्रीगुरुदत्तचरणार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP