मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय चवतिसावा

आदिपर्व - अध्याय चवतिसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


पार्थ म्हणे, ‘ तो कोण ब्रह्मर्षि असे ? मनोरम हि म्यां तें
तद्यश नसे परिसिलें; सांग सख्या ! तूं तदीय महिम्यातें. ’ ॥१॥
गंधर्व म्हणे, “ होता कुशिकतनुज गाधि कन्यकुब्जपती,
तत्सुत विश्वामित्र प्रभु, यत्सेवेसि नृप सदा जपती. ॥२॥
सबळसचिव तो भूपति मृगया करितां वनीं बहु श्रमला;
दैवें वसिष्ठमुनिचें पुण्याश्रमपद विलोकितां रमला. ॥३॥
स्वपदनतगाधिजातें सत्कारुनि मुनि म्हणे ‘ अगा ! राया !
जावें न क्षुधितें त्वां, येउनियां आमुच्या अगारा या. ’ ॥४॥
वाल्मीकिच्या जन जसा तृप्तिसि पावे कुळासकट कवनीं,
मुनिच्या उटजीं तैसा तो गाधिज भूप ही सकटक वनीं. ॥५॥
नृपति म्हणे, ‘ कोठुनि हें आलें साहित्य जेवणा रानीं ?
अस्मद्गृहीं हि न कधीं वरिली ती तृप्ति जेवणारानीं. ॥६॥
जें न नृप - प्रासादें तें मुनिच्या भुक्ति - सुख दिलें उटजें,
हें मोटें नवल; अहो ! लाजविला पारिजत कीं कुटजें. ॥७॥
वल्कलरुद्राक्षधर ब्राह्मण अकृतान्ययत्न हा, रानीं
बळ पूजिलें कसें हो ! बहुमूल्य दुकूलरत्नहारानीं ? ’ ॥८॥
करित अधोश कळे कीं, उटजीं सुर - धेनु - नंदिनी आहे;
पाहे तीस नृप म्हणे मग मुनिला ‘ गाय मागतों, द्या हे. ॥९॥
अर्बुद गायी देतों, अथवा देतों स्वराज्य भोगाया,
दे गाय, काय विनिमय हा भवदर्थोन ? मान्य हो गा ! या. ’ ॥१०॥
मुनिवर म्हणे, ‘ नृपा ! हें वचन तुझें मन्मनासि कंपा दे,
या धेनुबळें माझा हा आश्रमधर्म सांग संपादे. ॥११॥
कोण ज्ञाता राज्यस्वीकार करील आधि ज्यामाजी ?
मागों नको, न देया, हेया हे धेनु गाधिज्या ! माजी. ’ ॥१२॥
विश्वामित्र म्हणे, ‘ मीं क्षत्रिय, आधार जाण तेज्याचा,
आज्ञा - मानस - भंग न करिती भद्रेच्छु जाणते ज्याचा. ॥१३॥  
स्वाध्याय तुझें बळ, तूं ब्राह्मण, कैंचें असह्य तेज तुला ?
पिप्पलजत्व सम असो; दहनीं तेजस्विता न ते जतुला. ॥१४॥
मानधन प्रभु मीं, जें वदलों कर्तव्य तें करीन खरें.
ऐसा कोण प्राणी, ज्यातें न करील वश हरी नखरें ? ’ ॥१५॥
भगवान् वदे, ‘ बळी तूं तुझिया चतुरंगसैन्य सांगातें.
तुज कर्तव्य असे जें, सिद्ध न करिसी अभीष्ट का गा ! तें ? ’ ॥१६॥
कौशिक अनुगांसि म्हणे, ‘ सोडा हो ! धेनुला, चला, हाका.
हा काय रत्नभोक्ता ? मारू अनुताप पावुनीं हाका. ’ ॥१७॥
दंडें ताडुनि नेतां, फोडी ती धेनु फार हंबरडे;
तेव्हां आश्रमवासि द्विज - मृग - खग - देवता - कदंब रडे. ॥१८॥
नेतां बळें चि धांवत येऊनि ती मुनिपुढें उभी राहे,
आणूनि लोचनीं जळ, बहुदीनत्वें मुखाकडे पाहे. ॥१९॥
धेनु म्हणे, “ स्वामी ! त्वां पालन केलें, करी न बाप तसें.
कां मज उपेक्षिलें हो ! मीं खळदंडें उदंड तापतसें. ’ ॥२०॥
साधु म्हणे, ‘ मज हृदयीं शत, तुज बाहेर हे कशा लागे.
मीं ब्राह्मण क्षमावान्, माते ! रडतीस तूं कशाला ! गे ? ॥२१॥
क्षत्रियतेज असें हें, जें तुजला पीडितो कशापातें.
मत्तेजक्षांति मला म्हणत्ये ‘ हां हां ! न ओक शापातें. ’ ॥२२॥
मन्मति - दरींत न शिरे कोप - मतंगज विवेक - हरि जागे;
म्यां न त्यजितां नेतो भूप बळें, तुज रुचेल तरि जा गे ! ” ॥२३॥
गाय म्हणे, ‘ भगवंता ! नसतां आज्ञा तुझी, न मद्धरणीं
काळ हि बळी; किती हा ? न तृणबळें होय वह्नि बद्ध रणीं. ’ ॥२४॥
विप्र म्हणे, ‘ नेला कीं दृढबद्ध करूनि वत्स दाव्यानें,
स्वबळें नृपें मदाश्रम, देह जसा व्यापिला सदा व्यानें. ॥२५॥
शक्य असेल तरि रहा, ’ ऐसें मुनि बोलतां चि ती क्षोभे.
ग्रीष्मगमध्यान्हार्कप्रतिम तिचा देह तेधवां शोभे. ॥२६॥
धेनुमिषें त्या मुनिची सुतपस्यासिद्धि कोपली वाटे.
फाटे गाधिजबळतम त्या जपळेच्या धरूनियां वाटे. ॥२७॥
अंगांपासुनि केले प्रकट तिणें म्लेच्छ, यवन, शबर, शक;
बळ उडविलें तिहीं खगपतिपक्षांहीं जसें सहज मशक. ॥२८॥
जेंवि दिगंताप्रति ते तिमिरा तूळा रविप्रभा वात्या.
सेना तसी नृपबळा, निस्तुळ म्हणती कवि प्रभावा त्या. ॥२९॥
दशशतसहस्र पीडिति एकैका गाधिजानुगा यवन;
गाय वन स्वर्ग हि, तें दावि पितां आपणांत गाय वन. ॥३०॥
‘ पकडा, लिया, कहं ? लो, बे ! बिसवामितर भाग जावेगा, ’
यवन म्हणति; दाविति त्या, वायु म्हणे ‘ भूरिभाग ’ ज्या वेगा. ॥३१॥
मागें पाहों न दिलें, तीं बारा कोस पळविलीं कटकें.
यशें हारविलें तेथें किति शस्त्रें, हार, कुंडलें, कटकें ? ॥३२॥
भूप म्हणे, ‘ जे नेणति गोब्राह्मणतेज, ते जन क्षत्रीं
कल्पिति, जसें न पाहुनि शिशु शशभृत्तेज तेज नक्षत्रीं. ॥३३॥
धिक् क्षत्रियतेजातें ! सार नसे लेश या पलालसमीं;
येणें चि जाहलों हतकाम पराभूत पापलालस मीं. ॥३४॥
क्षत्रबळ नाव फुटकी, जें ब्राह्मणतेज तें चि नव नौका.
बुडतों न अन्यथा मीं, तरता व्यसनांत तो हि न वनौका. ॥३५॥
प्राज्य हि राज्य हित नव्हे; तप साधावें, तयांत सर्व हितें.
तप न करावें कोणा प्रभुनें विनिमग्न ज्यांत शर्व हि तें ? ’ ॥३६॥
निश्चय करूनि, राज्यश्री सोडुनि, सर्व ताप साहूनीं,
होमुनि तपोनळीं वपु, होय अधिक सर तापसाहूनीं. ॥३७॥
सिद्धि म्हणति, ‘ पति वरिले व्यर्थ तुम्हीं बहु तपोनि, धिक् क्षणदे !
धिक् स्वाहे ! धिक् पद्मिनि ! सुख न, जसें हा तपोनिधि क्षण दे. ’ ॥३८॥
बह्मर्षिता वरी त्या पतिस म्हणे, ‘ तूंहि अच्छ विप्र खरा;
रवि भावी कीं, भुलली निजरुचि, अन्यत्र न छवि प्रखरा. ’ ॥३९॥
झाला नृपति वसिष्ठस्पर्धेनें विप्र, तें असो आतां;
विस्तर भय दे, नाहीं तरि, काळाचें हि भय न हें गातां. ॥४०॥
त्या मुनिनें सिद्धिबळें मोहुनि सौदासनृपतिच्या मतितें,
केला वसिष्ठ सुतशतशोकार्त, किजे जसें महापतितें. ॥४१॥
ज्येष्ठ सुत वसिष्ठाचा शक्तिमुनि पथीं वनांत आढळला;
कल्माषपाद मागे पथ, परि कवि तो न सर्वथा ढळला. ॥४२॥
संकुचित पथ न सोडी म्हणुनि नृपें ताडिल कशा - पातें.
‘ धर्मघ्ना ! राक्षस हो ’ दे मुनि या उग्रपाकशापातें. ॥४३॥
भेटे राक्षस मंत्री गाधिसुताज्ञेकरूनि शापाला.
ग्रासी मोह नृपाला, राहु महाग्रह जसा निशापाला. ॥४४॥
म्रुगमांसभोजनार्थी त्यावरि भेटे द्विज क्षमापतिला,
मान्य करुनि तें विसरे, कीं शापें मोह जाहला मतिला. ॥४५॥
रात्रौ स्मरले, सरलें, होतें यद्यपि उदंड परि पळ तें.
दैव प्रसन्न नसतां, वस्तु सकळ भे दिल्याचिपरि पळतें. ॥४६॥
‘ नरमांस द्या ’ ह्मणे नृप, ‘ कोटुनि आणूं तदर्थ हरिणा मीं. ’
नुमजे मोहें कीं, ‘ हें कर्म मला तापवील परिणामीं. ’ ॥४७॥
करितां तसें चि सूदें, उमजे, नुमजेल काय हो ! मुनितें ?
पेटे जें अति शुष्क क्रोधज्वलनांत काय होमुनि तें. ॥४८॥
विप्र म्हणे, ‘ हा ! दुष्टा ! ब्राह्मण नरमांस काय रे ! खाती ?
श्रुतिकृतमर्यादेची जी पुसिली आजि काय रेखा ती ? ॥४९॥
मीं विप्र, नव्हें राक्षस; राज्यमदांधें न नटि वळखावें.
हें त्वां चि आजिपासुनि राक्षस होवुनि मनुष्यपळ खावें. ’ ॥५०॥
हे दोन शाप, राक्षस, गाधिज, एकामतें चि गुरु चवघे.
पढवुनि मित्रसहकरें मारविती श्रीवसिष्ठसुत अवघे. ॥५१॥
सेवी द्विजरक्तरसा नृपति, वसिष्ठ हि नव्या चि शोकरसा.
सेवन करवी, भरवी, विधि त्याचा शाप, भूप तो करसा. ॥५२॥
होय विफळयत्न मुनि स्वतनुत्यागीं धरून कामातें,
मेर्वग्न्यब्धीस म्हणे, ‘ म्हणतां कां हो ! ‘ मरू नका ’ मातें ? ” ॥५३॥
बद्ध करूनि कर - चरण बुडतां, तोडी महानदी पाशा.
कोणा नको सुतेजा ? काय पतंगीं लहान दीपाशा ? ॥५४॥
तोडी पाश, न बुडवी जी सकरुणमानसा धुनी, तीस
ठेउनि नाम विपाशा, गाति सबहुमान साधु नीतीस. ॥५५॥
जैसा यत्न न सोडी, जरि धन न मिळे, तथापि धनकामी,
निधनार्थी मुन हि म्हणे, ‘ यत्नीं फळ; आवरूं स्वमन कां मीं ? ’ ॥५६॥
शक्तिस्त्री न विसंबे श्वसुरासि, वनीं फिरे तयामागें,
गुरुसेवनें भुलविलें मन कुळज्यांचें, तसें न हेमागें. ॥५७॥
भरि एकदा श्रुतिरवें, तद्गर्भाचें हि, कानना, तुंड.
तें कुललयशोकतमीं धरिल हिमकरत्व कां न नातुंड ? ॥५८॥
ब्रह्मर्षि पुसे, ‘ वत्से ! शक्ति तसा वेद कोण गे ! ह्मणतो ?
वाटे आलिंगावा कडकडुनि, मला दिसेचिना पण तो. ’ ॥५९॥
ती साश्रु अदृश्यंती बोले जोडूनि हात, ‘ मामाजी !
गर्भ मदुदरीं म्हणतो मज घालायासि हा तमामाजी. ’ ॥६०॥
मुनिपति म्हणे, ‘ अगा ! कुळतंतो ! संतोषदान नातूंनीं
न दिले, असें अमृत तव गळतें संतोषदाननातूनीं. ॥६१॥
ऐसें मद्व्यसनशमन कवण दयित सोयरा शिशो ! करिता?
तव वेदध्वनिघटजें केला विषतोयराशिशोक रिता ? ’ ॥६२॥
सोडुनि मरणोद्यम शमधन अनघ नलिनभवप्रभव परते;
चित्तीं म्हणे, ‘ अकृपसे गमले मेर्वादि, सदयतम पर ते. ’ ॥६३॥
तों मार्गीं भक्षाया मुनिसह तत्कुळकरा हि उर्वरिता
तो भूप ये सुहृत्त्व त्यजुनि विधिबळें धरूनि उर्वरिता. ॥६४॥
गुरुशापदुरिंधनहततेजा राजर्षि, वह्नि तो याज्य,
व्हाया पुन्हां प्रकाशित सिंची मुनि मंत्रपूत तोयाज्य. ॥६५॥
मलिन कुगंधि कुरूप क्रूर कठिन शुष्क राक्षसत्वानें,
तो नृप केला स्मरसा सहसा त्या पुष्कराक्षसत्वानें. ॥६६॥
जी निजसक्तीर्ति तिला होवूं दे न वितथा, पिशा पावे.
यद्यपि शापार्ह तिघे, न म्हणे तो कवि तथापि शापावे. ॥६७॥
तारुनि नृपासि कुळकर पुत्र हि दे, न सुकृतासि मुनि वेची.
तत्कीर्तिला नमी श्री शरदृतुच्या लक्ष वेळ पुनिवेची. ॥६८॥
व्हावा अद्भुत जैसा प्रध्वस्ततमःपराश रविस रवी,
मुनिला सुतशोक तसा होउनि शक्तिज पराशर विसरवी. ॥६९॥
तो आज्याला चि म्हणे ‘ तात; ’ किजे अधिक काय हो ! तातें ?
खेद अदृश्यंतीतें दे, श्वशुरा ‘ तात ’ म्हणत होता तें. ॥७०॥
ती एकदा म्हणे, “ ‘ बा ’ म्हणसि असें चि पसरूनि आ ज्याला
म्हणुनि तुवां निववावें तें कैंचें ? म्हणसि ‘ तात ’ आज्याला. ॥७१॥
मामाजींस म्हणसि, तें न म्हण; म्हण तयांसि ‘ आर्य आज्याबा. ’
आज्या ‘ बा ’ न म्हणावें, गहिवर येतो तया हि माज्या बा ! ॥७२॥
राहु निशेच्या, माझ्या राक्षस, करि रोष, नंदना ! तिलकीं.
काय वदावें ? दावें गिळिला अल्पद्रु नंदनांतिल कीं. ॥७३॥
ज्यांस म्हणत होती कर जोडूनि विद्या कळा सभा ‘ बो ! जी ! ’
हरिस हरिणसे झाले नव्याण्णव त्या खळास भावोजी. ” ॥७४॥
पितृघातवृत्त कळतां सर्वां लोकांसि दोष तो लावी,
कीं शक्तोपक्षकमति ती अघर्कृन्मतिसवें चि तोलावी. ॥७५॥
जैसें सुटों न द्यावें प्राणक्षयतत्परा शरासि, कवी
ब्रह्मर्षि तसें चि करी, निजशांतिकळा पराशरा शिकवी. ॥७६॥
‘ धरिति शिवेच्छु क्षत्रियजन जिंकाया परा शरीराला,
संत क्षमेसि धरिती, तुज हेचि रुचो पराशरा ! लीला. ॥७७॥
व्याघ्रवृकहरिव्याळप्रभृतींचा जो समूह हानिकर,
त्याहूनि कामकोपप्रमुखांचा निपट दुष्ट हा निकर. ॥७८॥
बा ! सादर अभयाच्या तापस दानींच; हा निकर विखरी
धृतिला धुळींत; देउनि ताप सदा नीच हानि करवि खरी. ॥७९॥
जी शीतागाधजळा सरिता, शिरतां निवे करी तींत,
निवतो प्रवेशतां जन सर्व हि तैसा विवेकरीतींत. ॥८०॥
नाशी स्वसेवनकरा, अन्यजना ही, म्हणोन कोपानें
बहु अहित होय, तैसें अहित विषाच्या म्हणों नको पानें. ॥८१॥
भृगुकुळज और्वमुनि ही पूर्वीं ऐसा चि कोपला होता,
पितृवचनें परि टाकी स्वक्रोधाग्नीस सागरीं पोता. ॥८२॥
दे मज हें, लोकांचें भस्म क्रोधें करूं नको, पावें.
कथिला धरूनि हनु नय, अनुनय किति बा ! करूं ? न कोपावें. ॥८३॥
कोपें कुळज जरि, तमें तरि फुगवुनि गल्ल भानु गांठावा.
महिमा क्षमारताचा बहु तो श्रीवल्लभानुगां ठावा. ॥८४॥
नंदनशील म्हणति त्या तापाकुळ नंदनाप्रति ज्ञाते.
सोडावी मद्वचनें बापा ! कुळनंदना ! प्रतिज्ञा ते. ’ ॥८५॥
लोकक्षयसंकल्प त्यागुनि, सुखवुनि मनांत आजोबा,
राक्षससत्र करी, कीं, भाव्यजसुतसा सुरांत साजो बा. ॥८६॥
जैं भस्मसात् पराशर करि मंत्रबळें पुलस्त्यसंततितें,
आले संरक्षाया ऋत्वत्रिपुलस्त्यपुलह संत तितें. ॥८७॥
त्यासि पुलस्त्य म्हणे, ‘ बा ! तुज पाहुनि सर्व ताप हरपावे,
सत्यः साधुसमागम, तेंवि न नाशूनि ताप हर पावे. ॥८८॥
तेजप्रमाण आम्हां तत्त्वज्ञांस प्रमाण न वय जनीं.
तें अद्भुत तेज तुझें दिसलें कोणासि या न नव यजनीं. ? ॥८९॥
हा आर्य हि न क्षांति क्षण दूर करूं न कोपला शांत.
काळ चि निमित्त करितो भलत्यास, करूं नको पलाशांत. ॥९०॥
पावे क्षमी सुकृत, सुख, यश, जें पावेचिना अमर्षीं तें
विधुतें लक्ष्म तसें हें अकृपपण नसो भवत्समर्षीतें. ॥९१॥
साहे न कोपवेगा जो, कीं जो कांपरा शरास रणीं,
त्याची रुचेल शांतिस, कीं कीर्तीस कां पराशरा ! सरणी ? ॥९२॥
कामाची क्रोहाची ज्यांहीं केली जपोनि आज्ञा, ते
चुकले, स्वहिता मुकले, त्यांतें पाहोनि म्हणति ‘ हा ’ ज्ञते. ॥९३॥
हित इतर न धन शमसम, यावरि तुज हें न कार्य सत्र, पहा;
कवि रविरुचि शुचिभग तव व्हावा येणें न आर्य स - त्रप हा. ॥९४॥
शक्ति - ज सत्र पुरें करि, सद्वचनांच्या निवे चि तो पानें.
हो पानें सुखद अमृत, परि सद्वचनें चि शांति - सोपानें. ॥९५॥
गंधर्वोक्त - वसिष्ठप्रभु - चरितें जिष्णु तो निवाला हो !
प्रेमें म्हणे, ‘ जसा मीं सर्व हि जन पात्र या शिवाला हो. ’ ॥९६॥
पुसतां पुरोहित, म्हणे, “ आचार्यत्वेंकरूनि सौम्यातें
उत्कोचनामतीर्थीं क्षिप्र वरा जा नमूनि धौम्यातें. ॥९७॥
जाणे, तो गुण जाणे, जे तत्पूर्वज मुनीद्र देवल ते.
तत्पदयुगली म्हणत्ये, ‘ न सुख स्पर्धेंत बाइ ! देव - लते ? ’ ” ॥९८॥
देउनि अग्न्यस्त्रातें, ठेवुनि चित्तीं तदुक्तमंत्रास,
धौम्याप्रति जातां दे कुदशेसि पदोपदीं हि संत्रास. ॥९९॥
तीर्थीं स्वानुजरूपें जी होती तप करित देवलता,
तीणें बहु लाजविली पांडुसुतेच्छित करूनि देव - लता. ॥१००॥
‘ यत्ध्रुवमाश्रिततारकमनलमुरुभवपयोनिधी म्या तें,
हें यानपात्र वरिलें, ’ धर्म म्हणे पद धरूनि धौम्यातें. ॥१०१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP