मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय एकतिसावा

आदिपर्व - अध्याय एकतिसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


स्कंधीं पृथेसि वाहुनि, लंघुनि मत्स्यादि देश दूरवर,
गेले तापसवेष स्वीकार्नि पांडुपुत्र शूरवर. ॥१॥
त्या व्यसनांत निवविला दर्शन देवूनि तापहा व्यासें,
जो चिंती साधुजनीं संपत्ति सदा रता पहाव्यासें. ॥२॥
चिंतामणि अधना जें, धन्वंतरि जें गदाकुळा देतों,
भेटोनि अकस्मात् सुख तें त्या कुरुच्या तदा कुळा दे तो. ॥३॥
पौत्रांसि म्हणे, ‘ मज हें कळलें होतें; परंतु जळधीतें
मिळतां बळें नदीतें फिरविल कोण्ही बळी, न खळधीतें. ॥४॥
हा ! वालद्रुम हो ! कां खेद तुम्हां ! मीं सुधाढ्य आवाल;
पावाल वृद्धि पुष्कळ, दुष्टग्रीष्मासि लाज लावाल. ॥५॥
प्रार्थावें नलगे मज, जें तुमचें हित करीन आधीं तें.
भेटेन, एकचक्रानगरींत रहा, हरीन आधींतें. ’ ॥६॥
जातां देवूनि अभय निजजनकाचा पिता, महा ज्ञाते,
त्याचि नगरीं द्विजगृहीं होते पाळुनि पितामहाज्ञा ते. ॥७॥
सिद्धान्न मातृहस्तीं देती ते वरुनि वृत्ति माधुकरी.
भीमासि अर्ध दे ती, अर्धाचे पांच भाग साधु करी. ॥८॥
होते कांहीं काळ स्वीकारुनि भैक्ष्यवृत्तिला मुदित,
तों कुंती परिसे त्या आश्रयदब्राह्मणालयीं रुदित. ॥९॥
भीमासि म्हणे, ‘ रडतो दुःखें सकुटुंब विप्र बापा ! हें
मज बहु दुःसह झालें; आलें नेत्रांसि अश्रु बा ! पाहें. ॥१०॥
आम्हीं पक्षी, हें गृह नीड, धरादेव आश्रयागम हा.
दुःख हरूनि करावी प्रत्युपकृति, होय हाचि याग महा. ’ ॥११॥
भीम म्हणे, ‘ शोध करीं, जा, स्वमुखें विप्रनायका पूस;
वारीन दुःख सर्वहि; दहना अतिभार काय कापूस ? ’ ॥१२॥
द्विजरुदित पुन्हां तप्त श्रुति करि झगटोनि यादवीची, तें
मोहे मन, जेंवि विषांबुधिच्या भेटोनि याद वीचीतें. ॥१३॥
जाय द्विजाकडे ती गाय जसी वासुराकडे मोहें.
करितां विलाप, बोलत होता निजदुःख तेधवां तो हें, ॥१४॥
‘ ज्याये ! वदलीस परस्थळगमनविचार, सर्वथा राहो.
माहेर येथ होतें; ओळखिती लोक सर्व थारा, हो ! ॥१५॥
गेलों असतों तरि कां पडतें हें प्राणसंकट प्रमदे !
स्वकुटुंबव्यसन जसें देतें, न तसें बुधा विष भ्रम दे. ॥१६॥
जरि दान तुझें द्यावें कांतें ! मज भासतें तसें तरि तें,
सिंधूदरीं विकावें स्वहितार्थ तितीर्षुनें जसें तरितें. ॥१७॥
पुत्रचि अधिक, न कन्या, अन्यास गमे, मला न लोभ्याला,
नयनयुगांतुनि एक हि द्याया स्वप्नीं न कोण तो भ्याला ? ॥१८॥
देतों निजवपु, परि तूं भीरु ! कसी साहसील विरहातें ?
स्वर्गींहि दुःसहचि जें म्हणसील मज स्मरोनि चिर ‘ हा ! ’ तें. ॥१९॥
प्राणाचा त्याग बरा, तुमचा न बरा, कसा न तो पापी ?
क्रूपांत बळें अबळाम घालुनि ठकवूनि दोर जो कापी. ’ ॥२०॥
तों ब्राम्हणी म्हणे, ‘ हो ! कवि साधु तुम्हीं करूं नका शोक.
यन्मूळ ‘ आपदर्थे ’ ते शंकरसाचि आठवा श्लोक. ॥२१॥
अजि ! आत्मानं सतत्म रक्षेद्दारैर्धनैरपि ’ श्लोकीं,
तेंचि करा हो ! न बुडों द्या हो ! मज, निजमतीसही शोकीं. ॥२२॥
पतिपूर्वीं स्त्रीस मरण, तें लग्नाहूनि काय हो ऊन ?
न रहावेंचि सतीनें पळभरिहि विरूपकाय होऊन. ॥२३॥
रक्षाल तुम्हींच मुलें, अबळा भावील भार जीवा हे;
रक्षील कसी अन्या नवपूरीं भीरु फार जी वाहे ? ॥२४॥
जाईन मींच, राक्षस जरि करकर सर्व मानवां चावे.
दैवें, स्त्री म्हणुनि दया येतां, मत्प्राण कां न वांचावे ? ॥२५॥
मज भक्षीलचि तो तरि विधुरपणें सर्वथा नका राहूं,
ती स्त्री मींच, ह्मणा जी ! मागें सारूनियां नकारा हूं. ’ ॥२६॥
ऐसें म्हणतां स्त्रीच्या कंठीं घालुनि मिठी म्हणे, ‘ अथि ! ते
कथमेवमुक्तमदयं तदयं किमनुष्ठितुं क्षमो दयिते ! ’ ॥२७॥
परिसे असें पृथा जों तों चि ह्मणे त्यांसि कन्यका, ‘ मातें
द्या, द्यायाची च सुता, हे किमपि न ये चि अन्य कामातें. ॥२८॥
आत्मा पुत्र, सखा स्त्री, कन्या चिंता चि, सर्वकाळ, जिला
प्रसवोनि वाहति मनीं श्रीमंत हि पितर सर्व काळजिला. ॥२९॥
बुध, ‘ कन्या रक्ष ’ ‘ तिघांतुनि एका, ’ तुज ह्मणेल कां ? ‘ टाकीं. ’
बापा ! कांट्यानें चि प्राज्ञ सुखें काढिताति कांटा कीं. ’ ॥३०॥
ऐसें वदोनि कन्या रडवूनि रडे, तशांत जवळूनि
खवळूनि उठे बाळक, बोले हस्तें तृणासि कवळूनि. ॥३१॥
समजावुनि त्यांसि ह्मणे, ‘ एसें लात्रिंचलासि मालीन;
कां ललतां आललतां ? पलतां मीं सागलांत तालीन. ’ ॥३२॥
हासविलीं हर्षविलीं व्यसनातें तिघें हि बाळशब्दानें.
अब्दानें ग्रीष्मदवाकुळबर्हिकुळें जसींच अब्दानें. ॥३३॥
तेव्हां चि पृथादेवी भेटे, अभयोक्ति जी वदे त्यांतें,
संजीवनी च जाणों ती, रोगेंकरुनि जीव देत्यांतें. ॥३४॥
रोदनकारण पुसतां विप्र ह्मणे, ‘ अंब ! तापसि ! श्रवणें
घ्यावें शिव, अशिवाच्या व्यर्थ चि कां तूं हि तापसि श्रवणें ? ॥३५॥
या राष्ट्रा बकराक्षस, अजयूथा लांडगा तसा, पाळी.
तद्वेतनदानाची आलीसे आजि मजकडे पाळी. ॥३६॥
एक महिष, एक पुरुष, शाल्योदनराशि त्यासि भक्षाया
द्यावा असें असे; या व्यसनीं मज कोण दक्ष रक्षाया ? ॥३७॥
विरहभयें एकास हि राक्षसहस्तीं न देववे चि; तसें
धन हि न पुरुष मिळेसें; स्वकुळ चि मीं भूमिदेव वेचितसें. ॥३८॥
सहज गजगंड भेदी, हरिचा, नव्हता कळा सिकत, करज.
अकृतघ्नत्वार्थचि दे शुचिता मळल्या जळासि कतकरज. ॥३९॥
तैसा कुलीन जन परदुःखध्वंसीं पटु स्वभावानें,
संकट हरि अरिचें ही, हरिना कां प्रार्थिताम स्वभावानें ? ’ ॥४०॥
कुंती म्हणे, ‘ दिला तुज एक स्वसुत, द्विजा ! नको चि रडों.
हा शोकभर स्वशिरीं घेउनि सकुटुंब तूं नको चिरडों. ’ ॥४१॥
विप्र म्हणे, ‘ शिव ! शिव ! परघातक जो स्वार्थलुब्ध नर कामी,
तो जैसा, तैसा या कर्में पावेन घोर नरका मीं. ॥४२॥
करुनि पराचें अहित स्वहित विहित काय तापसि ! कवीसी.
माते ! असें कसें मज व्हाया याहुनि ताप सिकवीसी ? ’ ॥४३॥
कुंती, म्हणे , ‘ मदात्मज गुरुवरमंत्रें असे महातेजा;
साहों न शकति राक्षस वज्राघातास ही सहाते ज्या. ॥४४॥
सुरवल्लिचा, नव्हे गा ! श्रुद्रलतागुच्छकासम, स्तबक.
स्पष्ट मदात्मजचरणीं अर्पील प्राणधन समस्त बक. ॥४५॥
परि हें विप्रवरा ! त्वां न प्रकटावें, मनीं च जिरवावें.
विद्यार्थिजनोपद्रव लागेल म्हणोनियां न मिरवावें. ’ ॥४६॥
मग विप्र - पृथा - प्रार्थित भीम धरुनि राक्षसापराध मनीं,
कोपे, जाणों दहन चि तो हो, प्रार्थना तया धमनी. ॥४७॥
तें मान्य करुनि, मुनिला, ‘ व्हा स्वस्थ ’ असें चि तो कवि प्रर्थी.
संसारी वित्तार्थी, तैसे चि कुलीन लोक विप्रार्थी. ॥४८॥
स्वानुज साहस कांहीं करणार, असें युधिष्ठिरा समजे.
‘ आकारें चि परेंगित कळे ’ म्हणति कवि युधिष्ठिरासम जे. ॥४९॥
पुसतां पृथा कथी तैं धर्म म्हणे, ‘ अंब ! परिस तोक - वच.
द्याया काय उचित, जो रणीं सहाणार अरिस, तो कवच ? ॥५०॥
द्यावा परा न तरतां अंबुधिमध्यें कसा स्वनावाडी ?
धार्मिक न तो, जना जो न गुणहि शिशुरोदनस्वना वाडी. ’ ॥५१॥
कुंती म्हणे, “ अरे ! बा ! पावों द्यावा मुनी कसा असुखा ?
आम्हीं सुखें म्हणावें, ‘ काळा ! द्विज सोड, आमुचे असु खा. ’ ॥५२॥
विप्रार्थ तुम्हीं असु हि, स्वर्गीं सुखवावया जनक, वाडा.
हें चि हित, न काळास हि पाहुनि लाविति भले जन कवाडा. ॥५३॥
भीसी कां ! अनुभविलें अनुजबळ तुवां न काय गा ! रानीं ?
पावो ताप पराचा, परि हिमगिरिचा न काय गारानीं. ॥५४॥
पडला निपट शिशुपणीं भीम मदंकावरूनि, ज्यावरि तें
झालें चूर्ण शिळातळ, न धरीं भय, यश तवानुज्या वरितें. ॥५५॥
ब्राह्मणसाहाय्यकर क्षत्रिय जो तोचि संत, तोचि तरे,
ऐसें व्यासें कथिलें, म्हणुनि तुम्हां हेंचि संततोचित रे ! ” ॥५६॥
जननीस धर्म वर्णी, नवल न वर्णिल तीस सुरभी ती.
तर्‍हिच तसे खळ वधिले तत्पुत्रानीं, जयासि सुर भीती. ॥५७॥
रात्रौ एकाकी ही शिरतां सागरवनीं न भी मकर,
भीम हि तसा बकवनीं आणि तदन्नीं तसा चि भीमकर. ॥५८॥
जेवी भीम, ‘ बका ! ये ’ ऐसी मारूनि हाक उग्रास;
शिरले काय सदुदरीं सदोदनाचे भिवोनि सुग्रीस. ॥५९॥
हें पाहुनि बक धावे, मानेवरि दे धडाधड बुक्या, तें
होय त्वराशनीं त्य अकुरुकीर्तिकुच्यांचिया हित बुक्यातें. ॥६०॥
हंसें हि जेववावा जो प्रेमें धरुनियां चिबुक लावा,
तो त्या गरुडा झडपी, ‘ आमरण ’ म्हणे ‘ असा चि बुकलावा. ’ ॥६१॥
भीम न सोडी भोजन, राक्षस ताडी बळें जरि बुक्यानीं.
खळ गांजी, परि सादर हरिभजन करी जसा बुधा नुक्यानीं. ॥६२॥
पांडव जेवुनि आधीं मग राक्षसजीवितासि आचवला.
सन्माणि न काळलक्षा ये, येतो काय राक्षसा चवला ? ॥६३॥
मारी हरि लीलेनें जेंवि गजा, तेंवि पार्थ कुणपाशा.
तैं सुर म्हणति, ‘ यमाच्या, गुरु साजति भीमबाहुगुण, पाशा. ’ ॥६४॥
ठेवी नगरद्वारीं परमभयानक अशुद्धिमत् कुणप,
जाणों मातेनें तो वधिला शिशुरक्तपोग्र मत्कुणप. ॥६५॥
भीमें हळू चि जावुनि कथिली वार्ता द्विजासि कानीं ती.
श्लाघ्यहि करुनि न मिरवी कुळज, सुजन हो ! असी सिका नीती. ॥६६॥
‘ चुकलों, क्षमा करा मज, अपराधसहस्र घातुका घडलें, ’
या भावें जाणों तें द्वारीं रक्ष क्षमापना पडलें. ॥६७॥
प्रातःकाळीं च तसें वकशव पाहोनि, एकचक्रा तें
यश देती झाली करिवरपाळाच्या चि एक चक्रातें. ॥६८॥
म्हणति विचक्षण पुरजन अन्योन्य मनीं धरूनि हरिख, ‘ चला,
ज्याचा वार तसाच चि हेतु पुसों कीं, कसा स्वअंरि खचला ? ’ ॥६९॥
सांगे विप्र, ‘ मजकडे येतां प्राणघ्न उग्रतर वार,
बहु भ्यालों, अज जैसा भीतो पाहोनि उग्र तरवार. ॥७०॥
सकुटुंब रडत होतों तों आला मंत्रसिद्ध विप्र कृती,
रोदनहेतु मज पुसे तो सदय महामना शुचिप्रकृती. ॥७१॥
ऐकोनि व्यसन वदे, ‘ मीं देतों अन्न राक्षसापसदा.
हरिणवनीं वृक न बरा, मंडूकांच्या बिळांत साप सदा. ॥७२॥
मच्चिंता न करावी, स्वस्थ असावें ’ असें अभय मातें
देवुनि जाय दमाया, जेंवि शिवाप्रानवल्लभ यमातें. ॥७३॥
त्याचें चि कर्म हें, तो आम्हांला होय पौर हो ! तात.
साधूंसि सहाय सुखें देव सकर्पूरगौर होतात. ॥७४॥
ऐसें परिसुनि पौर ब्रह्मोत्सव करिति, गाति महिमा, ते
म्हणति, ‘ ब्राह्मणचि तुझा पति, गुरु आम्हां प्रजांसि, महिमाते ! ’ ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP