मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय पंधरावा

आदिपर्व - अध्याय पंधरावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


दीना होउनि देवी सत्यवती पुत्रशोकतापानें,
भीष्मासि म्हणे, ‘ साधो ! रक्षावें कुळ तुवां अपापानें. ॥१॥
धर्में त्वन्माता मीं, धर्मज्ञा ! धर्मसेतु रक्षाया
कथित्यें, तें मान्य करीं, स्वीकारीं स्त्री स्वधर्मदक्षा या. ॥२॥
मीं गुरु, मदुक्तिनें या स्त्रीस्वीकारीं तुला नसे पाप.
आपद्धर्म असे हा बा ! पद गुरुचें वरीं, हरीं ताप. ॥३॥
स्वजनां हो तृप्ति तुझा ठायीं, जैसी शिलीमुखां बकुळीं.
कुरुकुळगृह न खचावें; याला आधार तूंचि खांब कुळीं. ’ ॥४॥
भीष्म म्हणे, ‘ माते ! त्वां धर्मचि कथिला, परि प्रतिज्ञा ते
अत्याज्य. भिती सत्यभ्रंशासि, न बहु अरिप्रति ज्ञाते. ॥५॥
म्यां ब्रह्मचर्यसुव्रतनियम स्वमुखें त्वदर्थ जो केला,
देह त्याज्य, परि न तो त्याज्य; न सेवील सुज्ञ ओकेला. ॥६॥
त्यजितील पंचभूतें स्वगुणांसि, रवि छवीस सोडील,
शीतत्वातें चंद्रहि, शक्रहि कर विक्रमासि जोडील; ॥७॥
उष्णत्व त्यजिल दहन, मर्यादेतेंहि सिंधु मोडील,
धर्मपर धर्मराजहि सद्धर्मप्रीतिलाहि तोडील; ॥८॥
परि हा शांतनव, तुझा सुत, केवळ कृपण मान, सत्य जितां,
मेल्याहि न टाकील, प्राणांसि न भीतमानस त्यजितां. ’ ॥९॥
देवीं म्हणे, ‘ खरें हें; सांगाया योग्य होय मीं; नातें
गंगेचें माझें सम; जाणें तुज सत्य - तोय - मीनातें. ’ ॥१०॥
भीष्म म्हणे, ‘ मज न शिवे सत्यभ्रष्टत्व, वंश यश राहे,
ऐसा विचार, शिष्टश्रुतिमान्य, विचारिसील तरि आहे. ॥११॥
पूर्वीं पितृवधकुपितें रामें स्वीकारुनि स्वगुरुकेली,
वधुनि सहस्रभुजार्जुन, असकृन्निःक्षत्रिया धरा केली. ॥१२॥
क्षत्रियवंश बुडविले; वधिले जे जे प्रसिद्ध योध रणीं;
पोटीं शिशु हि नुरविले; राम म्हणे, ‘ क्षत्रहीन हो धरणी. ’ ॥१३॥
संतानार्थ शरण मग विप्रांसि क्षत्रियस्त्रिया गेल्या.
ज्या केवळचि बुडाल्या संतति, त्या प्रकट मागतीं केल्या. ॥१४॥
गुरुशप्त उतथ्याचा सुत, ममताकुक्षिजात, दीर्घतमा
होता प्रकाशमैथुनदोषी, परि आश्रय श्रुतोपशमा. ॥१५॥
स्त्रीपुत्रानीं तो ऋषि, त्या दोषें, जान्हवींत वाहविला;
संतानार्थ बळिनृपें प्रार्थुनि तो निजगृहांत राहविला. ॥१६॥
त्यापासूनि सुदेष्णाराज्ञीला पुत्र जाहला अंग,
दुसरा कलिंग, पुंड्रहि, सुह्यहि, तैसाचि पांचवा वंग. ॥१७॥
ऐसा आपद्धर्मव्यवहार असे; म्हणोनियां क्षिप्र
कोण्हीं विचित्रवीर्यक्षेत्रीं संतान वाढवू विप्र. ’ ॥१८॥
देवी म्हणे, ‘ हित वदसि तूं बा ! सद्बुद्धिच्या अगारा ! या
माझ्याहि हितगुजाचें श्रवण करीं सज्जना ! अगा ! राया ! ’ ॥१९॥
लज्जा वदों न दे, परि चिंतिति ज्या पवित्र पाय कवी,
श्रीमत्पराशराची पुण्यकथा स्वानुभूत आयकवी. ॥२०॥
व्यासजनन कथुनि, म्हणे, ‘ प्रदक्षिणा पुत्र मज करी नमुनीं.
जातां वदे असें कीं, ‘ स्मरतां येउनि, सुखी करीन, ’ मुनी. ॥२१॥
येइल तुझ्या मना, तरि त्याला या संकटांत बाहेन.
संततिचिंताशमन प्रार्थुनि त्या मुनिवरासि पाहेन. ’ ॥२२॥
भीष्म वदे, पडलां तें कानीं, ‘ नमुनि वरदास, विश्वास
धाया, स्मर; रक्षिल तो कानीन मुनिवर दासविश्वास. ’ ॥२३॥
स्मरतांचि, दर्शन दिलें मातेला ईश्वरें पराशरजें,
वाहति माथां, ज्याच्या चरणांचीं, शुद्धधी पराश रजें. ॥२४॥
येतांचि, धांवला हो ! पाहत होताचि वाट पान्हा, तो.
जाणों म्हणति मिथः स्तनदृष्टि क्षीरें न आटपा न्हातो. ’ ॥२५॥
सिंपुनि कमंडलुजळें मग, आधीं दर्शनेंचि, निववीली.
शोकवियोगदवार्ता त्या अमृतघनें पळांत जिववीली. ॥२६॥
माता पूजुनि सुखवी पुत्रातें, नमुनि तोहि मातेतें.
विश्व पवरजीं लोळे, परि तिळमात्रहि न तेज माते तें. ॥२७॥
मातेसि पुसे इच्छावरद श्रीव्यास भक्तसंतान.
मागे विचित्रवीर्यक्षेत्रीं कुरुकुळशिवार्थ संतान. ॥२८॥
‘ ताताकडील भीष्म, व्यासा ! मातेकडील तूं शिष्ट;
म्रुतबंधुचें करावें धर्मार्थ तुम्हीं असेल जें इष्ट. ॥२९॥
असतां समर्थ तूं सुरतरुगुरुवरचरणरेणु देवर, ‘ हा ! ’
या त्वप्रजावतीनीं न म्हणावें, स्वजननीस दे वर हा. ’ ॥३०॥
व्यास म्हणे, ‘ धर्मज्ञे ! माते ! आज्ञा तुझी शिरोधार्या.
सांगेन तें करूं दे व्रत, वर्षभरि त्वदात्मभूभार्या. ’ ॥३१॥
काली म्हणे, ‘ अहा ! बा ! होईल अराजक, प्रजालोप.
आर्तमनासि महाश्रय अम्रततरूचें लहानही रोप. ॥३२॥
कौसल्या गर्भातें पावो आतांचि; वा ! विलंब कसा
साहों ? अधर्म टपतो लोकां, मीनां गिळावया बकसा. ’ ॥३३॥
व्यास म्हणे, ‘ माते ! तरि कौसल्या मद्विरूपता साहो.
माझी करू प्रतिक्षा, ऋतुकाळीं सुव्रता, सुवासा हो. ’ ॥३४॥
ऐसें सांगोनि, श्रीसत्यवतीच्या पदांबुजां नमुनी,
तो योगिवेष ईश्वर झाला अंतर्हित क्षणांत मुनी. ॥३५॥
सांगे सुनेसि देवी, ‘ कुरुकुळ तारावयास भाव्यासीं
बोल, रम सुतार्थ, जसी रमत्ये बोधार्थ सत्सभा, व्यासीं. ’ ॥३६॥
झालीच मनें प्रांजलि ती पुत्रास प्रसू; न शयनातें
मोडिति करूनि अंजलि नेतां सून प्रसूनशयनातें. ॥३७॥
सासूनें शुचिशयनीं सून निजविली धरूनि हनु. कंपा
पावे, चिंती भीष्मा; ये मुनिहि करावयासि अनुकंपा. ॥३८॥
मुनिवररविच्या उदयीं ती कैरविणीच अंबिका झाली.
अतुग्र रूप पाहुनि, झांकी तत्काळ लोचनें, भ्याली. ॥३९॥
त्या साध्वीवरि करुणा केल्यावरि, सूनुला पुसे माता,
‘ होईल पुत्र कैसा ? सांग मला, सर्व जाणसी ताता ! ’ ॥४०॥
व्यास म्हणे, ‘ होइल सुत नागायुतबळ, सभाग्य, विदितनय,
राजर्षि, साधुसत्कृत; त्यासहि होतील शत बळी तनय; ॥४१॥
परि मातेच्या दोषें होइल जात्यंध, एव्हडेंचि उणें.
चंद्रीं अंक तसें हें; परिपूर्ण परंतु सर्वसाधुगुणें. ’ ॥४२॥
माय म्हणे, ‘ माझें मन, जाणुनि होणार नृप अचक्षु, भितें;
योग्य दुजा सुत द्यावा; लंघावें त्वां न हें वच क्षुभितें. ’ ॥४३॥
मान्य करुनि मुनि गेला; अंधचि सुत अंबिकेसि मग झाला.
‘ धृतराष्ट्र ’ असें भीष्में संस्कारुनि नाम ठेविलें त्याला. ॥४४॥
अंबालिकेसिही मग विनवी, गेला म्हणोनि सुतपा ‘ हूं. ’
‘ त्वांहि न भ्यावें; सिंहासनगत बाई ! तुझाचि सुत पाहूं. ’ ॥४५॥
तीही भ्याली मुनिला; झाली पांडु क्षणांत; कातरता
स्त्रीगुणचि; असो दोष; न पुरुषहि त्या भीतिदायका तरता. ॥४६॥
कृष्ण म्हणे, ‘ म्यां दिधला संप्रति सुंदरि ! कुमार तुजला जो,
तद्वर्ण पांडु, नामहि; वरकर्पूरप्रसूहि तुज लाजो. ’ ॥४७॥
तेंही, पुसतां, कथिलें पांडुत्व; म्हणूनि धरुनियां हनुतें,
माय म्हणे, ‘ बा ! तिसरा द्यावा त्वां कल्पतरुसमूहनुतें. ’ ॥४८॥
लाजे, हांसे, पाहे पायांचिकडे प्रसन्नवदन मुनी.
‘ अंब ! श्रुतिराज्ञा ते, ’ ऐसें बोलोनि जाय पद नमुनी. ॥४९॥
झाला पांडु; तयावरि पहिलीला वासवी तदेव पुन्हां
सांगे, ‘ आजि मुनिकडे जा, येइल, उदित होउ दे वपु, न्हा. ’ ॥५०॥
तें सांगे दासीला आपण चित्तांत फार भीडस ती;
व्याळीसीच गमे मुनितनु; रक्षी सासुचीहि भीड सती. ॥५१॥
त्या प्रभुला ठकवि असें कोण्हीहि न कर्म ठक; विनटलीला
तारावया भजे, हो ! भुलला न सुकर्मठ कवि नटलीला. ॥५२॥
व्हाया प्रसन्न जोडुनि सजलोत्थितरोम हात, ‘ पार मला
दावा, ’ म्हणे ‘ भवाचा; ’ तरिच तिसीं तोमहातपा रमला. ॥५३॥
गुरुवरसेवालाभें झाली लोकत्रयीं उजळ दासी.
पंक झडोनि गळाला, अनुसरतां त्या सुंपुण्यजळदासी. ॥५४॥
सेवाधर्में पूजुनि, भवसागरसेतु सुखविला साचा.
संपादिला प्रसाद प्रभुचा, जो हेतु सुखविलासाचा. ॥५५॥
मुनिराज म्हणे तीतें, ‘ भावें झालीस आनत पदासी.
तरलीस; यावरि न तूं दासी; ऐसें न आन तप, दासी !. ’ ॥५६॥
‘ होइल सुत धर्मात्मा, सर्वसुमतिपति, महायशा; शील
गातिल कवि; महिला, कुरुपति करुनि तया सहाय, शासील. ॥५७॥
केलें मद्वंचन हें; प्रसवेल सुमेरुतुल्य सुत राई; ’
ऐसें मातेसि कथुनि, गेला होउनि मुनींद्र उतराई. ॥५८॥
मांडव्याच्या शापें झाला दासीकुमार यमधर्म.
‘ विदुर ’ असें नाम तया ठेउनि गांगेय दे सुबहु शर्म. ॥५९॥
शापाचें मूळ असें, मांडव्यमहर्षि तरुतळीं उग्र
तप करि; निजाश्रमपदद्वारींच उभा; दिसे स्वयें उग्र. ॥६०॥
कृश, तेजस्वी, मौनव्रत, ऊर्ध्वभुज, प्रशांत पात्यातें
पातें लावुनि होता; म्हणति मुनी सुर ‘ महातपा ’ त्यातें. ॥६१॥
कोणा एका नरपतिनगरीं चोरी करूनि, चोरानीं
पळतां आश्रय केला आश्रम, वांचावयासि, तो रानीं. ॥६२॥
मागोनि लाग लावित नृपबळ येउनि, पुसे तया तपत्या.
सांगेल काय मौनी ? ध्यानस्था एक ठावुकें तप त्या. ॥६३॥
त्या आश्रमींच तस्कर सांपडतां, मुनिहि मानिला चोर.
बांधुनि नेतां हि न तो डगमगला, शांति साधुची थोर. ॥६४॥
राजाज्ञेनें शूळीं मुनिहि चढविला, परंतु न क्षोभे.
तेथेंहि तपस्तेजें, एकलतालाग्रगार्कसा, शोभे. ॥६५॥
होता तसाचि शूळीं; तिळहि न धैर्यप्रताप डळमळला.
न ज्ञानदृक्शतांशहि, येउनि देहात्मतापडळ, मळला. ॥६६॥
तापसजनास त्याचा ध्यानीं वृत्तांत तो सकळ कळला;
मग खगरूपें रात्रौ येउनि, पाहूनि त्यास, कळकळला. ॥६७॥
मुनि म्हणति, ‘ बा ! अहा ! हें काय ? प्रख्यात तूं ऋषी, वळसा
हा कां ? क्षेत्रीं सुकृतचि पिकविसि, कीं शाळितें कृषीवळसा ? ’ ॥६८॥
मांडव्य म्हणे, ‘ मुनिहो ! सुविचारें यासि दंडकर हा तो
मुख्य न; कृत भोगावें; शांतीसीं तरिच दंडक रहातो. ’ ॥६९॥
तें वध्यस्थळरक्षकवदनें परिसोनि, भूप कर जोडी;
अभयवरद मुनि उतरुनि, मग मूळीं, शूळ न निघतां, तोडी. ॥७०॥
तत्प्राणांचा न करी जर्‍हि अंतर्गतहि, ती अणी कवळ.
होता स्वस्थ; तपाचें सांगावें काय हो अणीक बळ ? ॥७१॥
त्याचें प्रख्यात ‘ अणी - मांडव्य ’ असेंचि जाहलें नाम.
होय परशुराम, जसा परशूच्या धारणामुळें, राम. ॥७२॥
संयमनीप्रति जाउनि, धर्मासि म्हणे मुनींद्र, ‘ म्यां पाप
काय कधीं केलें ? रे ! आलें फळ ज्यास, हा असा ताप. ॥७३॥
तत्वज्ञ आपणाला म्हणविसि; वद तव शीघ्र पितृपा ! हूं.
मग मत्तपोबळ पहा; बोल, तुझें आजि सुज्ञपण पाहूं. ’ ॥७४॥
धर्म म्हणे, ‘ भगवंता ! मन ठेवुनि कुतुकसाधनीं तुच्छीं,
बा ! घातली इषीका बाळपणीं त्वां पतंगिकापुच्छीं. ’ ॥७५॥
‘ अपराध अल्प असतां, त्वां केला दंड हा असा; धूसी
बहुधा असेंचि जीवां; शिक्षावें म्यांचि तुज असाधूसी. ॥७६॥
हो मानुषदासीसुत, हाचि उचित दंड; पूस नय मातें;
जें अज्ञपणीं घडलें अघ, आणावें मनांत न यमा ! तें. ’ ॥७७॥
ऐसा मुनिनें दिधला दासीपुत्रत्वहेतु हा शाप;
तो धर्म विदुररूपें संरक्षी कुरुकुळा, जसा बाप. ॥७८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP