मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय दुसरा

आदिपर्व - अध्याय दुसरा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


पारिषित जनमेजय बहुवार्षिक सत्र करि कुरुक्षेत्रीं.
सत्रांत श्वा येतां, जनमेजयबंधु ताडिती वेत्रीं. ॥१॥
तो सुरशुनीसुत तिला, गेला रोदन करीत, सांगाया.
सरमा म्हणे नृपाळा, ‘ त्वां केला व्यर्थ दंड कां गा ! या ? ॥२॥
म्हणतो, नाहीं सिवलों दृष्टिकरुनिही धराधवा ! हविला.
कां धर्म व्यर्थ तुवां, गांजुनि हा निरपराध, वाहविला ? ॥३॥
अघ न करितांहि दंडुनि माझ्या पुत्रासि मज दिला ताप;
तरि तुज अतर्कितचि भय येईल. ’ असा तिणें दिला शाप. ॥४॥
देउनि शाप, क्रोधें जातां तेथूनि सुरशुने सरमा,
झाल विषादभाजन नृप; चिंता त्यासि लागली परमा. ॥५॥
सत्रसमाप्ति करुनि तो गेला मग हस्तिनापुरा; राज
चिंता करी बहु; म्हणे, ‘ कोण निवारील शाप हा माजा ? ’ ॥६॥
त्यावरि नृप मृगयेला गेला असतां सदाश्रमा पाहे;
नामें श्रुतश्रवा मुनि जेथें निरुपम तपोनिधि राहे. ॥७॥
सोमश्रवा तयाचा सुत, तेजस्वी, सुविद्य त्याहूनीं.
राजा बहु आनंदे, त्या दोघां आश्रमांत पाहूनी. ॥८॥
नमुनि श्रुतश्रव्यातें सांगुनि निजवृत्त नृप म्हणे ‘ स्वामी !
हो मत्पुरोहित; तुला वरदा ! वर दास मागतों हा मीं. ’ ॥९॥
तो मुनि म्हणे, ‘ नृपाळा ! जें माझें गलित शुक्र तें व्याली
प्याली, या तेजस्विप्रवरा मन्नंदनासि ती व्याली. ॥१०॥
हा सर्व पापकृत्या नाशील; न एक शंभुची कृत्या;
रक्षील आश्रितासि व्यसनीं; हर रक्षितो जसा भृत्या. ॥११॥
व्रत यांचें एक असे, जो जें मागेल तें तया द्यावें;
हें चालविशील तरि स्वपुरोहित करुनियां सुखें न्यावें. ’ ॥१२॥
मान्य करूनि नृपें तो वंदुनि सोमश्रवा पुरा नेला.
भ्रात्यांतें हितबोध स्वपुरोहितवाक्यपालनीं केला. ॥१३॥
तक्षशिळादेशातें जाउनि, जिंकूनि, वश करी राजा,
दावी शत्रुजनीं बळ, दावित होता जसा पिता, आजा. ॥१४॥
होता धौम्य मुनि, तया शिष्य तिघे, ज्यांसि गुरुपदींच रुची;
उपमन्यु एक, दुसरा आरुणि, तिसराहि वेद; सर्व शुची. ॥१५॥
गुरु आरुणिला सांगे, शाळिक्षेत्रांत फार जळ जातां
नाशेस्ल बीज, म्हणउनि रोधावा मार्ग वारिचा बा ! तां. ’ ॥१६॥
दुर्जयजळप्रवाहें आरुणिकृत सेतुबंधशत नेलें.
श्रीगुरुनें योगबळें शिष्यपरीक्षार्थ तें तसें केलें. ॥१७॥
दुर्वारवारिमार्गीं मग रचिलें शीघ्र आपुलें गात्र;
आरुणि म्हणे, ‘ न नाशो गुरुशालिक्षेत्र एक हें मात्र. ’ ॥१८॥
शिष्यांप्रति धौम्य पुसे, ‘ आरुणि कोठें ? ’ करूनि ते प्रणती
‘ केदारखंडबंधन आज्ञापुनि, धाडिला तुम्हीं, ’ म्हणती. ॥१९॥
जाउनि केदाराप्रति आपण शिष्यासि धौम्य तो पाहे.
धेनु जसी निजवत्सा ‘ एहि; क्कास्यारुणे ! ’ असें बाहे. ॥२०॥
गुरुशब्द श्रवण करुनि, आरुणि धावोनियां धरी चरण.
पुसतां स्ववृत्त सांगे, तें करि मुनिचित्तवृत्तिचें हरण. ॥२१॥
गुरुधान्यक्षेत्राहुनि ज्या ज्ञानक्षेत्रही उणें काय,
त्या श्रीगुरुप्रसादस्वर्द्रुममूळाश्रिता उणें काय ? ॥२२॥
त्या कर्में ‘ उद्दालक ’ नाम, शिरीं पाणिपद्मही, ठेवी.
त्यासि वराशी दे तो, देतो पुत्रासि जसि पिता ठेवी. ॥२३॥
झाला गुरुप्रसादें लोकत्रयमान्य आरुणि कविवर.
छात्रीं नुरवि तिळहि खळदृष्टिसि गुरुराज कारुणिक विवर. ॥२४॥
ज्ञानामृतें भरुनि तो स्वस्थाना, जेंवि मेघ जळधीनें,
पाठविला, निववाया जग, त्या गुरुनें दयाविमळधीनें. ॥२५॥
उपमन्यु गुरुनिदेशें धेनु वनामाजि सर्वदा रक्षी;
सूर्यास्तीं घेउनि ये; त्यातें गुरु, चरण वंदितां, लक्षी. ॥२६॥
धौम्य म्हणे, ‘ रे वत्सा ! भ्रमसि वनीं, तदपि दिससि तूं मोटा ? ’
उपमन्यु म्हणु, ‘ येउनि, भिक्षा मागोनि, तर्पितों पोटा. ’ ॥२७॥
‘ न निवेदितां मला त्वां भिक्षा भक्षूं नये, ’ म्हणे धौम्य.
आज्ञा माथां वाहे; तैसेंचि करी गुरूक्त तो सौम्य. ॥२८॥
भैक्ष्य निवेदी जें तें सर्वहि घे नित्य गुरु, जसा खोटा;
पुनरपि पुसे तयाला, ‘ वत्सा ! दिसतोसि तूं बरा मोटा ? ’ ॥२९॥
‘ दुसरी भिक्षा खातों ’ ऐसें कथितां, म्हणे गुरु, ‘ प्राज्ञा !
अन्याय हा, न करणें परवृत्त्युपरोध; हे असे आज्ञा. ’ ॥३०॥
भिक्षाहारनिवरण केल्यावरिही दिसे बरा तुष्ट;
म्हणुनि उपाध्याय पुसे, ‘ वत्सा ! आहेसि तूं कसा पुष्ट ? ’ ॥३१॥
उपमन्यु म्हणे, ‘ स्वामी ! धेनूंच्या सेवितों वनीं दुग्धा. ’
धौम्य म्हणे, ‘ तुज आज्ञा नसतां करिसी असें कसें मुग्धा ? ’ ॥३२॥
आज्ञा धरी शिरीं, परि उपमन्यु दिसे तथापि तो पीन;
पुनरपि पुसे गुरु; मनीं कीं, ‘ मीं सर्वस्व यासि ओपीन. ’ ॥३३॥
शिष्य म्हणे, ‘ स्तनपानीं, वत्समुखीं ये तयाचि फेंसाचें
प्राशन करितों; स्वामी ! कारण या पीनतेसि हें साचें. ’ ॥३४॥
‘ हे वत्स सुगुण, सकरुण, आत्मविभागीं करूनियां तोटा
देताति फेनपा ! तुज फेन बहु; अहा ! अधर्म हा मोटा. ’ ॥३५॥
देशिक ऐसें सांगे; ‘ न करीन ’ असें पुन्हा म्हणे; तो भी.
जठराग्निप्रशमार्थी उपमन्यु तसें करी, नव्हे लोभी. ॥३६॥
मग धेनु चारितां तो क्षिद्विकळ वनांत अर्कतरु लक्षी.
त्याचीं पत्रें प्राज्य क्षीर स्रवती म्हणोनि बहु भक्षी. ॥३७॥
त्यांच्या तीक्ष्णविपाकें झाला तत्काळ अंध; कूपांत
आश्रमपदासि येतां पडला उपमन्यु घोररूपांत. ॥३८॥
आल्या धेनु, न आला शिष्य, म्हणुनि त्यासि गुरु वनीं हुडकी
‘ एक ’ म्हणे ‘ लेवविली, हा ! घडितां सांडिली दुजी कुडकी. ’ ॥३९॥
‘ एहि; कास्युपमन्यो ! वत्स ! ’ असी हाक फोडितां थोर,
श्रवण करुनि उत्तर दे, दूरुनि तो, तोयदा जसा मोर. ॥४०॥
‘ स्वामी ! हा मीं आहें, कूपीं पडलों पथीं न लक्षूनीं;
झालों अंध स्वकृतें, अर्कद्रुदळें यथेष्ट भक्षूनीं. ’ ॥४१॥
‘ तुज दृष्टि अश्विनीसुत देतील स्तुति करीं, ’ असें सिकवी.
परते करुणाघन गुरु, शिष्यक्षेत्रांत सद्यशें पिकवी. ॥४२॥
स्तवितांचि भेटले गुरुभक्ताला देववैद्य नासत्य.
व्यसनीं गुरूपदेशचि रक्षी, दुसरा न, या जना, सत्य. ॥४३॥
जो भक्षी अर्काचा, दास्यीं वागावया वपू, पाला;
सत्व पहाया देती, त्या क्षुधिताच्या करीं, अपूपाला. ॥४४॥
उपमन्यु म्हणे, ‘ गुरुला पुसिल्यावांचूनि, या अपूपा मीं
खाया उत्साह मनीं पावत नाहीं, दया करा स्वामी ! ’ ॥४५॥
‘ अस्मद्वचनें, आम्ही देतांचि, अपूपसेवना, सत्य,
पूर्वीं करिता झाला त्वद्गुरुही, ’ म्हणति देव नासत्य. ॥४६॥
तदपि, तसेंचि विनवितां, गुरुभक्तप्रेमविगलदस्रांनीं,
देवूनि आत्मदृष्टिहि, केला तो बहुकृतार्थ दस्रानीं. ॥४७॥
‘ त्वद्गुरुचे कार्ष्णायस दंत, हिरण्मय तुझे, असोत ’ असें
वदले दस्र; ‘ तदर्थ स्वगुरुपरिस होउनीं कृतार्थ असें. ॥४८॥
ब्रह्मज्ञ गुरु नसे, परि तूं भक्तिबळेंकरूनि होसील.
गुरुभक्त धन्य तूंचि; च्छळ कोण असा अधन्य सोसील ? ’ ॥४९॥
उद्धरुनि देव गेले, मग तो उपमन्यु गुरुपदीं लागे;
पुसतां, झालें वृत्त, प्रांजळि होऊनि, सर्वही सांगे. ॥५०॥
धौम्य म्हणे, ‘ तुज यांवें शास्त्रांसह कंठपाठ वेदानीं;
हो धन्य, मज वरांच्या, प्रेमभरें, किमपि नाठवे दानीं. ॥५१॥
जें आश्विनेय वदले, त्या कल्याणासि पात्र होसील.
शिष्यचकोरांसि तुझा अमृतें मुखचंद्र नित्य पोसील. ’ ॥५२॥
हे उपमन्युपरीक्षा; वेदपरीक्षाहि आयिका आतां.
गुरुसेवासुकृतफळप्राप्ति गुरूपासकां असे गातां. ॥५३॥
‘ कांहीं काळ करावी शुश्रूषा; श्रेय पावशील, ’ असी
आज्ञा करि गुरु, लावी सेवनशाणीं गुणार्थ शिष्यअसी. ॥५४॥
गुरुसदनीं वेद जसा, विषयींहि तसा न देह राबेल.
तो दास्यरूप वाहे त्या नित्य, चुकों न दे, हरा बेल. ॥५५॥
गुरुसदन अमृतसागर, त्यामाजि तरंगवृंद तें कृत.
मोटें लहान न म्हणे, सेवी भवदावदग्ध तो भृत्य. ॥५६॥
वेद जसा गुरुभजना, यक्ष कृपणहि न तसा धना जपला.
रात्रिंदिव उत्साहें दुष्करसेवामहातपें तपला. ॥५७॥
निजपूजाचि विसरला, चुकला जठराग्निलाचि तर्पाया;
निद्रेलाचि न जपला, खिजला मन आळसासि अर्पाया. ॥५८॥
होय प्रसन्न बहुतां दिवसीं गुरु - वामदेव वेदा त्या.
सर्वज्ञत्व कुशळवर दे; कोण न काम देववे दात्या ? ॥५९॥
प्रथमच्छात्रपरीक्षातात्पर्य असेंचि जाणती आर्य;
अत्यल्पहि निजगुरुचें साधावें, त्यजुनि देहही, कार्य. ॥६०॥
गुरुनें अत्यावश्यक अशनादि निषेधितांचि सोडावें.
हें उपमन्युपरीक्षातात्पर्य प्रेमळेंचि जोडावें. ॥६१॥
वेदपरीक्षेचें हें तात्पर्य, गुरूक्त अनुचितहि कर्म
करितां हिमोष्णदुःखा तदनुग्रह मानितां, घडे शर्म. ॥६२॥
जरि गुरु सेवेसि न घे, शिष्यें अर्थेंकरूनि तरि त्यातें
प्रार्थूनि तोषवावें, अहिततमाज्ञानबीज हरित्यातें. ॥६३॥
गुरुदक्षिणार्थ उद्यम करितां, शक्रादिदेवता तूर्ण
होती सहाय; दुर्जनविघ्नितही कार्य होतसे पूर्ण. ॥६४॥
हें प्रतिपादन आहे वेदचरित्रांत; तेंचि परिसा हो !
गुरुभक्तांचा महिमा पापांत, महागजांत हरिसा हो. ॥६५॥
वेद गुरुकुळापासुनि, अंबुधिपासूनि जेंवि चंद्र, निघे.
त्यासहि होते झाले उत्तंकप्रमुख साधु शिष्य तिघे. ॥६६॥
सेवा न घेति गुरुकुळवासानुभवी, म्हणोनि, तो कांहीं
शिष्यांहीं अनुभविलें लालनसुख जेंवि वृद्धतोकांहीं. ॥६७॥
जनमेजयपौष्यांचा झाला होता पुरोहित स्ववरें.
वेदासि कोण न म्हणे गुरु ? ज्यावरि ढळति गुरुकृपाचवरें. ॥६८॥
एका समयीं ठेउनि उत्तंकाला निजाश्रमीं, वेद
याज्याप्रति, कुमुदाप्रति विधुसा, गेला हरावया खेद. ॥६९॥
उत्तंकाला कांहीं सांगे स्वाभिमत कार्य गुरुभार्या;
श्रीमदयोध्या जैसी भरता गुरुभक्तिसादरा आर्या. ॥७०॥
जेंवि वसिष्ठाद्युक्ती सांगति, ‘ भरता ! वरीं गुरुश्रीतें,
उत्तंकासि मुनिसत्या ‘ स्वीकारीं ’ म्हणति ‘ निजगुरुस्त्रीतें. ’ ॥७१॥
राम जसा भरतातें, उत्तंकातें तसाचि गुरु वेद
सुखवी वरप्रसादें; नाहीं गुरु देव यांत तिळ भेद. ॥७२॥
उत्तंक म्हणे गुरुला, ‘ द्यावी म्यां काय दक्षिणा सांगा ? ’
वेद वदे, ‘ बहु दिधलें, वत्सा ! उपरोध करिसि हा कां गा ? ॥७३॥
त्वां मज अर्थ दिला जो, न म्हणें गुरु त्यापरीस हेमागा;
पूस उपाध्यायीतें, जरि तूं म्हणतोसि आग्रहें मागा. ’ ॥७४॥
प्रार्थुनि तसेंचि पुसतां त्यासि उपाध्यायिनी असें मागे;
‘ पौष्यस्त्री - ताटंकें दे; न प्रिय अर्थ मज दुजा लागे. ॥७५॥
होणार आजिपासुनि चवथे दिवसींच पुण्यकव्रत; ती
वेळा सांभाळीं कीं होइल तुज इष्टदा सुरव्रतती. ॥७६॥
तीं कुंडलें स्वकर्णीं घालुनि म्यां श्रीसमान साजावें,
वाढावें विप्रांतें; तरि सत्वर शुद्धमानसा ! जावें. ॥७७॥
उत्तंका ! त्या समयीं येतां तूं पावसील कल्याण.
नाहीं तरि तें कैंचें ? तुजवरि घालील शाप पल्याण. ’ ॥७८॥
आज्ञा घेउनि जातां, पुरुष वृषारूढ देखिला वाटे;
सांगे मद्वृष - गोमयभक्षण; तें त्यासि निंद्यसें वाटे. ॥७९॥
‘ गुरुनेंहि भक्षिलें, ’ हें त्या पुरुषें सत्य सांगतांच, मना
ये; भक्षी, शीघ्र निघे; उठतां उठतां करूनि आचमना. ॥८०॥
वृष धर्म; पुरुष ईश्वर; जें गोमय, मूत्र, अमृत, धर्मफळ;
तें मृत्युभयहर म्हणुनि, सेवन करवी प्रभू करूनि बळ. ॥८१॥
पौष्यनृपाप्रति जाउनि, अमृतरसस्रावि कुंडलें याची;
तों तो, प्रसन्नचित्तें, याञ्चा सफळा करावया याची, ॥८२॥
कृतपुण्यासि हरि जसा कल्पलतेजवळि इष्ट पावाया
स्वगृहीं, स्त्रीनिकट, तसा भूप प्रेषौ विशुद्धभावा या. ॥८३॥
पाहे गृहांत परि ती, देवी कोठेंहि न दिसतां क्षिप्र
परते; म्हणे, ‘ नृपा ! या योग्य विनोदासि हा नव्हे विप्र. ’ ॥८४॥
करुनि विचार नृप म्हणे, ‘ केला म्यां शोध, म्हणसि, बहु धामी
देवी न पाहिली, तरि म्हणतों, उच्छिष्ट अससि बहुधा, मीं. ॥८५॥
साध्वीदर्शन दुर्लभ अशुचि जनाला; करीं बरें स्मरण; ’
ऐसें म्हणतां, स्मरला गुरुचे चित्तांत चिंतितां चरण. ॥८६॥
उत्तंक म्हणे, ‘ केलें आचमन उठोनि चालतां वाटे;
तें झालें व्यर्थ खरें मज तों साध्वीच देवता वाटे. ’ ॥८७॥
होउनि शुद्ध यथाविधि सदनीं जातांचि देखिली देवी.
ती या सत्पात्राच्या चरणीं शिर, कुंडलें करीं, ठेवी. ॥८८॥
‘ साधव पथीं असावें, तक्षक जपतो; ’ असें सती सिकवी;
दे आशीर्वाद; निघे तो शीघ्र; पुसोनि त्यास तीसि कवी. ॥८९॥
गुणवत् पात्र म्हणुनि, तो भूपें श्राद्धार्थ विनवितां राहे;
भोजनसमयीं पात्रीं शीत सकेशान्न वाढिलें पाहे. ॥९०॥
कोपे, म्हणे, ‘ असें हें श्राद्धीं विप्रासि अन्न वाढावें ?
हो अंध, प्रभुनें पद मत्तापासूनि शीघ्र काढावें. ॥९१॥
भूप म्हणे, ‘ अन्न अशुचि नसतां जरि दूषितोसि, घे शाप,
अनपत्य, हो; तुझें तुज बाधो शुद्धानदूषका ! पाप. ’ ॥९२॥
विप्र म्हणे, ‘ आन पहा; पौष्या ! नससीच योग्य कोपाया,
जैसी असती पतिला, करुनि बळें पाप, शाप ओपाया. ’ ॥९३॥
अन्न सदोष पहातां, राया अपराध आपुला कळला.
शापनिवृत्तिवरार्थ प्रांजलि होतांचि, विप्र तो वळला. ॥९४॥
विप्र म्हणे, ‘ येईलचि, परि चिर न टिकेल, अंधता, राया ! ’
साधु समर्थचि, धरितां चरण, च्छेदूनि बंध, ताराया. ॥९५॥
‘ तूंहि स्वशाप वारीं ’ म्हणतां विप्रासि नृप म्हणे, ‘ बापा !
क्षत्रियहृदय क्षुरसम, जाणतसे द्यावयाचि हें शापा. ॥९६॥
हृदय नवनीत तुमचें, वचन क्षुर; आमुचें वचन लोणी,
चित्त क्षुरचि; सहजगुण लोकीं केला न अन्यथा कोणी. ’ ॥९७॥
उत्तंक म्हणे, ‘ राया ! जरि मीं शुद्धान्न दूषितों तरि तो
मज बाधता; तसें तों नाहीं; मग शाप काय गा ! करितो ? ’ ॥९८॥
ऐसें वदोनि, त्याचा जायासि निरोप, कार्य साधुनि, घे;
आठवुनी मनिं आणुनि, तो, श्रीमद्गुरु सभार्य, साधु निघे. ॥९९॥
क्षण दृश्य अदृश्य पथीं, नग्न क्षपणक विलोकितां क्षिप्र
धांवे बुध; दुःस्वप्न प्रेक्षुनि काशीपथीं तसा विप्र. ॥१००॥
उदकार्थ पथीं गुंते, ताटंकें वेगळीं क्षण स्थापी;
क्षपणकतनु तक्षक खळ तितुक्यांतचि कुंडलें हरी पापी. ॥१०१॥
पळतांचि देखिला खळ; वंदुनि गुरुदेवतांसि, तो रागें
त्या दुष्टाच्या लागे, जैसा सुमुमुक्षु मृत्युच्या मागें. ॥१०२॥
विप्रें धावुनि धरितां क्षपणक वेष त्यजूनि निजरूपें
शिरला बिळांत तक्षक; तों क्षोभे द्विज, जसा दहन तूपें. ॥१०३॥
ऐसें होतां, तो मुनि, रक्षाया स्वयश आणि ताटंकें,
झाला क्षितिला दंडें, जेंवि शिळेलागि, खाणिता, टंकें. ॥१०४॥
तें पाहुनि शक्र म्हणे, ‘ वज्रा ! मुनिच्या प्रविष्ट हो दंडीं;
आश्रय दिला खळाला जेणें, त्या भूमिकुक्षिला खंडीं. ’ ॥१०५॥
वज्रें तसेंचि केलें, खणिली यावद्भुजंगदेश रसा.
गेला द्विज पाताळीं, चापच्युत रावणारिचा शरसा. ॥१०६॥
जावूनि नागलोकीं, नागांतें स्तवुनि, कुंडलें मागे.
परि ते त्यासि न वळले. स्तुति करितां, हस्त जोडितां, भागे. ॥१०७॥
दोघी स्त्रिया सित असित तंतूनीं विणिति पट असें पाहे;
तों द्वादशार चक्रहि सा शिशुनीं फिरवितांचि जें वाहे. ॥१०८॥
देखे तसाचि तेथें एक पुरुष, एक त्याजवळ वाजी;
त्यांतें स्तवि. पुरुष म्हणे, ‘ माग. ’ वदे विप्र, ‘ नाग वळवा जी !. ॥१०९॥
पुरुष म्हणे, ‘ विप्रा ! या अश्वापानीं करीं अगा ! धमन.
साधो ! तुझें न मानू, त्या खळबळजळधिला अगाध, मन. ’ ॥११०॥
विप्र तसेंचि अनुष्ठी; तों हयवदनादिरंध्रभवधूम,
मूषकबिळीं जसी, तसि करि त्या नागालयांत बहु धूम. ॥१११॥
पाताळांत सधूम ज्वाळा शिरतांचि तापले भोगी.
संसर्गीही भोगिति, दोषीच न दोष आपले भोगी. ॥११२॥
‘ मरतों ’ ऐसें कळलें, व्यसनांत सुचेचिना उपाय; नतें,
नागें, मग, कुंडलयुग जें, केलें मुनिपदीं उपायन तें. ॥११३॥
‘ चुकलों; रक्षीं. ’ ह्मणतां कर जोडुनि, लाज तक्षका नाहीं.
दंडेंचि खळ वळे; हें तत्व प्राशूत दक्ष कानाहीं. ॥११४॥
देउनि अभय नतातें, घेउनि तीं कुंडलें, म्हणे, ‘ आजि
पुण्यक मीं दूर; अहा ! क्षोभेल गुरुप्रिया मनामाजि. ’ ॥११५॥
तो पुरुष म्हणे, ‘ विप्रा ! हो अश्वारूढ; दिव्य वाजिप हा
क्षणमात्रें गुरुसदना तुज नेयिल; कुतुक तेंहि आजि पहा. ’ ॥११६॥
चढतांचि, आणिला तो क्षणमात्रें गुरुकुळासि अश्वानें.
व्यसनें पराभवासि न पावे गुरुभक्त; सिंह न श्वानें. ॥११७॥
तों गुरुपत्नी ‘ न्हावुनि, वेणी करवीत बैसली होती.
‘ टळलाचि अवधि; द्यावा शाप; ’ असें जों मनीं म्हणे हो ! ती, ॥११८॥
तीतें वंदुनि, ठेवी कुंडलयुग तीपुढें, पुन्हां वंदी.
गुरुपत्नीनें केला धन्य, शिवा - दृष्टिनें जसा नंदी. ॥११९॥
मग अमृतघनाच्याही, जीची हांसेल धूलि, करकेला,
गुरुपदयुगळी नमिली; र्‍हीत जिणें पारिजातकर केला. ॥१२०॥
पुसतां विलंबकारण, सांगे मग, जें विलोकिलें होतें
वृष - गोमयभक्षण; जें पाताळांतीलही पुसे तो तें. ॥१२१॥
गुरु वेद म्हणे ‘ वत्सा ! चिंतिति जीतें सदैव धीर, चिती
ती एक दुजी माया अमित ब्रह्मांडकुंभ जी रचिती; ॥१२२॥
जें तंत्र देखिलें त्वां, तें होय अनेकवासनाजाळ;
सित असित तंतु तीं सुखदुःखें; पट भव, तसेचि जे बाळ ॥१२३॥
ते वत्सा ! तुज कथितों; एक अविद्या, असें मनीं आण;
तैसीच अस्मिता ती दुसरी, ऐसें महामते ! जाण; ॥१२४॥
तिसरा राग; चतुर्थ द्वेष; अभिनिवेश पांचवा; सावी
ती ईश्वरमाया; हे व्हावी अध्यात्मखुण तुला ठावी. ॥१२५॥
जें चक्र पाहिलें तें स्थूळ शरीर; प्रमाण हें बापा ।
यांच्या संचाराचा हेतु अविद्यादिषट्क निष्पापा !. ॥१२६॥
जो पुरुष सांगासी, तो अंतर्यामी महेश, मायावी.
जो अश्व, जीव तो; हे दृष्टि तुला साधुसत्तमा ! यावी. ॥१२७॥
पौष्याप्रति जातां, जो पुरुष वृषारूढ देखिला अयनीं,
तो परमेश्वर; वृष, तो धर्म; वृषभरूप भासला नयनीं. ॥१२८॥
गोमय भक्षविलें, तें अमृत; म्हणोनीच नागगेहांत
तूं वांचलासि वत्सा ! विषबाधा जाहली न देहांत. ॥१२९॥
परमेश्वरें अनुग्रह तुजवरि केला; स्वतत्व कळवीलें.
त्या आम्हां जीवांच्या सुहृदें दुस्तर अरिष्ट पळवीलें. ॥१३०॥
आहे तुझी स्वधर्मीं सन्निष्ठा, तीच या फळा फळली.
हो मदधिक सत्संमत; जा स्वगृहा; चित्कळा तुला कळली. ’ ॥१३१॥
गुरुला नमुनि निघाला. गेला तो हास्तिनापुरासि कवी.
तक्षशिलाजयमुदिता भेटे जनमेजया; असें सिकवी, ॥१३२॥
‘ कर्तव्य तें न करितां, राया ! भलतेंचि करिसि बाळकसा;
काय म्हणावें तुज या भरतकुळीं तूं असा नृपाळ कसा ? ’ ॥१३३॥
पूजुनि त्यासि नृप म्हणे, प्रकृतींच्या पाळनें सदा धर्म
रक्षितसें, भगवंता !; वद जें चुकलों असेन मीं कर्म. ’ ॥१३४॥
उत्तंक म्हणे, ‘ केला भस्म तुझा तात तक्षकें अहितें;
आझुनि तरि फेडावें गुरुचें ऋण, भस्म करुनि त्या अहितें. ॥१३५॥
विषहरणदक्ष कश्यप, धन देवुनि, फिरविला; असा खोटा.
विघ्न करुनि गुर्वर्थीं, मजहि दिला ताप त्या खळें मोटा. ॥१३६॥
जरि त्यासि सर्पसत्रीं, दहनीं तूं होमिसील, तरि तात
स्वर्गीं होईल सुखी. गुरुविप्रप्रिय सुशील करितात. ’ ॥१३७॥
मुनिवाक्य श्रवण करुनि, जनमेजय नृप पुसे अमात्यांतें.
होतेंचि विदित; डसला तक्षक भोगी नरोत्तमा त्यां तें. ॥१३८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP