मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
त्रिंशत्तम किरण

दीपप्रकाश - त्रिंशत्तम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
जयजयाजी वैकुंठनाथा । श्रीमाधवनाथा समर्था । तारी तारी बां अनाथा । नाथ - सुतासी ॥१॥
नरदेहासारखा श्रेष्ठ जन्म । व्यर्थ घालवितों मी अधम । ओढितीं इंद्रियें पशुसम । दाही दिशा ॥२॥
मन झालें विषयोन्मुख । न होई अजुनि अंतर्मुख । सदा पीडिलों भय हर्ष शोक । या विकारांनीं ॥३॥
जिव्हा बाष्कळ बडबडे । दृष्टि जाई भलतीकडे । कर्ण ओढिती विषयाचे पवाडे । ऐकावया ॥४॥
कोणी न कोणाचा वडील । सर्वच जाहले उच्छृंखल । तुजवांचुनी ह्यां आवरील । कोण बापा ॥५॥
इंद्रियांच्या तृप्तीसाठी । केल्या खोट्याही गोष्टी । विषयी जनांची केली आरती । विषयसुखा कारणें ॥६॥
मौनधारण व्रताचरण । तप सच्छास्त्र - श्रवण । स्वधर्मी रत वेदाध्ययन । ग्रंथ - वाचन ॥७॥
जप उपांशु एकांतवास । समाधिसुखाचा चाखणें रस । हीं मोक्षसाधनें असती विशेष । साधकासी ॥८॥
यांचा उपयोग उदर पूर्तीकडे । करोनी भोंदिले जन बापुडे । परि या कृतीनेंही पोटाचे खड्डे । भरले नाहींत गा ॥९॥
ऐसा दुराचारी बाळ । न्यावया निजस्वरूपीं विमल । स्वीकारिसी स्नेहाळा । योगीराया ॥१०॥
परि आहे एक विनवणी । न घेई केवळ मजलागुनी । जे असतील बंधु भगिनी । माझ्यासम ॥११॥
जे विषयरिपूंनीं नाडिले । ज्यांनी साधनही नाहीं पाहिलें । त्यांनाही घेई दयाळे । ओढूनियां ॥१२॥
तुझ्या चरणीं बंधु भगिनींनी । असावें प्रेमें दिनरजनीं । तुझ्या गुणीं रमावें ऐसें मज वाटे ॥१३॥
वंदन स्तुति कर्म समर्पण । चरणसेवा नामस्मरण । सहावें कथा श्रवण । हीं दास्य - योग - अंगें ॥१४॥
या योगाची रस माधुरी । ओतीं सर्वांच्या अंतरीं । हीच प्रार्थना वारंवार करी । नाथसुत ॥१५॥
मी तव पायीं शरण अचल । मज तारिसी यांत नसें नवल । बंधुभगिनीसही घेशील । आपुल्या माळेंत ॥१६॥
तैं तुझी कीर्ती राहील । समप्रेमीं लोक म्हणतील । ना तरी निंदितील । हे जन तुज ॥१७॥
कैसाही असो बांधव । तो ओढून घेई जवळ । तन्मुखी शर्करा ठेव । निजपद सुखाची ॥१८॥
तुझा दीपकिरण प्रकाश । सहस्त्रकराही दिपवील खास । कैसा दाखवूं सर्व किरणेश्वरा ॥१९॥
तुझ्या प्रकाश सागराचे । हे बिंदूच असती साचे । परि तितुकेंच अज्ञान तमाचें । निरसन करितील ॥२०॥
न ठेवुनी भेदाभेद । जे घेतील किरणांचा छंद । ते तोडीतील भवबंध । ऐसें तूंच कथिलें ॥२१॥
कृष्ण भक्तातें करून बोध । जाई वारीस सिद्ध । उतरला बारशीस भक्तवृंद । सवें होता ॥२२॥
तेथेही नाथ लीला करी । उभा राहिला वजन - काट्यावरीं । पाहती भक्त तो झाला जडभरी । बासष्ट शेर ॥२३॥
प्रभु अत्यंत हंसुनी म्हणें । पुन्हा माझा तोल पाहणे । तो चौदा शेराचें प्रभूनें । भरविलें वजन ॥२४॥
तेथून जाती कोल्हापुरीं । भेटती महालक्ष्मीस श्रीहरी । तेथेही एका भक्तातें उद्धरी । योगीराय ॥२५॥
होता जातीचा कुंभार । प्रभु - मनीं नसे जाति - विचार । अनुगृहीत करी हा भाविक नर । पत्निसमवेत ॥२६॥
पतिपत्नीसी अनुग्रह । न देई एकच सद्गुरुराय । बंधूभगिनीचें होय । नाते म्हणती ॥२७॥
यासि नसे शास्त्राचा आधार । नाथ गेला शास्त्रपैल पार । परी राखाया रूढी सत्वर । देई पतिमुखें ॥२८॥
पति हाच स्त्रीचा सद्गुरु । हें रूढीवचन आहे निर्धारू । म्हणोनी माझा सद्गुरु । उपदेश देववी पतिमुखें ॥२९॥
आपण सांगे पतीसी मंत्र । मग पति सांगे पत्नीप्रत । ऐसा ठेवोनि मध्यस्थ । देई अनुग्रह ॥३०॥
कुंभार पत्नीसि अनुग्रह देतां । लागली तेथें समाधी तत्वतां । एक घटिका निश्चल कांता । जाहली तयाची ॥३१॥
येता पूर्वस्थितीवरी । सांगे हर्षुनी ती नारी । गेले होते मंदिरीं । अंबाबाईच्या ॥३२॥
श्रीनाथें मज उचलोनी । ठेविलें अंबेच्या चरणीं । एक नारिकेल घेउनी । दिला अंबेच्या करीं ॥३३॥
तेथोनि येई खानदेशीं । वरणगांव नामे भूमीसी । तेथें होता भक्त तापसी । रणछोडदास ॥३४॥
उभय्तां पतिपत्नींनीं । वाहिला देह श्रीचरणीं । त्यांचें दुःख घेउनी । मुक्त केलें ॥३५॥
या भक्ताची नारी । केवळ भक्तीच साजिरी । तियेचे रक्षण नानापरी । करी भक्तवत्सल ॥३६॥
एकदां आली धरणगांवीं । मध्यरात्रीच्या समयीं । जवळीं सामान शिशूही । कडेवरी असें ॥३७॥
ती केवळ अबला । आठवी नाथ सद्गुरुला । आतां काय करूं विठ्ठला । सद्गुरुराया ॥३८॥
नाहीं येथें माझे पती । अथवा परिचित मूर्ती । कोण नेईल ही पेटी । उचलोनी ॥३९॥
करीत बसली प्रभूचा धांवा । आतां यावें त्वरित देवा । नाथ आमुचा भारवाहक तेव्हां । होऊनी आला ॥४०॥
धरिलें प्रभूनें रूप पोक्त । पीत पगडी पीत कोट । म्हणे बाई देतां पैसे सात । मी उचलीन ॥४१॥
रणछोडदास पत्नी हर्षली । म्हणे नाथ माउली पावली । पाठविला हेलकरी मजजवळी । न्यावया पेटी ॥४२॥
त्यासह आली ग्रामांत । काढले पैसे सात । तों हमाल तेथें गुप्त । जाहला क्षणांत ॥४३॥
पाहिलें चोहोंकडे तेथें । बाहिलें सतीनें मुक्तकंठें । मग अनुतापली मनांत । हमाल नव्हे नाथ तो ॥४४॥
कैसी मी भाग्यहीन । प्रभूने स्विकारिलें सेवकपण । न ओळखितां आपण । लादलें ओझें त्यावरी ॥४५॥
प्रभुमाया अनिवार । एकनाथापरी विभूति थोर । राहिला श्रीखंड्या चादर । परि ओळखिला नाहीं ॥४६॥
देखोनि जवळी रणछोड काळ । सांगे गृह बदलावें लागेल । माझी स्मृती ठेवीं अचल । भक्तराया ॥४७॥
होतां पूर्ण एक मास । नवज्वरें पीडीला शिष्य । सोडी नश्वर देहास । नाथ - ध्यान योगें ॥४८॥
तेथोनि येई पातोंडेपुरीं । होती एक वृद्ध नारी । तिला सांगे पंढरीची वारी । करी वो माये ॥४९॥
न करिसी नियम व्रत । न ठावे ध्यान धारणापंथ । इतुका तरी परमार्थ । करी पंढरीचा ॥५०॥
या सर्व क्रियांचें फळ । पंढरीच्या वारींत उज्वल । सोडूनि आशा सकळ । इतुकें कार्य करीं ॥५१॥
पंढरी ही विष्णुपरी । तिचे गण असती नामयापरी । दिसतां नयनीं वारकरी । त्यास आणिती खेंचुनी ॥५२॥
इतुका तरी नियम करी । न चुकवी पंढरीची फेरी । तूं होशील स्वयें पंढरी । या नियमानेम ॥५३॥
वृद्धेचे वय सत्तर । जाहलीं गात्रें बेजार । कर्णनयनें समाधिस्थिर । घेती आनंदें ॥५४॥
रुपेरी केसांचा शिरीं भार । धरणीसि भेटे कंबर । हस्तही कांपती थरथर । म्हातारीचें ॥५५॥
परी कंठी जोर फार । न राहे क्षणही स्थिर । पुत्र स्नुषा होती बेजार । या कटकटीनें ॥५६॥
ठेवी पैसा आपणापाशीं । न देई दिडकी कोणासी । जवळी असतां द्रव्यराशी । भोगी विपत्ति ॥५७॥
न करी ब्राह्मण पूजन । अथवा निष्कामकर्म जाण । संसाराचें करी ध्यान । वृद्धा नारी ॥५८॥
जों जों होई जीर्ण शरीर । तों तों आशेस येई जोर । न जाई प्राणही लवकर । आशाबद्धांचा ॥५९॥
व्हावया नातू नाती । करी प्रभूसी तो मैत्री । ऐसी स्वार्थी वृद्धा होती । धनाबाई तिचें नाम ॥६०॥
जें आशेंत नित्य राहती । तयासी अवचित काढीं निश्चितीं । तूं एकदां तरी गांठीं । पंढरिक्षेत्र ॥६१॥
विनवी वृद्धा प्रभूसी । कैसी जाऊं पंढरीसी । कोण आंवरील संसारासी । मम पुत्राच्या ॥६२॥
मी अल्पकाळही जातां बाहेर । येथें होतो अंधार । पुत्र केवळ भोळाशंकर । स्नुषा भवानी ॥६३॥
मी राहिली नसते जिवंत । यांची न होती धडकत । लुटुनी नेते लोक वित्त । निःसंशय ॥६४॥
मी जातां पंढरपुरा । कोण पाहील वांसरा । गुरातें पाणी चारा । कोण घालील ॥६५॥
चाकर झाले बेगुमान । न करिती कर्तव्य जाण । पाहिजे फुकट वेतन । तयांलागीं ॥६६॥
माझी म्हैस असे गाभण । तिच्या प्रसूतीचे आले दिन । चोरांचा सुळसुळाट पूर्ण । झाला असे ॥६७॥
गत दिनीं निकटवर्ती । - गृहीं चोर येती । लुटिली सारी संपत्ति । बापुड्य़ाची ॥६८॥
मम गृहीं नाहीं विशेष घबाड । परि स्वयंपाक पात्रेंही आम्हां जड । कैसा पाय काढूं गोविंदा । पंढरिसी ॥६९॥
पुत्र स्नुषा दोघे पसरती । कुंभकर्णाची बाधा त्यांप्रती । झाली जरी तोफेची बत्ती । तरी ते घोरतील ॥७०॥
येथेंच माझें पंढरपूर । न जाववे गुरुवर । पूजितें प्रत्यहीं शारङ्धर । बाळकृष्ण ॥७१॥
जेथें भाव तेथें देव । हा आपुलाच अनुभव । माझ्यास्तव पंढरीराव । येईल धांवत ॥७२॥
नाथ म्हणे कुणाचें घर । कां घेसी कर्तृत्व शिरावर । माझें माझें म्हणोन जाणार । एके दिवशीं ॥७३॥
ही केवळ अभ्राची छाया । क्षणोक्षणीं बदलेल समया । जाशील एक दिनीम निघोनियां । यमाचें द्वारीं ॥७४॥
मग कुठें राहील तुझा संसार । खाशील यमदूतांचा मार । कुंभीपाकादि नरकीं थोर । पडशील गे ॥७५॥
तूं म्हणसी माझें ज्यातें । तेंचि जाळितील तव देहातें । कां घेसी भ्रांतीतें । जाई पंढरीसी ॥७६॥
कोण काळ येईल कैसा । नाहीं क्षणाचा भरंवसा । घे इतुका पुण्याचा हिस्सा । जाई पंढरीसी ॥७७॥
तुझ्या राखेन मी घरा । घालीन गुरांना चारा । म्हैसही व्याली तर । करीन खटपट तियेची ॥७८॥
जाई जाई गे आधीं । नको घेऊं प्रपंचकर्दमीं उडी । झाली सावध परि न सोडी । मिठी प्रपंचाची ॥७९॥
नाथदेवा ! । घर सांभाळावें । कुणाही येऊं न द्यावें । मजही ऐसें अभिवचन द्यावें । मग करीन विचार ॥८०॥
अवश्य म्हणे श्रीनाथ । सर्व होईल व्यवस्थित । म्हातारी होउनी कष्टचित्त । जाई पंढरीसी ॥८१॥
निरोप घेई प्रभूचा । धरित मार्ग पंढरीचा । रक्षावा दयाळें । आमुचा । प्रपंच हा ॥८२॥
किल्ल्या माझ्या सांभाळाव्या । पुत्राजवळीं मुळीं न द्याव्या । माझी खट्याळ गाय सदया । आवरीं तियेला ॥८३॥
क्षणक्षणां पाहून घराकडे । वृद्धा जाई पुढें पुढें । अग्निरथावरि मग चढे । येई पंढरीसी ॥८४॥
केलें चंद्रभागेंत स्नान । पुंडलीक भक्ताचें दर्शन । मग राउळीं काठी टेंकून । आली धनाई ॥८५॥
नामदेव पायरी वंदिली । महाद्वारीं प्रवेशली । गरूडस्तंभा भेटली । भानुदास स्तंभासी ॥८६॥
श्रीरखुमाई - वल्लभपायीं । ठेविली वृद्धेने डोई । आदरें दुसर्‍या मंदिरीं जाई । श्रीरखुमाई दर्शना ॥८७॥
सर्व देवांतें वंदिलें । पालख्यांची पाहिलीं स्थळें । विष्णुपदही नामस्कारिलें । गोपाळपुरीं गेली ॥८८॥
नगरप्रदक्षिणा सायंकाळीं । वृद्धेनें हळुहळु केली । त्रिकाळ पूजा पाहिली । श्रीपांडुरंगाची ॥८९॥
श्रीव्यासदेवाचें स्थान । दत्त पादुकातें वंदून । नमस्कारी कळस सुवर्ण । बसे अग्निरथांत ॥९०॥
इकडे काय झाला चमत्कार । नाथ राखी तियेचें घर । करी वृद्धेचा संसार । संसारी हा ॥९१॥
तों एकेदिनी मध्यरात्री । येती तस्कर दुर्वृत्ती । नाथ गेला ग्रामाप्रती । एक दिनास्तव ॥९२॥
तस्करें फोडिले द्वार । परि आडकला तेथें कर । न हालूं शके तो चोर । जाहला व्याकुळ ॥९३॥
लंगोट नेसोनि कोणी आला । मारितो काठीनें मला । आतां प्रसंग कठीण ओढावला । वांचवी गे मरीआई ॥९४॥
मज वाटे आज नाथ । येथें न राहिला वस्तीस । कांहीं लभ्यांश होईल प्राप्त । म्हणोनि आलों ॥९५॥
परि हा नसोनि असे । हे प्रभूचे खेळ कैसें । नाथ केवळ परमेश्वर भासे । आहे सर्वांठायीं ॥९६॥
नाथा मी चोरी न करीन । वाहतों पायांची आण । जें मिळेल तें खाईन । कष्ट करोनी ॥९७॥
प्रभातीची वेळ आली । तस्कर म्हणें वर्षें भरलीं । आता पायीं श्रृंखला आली । कारागृहाची ॥९८॥
नाथा जरि मी आहे दुष्ट । तरी झालों शरणागत । तुझ्यावीण कोण समर्थ । रक्षावया ॥९९॥
ऐसा नानापरी दुःख करी । तों येई प्रत्यक्ष स्वारी । तस्कर मूर्छित झाला होता द्वारीं । उठविले तया ॥१००॥
काय गा ऐसा कष्टी होसी । तुज पाहिजेना द्रव्यराशी । तूं अझुनीहि ना ओळखिसी । माझा प्रताप ॥१॥
तयाचा अनुताप देखोनी । नाथें केली क्षमा झणी । उठवी वृद्धा - पुत्रालागुनी । महाराज ॥२॥
होता तेथें तस्कर । सांगितलें निज कर्म घोर । नाथ कृतीचा प्रखर । महिमा दाविला ॥३॥
नाथ केवळ दयासागर । केला तस्कराचा उद्धार । त्यातें सन्मार्गी लावी चतुर । आली वृद्धा नारी ॥४॥
ही नवल कृती ऐकिली । प्रभुचरणीं धांव घेतली । हंसुनि म्हणे नाथ माऊली । सांभाळी गृह आपुलें ॥५॥
वृद्धेचे चित्त विरमले । जैसें दुग्धी दहीं पडलें । तूं कष्टलीस नाथ - विठ्ठलें । आम्हां कारणें ॥६॥
ऐसा करि आक्रोश । वैराग्य बिंबलें चित्तास । न पाही घरदारास । नाथ - सेवेंत राहिली ॥७॥
यथासांग केल्या मावंद्या । पूजिलें सद्गुरु पादारविंदा । जाईन पुंडलिक वरदा । भेटावयासी ॥८॥
त्याच रात्री ती म्हातारी । कफरोगें झाली घाबरी । प्रभातीं सोडिली देहपुरी । विठ्ठल नामानें ॥९॥
होती संसारिक ती युवती । परि घेतली प्रभूनें हातीं । केलें तियेला पुण्यवती । योगीनाथें ॥११०॥
किती वर्णावें नाथांच्या गुणा । किती प्रकाशवावें किरणा । तीं अल्पचि वाटतीं जाणा । मजलागीं ॥११॥
पुढील किरणीं परब्रह्म । गुरु - निंदका मार्ग उत्तम । दावून करील पूर्ण काम । साधकांचें ॥१२॥
तें गोड निरूपण । करा करा हो श्रवण । तेणें गुरुपदी भाव अनन्य । जडेल साधकाचा ॥११३॥
इति श्रीमाधवनाथ दीप प्रकाशे नाथसुत विरचिते वृद्धस्त्रीउद्धरणं नाम त्रिंशत्तमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP