मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
अष्टादश किरण

दीपप्रकाश - अष्टादश किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
जय जय श्रीयोगाभ्यानंदा । भक्त सुमन मकरंदा । भक्त चकोर चंद्रा । तुज साष्टांग नमन ॥१॥
जय योगमाया विहरणा । चिद्रूपा चित्तभूषणा । चिद्घनानंद सगुणा । तुज साष्टांग नमन ॥२॥
हृदयक्षीरसागरवासा । चित्तशेषशयना विशेषा । चित्काल लक्ष्मीच्या ईशा । तुज साष्टांग नमन ॥३॥
जय जय नाभिसरोवरा । मणिपुर कमलधारा । सृष्टीज्ञान ब्रह्माधारा । तुज साष्टांग नमन ॥४॥
सद्भावे नारदतुंबर । करिती गायन मनोहर । ऐसा तूं सद्गुरु योगीवर । तुज साष्टांग नमन ॥५॥
प्रभु त्वां कृपेचा बिंदु देतां । सतरा किरणांची प्रकाशमधुता । म्यां चाखोनि आतां । आलों अठरावीवरी ॥६॥
नव्हतें किरणांचें ज्ञान । नाही ठावें अध्ययन । श्रवण मननाचें विस्मरण । मज सदाची ॥७॥
पूर्वींच्या संतीं ग्रंथलेखन । केलें हो असाधारण । परि ते होते सिद्ध तैसे विद्वान । महापुरूष ॥८॥
अनुभवाची विद्युल्लता । खेळवुनी अंतःपुरांत । मग देती बाह्यरूपता । ग्रंथद्वारें ॥९॥
म्यां नाहीं चाखिला अनुभव । मज न सांपडे तें गांव । तव पायांवीण सर्व । शून्य दिसे ॥१०॥
ऐसें असतां नाथ जगदंबे । मज ग्रंथलेखनीं केलें उभे । म्हणोनि चित्त विश्वारंभे । होई असावध ॥११॥
तूं सर्व रत्नांचे भांडार । तुझे शिष्यगण हे मोत्यांचे सर । तयांच्या पायांचा किंकर । मी न शोभे ॥१२॥
त्या श्रेष्ठांचे हे कार्य । जयजयकाराचें माझें कार्य । सतत दारीं उभें रहावें । चोपदारी करोनी ॥१३॥
मी केवळ मुजर्‍याचा अधिकारी । मज नको ही थोरी । पडतां वृथाभिमानतिमिरीं । पारखा होईन दरबारा ॥१४॥
तूं मज करिसी कवी । परि मूळ स्वभाव न जाई । बटीक ती बटिकच राही । जरी राज्ञी जाहली ॥१५॥
ऐसा असतां सिद्धांत । तंव कृपेचा फेरा उलट । ती करी कृति अघटीत । नाहीं कोणी वदावें ॥१६॥
नाथसुतांसी आज्ञा प्रमाण । तीच प्रकाशवील किरण । येरव्हीं माझें वेडेपण । मज पूर्ण कळे गा ॥१७॥
नासीकप्रांती भगूर गांव । तेथें येई देवाधिदेव । आला एक मुमुक्षु दिव्य । श्रीदर्शनीं ॥१८॥
असे नांव भिकूशेट । परि वली म्हणे नाथ । तेंचि पुढें यथार्थ । प्राप्त झालें ॥१९॥
वली ही केवल वल्ली । जयाची वृत्तिही वली । आचारेंही झाला वली । निरूपम ॥२०॥
बाळपणापासून वैराग्यशील । वैराग्य हा तयाचा खेळ । त्याग हेंच शिक्षण अतुल । भक्तरायाचे ॥२१॥
असे जातीचा शिंपी । परि द्विजापरी आचार व्यापी । सत्वगुणाची भासे दीप्ती । तयाच्या ठायीं ॥२२॥
वैराग्याचा पाक करोनी । चाखे संसार - हिम भुवनीं । झाला पुष्ट शिष्याग्रणीं । खाऊनि पौष्टिक ॥२३॥
मग कराया योगविहार । शोधी नंदनवन सुंदर । तों अवचित आला एक फकीर । सांगे इच्छित ॥२४॥
एक वर्ष घेई विश्रांती । आणीं आणखी निश्चय शक्ती । मग भेटेल तुझी मूर्ति । वलीनाथा ॥२५॥
एक संवत्सर वलीराय । वेड्यापरी झाला बाह्य । नाथ नामीं आपुलें हृदय । रंगवी सदा ॥२६॥
जाहली चिंतातुर मातापिता । करिती मायिक उपचारता । नाथागमनाची कळली वार्ता । आणिती प्रभुपदीं ॥२७॥
प्रभुनें पाहतांच तयास । वलीचा दिला तत्क्षणी वेश । झाले अंतरीं उदास । मातापितरें ॥२८॥
म्हणते भिक्या झाला वेडा । टाकिला लग्नाचा पायी बेडा । हा साधुही दिसे वांकुडा । टाकी भर वृत्तींत ॥२९॥
भिक्या ! चाल रे चाल घरीं । येरू म्हणे मी आलों माझ्या घरीं । मज नको विनाशी गृह जरी । अविनाशी । मिळे ॥३०॥
हात धरिला भिकूचा । परि न हालला भक्त साचा । मग बोलता दयारसाचा । कुंभ श्रीनाथ ॥३१॥
तुमचा भिक्या नसे वेडा । यासी नाहीं कोणती बाधा । करील सारा धंदा । चिंता न करावी ॥३२॥
तो प्रपंच साधुनी परमार्थ । साधील हें वचन निश्चित । केले प्रेमें अनुग्रहीत । “ वली पुत्रासी ” ॥३३॥
सांगितल्या आज्ञा तीन । सत्य वचन वर्ज परान्न । परस्त्री मातेसमान । जाण बाळा ॥३४॥
या त्रिपुटीतें सांभाळी । मग यमनियमाची माळ घालीं । भक्तीच्या पांघरूणाखालीं । राहीं अखंड ॥३५॥
सत्यासारखा नाहीं धर्म । सत्य हेंचि परब्रह्म । सत्याविण योग्य उत्तम । न साधे कोणता ॥३६॥
प्रपंच - परमार्थी जो सत्य । तो जितचि मुक्त । त्यास नको योगशास्त्र । वा इतर पंथही ॥३७॥
न घ्यावें द्रव्य कोणाचें । तैसें अन्नही परांचे । ते ओढती बुथडे वृत्तीचे । जाण बाळा ॥३८॥
जैसे ज्याचें खावें अन्न । तेंचि वृत्तीस होई कारण । या कारणें परान्न ग्रहण । करूं नये ॥३९॥
आतां परस्त्रीचे व्रत । हे सत्यासम असे श्रेष्ठ । या माजी राहतां भ्रांत । क्रियाशून्य नर होय ॥४०॥
परस्त्रीकडे न पाहीं कदा । नको भाषाही एकदां । येता तरंग करील बिघाडा । तव कार्याचा ॥४१॥
नको नको परस्त्रियेचा संग । ती करील परमार्थाचा बेरंग । तुज समूळ पाडील अधोमार्गी । वली राया ॥४२॥
स्त्री ही मूषकीसमान । हळूच करील दंश आपण । गुदगुल्या होती जाण । तयाकाळीं ॥४३॥
परि त्या विषयाची प्रगटता । ज्यावेळीं होते तत्वतां । शरीरीं पू राहे सर्वथा । मग कष्टसाध्य होई ॥४४॥
स्त्रिया या असती अग्नी । नरदेह हें केवळ लोणी । नको तयांची भाषासरणी । वा दर्शन ॥४५॥
या स्त्रियांच्या मोहजालांत । मुक्त होई ऐसा क्कचित । असो सिद्ध वा साधनयुत । तोहि न सुटे ॥४६॥
अरे स्त्रिया या कमलिनी । येतां भृंग उदरभरणीं । त्यास कोंडून टाकिती दलांनी । बलात्कारें ॥४७॥
जो भृंग काष्ठ कोरुनी । जाई गुंजारव करूनी । त्यासी कोमल दलसरणी । फोडता न ये ॥४८॥
बाळा त्या दिसती कोमल । परि वज्राहुनी कठिण दल । हे तयांचे अभंग जाल । निश्चयेसी ॥४९॥
स्त्रिया या सोमलापरि । वरी शुभ्र शर्करेपरि । चाखिता काळीज चिरीं । तेवीं असती ॥५०॥
असतां जरी लोकमेळा । तेथेंहि न करीं वाचाळ । मग एकांती दिसता अबला । पाहणें हेंची अनुचित ॥५१॥
स्त्रीपुरूष भेदभाव । हा जयाचा नष्ट होय । तयावीण इतरीं निःसंशय । परस्त्री पाहूं नये ॥५२॥
जरी अवचित स्त्रियांचा वास घडला । तरी मातेसमान मानीं बाळा । करी वंदन त्या देवतेला । बालभावें ॥५३॥
पाहतां तियेच्या अवयवा । तूं होई बालकासम राया । जैसा अंकीं खेळुनी तान्हा । करी स्तनपान ॥५४॥
किंवा परस्त्रीचे ठायीं । मम मूर्ती अचल ठेवीं । मग तुलसी भय नाहीं । चिरकालिक ॥५५॥
ऐसी वृत्ति ठेवितां अंतरीं । जरी आली विषयांध नारी । तुज आलिंगता तरी । होईल निर्विषय ॥५६॥
तिची वृत्ति निर्मल होईल । सर्व गात्रें होती शिथिल । केवळ पुण्यस्पर्शाचा अतुल । इतुका महिमा ॥५७॥
तरी परस्त्रियेचें पथ्य । तूं ठेवीं अचल संतत । मग होशील रे स्वतंत्र । सर्व भयापासूनी ॥५८॥
ऐसा वलीरूपी अमृतवृक्षाला । बोधामृताचा रस ओतिला । अमृतफलानें परिपूर्ण झाला । वृक्षराज तो ॥५९॥
त्यातें कटुनिंबाचा कल्क दिला । तो त्रयसंवत्सर सेविला । अल्प दुग्धावरी राहिला । भक्तश्रेष्ठ ॥६०॥
प्राणायाम ध्यानधारणीं । सदा रंगे वलीमुनी । पावला प्रपंच विस्मरणीं । परि परिजन चिंतातुर ॥६१॥
पितर म्हणती भिक्यानें । बुडविले सारे घेणें । उदराचीही फिकिर नसणें । हें वेडेपण ॥६२॥
घातलें नाथांचे पायावर । तरी जाहला अनावर । आतां एक उपाय थोर । करू म्हणती ॥६३॥
भिक्याचे दुसरे पायीं । अडकवूं बेडी विवाहीं । मग हा आकळिहा जाई । पूर्णपणें ॥६४॥
फसवुनी वलीराया । बांधिती गळा दुसरी जाया । परि वली तो वलीच या । पदवीसी राहिला ॥६५॥
पोटापुरती करी सेवा । संतुष्ट ठेवी सदा काया । न घेई कवडी वांया । कुणाचीही ॥६६॥
जाहला योगसंपन्न । परि शालीनता असाधारण । भेटतां बालकही जाण । पायीं मस्तक ठेवी ॥६७॥
कोणी निंदी अथवा वंदी । परि वली सदा आनंदी । समाधानींच सदा गोडी । जयासी असे ॥६८॥
समर्थांचा अतुल प्रताप । केली तया सिद्धि प्राप्त । परि वश न व्हावें कदापि । ऐसे स्वये सांगे ॥६९॥
सिद्धि - डाकिनी लीला करितां । तू ठेवीं रे शून्यता । तयांना वश होतां उलटा । होशील म्हणे नाथ ॥७०॥
नाथ वारंवार जागृती देई । भक्त तों तों उंच जाई । धन्य माझी सद्गुरु आई । जी करी ऐसीं रत्नें ॥७१॥
ऐसें कांहीं काल लोटतां । वलीसी दिधली दिव्यता । नाथासम कृती पाहतां । नवल वाटे जनासी ॥७२॥
वलीचे भाषण नाथासम । कंठही असे नाथासम । स्वरूप रसही राम । ओती वली शरीरीं ॥७३॥
वली जेथ बैसला । तेथ सुगंधाचा वायू सुटला । वली बोलतां बोला । विसरती जन भान ॥७४॥
ऐसे दाविलें चमत्कार । वृत्ति ठेवी सदा स्थिर । प्रसन्न झाला योगीश्वर । नाथदेव ॥७५॥
काढोनि घेती सिद्धिछाया । ध्यानींच रमवी वलीराया । एकाच स्थानीं बैसवोनियां । चढवी शिखरावरी ॥७६॥
वली नसे वा विद्वान । घेतले नाहीं पर - शिक्षण । परि करी वक्तृत्वपूर्ण । संभाषण सर्वदा ॥७७॥
वली वात्सल्याची मूर्ती । अनेक बंधु प्रार्थिती । श्रीगुरुचरणीं जडविती । भक्ति त्यांची ॥७८॥
कोणी असतां सुरापानीं । म्हणे लेकराचे वच मानीं । पायां पडोनि करी विनवणी । सोडावें मद्य सत्वर ॥७९॥
मी राहुनी उपवासी । करीन वस्ती आपुल्या गृहासीं । तुम्ही न करावी ऐसी । दुष्कृती गा ॥८०॥
ऐसें द्यावें अभिवचन । वहावी प्रभूची आण । मग त्यातें दावी चरण । नाथ प्रभूचे ॥८१॥
किती धन्यता द्यावी नाथा । हें न कळे हो नाथसुता । शब्दांची दिसे अपूर्तता । ऐशा काजीं ॥८२॥
देऊनि भक्तासी लेणें । आपणची सांभाळ करणें । हें नव्हे गा सुलभ करणें । सद्गुरूवांचुनी ॥८३॥
येतां प्रभु नाशिकास । भेटला एक सच्छिष्य । वंदी प्रभुचे चरण रजास । कर्डिलें उपनाम तयाचे ॥८४॥
त्यांतें बोध करी सुंदर । तूं अससी बा मामलेदार । माझे दरबारींचाही अधिकार । घेई आनंदें ॥८५॥
तुज ध्यानाचे आसन । मी आजी दृढ देईन । सदैव त्यांत राहून । करीं चाकरी ॥८६॥
असतां नाशिकास नाथ । जाती श्रीत्र्यंबकेश्वरीं त्वरित । निवृत्तीच्या यात्रेप्रीत्यर्थ । करिती पर्यटने ॥८७॥
विनायक नामे ब्राह्मण । पिंपळगांव जयाचें वसतिस्थान । वृत्ति असे कुळकर्णीपण । त्याच ग्रामीं ॥८८॥
दशवर्षाचें असतां हें बाळ । करी कृती अतुल । शिक्षणास्तव कष्टवी मातुल । म्हणोनियां ॥८९॥
विनायका शिक्षण - तिरस्कारा । न चढे शाळेच्या पायरीवर । करिती शिक्षा मातुल फार । परी नायके तो ॥९०॥
एके दिनीं करी विचार । नको हा शाळेचा मार । घेतली तुटकी तरवार । जाऊं देव - मंदिरी ॥९१॥
तेथें विनवूं देवासी । दे शत गजाचें बळ मजसी । नातरी आत्महत्येसी । करीन म्हणे ॥९२॥
तों देखतां ममीनें तरवार । घेतली हिरावुनी सत्वर । झालें खिन्न हे पोर । अंतरींच ॥९३॥
पुढें एक तपानंतर । झाला विवाहित चतुर । परी मनीं आवड फार । वैराग्याची ॥९४॥
रात्रीं घेवोनि कांबळा । सवें घोंगडीचा बोळा । जाई शिवमंदिराला । मध्यरात्रीं ॥९५॥
प्रार्थी श्री शिवदेवाला । मज भेटवा देवाला । त्याविणे मज उबग आला । संसाराचा ॥९६॥
ठेवुनी लक्ष मामानें । पाहिले मंदिरीं हे तान्हें । त्यातें आवरिलें क्रोधाने । न जावें म्हणोनी ॥९७॥
विनायक होई बहु कष्टी । कैसी या नशिबाची स्थिती । करितों श्रम देवासाठीं । परि यश ना येई ॥९८॥
मज नको दारा धन । ही चाकरीही मी सोडीन । परि प्रभुरूप पाहीन । प्रेमभावें ॥९९॥
त्या रूपाची जाणीव व्हावया । सोडिली पाहिजे गृह जाया । ऐसा विचार करूनियां । ठेवी गुप्त तो ॥१००॥
सरकारी कामास्तव । आला नाशिकीं विनूदेव । येथेंच साधेल कार्य । चित्ती म्हणे ॥१॥
परि सवें होते समव्यवसायी । त्यांस सांगता हानी होई । मध्यरात्रींच्या समयीं । सोडिला मुक्काम ॥२॥
नाशीक हे मोठें नगर । येथें राजदूतांची गस्त थोर । म्हणती तूं कोठील कोण पोर । चालला मध्यरात्रीं ॥३॥
आतां चलावें ठाण्यासी । सकाळी जावें गृहासी । हा हुकूम मोडितां तुजसी । बांधूनि नेऊं ॥४॥
घाबरले आमुचे राव । करिती मनीं हाय ! हाय ! । ओढवलें माझें दुर्दैव । येथेंही पां ॥५॥
जातां सरकारी चावडींत । काढितील माझी धिंड खचित । योजी एक युक्ति त्वरित । साधक तो ॥६॥
सांगे विनयें राजदूता । मी सरकारी नोकर तत्वतां । आलों ग्रामींच्या कामाकरिता । कचेरींत ॥७॥
आतां सुंदरनारायण । मंदिरीं । मी घेईन विश्रांती पुरी । तुज असत्य गमें तरीं । चाल मजसवें ॥८॥
राजदूतासवें नारायणीं । आला विनायक झणी । निद्रेचें मिष करोनी । पहुडला हो ॥९॥
शुकोदय होतां विनूभाऊ । सोडी पोलिसाचा बाऊ । मनीं म्हणे आतां जाऊं । करंज्यासी ॥१०॥
करंजाची वाट चुकून । गेला विरूद्ध दिशे जाण । जैसें पूर्वेचें - पश्चिमें गमन । त्यापरी ॥११॥
ऐसा पंचदश क्रोश श्रमला । परि कोठेंही न थांबला । भेटला करंजीच्या साधूला । म्हणे मज देव भेटवावा ॥१२॥
माझा आत्मा ब्रह्मांडी । न्यावयाची कला आधीं । मज दाखवावी एवढी । विनवणी करी ॥१३॥
साधू म्हणे मी गादीचा वारस । मज न कळे योगशास्त्र । चालवितों पूर्वजकीर्तीस । भजन पूजनें ॥१४॥
परि आळवीं मारुतिरायास । तो देईल तव ध्येयास । विनायक म्हणोनी अवश्य । निघाला निश्चयें ॥१५॥
केली मारुती - उपासना । दिलें प्रभूनें दर्शना । परि न बोले वचना । म्हणोनि खिन्न झाला ॥१६॥
शोधित आले आप्त । नेती विनूचा धरोनि हात । येरू म्हणें पूर्व पाप निश्चित । ओढवलेंगा ॥१७॥
गेला गृहीं चार मास । परि तळमळ चित्तास । केव्हा भेटेल जगदीश । मजलागीं ॥१८॥
होतें वय तरूण । भार्याही रूपसंपन्न । परि प्रपंची उदासीन । सदा राहे ॥१९॥
विनायकभार्या सुशील होती । परि तिज प्रपंची बहु आसक्ती । देखोनि पतीची त्यागी वृत्ते । जाहली खिन्न ॥१२०॥
विनायक वाटे तुकाराम । भार्या जिजाई सम । संगे प्रपंचाचा धर्म । परि राहे स्तब्ध तो ॥२१॥
जैसी मांसोळी जळावीण । तैसा तळमळे रात्रंदिन । म्हणे भेटवा जगन्मोहन । सद्गुरुदेव ॥२२॥
न राही सेवेमाजीं लक्ष । संसारींही नसे दक्ष । ध्येयजपाची साक्ष । सदा ठेवी ॥२३॥
नसे वस्त्राची पर्वा । फाटके धोतर रुमाल हिरवा । अन्नहि सोडी केव्हां केव्हां । चार दिन ॥२४॥
करिती लोक नाना फजिती । कासया नाडिली कन्यासती । तुजसवें विवाह लाविती । तें मूर्ख ठरतील ॥२५॥
जो स्वस्त्रियेस पोसीना । तो काय देईल अन्यांना । धिक् धिक् तुझें जिणें जाण । या जगतीं ॥२६॥
यापरी जन निंदती । परि हा आनंदमूर्ती । न करी उच्छृंखल वृत्ती । कदापीही ॥२७॥
ऐसा जयाचा त्याग । त्या दूर नसे परमार्ग मार्ग । विषयाची अडगळा सांग । काढिली पाहिजे ॥२८॥
ही अर्गला काढावया । पाहिजे तळमळ जीवा । तळमळीची थाप बसतां देवा । चिंता पडे ॥२९॥
मग श्रीगुरुदेव येती । अर्गला काढोनि फेकिती । मोक्षमार्ग त्वरित करिती । मोकळासा ॥१३०॥
एके दिनीं विनायका । झाला शुभ दृष्टांत देखा । आला एक साधू सखा । सांगे खुण ॥३१॥
श्रीत्र्यंबकीं तुझा तात । येईल निवृत्ति यात्रेंत । तोंचि तव इच्छित । देईल गा ॥३२॥
त्या जाई शरण भावें । तो योग - रत्नाचे ठेवे । तुज देईल तें घ्यावें । आनंदानें ॥३३॥
ऐसा दृष्टांत होता । विनायका बहू हर्ष चित्ता । म्हणे सांपडला माझा त्राता । सद्गुरुराज ॥३४॥
परि गृह कैसें सोडावें । मी कारागृहीं पडलों आहे । मज बाहेर न जाववें । या ग्रामांतुनी ॥३५॥
सर्वत्र असती पाहरेकरी । जाऊं न देती दूरी । काय करावें या विचारीं । सचिंत झाला ॥३६॥
तों शंकर नानाजी सोयरा । आला विनूच्या घरा । त्यांस सांगे त्र्यंबकेश्वरा । भेटूं आपण ॥३७॥
पत्नीसी विनवी मी एकटा । न जाई कोठें आतां । शंकर नानाजी सवें असतां । कैसा जाऊं ॥३८॥
घेवोनि भार्येची अनुकूलता । त्रिंबकाचा धरिला रस्ता । एक ध्येय एकच रस्ता । तेथें मग विसर केंवि होई ॥३९॥
आले उभयतां इष्टस्थलीं । विनूनें युक्ति योजिली । संवगड्याची दृष्टी चुकविली । गेला भलतीकडे ॥१४०॥
पूर्व रात्रीची वेळ । म्हणे निघतीं दिंड्या टाळ । आज एकादशी मंगल । दिन असे हो ॥४१॥
त्या समूहीं माझा तात । मज भेटेल बहुधा निश्चित । नातरी सर्व नगरांत । शोधूं तया ॥४२॥
पाहिले दिंड्यांचें मेळे । संतजनातें विनविलें । सद्गुरुनाथ कोणी पाहिले । सांगा ना कां ॥४३॥
माझा देव कोठें आहे । मज प्रेमें सांगावें । त्याविणें मी न जाय । येथूनियां ॥४४॥
मनीं म्हणे गा त्र्यंबकेश्वरा । मज दावीं रे माहेरा । कोठें माझा पिता खरा । राहतसें ॥४५॥
तूं अससी जागृत । ऐसें म्हणती संत । आजि दावी रे प्रचीत । या बोलाची ॥४६॥
न दिसतां माझा सोयरा । देईन प्राण प्राणेश्वरा । हे शाब्दिक नव्हे श्रीहरा । कृतीनें करीन ॥४७॥
मज नसे तुझी चाड । दावी माझा सद्गुरु वंद्य । असे हाचि माझा बालछंद । तुजजवळीं ॥४८॥
ऐसा करितां शोध सतत । झाली गा मध्यरात्र । मग म्हणे एकेक गृहांत । शोधूं आतां ॥४९॥
एकेका घरी जाई । म्हणावें उघडावें दार आई । चित्रकुटींची माझी आई । दाखवावी ॥१५०॥
जन होती विस्मित । म्हणती हा दिसतो भ्रांत । भलत्या कालीं करी त्रस्त । आमुची मनें ॥५१॥
एका गृहाचे दार उघडें । दिसतां विनू धांवे तिकडे । चित्रकुटीचे राजे इकडे । असती काय ? ॥५२॥
गृहाची स्वामिनी आका । झाली तयाच्या सामोरी देखा । दिसतो वारकर्‍यासारिखा । परि तू अगोचर ॥५३॥
मध्यरात्रीचा काल झाला । परदारीं तूं पातला । तुज नाहीं रे चांडाळा । लाज कशी ॥५४॥
हें वारकरी ना टाळकरी । केवळ भोंदू खरोखरी । जा आपुलें काळें करीं । नातरी मिळे बक्षीस ॥५५॥
विनायक बसला दारांत । मी थांबेन निश्चये येथ । मज सांगे माये मात । गुरुरायाची ॥५६॥
न ठाऊके तुझा गुरु । नको बा आम्हां त्रस्त करूं । निघाला तेथूनी नरू । खिन्न होवोनी ॥५७॥
मग लागला रडाया । कोठें अससी चित्रकूट राया । कां रे सोडिली माया । बाळाची त्वां ॥५८॥
मज दृष्टांती पाचारिलें । आतां कोठें लपलीस वेल्हाळे । न पहावा अंत कृपाळे । दर्शन द्यावें ॥५९॥
नाहीं राहिलीं आतां शक्ती । येथें करितों माझी पूर्ती । मग तूं भेटशील अंतीं । धांवुनियां ॥१६०॥
तुझें सत्व त्र्यंबकराया । गेलें गेलें रे विलया । माझे प्राण घेवोनियां । तुज लभ्यांश काय ॥६१॥
ऐसा दुःखित मनीं झाला । तों एक पादचारी भेटला । कर जोडोनि विनवी तयाला । मज दावा देव ॥६२॥
येरू म्हणे जवळ येथ । आहे चित्रकूटनाथ । असती अद्यापी जागृत । बोधिती भक्तगणा ॥६३॥
विनायकाचें जें गेलें जीवन । तें भेटलें त्यातें परतून । या आनंदाचें वर्णन । कैसें गावें ॥६४॥
विसरोनी देह भान । पळाला विनू भक्त जाण । देखोनि योगेश्वरा नमन । साष्टांगें करी ॥६५॥
हळुच बसला कोपर्‍यांत । तों नाथें धरोनी हात । आणिला सन्मुख भक्त । विनायकराव ॥६६॥
कां बा बससी कोपर्‍यांत । येई मम सन्मुख सत्य । तुम्हांस्तव येणें जगांत । आम्हां भाव पडे ॥६७॥
तव निवास असतां प्रकाशांत । कां बससी अंधारांत । ऐसें बोले योगीनाथ । मधुर बोलें ॥६८॥
सांगे इतरां शिष्यगणां । आतां जावें आपल्या स्थाना । या भक्ता सवें दोन वचना । बोलेन गा ॥६९॥
मग विनूचा इतिहास । स्वयेंच सांगे योगीश । धरिलें भक्तें पायास । मज अनुग्रहीत कीजे ॥१७०॥
तूं जाई गा आपुले घरीं । प्रिय भार्येते विचारी । सानुकूल दिसतां नारी । तुज लावीन मार्गी ॥७१॥
ऐकतां पत्नीचे नांव । विनायकाचें धडपडें हृदय । एवढें सोडून सर्व । करीन देवा ॥७२॥
पत्नी नव्हे ती वैरिणी । मम कार्याची हानी । परि नाथ सद्गुरु न मानी । वचन हें ॥७३॥
मी दोष न घेई बाळा । घेउनी येई पत्नीला । मग तुज योग कमला । सहज देईन ॥७४॥
मी जाईन नाशिकास । तेथें त्वां यावें अवश्य । विनू म्हणे योगरत्नास । आतां येणें कठीण ॥७५॥
जोडूणी हस्त म्हणे देवा । मम हेतू पूर्ण करावा । स्त्रियेचें अंतरीं प्रकाश । करावा । मग होईल कार्य ॥७६॥
हंसुनि म्हणे योगींद्र । तुझा कार्यभाग सिद्ध । न करी आतां खेद । भक्तराया ॥७७॥
गेला विनायक पिंपळगांवी । आणिली आपुली ‘ जिजाई ’ । ती कथा आदरें परिसावी । पुढील किरणीं ॥७८॥
विनायक - कथेचा इतिहास । सांगेल सकळ साधकास । तळमळीविना कार्यास । सिद्धी नये ॥७९॥
लागतां ऐसी तळमळ । ध्येय त्वरित भेटेल । सर्व कार्ये सुफळ । होतील हे सिद्ध ॥१८०॥
श्रीनाथें जयातें सांठविलें । तें रूप त्यांचेंच झालें । घेऊं शिरीं पाउलें । भक्तोत्तमाचीं ॥८१॥
पूर्णानंदा नाथ देवा । विनायकाचा हट्ट पुरवावा । आणि माझा विसर पडावा । हें उचित नव्हे ॥८२॥
माझाही असे बालहट्ट । दावीं तव उज्वल ज्योत । न करितां अल्पही कष्ट । मज मिळावें ॥८३॥
नाथ बोले हांसून । सर्व करीं मज अर्पण । मग तुज विनूसमान । करीन गा ॥८४॥
या एका वाक्यांत । सर्व ठेवी अर्थ नाथ । म्हणोनि पायीं माथा नित्य । ठेविला हो ॥८५॥
श्रीनाथ किरणें किती । इया ग्रंथीं प्रकाशती । कथाया न माझी शक्ती । श्रोती कोप न करावा ॥८६॥
मज न कळे काय घडेल । ही श्रीनाथ शक्ति अतुल । जैशी लेखणी मार्ग आक्रमील । जाईल तैसाचि नाथसुत ॥८७॥
हींच नाथें सहज समाधी । मज दिली सोडून उपाधी । पुरविली माझी आवडी । मातेनें गा ॥८८॥
किती स्मरूं उपकारा । तुज पार नसे योगेश्वरा । ठेवितों मस्तक जोडितो करा । प्रेमभावें ॥१८९॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते श्रीनाथभक्तवली - विनायक चरित्र कथनं नाम अष्टादश किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP