मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
सप्तम किरण

दीपप्रकाश - सप्तम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथाय नमः --
जय जयाजी सद्गुरुरामा । अनंतरूपा पुरुषोत्तमा । तुझा न कळे बां महिमा । अगमा निगमा ही ॥१॥
कोणीं म्हणती तुज काळा राम । कोणीं म्हणती गोरा राम । कोणीं म्हणती नयनाभिराम । ऐसें तुझे रूप ॥२॥
क्षणांत अससी श्रीमंतापरी । क्षणांत होसी क्षुद्र भिकारी । गृहस्थाश्रमाची मूर्ती साजिरी । नटसी स्वयें ॥३॥
कधीं होसी त्रिगुणरूपधारी । उत्पत्तिस्थितिलयाआ अधिकारी । जटाजूट चढविशी शिरीं । कंठीं रुद्राक्षमाळा ॥४॥
सहा करीं आयुधांची आवडी । शंख चक्र त्रिशूलादि । भोंवती वेद - श्वानांची गर्दी । कामधेनू पाठीशीं ॥५॥
कधीं वसती गाणगापुरीं । स्नान करीसी गंगातीरीं । कधीं भिक्षा करवीरीं । निद्रा माहूरक्षेत्रीं ॥६॥
कईं नाम श्रीनरसिंह सरस्वती । कईं होसी श्रीपाद मूर्ति । कईं वासुदेवानंद ख्याति । नर्मदातिरीं ॥७॥
तुझ्या करुण - रस - गंगेत । मज ओढोनि घेई अवचित । त्यांत बुडवी अहोरात्र । कृपानिधे ! ॥८॥
मग मी कांहीं न बोलेन । तुजपाशीं न मागेन । मी - तूंपण ही विसरेन । लोळेन सुख - शयनीं ॥९॥
तूं गंगाधर - नंदन करी । सकल शास्त्रांची माधुरी । ऐसी लिहविली पोथी निर्धारी । गुरुचरित्राची ॥१०॥
गंगाधरसुत तुझा भक्त थोर । पंडित तेवीं कवीश्वर । नाथसुत तयाचा किंकर । शोभेना हो ॥११॥
मज नको तयाची थोरी । नाथसुता ठेवी आपुल्या द्वारीं । झाडीन तुझी ओसरी । हाची वर देई ॥१२॥
ऐकोनी दासाची विनवणी । तूं घेसी अवतार झणीं । माधवनाथरूपें भक्तालागुनी । तारिसी गा ॥१३॥
त्वां मजसी दिला आधार । केला तव दरबारीचा चोपदार । माझ्या इच्छेहूनी थोर । दिधलें स्थान ॥१४॥
नित्य पाहीन नाथ देव । श्रीनाथ भक्तांचा समुदाय । नेत्रांची पुरवी हाय । बहू दिवसांची ॥१५॥
गत प्रकाश किरणांत । नाथे त्यजिलें चित्रकूट । मग घेई विश्वनाथ भेट । काशीक्षेत्रीं ॥१६॥
केला मानसीं विचार । आतां अज्ञातवास संचार । करूं सर्व भूमिवर । निरीक्षणार्थ ॥१७॥
वाढला फार जोजार । आतां पटल घेणें सोईस्कार । म्हणोनी घेई गुरुवर । विविधरूपें ॥१८॥
वर्ष होतें तेहतीसावें परी दिसे जणूं विसावें । वंदोनी विश्वनाथभावें । जाई अमरकंटकीं ॥१९॥
अमरकंटक हा अमर । करी वस्ती कंटकीं अमर । त्यास तुडवितां अमर । मनुज होय ॥२०॥
अमरकंटक ही इंद्रपुरी । जिची न येई कोणा सरी । जी सृष्टीची भंडारी । उघडुनी दावी ॥२१॥
निसर्गाचें उपवन । भासे केवळ नंदनवन । वृक्षराजी हे सुरगण । शोभती हो ॥२२॥
दिव्य वनस्पती या देवांगना । सेविती आदरें पांथस्थांना । मयूर - किन्नरांचें जाणा । ऐकावें गायन ॥२३॥
कोकिला अप्सरा ही सुंदर । पंचमालापें करिती विहार । ठायीं ठायीं गुंफा मनोहर । जणूं इंद्रभुवन ॥२४॥
बालरूपी निर्मल झरे । उडविती कारंजाचे फवारे । सुरनदी - नर्मदा पसरे । या इंद्रपुरींत ॥२५॥
परी या अमराचा मार्ग कठीण । द्वैत - सर्प वसती दारुण । तामस - पशूंचें निवासस्थान । मार्गीं असें ॥२६॥
ते मारितां निश्चय - शरानें । भेटे अमर संतोषानें । दाखवीं निजभूषणें । भक्तजनां ॥२७॥
ऐशा अमरकंटकीं अमरेश । करावया एकांत वास । घेऊनी चित्कला सुंदरीस । त्वरित जाई ॥२८॥
सतरा वर्षांची ती नारी । चंद्रप्रभा सुकुमारी । करावया विलास ब्रह्मचारी । नाथ नेई आदरें ॥२९॥
हें कोणा नवल वाटेल । परी या तत्त्वाचें शोधितां मूळ । मग अनुभव येईल । बोलाचा हो ॥३०॥
तेथें केला एक वर्ष वास । घेई पिशाच्च वृत्तीस । समीप न येऊं देई कोणास । योगेश्वर ॥३१॥
सदा सोहम् जपाचा घोष । आभासाचा घेई वेष । शरत्कालीं प्रभू विशेष । दावी लीला मनोहर ॥३२॥
अमराहुनी जाई इंदुरीं । तेथील नृपाच्या दरबारीं । देव मामलेदार साधू विहरी । जाई तया भेटावया ॥३३॥
देखोनी ही नाथमूर्ति । आनंद झाला यशवंताप्रति । कडकडोनी भेटती । उभयतांहि ॥३४॥
नाथें कथिलें सकलवृत्त । म्हणे आतां कासया मागशीं वर शिरीं । परी तव इच्छेकारणें करी । मनोरथ पूर्ण ॥३५॥
यशवंत म्हणे तूं सर्वकारी । कासया मगशीं वर शिरीं । परी तव इच्छेकारणें करी । मनोरथ पूर्ण ॥३६॥
करोनी भावें वंदन । येई महू ग्रामीं हंसून । झाला वैद्य गुणसंपन्न । नामें माधवराव ॥३७॥
माधवराव नगरांत फिरती । नरहरी नामक शिंप्यास भेटती । म्हणे मी वैद्यकी क्रियेचि गति । जाणत आहे ॥३८॥
मज असें नाडी ज्ञान । वायूचें सांगेन सहज ठिकाण । नेत्ररोगावरी अंजन । रामबाण असे ॥३९॥
जो पांगुळा त्यास येतील पाय । मुकाही वाचाळ होय । जन्माची मूळव्याधि जाय । माझ्या औषधानें ॥४०॥
जाहलें कर्ण बहिर । त्यासही उपाय थोर । कोणी वेडा वा माथेफिरू । त्यास करीन सावध ॥४१॥
सर्पविंचू विखार । पळवीन त्यांचें दुःख दूर । इंगा फिरवीन इंगळेवर । श्वान विषाचा पाड काय ॥४२॥
डाकिणीनें घातले फेरे । पिशाच्च अंतरी संचरे । मुंजा म्हसोबाचे वारें । चुकवीन ॥४३॥
ब्रह्मसमंधें जरी झडपिलें । कोणी चेटकें ही केलें । मूठमारीनें दुःखी असलें । तया सुखी करीन ॥४४॥
जरी जाहला त्रिदोष ज्वर । वाताचाही जोर फार । मम मात्रा करील पार । दुःखांतुनी ॥४५॥
मम मात्रेचा अगाध माहिमा । काय सांगावा तुम्हा । त्रिविधतापही विरामा । पावतील ॥४६॥
जैसे वैदू लोक ग्रामीं फिरती । निज औषधींचा महिमा सांगती । एकदा अनुभव घ्यावा म्हणती । लांब स्वर काढुनी ॥४७॥
तैसे संत हे महानुभाव । संचार करिती जगी सर्व । कंठरवानें संगती भव - । रोगांचे घ्या औषध ॥४८॥
न लागेल एक पैसा । केवळ पथ्यावरी भरवंसा । परी अज्ञ जीवाची आशा । धांवेना तिकडे ॥४९॥
ऐसे नाथें शिंप्यास कथिलें । असें एकच औषध भलें । तें काढील सर्व रोगांचीं मुळें । निःसंशय ॥५०॥
नवल वाटलें नरहरीस । म्हणे हा वैद्य किंवा योगी पुरुष । याचा प्रत्यय घ्यावयास । बोलवी स्वबंधू ॥५१॥
जो कफविकारें पीडिला । उपायाचा मार्ग खुंटला । आंग्लमहावैद्यही थकला । त्या रोग्यास पाचारी ॥५२॥
सांगे माधववैद्यास । दुःखमुक्त करावेंयांस । प्रभूनें दिलें विभूतीस । ओढी म्हणे श्वासानें ॥५३॥
झाला तत्क्षणीं रोगमुक्त । नरहरि म्हणे हा योगी खचित । करी प्रेमें प्रणिपात । तों आवरी नाथ ॥५४॥
नाथदेव सांगे हा जडींचा महिमा । एका सिद्धे दिधली आम्हां । पूजाया उदर - आत्मारामा । उपेगा आणिली ॥५५॥
नरहरि देई द्रव्यभार । परी शिवला नाहीं गुरुवर । म्हणे अल्प दुग्ध द्यावें सत्वर । प्राशनार्थ ॥५६॥
नाथकीर्तीचा चंद्रमा । कधीं वाढे कधीं होई विरामा । कधीं अभ्राची घेई उत्तमा । नील शाला ॥५७॥
डॉक्टर कीगन पाश्चिमात्य । त्यास कळली ही अतुल मात । प्रत्यय घ्यावया येत । धारा नरगरीसी ॥५८॥
धारानगरेश झाला जर्जर । थकला तो भिषग्वर । नाथें औषध - विभूति चार । दिवस दिधले ॥५९॥
झाला नृप रोगमुक्त । तुष्टला केगन मनांत । म्हणे हा मानव नव्हें खचित । करी अतुल कृति ॥६०॥
विनवी नाथासी कर जोडून । मज कांहीं द्यावें ज्ञान । तयाच्या तलहस्तीं योगभूषण । ठेवी अंगुष्ठ ॥६१॥
‘ पहावें साहेब त्यांत ’ । तों दिसली प्रकाश ज्योत । हेंचि देतों व्रत । आचरावें नेमस्तें ॥६२॥
श्रीनाथ प्रभूचे पितृव्य । धारानगरीस करिती वास्तव्य । येती मग माधवराव । तयांच्या गृहीं ॥६३॥
ठेविल्या भरून शिशा चार । रंग घालुनी केले प्रकार । विभूति हेंच सर्व सार । त्यांत मिळविलें ॥६४॥
सुटतां कीर्तिवायूचे वारें । नाथें सोडिलें स्थान त्वरें । खांडवा ग्रामी संचरे । आंग्लरथमार्गे ॥६५॥
येतां खांडव्यास नाथमूर्ति । आपुल्या मनीं विचार करिती । कोठें करावी उदरपूर्तिं । अपरिग्रहें ॥६६॥
तों भेटले एक तारमास्तर । दृश्य करी त्यांचें अंतर । भावे करोनी नमस्कार । नेई नाथा स्वगृहीं ॥६७॥
नाथ मागे कांहीं कामा । त्यावीण न जाई आश्रमा । प्रभु आग्रहें तयाची रामा । देई पाळणा गुंफावया ॥६८॥
ज्यानें पंचतत्वांचा पाळणा करूनी । गुंफिलें ओंकार तंतूंनीं । खेळविला सोहम् बाळ हंसुनी । तो काष्ठपाळणा गुंफी ॥६९॥
तार मातरांची पत्नी । अपस्माराची सांगे कहाणी । विभूती औषध तियेसी देऊनी । करी रोगमुक्त ॥७०॥
मग संचार केला चाळीसगांवीं । दूसरा वेष नाथ घेई । शिरीं जीर्ण रुमाल पाही । कटीं पंचा जुनाच ॥७१॥
पोहरेगांवीं तेथून येती । ग्रामाबाहेर घेती विश्रांती । तों पाहिला एक बाग नेत्रीं । जीत कवठें गहूं ॥७२॥
मनीं नाथ विचार करी । आतां येथेच करूं चाकरी । दुग्धपानाची भाकरी । मिळवूं येथेंच ॥७३॥
नाथ जाई त्या मळ्यांत । क्षेत्रपाळातें विनवीत । मज चाकरी द्यावी उचित । धोंड्या हें नाम माझें ॥७४॥
माझा रोजमुरा केवळ दुग्ध । नको मला द्रव्याचा संबंध । दिनरात्री राहीन सावध । सेवेविषयीं ॥७५॥
तन्नाम रंभा पाटील । मनीं झाला विस्मित केवळ । न घेतां एक छदाम करील । कैसी सेवा ॥७६॥
हा न दिसे सेवक खरा । परी जो चालून आला घरा । ठेऊन घ्यावा बरा । कवठें राखाया ॥७७॥
म्हणे तूं करशील कां वृक्ष - रक्षण । येरू वदे हें माझें कर्तव्य जाण । सर्व राखणें हें संधान । मज आवडे जीवाहुनीं ॥७८॥
बांधिला एक माळा । त्यावरी श्रीनाथ बसला । मुखी भजनाचा चाळा । सदोदित चालला ॥७९॥
ऐसे क्रमिले कांही दिवस । चाखीत होता स्वानंदरस । आमुचा धोंड्या मळ्यास । शोभवीत होता ॥८०॥
नाथा ! तूं झालासी धोंडा । आम्हासही तैसें करी गड्या । सोडवूं सार्‍या मनाच्या उड्या । सहजींच ॥८१॥
ऐसी चाकरी करिता नाथ । राहिलें द्वार उघडें अवचित । आला एक पोळ मदोन्मत्त । खाई कोमल गोधूम ॥८२॥
नाथें देखिला पोळ नयनीं । म्हणे पाहुणा आला हो भोजनीं । यातें तृप्त करावें या क्षणीं । निवारू नये ॥८३॥
वृषभें खादलें पीक बहुत । बैसला विश्रांतिस्तव तेथ । आला पाटील मळ्यांत । गांवातुनी ॥८४॥
देखिली नाथप्रभूची लीला । चित्तीं बहुत क्षोभला । परी न बोली वचनाला । म्हने भजनरंगीं दंग असे ॥८५॥
पाटील होता वारकरी । तयानें चाखिली भजन माधुरी । म्हणोनी सत्ववृत्ति धरी । आपुल्या मनीं ॥८६॥
परी पाटलीण बाईचा तोरा । मज न वर्णवे सारा । जिचा होता दरारा । पाटलावरी ॥८७॥
म्हणे धोंड्या तूं दगड । तुज नाहीं रे ज्ञान मूढा । आमचें पिउनी गटगटा दुग्ध । चाकरी न करीसी ॥८८॥
बुडविलें माझें शेत । वरी करिसी हास्य उलट । तुज लज्जा न वाटे चित्तांत । तिळभरी ॥८९॥
तूं दिससी दुसरा पोळ । आमुचें खाउनी अन्न विमल । जाहलासी लंबोदर केवळ । दवडिला घांस आमुचा ॥९०॥
जाई जाई रे येथून । मज न दावी हें वदन । ऐसें नाना गालिप्रदान । करी पाटलीण बाई ॥९१॥
परी नाथजी धोंड्या जाहला । न देई प्रत्युत्तर तियेला । देखोनी विशेष चिडली अबला । जाहली प्रबला ॥९२॥
नाथ म्हणे केलें रक्षण । रक्षणाचें हें महिमान । रक्षणीं ऐसें गालिप्रदान । ऐकणें लागे आम्हां ॥९३॥
आम्ही सत्वा रक्षाया जातों । तों तामस तया आड येतो । हा झगडा नित्य चालतो । उभयतांत ॥९४॥
घेतली आपुली बोचरी लोटी । निघे तेथूनी जगजेठी । नमन करी बाईप्रती । म्हणे उपकार तुझे ॥९५॥
बाई ! गहूं तुज बावन्न मण । पिकतील हा निश्चय जाण । वेडावूनी म्हणे पाटलीण । गगनांतुनी येतील काय ॥९६॥
बाई गगन हेंच तुझें धान्य । गगन हें तुझें जीवन । या गगना ऐसें मन । करी वो माऊली ॥९७॥
परी ती वासनेची नारी । नुमजे नाथांची वैखरी । कुशब्दानें ताडन करी । प्रभुलागीं ॥९८॥
जो जाहला योगेश्वर । सर्व सत्तेचा आधार । ऋद्धि सिद्धिचा दातार । तो साही कटु वचन ॥९९॥
ज्यानें बालपणींच मुक्तिका । केली दिव्यौषधी गुटिका । सोडवीं सहजी पंचराशिका । तो साही कटु वचनें ॥१००॥
सहज समाधीचा योग । जो स्वयेंच साधी चांग । देई वाक् सिद्धि अभंग । तो साही कटु वचन ॥१॥
निघाला सत्वर तेथोनी । तों भेटला गांवचा कुलकर्णी । नेई आपुल्या भुवनीं । नाथ देवासी ॥२॥
केशवराव तयाचें नाम । नाथासी म्हणे तूं ब्राह्मण उत्तम । राही मम गृहीं पूजाकर्म । करावयासी ॥३॥
नाथ बोले न जाणे अनंत देव । मज एकच ठावें शीव । कैसे पूजूं हे यादव । यादवीचे ॥४॥
हा दिसतो बैरागी देव्हारा । मज याचा वीट आला खरा । दाखवावा मार्ग दुसरा । आपुल्या सेवेचा ॥५॥
हे तत्वबोल ऐकोनी । केशव दचकला मनीं । हा धोंड्या नसे भासे मुनी । ठसलें चित्तीं तयाच्या ॥६॥
विनवी आपण स्वस्थ असावें । मम गृहीचें दुग्ध घ्यावे । नाथराया हें न साहवें । म्हणे व्रतभंग होईल ॥७॥
राहिला स्तब्ध क्षणभर । देखिलें तयाचें घर । तों मृत्तिकेचा पाहिला गारा । जाहला आनंद योगीशा ॥८॥
केशव जाई पूजाया शंकर । नाथें काय केला चमत्कार । कर्दम ठेविला करणीवर । केला गिलावा भिंतीसी ॥९॥
कारागीर जाती घरीं । खावया दुपारची शिदोरी । सर्वांचे काम एकुटा करी । घटकेमाजीं ॥११०॥
राखिलें अयाचित व्रत बरवें । हें देखितां केशवें । ठायींच वृत्ति विरझून जाये । तयाची गा ॥११॥
म्हणे मनीं केशवराव । हा नाहीं हो नाहीं मानव । अवरतला वाटे देव । या रूपानें ॥१२॥
केशवाची बघोनी ऐशी स्थिती । नाथ चिंतीती आपुलें चित्तीं । आता येथे राहतां निश्चिती । प्रगट होणें लागे ॥१३॥
तेथून निघती लगबगा । ‘ मज घाटावरी जाणे गा । तुमचे इच्छित कार्य सुभगा । होईल सप्तदश - दिनांत ’ ॥१४॥
जाहली वृत्ति अफाट । घेतली पश्चिमेची वाट । चाले जैसा वायूचा लोट । जाई मार्गातुनी ॥१५॥
पुढील कथारस अभिनव । नाथ होईल कोंड्या गुरव । करील माया अपूर्व । नाटकी हा ॥१६॥
श्रीनाथदीपप्रकाश । जाहला सात किरणांचा प्रकाश । वाढवी स्वयं कीर्तीस । आपुला आपण ॥११७॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते अज्ञातवासनिरूपणंनाम सप्तम किरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP