श्रीकल्याणकृत पदें - श्रीगुरु

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


१. ( चाल - गड्यांनो, घ्या हरिच्या नामा )
नमन श्रीगुरु - निजपाया । साधक तारक उपाया ॥
संकट दुर्घट अपाया । सोहं हंसा खुण पाया ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रिद गाजे । श्रवणें निर्भय मन माझें ॥
भाविक सात्त्विक सुख माजे । षड्रिपु - मंदिर मज लाजे ॥१॥
कृपाअंजन लेउनियां । ब्रह्मपरात्पर होउनियां ॥
सज्जनपदरज सेउनियां । अष्टै काया निरसुनियां ॥२॥
अपार महिमा गुरुराया । बंद भवार्णव उतराया ॥
कल्याण - अनुभव विवराया । अनाथ हिन दिन उद्धराया ॥३॥

२. ( चाल - पाळण्याची )
तो मज आवडतो मम स्वामी । निशीदिनीं अंतर्यामीं ॥ध्रु.॥
अक्षै पदाचा सुखदाता । निरसुनि माया ममता ॥१॥
भक्तिमार्गींच्या गजढाला । चालविल्या आढाला ॥२॥
काय बोलुं मी कीर्तीसी । न दिसे तुळणा ज्यासी ॥३॥
छत्र बहुतांचे दासाचें । धामचि कल्याणाचें ॥४॥


गे बाईये स्वामी तो आठवे मनीं । नित्य बोलतां चालतां जनीं ।
स्वप्न सुषुप्ती जागृति मौनीं । खंड नाहींच अखंड ध्यानीं ॥ध्रु.॥
अलभ्याचा हा लाभ मज जाहला । विश्वजनासी उपेगा आला ।
कीर्तिरूपेंचि विस्तारला । दाही दिशा भरोनि पुरवला ॥१॥
भक्तिप्रेमाचें तारूं उतटलें । ज्ञानवैराग्यतीरीं लागलें ।
संतसज्जनीं सांठविलें । हीन दीनासी तेंहि उद्धरिलें ॥२॥
ज्याच्या गुणांसी नाहीं गणना । ज्याच्या कीर्तीसी नाहीं तुळणा ।
जो स्वयंभ श्रीगुरुराणा । ब्रह्मादिकांसी बुद्धि कळेना ॥३॥
धर्मस्थापना स्थापियेली । न्यायें नीतीनें भक्ति वाढविली ।
संतमंडळी ते निवाली । बहु दास ते भूमंडळीं ॥४॥
जन्मजन्मांतरीं पुण्यकोटी । बहु संचित होतें गांठीं ।
योगीरायाची जाली ज्यास भेटी । त्यास कल्याण होये सृष्टीं ॥५॥


गे बाईये आवडी तयाची मज मोठी । चित्तीं अखंड पडली मिठी ।
साधुजनांची बहु उंच कोटी । कृपादृष्टीं तारिल्या भक्त कोटी ॥ध्रु.॥
ज्यासी दीनबंधु नाम हें साजें । ज्यासी देहींच देवपण गाजें ।
ज्ञानवैराग्यसंपन्न राजे । ज्याच्या दर्शनें चिन्मय पुण्य माजें ॥ गे बाईये. ॥१॥
ज्याचा परमार्थवृक्ष अंकुरला । शाखापल्लवीं विस्तारला ।
नवविधा प्रकारें मुहुरला । शुद्ध निष्काम भजनें फळा आला ॥ गे बाईये. ॥२॥
ज्याची अपार धारणा धृति । ज्याची वेदांत काव्यसंमती ।
ज्याची अगम्य न गमे गति । ज्याचीं चरित्रें सर्वत्र गीती गाती । गे बाईये. ॥३॥
सर्व तीर्थांचें तीर्थ ते साधु । सर्व देवांचे देव ते साधु ।
अग्रपूजेसी वंद्य ते साधु । स्वस्वरूपाचे मायबाप साधु ॥ गे बाईये. ॥४॥
ज्यासी मुळींच मीपण नाहीं । ज्यासी समान देखणें देहीं ।
जेहीं आपणांस सेविलें ठायीं । सर्व कल्याण त्याचिये पायीं ॥ गे बाईये. ॥५॥

५. ( चाल - उत्तम जन्मा येउनि. )
स्वामी माझा योगीराजा आवडतो हृदयीं ।
दिवसरजनीं न गमे जनीं नावडे कांहीं ॥ध्रु.॥
आदिशक्ति परमेश्वर षड्गुण ईश्वर । त्याचें अंतर परात्पर शुद्ध विचार ।
योगेश्वर अपरांपर तोचि अवतार । हीन दीन जना करी पावन माझें माहेर ॥१॥
अध्यात्मखाणी ग्रंथ वाणी वदोन गेली । न कळे महिमा न गणे सीमा काये बोलिली ।
भक्तिमंडळी भूमंडळीं कोणें मोजिली । उत्तम मूर्ति अपार कीर्ति विश्वीं दुमदुमिली ॥२॥
करुणानिधि करुणाकर कृपें पाहिलें । बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध होऊन ठेले ।
जडमूढ प्राणी चरणस्पर्शें कल्याण जाले ।
माया ममता विवरु।नि पाहातां निजपद लाधलें ॥३॥
 
६. ( राग - बिहाग; ताल - दादरा )
गुरुराजया हो माझेया दीनबंधु ॥ध्रु.॥
लिंगदेह मोठें खोटें । वज्रघायीं न तुटे न फुटे ।
अवलीळा चरणस्पर्शे । केला छेदु ॥१॥
भववारी वारी स्मरणें । जडमूढालागीं तरणें ।
जन्मासी येणें मरणें । नाहीं खेदु ॥२॥
परतरवर कल्याण देवा । हिनदीनजनपावन देवा ।
सज्जनजनहृदयांतर देवा । तुझा वेधु ॥३॥

७. ( राग - छायालगत्व खमाज; ताल - धुमाळ )
धन्य साधु रे, धन्य सा. ॥ध्रु.॥
सकळ चराचर त्रिविध देवा । समान अंतरिं वेधु रे ॥१॥
षड्रिपुचा संहार करूनी । दासासि केला बोधु रे ॥२॥
पंचभुतादि त्रिगुण माया । समूळ शोधिला शोधु रे ॥३॥
अहं सोहं गिळूनि ठेला । विवेक परमानंदु रे ॥४॥
षड्गुणईश्वर तो स्वामि माझा । कल्याण कृपासिंधु रे ॥५॥

८. ( राग - कानडा; ताल - त्रिवट )
परतर परवर श्रीरामा । अगाध महिमा गुरुगरिमा ।
श्रुतिपर तूं परब्रह्मा । भरहर हर तूं विश्रामा ॥ध्रु.॥
मोक्षपाणी मम वंशा । श्रीगुरुस्वामी मूळपुरुषा ।
षड्गुणईश्वर सर्वेशा । भवहर हर तूं बरईशा ॥१॥
आमुची वोळी देवाची । पतितपावन सर्वांची ।
वर वरदायक जीवाची । प्रचीत पदवी शिवाची ॥२॥
कृष्णावेण्यातिरवासी । सज्जनपर्वतनीवासी ।
सुरवर वांछिति देवासी । कल्याणदायक सर्वांसी ॥३॥

९. ( चाल - कैवारी हनुमान. )
आवडीं म्यां वरिला । गुरुवर ॥ध्रु.॥
स्वात्मसुखाचें कुंकुम लेउनि । संसृतिशिण हरिला । गुरु. ॥१॥
स्वात्मभूषणें भूषविलें मशीं । संशय नच उरला ॥२॥
गुरुकृपें कल्याणचि होइल । निश्चय मनिं थिरला ॥३॥

१०. ( राग - सोहनी; ताल - दादरा )
गुरुचरणीं चित्त लावीं बापा ॥ध्रु.॥
माझें माझें बकतोसि । वायांविण थिकतोसी । घडी घडी काळ टप लावी बापा ॥१॥
द्रव्य दारा गारा सारा । सर्वांसि पाहिजे थारा । सेवट हे माया मोकलावी बापा ॥२॥
चक्रवर्ती आले गेले । नेणो जीव कितिक मेले ॥ बुद्धि हें अंतरीं निवळावी बापा ॥३॥
येथूनीयां तेथवरी । शाश्वत कल्याण हरि ॥ पांच ही पंचकें निवेदावीं बापा ॥४॥

११. ( चाल - ज्यासी दीनबंधु. )
क्रुपासिंधु सद्गुरुराजमूर्ती । तुझा पार न कळे वेदश्रुती ।
बोलों जातां म्हणाति नेति नेति । तुझ्या ध्यासें अनंत सिद्ध होती ॥१॥
जयरामा आआम निजधामा । हरादिक चिंतिती तुज रामा ।
ब्रह्मानंदें डुल्लती अंतर्यामा । काय जाणों मानवी तुझी सीमा ॥२॥
दीनानाथा हें थोर ब्रीद गाजे ॥ तेणें मानसीं परम सुख माजे ।
गुरुस्वामी पातले हृदयसेजे । नाम कल्याण घोषताळी वाजे ॥३॥

१२. ( राग - गौडमल्हार ; ताल - धुमाळी )
पाहा हो पाहा हो सये पाहा हो । संगातीत निजसुख लाहा हो ॥ध्रु.॥
मीपण तूंपण सर्व मेळउनि गुणागुण ॥ सद्गुरुचे पदीं आधीं वाहा हो ॥१॥
अमळ विमळ ब्रह्म सर्वगत सदोदित । साक्षिणीचा मूळ निरसाहा हो ॥२॥
श्रीगुरु कल्याणस्वामि पाववितो निजधामीं । मौन्यगर्भ शोधुनियां राहा हो ॥३॥

१३. ( राग - काफी; ताल - धुमाळी )
रे सखया सज्जन दुर्लभ । ज्यासी बोलिजे सिद्ध स्वयंभ ।
जे भाविकासी अतिदुर्लभ । ज्याच्या दर्शनें अपार पुण्यलाभ ॥ध्रु.॥
जे अक्रोध महानुभाव । योगवैराग्यछत्रपतिराव ।
ज्याच्या मतें हा बद्ध मोक्ष वाव । ज्यासी श्रुति म्हणती गुरुराव ॥१॥
भक्तीं विलसती इंद्रियानंदें । शांतिक्षमेसी सुटली दोंदें ।
भूतकृपा सर्वत्र सम नांदे । जन संतुष्ट कीर्तिमकरंदें ॥२॥
दृश्य पदार्थ निर्लोभ ज्यासी । जे दानशूर निजवस्तूसी ।
थापें मारिलें भयशोकासी । कृपाकल्याण दीन जनासी ॥३॥

१४. ( चाल - सामर्थ्याचा गाभा )
शेष श्रमला श्रुति । म्हणती नेति नेति ।
काय करूं मी स्तुति । मानव मंदमती ॥१॥
धन्य सद्गुरु रामा । मज न कळे तुझा महिमा ।
सीमाच होती निःसीमा । पुराण पुरुषोत्तमा ॥२॥
ब्रह्माविष्णुहर । त्याहुनि परात्पर ।
विश्रांतीची थार । मायेविण माहेर ॥३॥
सद्भाविकाला फळाला । थोर लाभ जाला ।
अनुभव हा सज्जनाला । वाचें राम बोला ॥४॥
नाम म्हणतां वाचें । पद लाभें स्वामीचें ॥
धामचि कल्याणाचें । तपफळ जन्मांतरींचें ॥५॥

१५. ( चाल - लावुनियां लोचन. )
जन्मुनि साधिलें सार काय रे । मिथ्या भूत माया सर्व पाहे रे ॥ध्रु.॥
देवाधिदेव मुख्य प्राप्तीचा नरदेह ठाव । तयासि नेणतां व्यर्थ जाय रे ॥१॥
सर्व देवांमध्ये देव तो श्रीगुरुराव । कां रे आव्हारिले त्या पाया ॥२॥
पूर्णब्रह्म सदोदित नित्य शाश्वत संचलें । खूण ठाकेना कल्याण पद ठाया रे ॥३॥

१६. ( राग - बागेशी; ताल - दादरा )
गुरुदेव देवा हां हां ॥ध्रु.॥
नेति नेति श्रुति म्हणती । पार नकळे तुझा किती ॥१॥
आगम निगम गति शेष विशेष स्मृति । अकळ न कळे तुझी स्थिती ॥२॥
जीवन सज्जनाचें धाम कल्याणाचें । अधिष्ठान निजपद साचें ॥३॥

१७. ( राग - देसकार; ताल - धुमाळी )
बाईये गं मजला वेधु लागला सज्जनाचा । विजय जाला या सुमनाचा ॥ध्रु.॥
ज्याचे कीर्तीचा ठसा महिमा वर्णूं मी कैसा । तीर्थें वंदिती चरणशेषा ॥१॥
त्याच्या चरणाची माती वंदीन मी दोहीं हातीं । मग मी पावेन निजपदप्राप्ती ॥२॥
त्याच्या दासाची दासी होईन मी त्याची दासी । पतितपावन भयभय नासी ॥३॥
नाम कल्याण ज्याची चुकवी संसार चीची । वारी बोहरी या जन्माची ॥४॥

१८. ( राग - तिलककामोद; ताल - दीपचंदी )
महाराज जय जय जी श्रीगुरुराया ॥ध्रु.॥
अजरअमरा अलक्ष्य अपारा । वाहिन मी निजपदीं काया ॥१॥
नित्यानंदा नित्यपरिपूर्ण । निरसीं दुर्घट माया ॥२॥
सकळ चराचर मुनिवर सुरवर । चिंतिति तुझिया पाया ॥३॥
रिद्धिसिद्धि दासी होउनि मुक्ती तिष्ठताती । पावावया तुझिया ठाया ॥४॥
कल्याणदासा हृदयनिवासा ॥ भावितसे प्रेम छाया ॥५॥

१९. ( काकड आरती )
ओंवाळा ओंवाळा श्रीगुरु रामदास राणा ।
जय गुरु रामदास राणा । पंचही प्राणांचा दीपक लाविला जाणा ॥ध्रु.॥
तिमिर - अज्ञान योगें उजळिल्या वाती । योगें. ॥
ज्ञानदीप प्रगटला । ज्ञानयोग प्रगटला ।
तेणें प्रकाशली ज्योती । ओंवाळा. ॥१॥
सज्जनगडवासिनी माझे रामदास माये । जयगुरु रामदास माये ।
पंचही प्राणांचा दीपक लाविला आहे ॥ओं.॥२॥
निर्गुण निरंज्योती श्रीगुरु रामदास । जय गुरु. ॥
दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस ॥ओं.॥३॥

२०.
जय जय जय जय आरती सद्गुरुस्वामी समर्था ।
काया वाचा जीवें प्राणें ओंवाळिन आतां ॥ध्रु.॥
ब्रह्माविष्णुहरादिक मानसीं ध्याती ।
सुरवर किन्नर नारद तुंबर कीर्तनीं गाती ॥
आगम निगम शेषस्फूर्ति मंदली मती ।
तो तूं आम्हां पूर्णकामा मानवां प्राप्ती ॥ जयजय ॥१॥
ऋषिवर कविवर मुनिवर ज्यांनीं तुज स्थापिलें ।
षड्दर्शनीं मत्तगुमानी पंथ चालिले ।
अपरांपर परात्परा पार नाकळे ।
पतीत प्राणी पदा लागुनी कल्याण जाले ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP