भगवान गोपालकृष्ण - अध्याय १ ला

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वतयै: नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: । श्रीसद्गुरु गोविंदाय नम: ॥ श्रीकेशवदत्ताय नम: ॥
ॐनमोजी गणनायका । ॐकार स्वरूपा विनायका ऋध्दिसिध्दीच्या नायका । होई सुखदायक भक्तांसी ॥१॥
तूं सकल विद्यांचा सागरू । कलाचातुर्याचा आगरू । सकलार्थ मति निधानु । होई कृपावंत दयाघना ॥२॥
जे विनम्रे करिती प्रार्थना । परिपूर्ण करिसी तयांची कामना । हृदयीं ठेवोनिया भावना । करितो आराधना गौरीपुत्रा ॥३॥
आदिबीज तूं साहित्याचे । अधिष्ठान आम्हां सारस्वताचें । मूलाधार प्रतिभेचे । दैवत या त्रिभूवनीं ॥४॥
तूं कृपावंत गजवदन । मागतो तुझे आशीर्वचन । इष्ट कामना व्हावी पूर्ण । चरित्रलेखनाची संतांच्या ॥५॥
सोनगीरीचे भगवदभक्त । श्रीसद्गुरु केशवदत्त । यांचा लिहावा चरित्रांकित । प्रबंध मानसी योजील ॥६॥
परीं हें कार्य सिध्दिस नेणें । केवळ तुझ्या कृपेचे लेणे । लाभावें मज सहजपणें । हिच प्रार्थना मनोमनीं ॥७॥
पुरवावी ही मनकामना । विनम्र मी गजानना । करावया साहित्य साधना । चरित्र या लेखनी ॥८॥
अगा देवी सरस्वती । साहित्य शारदे भगवती । तूंही देई वरदान मजप्रती । चरित्र या लेखनीं ॥९॥
आतां वंदीन गुरुचरण । मागेन तयांचे आशीर्वचन । करावया चरित्र कथन । केशवदत्तप्रभुचें ॥१०॥
मी तो मूढ अल्पमती । प्रज्ञाहिन मंदगती । चरित्र लिहिण्या मजप्रति । मार्ग तेचि दावतील ॥११॥
जैं होतां उषेचे आगमन । अवघे चरचर निघे उजळून । तैं श्रीगुरुकृपे करून । अज्ञान तिमिर नाश पावे ॥१२॥
गुरू कृपेचा असतां हस्त । माझिया मस्तकीं नित्य । कोण्या कारणें चळावें चित्त । चरित्र या लेखनी ॥१३॥
गुरुभक्तीचा दीप । जयाचिये हाती प्रदीप्त । उणीव तयांच्या पज्ञेपत । कैसी होईल जाण पां ॥१४॥
गुरु प्रत्यक्ष परब्रह्म । बोलिले अवघे संतजन । गुरु शांतिचे निधान । आधार स्थान आपुलें ॥१५॥
जंब भवसागरीं घोंगावे वादळ । दाही दिशा भासती काजळ । तंव दीपस्तंभ सद्गुरु अचळ । दावी मार्ग चोखट ॥१६॥
ज्ञानियांचा ज्ञानराजा । अमृतातेही जिंके पैजा । चरणावरी मी तयांच्या । नमविला माथा विनम्रें ॥१७॥
हा प्रत्यक्ष महाविष्णु । कैवल्याचा दिव्य तेजु । कथिला भावार्थ दीपकु । रसिक जनां प्राकृती ॥१८॥
अगा ज्ञानराया उदारा । प्रज्ञानिधी ज्ञानसागरा । करी मज दातारा । यशवंत या लेखनीं ॥१९॥
नामा तुका रामदास माळी सांवता भानुदास । गोरा कुंभार एकनाथ । संत भूषणें देशींची ॥२०॥
मुक्ताबाई जनाबाई । संतसखु बहिणाबाई । गोणाई अन राजाई । आभुषणें भक्तीचीं ॥२१॥
ऐसी संतजनांची मांदियाळी । सत्भाग्यें उतरली भूतळीं । सद्भावांची तया अंजुळी । वाहतो मी भक्तीने ॥२२॥
प्रार्थना ऐसी करून । केशवदत्त चरित्रकथन । रसिका तुम्हां करीन । मधुसूदनांच्या आज्ञेने ॥२३॥
त्यांच्याच कृपाप्रसादे । आनंदवन सर्वत्र भासे । ठाई ठाई अमृताचे । साहित्यझरे वाहतील ॥२४॥
लेखणी जरी माझिये हाती । परी लेखकु तेची असती । मौक्तिकें ओघळतील ग्रंथी । केवळ कृपा तयांची ॥२५॥
प्राजक्त फुले अंगणात । गंधीत परि आसमंत । तैसा हा चरित्रग्रंथ । होवो परिमळु अवघ्यासी ॥२६॥
चकोरा जैसी चंद्रिका । मेघ जीवन चातका । तैसी ही संतकथा । सुखवील रसिका आमोदे ॥२७॥
साधका ऐके सावचित । अपेक्षुनी लेकुराचे हित । जे प्रत्यक्ष महाराज मागत । “केशवदत्त” या जगीं ॥२८॥
“हे गोविंदा गरुडध्वजा । आनंदकंदा अधोक्षजा । शांति-भक्ति-नीतिच्या । निर्झरा वाहवी अनिरुध्द ”॥२९॥
हल्लरु नामाचा अखंड । मुखी राधे गोविंद गोविंद । भक्तीरसाचा प्रेमानंद । लाभो सकला तुझिया कृपें ॥३०॥
जेव्हां धर्मास ये ग्लानी । अवतार घेई चक्रपाणि । पार्थास गीता वचनी । योगेश्वरु बोलिला ॥३१॥
करावया दुष्टांचे निर्दालन । आणि सज्जनांचे रक्षण । धाव घेई रमारमण । स्वये मुकुंद सांगतसे ॥३२॥
मातला रावण महीवरी । रामरूप घे श्रीहरी । ओढून प्रत्यंचा चापधारी । निर्दाळलें राक्षसां ॥३३॥
द्वापारयुगी भगवंत । होऊन आले देवकीसुत । लीला जयाची अद्भुत । व्यासे वर्णिली वेणू वृंदावनी ॥३४॥
हा नंदाचा नंदकिशोर । गोपगोपी चित्तचोर । गोवर्धन-गिरीधर । वाजवी वेणू वृंदावनी ॥३५॥
बालक्रिडा करी गोकूळी । खेळे घेऊनी चेंडूफळी । गेंद जातां यमुना जळीं । निमित्तें मर्दिला कालिया ॥३६॥
सावळा वनमाळी सुंदर । खोडया करी अनिवार । कागाळ्या आणीतो सत्वर । गोपी अवघ्या यशोदेसी ॥३७॥
कान धरी यशोदामाता । भरी रागे कमलाकांता । न जाणें अजाणतां । “गोपाळ” विश्वंभर ॥३८॥
दाखवाया प्रत्यक्ष प्रचीति । प्रभुनें केली एक युक्ती । कोण्या कारणें मुख उघडती । मातेसी ब्रह्मांड दाखविण्या ॥३९॥
खेळला श्रीहरी रास । आश्विन शुध्द पौर्णिमेस । वर्णन त्याचे करीती व्यास । गोपीगीत गाऊनी ॥४०॥
गोपींचे करी गर्वहरण । प्रकटे अप्रकट होऊन । पुरवी कामना कमलनयन । ब्रह्मसुख देऊनी ॥४१॥
या आठव्या अवतारी । जिंतेंद्रिय चक्रधारी । कंसचाणूर संहारी । रक्षावया महीसी ॥४२॥
पुढती श्रीकृष्णे पार्था । सांगितली स्वमुखे गीता । जे ब्रह्मज्ञान ऐकतां । गहिवरला धनंजय ॥४३॥
जिथे भगवंत योगेश्वरु । आणि पार्थ धनुर्धरु । तिथे सुख जय निर्धारु । प्रत्यक्ष प्रभू बोलीले ॥४४॥
युगे युगे स्वयम् अहा । प्रभूनें घेतले अवतार दहा । बौध्द होउनी कलियुगी पहा । स्तब्ध उभा राहिला ॥४५॥
जरि हा निर्गुण निराकार । भक्ता झालासे साकार । चित्प्रकाश चिदधन । परम कल्याण सकाळासी ॥४६॥
भक्त पुंडलिकासाठी । धाउन आला जगजेठी । तिष्ठतसे भीवरा काठी । ठेउन हात कटीवर ॥४७॥
धर्मासी येतां न्यूनता । आणि रक्षावया जनहिता । हा अल्पांशें प्रकटे तत्वतां । संतरूपें जन्म घेई ॥४८॥
जे जे सत्पुरुष आणि संत । ते सारेच भगवंत । द्वैतहीन कृपावंत । परमानंद सकळासी ॥४९॥
ऐसी विभूतीची मालिका । उपजली या भूलोकां । चरणरज तयांचे मस्तका । लाऊं आपण सद्भाग्यें ॥५०॥
कृष्णदासी मीराबाई । राजस्थानची पुण्याई । कमाल्, तुळशी कबीरभाई । प्रसिध्द रामभक्त हे ॥५१॥
रामकृष्ण परमहंस । विवेकानंद चितप्रकाश । बाबू अरविंद घोष । कैवल्य भूषणें भारती ॥५२॥
ब्रह्मेंड स्वामी धावडशीकर । दयानंद आणि बीडकर । जुळती तयांपुढे आमुचे कर । अंमळनेरकर संतादि ॥५३॥
नृसिंह सरस्वती कर्दळीवनी । होता गुप्त प्रगटती झणी । जया म्हणती समर्थ स्वामी । अक्कलकोटनिवासी ॥५४॥
शिरडी ग्रामीचे साईनाथ । बाबा उपासनी, शिवदत्त । भक्ताभालीं ठेविती हात । क्षेम त्याचे करावया ॥५५॥
मोरया गोसावी दासगणेश । पद्मनाभस्वामी प्रत्यक्ष ईश । जयांचे नाम घेता जाती दोष ।
चरण त्यांचे नित्य स्मरू ॥५६॥
केडगावचे नारायण । शेगांवचे गजानन । महाराज हे आनंदघन । अस्तु कल्याण म्हणती सदा ॥५७॥
राम मारुति कृष्णानंद । रत्नागिरीचे स्वरूपानंद । नाथ पंथीय महासंत । नारायण श्रीगोंद्याचे ॥५७अ॥
गोविंद नामे सदगुरु । जयासी आतां नमन करु । त्यांचाच झाला अनुग्रह । चरित्रनायका प्रत्यक्ष ॥५८॥
“स्थिर रहो ” म्हणति सदा । विचलीत नहों “आनंद” कदा । वारील अवघ्यांची आपदा ।
गोविंद गोविंद म्हणाल जरी ॥५९॥
या सिध्दपुरुषाचा इतिहास । सांगणें येथें उचित । म्हणोनी हे हकीगत । ऐक साधका भक्तीनें ॥६०॥
धुळें शहरापासून दूर । तेरा मैल असे अंतर । आग्रा नामे मार्गावर । गांव एक वसतसे ॥६१॥
ग्रामास या म्हणती सोनगीर । वस्ती ज्याची दहा हजार । वैश्य, ब्राह्मण, कासार । हिंदू तसे अहिंदुही ॥६२॥
गांवच्या पश्चिमेस । प्राचीन असे किल्ला एक । ज्या डोंगरी दुर्गास । बांधिले गवळी राजानें ॥६३॥
या दुर्गाचे अवशेष । गतवैभवाची जणू साक्ष । अजुन पाहतां समक्ष । मन येतसे भरोनी ॥६४॥
परिपूर्ण हा भांगारी । पूर्वी म्हणती ज्या सुवर्णगिरी । अपभ्रंश ज्याचा सोनगिरी । म्हणून गांव सोनगीर ॥६५॥
सदर किल्ल्याच्या पायतळी । नाना वृक्षांच्या आवली । लतापुष्पांच्या सावली । नटविली सृष्टी निसर्गे ॥६६॥
दुर्गाच्या दिशेस उत्तर । गोडया पाण्याची एक विहीर । अनेक राहाट तिच्यावर । पुरवीती जीवन गांवकर्‍या ॥६७॥
पाणी विहीरीचे अति गोड । राहे थंड तिन्हीं त्रिकाळ । कधीं न आटला हा आड । ख्याती याची अजुनही ॥६८॥
गर्द छाया भोंवताली । म्हणोनी येती माध्यानकालीं । घ्यावया विश्रांती भली । तृषित आणि श्रांतजन ॥६९॥
विहीरीच्या पूर्व बाजूस । सान आहे शिवालय एक । अश्वत्थ वृक्षाच्या छायेंत । मारुती मंदीरही ठाके उभे ॥७०॥
हे पवित्र स्थान अतिरम्य । साधुसंतासी तपोवन । जेथे नांदे शांतता पूर्ण । एकांतवासा योगियासी ॥७१॥
औदुंबर, अश्वत्थवृक्ष । चिंच, वटत्व निंब अनेक । विहंग नानापरिचे कैक । राहती त्यावरी अनेक ॥७२॥
वसंतऋतुचे आगमनी । पक्षी गाती सुस्वर गाणी । नादब्रह्म भरूनी झणी । उपवन होई आनंदवन ॥७३॥
शके अठराशें आधीपासून । राहिले येथे एक संत महान् । ज्याकारणे ही भूमी पावन ।
गोविंदमहाराज नांव त्याचें ॥७४॥
यांचा पूर्वेतिहास कांही । विशेषें कुणा ठाऊका नाहीं । परि होते “गोडवी” नामें गांवी । पंजाब प्रांतीचें रहिवासी ॥७५॥
आले प्रथम जेव्हां सदुगुरु नाथ । उतरले सोमेश्वर मंदिरात । इथेच त्यांचा प्रथम वास । भाग्य उदेले सोनगीरीं ॥७६॥
नंतर मारुती मंदीरांत । जे झाले होते जीर्ण बहूत । रहावया तेथे आनंदात । आले सदुगुरु गोविंद ॥७७॥
या राउळासमीप । होता जो अश्वत्थवृक्ष । राहती तयाच्या सन्निध । सहास्त्रवधी डोंगळे ॥७८॥
महाराजांच्या अंगावरती । हे मुंगळे स्वैर फिरती । न वाटली तयांची क्षिती । कधीही गुरुगोविंदा ॥७९॥
आसनस्थ असती निरंतर । देवळाच्या ओसरीवर । भाविकें आणिली भाकर । सेविती कधीं प्रेमाने ॥८०॥
भूंगेशा किंवा मुरमुरे । भुकेसाठीं म्हणती पुरे । केवळ त्यांचिया आधारें । दिवस कैक राहती ॥८१॥
तंव कालान्तरे नंतर । बांधिले सहा खणी घर । गोपाळराव हवेलीकर । यानीं उत्तरेस मारुतीच्या ॥८२॥
हे चेअरमन बोर्डाचे । “आरोग्यरक्षण” खात्याचे । महाराजांचे संबंध यांचे । निकट आणि प्रेमळ ॥८३॥
या सहा खणी जागेत । ओटा एक छतासहित । महाराज बैसती तेथ । पेटवूनी धुनी अखंड ॥८४॥
अवस्था निरंतर उन्मनी । चिलीम हाती धरूनी । धूर सौरसे काढूनी । शब्द म्हणती गॉंय गॉंय ॥८५॥
आधिच हे स्थळ जंगल । त्यांत होतां सायंकाळ । भक्तभाविक आदि सकळ । न फिरकती ॥८६॥
शंकराचे पिंडीभोवती । सर्प जहरी विळखे घालिती । महाराज तयांसी खेळविती । हातीं धरोनी लिलया ॥८७॥
चढतां नाग अंगावरी । ना करिती तयास दूरी । म्हणती सर्वभूतांतरी । आत्मा अके वसतसे ॥८८॥
या सर्पासी मारण्याते । होतां कोणी धजावते । “बच्चा है डरोमत” ऐसे । न मारो म्हणती गोविंद ॥८९॥
पोलादासारखे शरीर । पायां लागती जटाभार । शस्त्राघाताची मांडीवर । खूण दिसतसे तयांच्या ॥९०॥
कासे कसुनी लंगोटी । हाती धरिती लांब काठीं । रजतकडे मनगटी । वेष असा ह्या सिध्दांचा ॥९१॥
हे रामदासी अवतार । उग्रमूर्ति रुद्रावतार । बाळगिती एक तलवार नाम तियेचे “भगवती” ॥९२॥
गळां चांदीची सांखळी । आवड जगा वेगळी । परी भक्तजना नवाळी । वाटे नेत्रीं देखतां ॥९३॥
ऐसे हे परम सदगुरु । सोनगीरीचे कल्पतरू । लोककल्याण कैवारू । सर्वत्र प्रसिध्द जाहले ॥९४॥
पूर्वी म्हणती जे अनेक । असे हा वेडापिसा एक । तेच होती नतमस्तक । पदांबुजी तयांच्या ॥९५॥
सखाराम परदेशी नांवाचा । नोकर होता कमेटीचा । महाराजांचा भक्त साचा । अन्न आणी धरून ॥९६॥
ठेवितसे अन्नाचे ताट । गोविन्द गुरुच्यां पुढ्यांत । लहर आली तरिच खात । नाहींतर राह्ती उपाशी ॥९७॥
तसेच  झिप्रुलाल तांबट । कासार नामें बाबूशेट । महाराजांचे भक्त निकट । इच्छा भोजन वाढिती ॥९८॥
ऐसी सुमारे वीस वर्षे । सेवा निके केली सहर्षे । श्री शान्ति सुख प्रकर्षे । पावली बाबू कासारा ॥९९॥
महाराजांचे मौनीव्रत । पूर्वी जे होते अखंडीत । खानेसुमारीनिमित्त । सोडीले तयांनी तात्काळ ॥१००॥
हा योग परम सुखाचा । वाटला अवघ्यांसी साचा । कारण आशीर्वाद गुरुंचा । स्वमुखें आता मिळेल ॥१॥
स्वानंदें नाचती बहूत । धावती आनंदवनांत । पायीं लागती साष्टांगवत । म्हणती प्रभू कृपा करा ॥२॥
दर्शनासी लागली रीघ । दुमदुमला अवघा परिघ । सत्संगाचा दुर्लभ । योग आला सकलांसी ॥३॥
गुरुगोविंदा आजवरी । म्हटले आपण महाराज जरी । कांही भक्त तया परी । बाबजी नामें संबोधितीं ॥४॥
मौनाचा केल्यावरी त्याग । भक्तांचे उजळलें भाग्य । पूर्वकथा ऐकण्याचा सुयोग । स्वमुखें तयांच्या लाभला ॥५॥
गोष्टी लढाईच्या सांगाव्या । कौतुकें सर्वांनी ऐकाव्या । खूणा तलावारीच्या पाहाव्या । पायावरी तयांच्या ॥६॥
रणमैदानिची साक्षांत । अवतरे वीरश्री प्रत्यक्षांत । भासती जणू हे विक्रांत । संत कीं योध्दा संभ्रम पडे ॥७॥
जे इंग्रजांसही नाटोपे । कळीकाळासी रुद्र वाटे । तेच असावे हे तात्या टोपे । तर्क कांही जणांचा ॥८॥
सोनगीरी आले त्या सुमारास । वय त्यांचे असावे पन्नास । आपला पूर्वइतिहास । कथिती लहर आलीया ॥९॥
यात्रा केली कैक योजनें । पायी तुडविली गर्द कानने । संतसज्जनांची दर्शने सुखसंवादे घेतली ॥१०॥
महाराजांनी कांही दिवस । केला होता काशीक्षेत्रीवास । तेथोनी त्रिवेणी संगमावर । प्रयाग तीर्थी राहिले ॥११॥
मथुरा गोकूळ वृंदावन । डाकोरनाथ परिभ्रमण । हृषीकेशी बद्रिनारायण । उत्तर यात्रा पूरी केली ॥१२॥
आबूचा पहाड, भावनगर । द्वारका भडोच उदेपूर । सोमनाथ सोरटी जोधपूर । क्षेत्रे अमूप देखिली ॥१३॥
सातपुडयाच्या पर्वतराजी । लीलया ओलांडती बाबजी । राहून एके गुहे माजी । स्वचिंतनी काळ कंठिला ॥१४॥
मग आले नर्मदाकाठी । भेटावया जगजेठी । परिक्रमा केली मोठी । संतसमागम साधीला ॥१५॥
नासिक पुणें त्र्यंबकेश्वर । चिंचवड आणि पंढरपूर । तेथून मग रामेश्वर । दक्षिणयात्रा पूरी केली ॥१६॥
आले पुन्हां गोविन्द परत । सातपुडयाच्या पर्वतात । राहोनी कांही काळ तेथ । सोनगीरी अवतीर्ण जाहले ॥१७॥
असे हे सिध्द श्रेष्ठ । राहोनी सदा आत्मनिष्ठ । भक्तजनांचे वारीत कष्ट । जे जे झाले लीन तया ॥१८॥
थंडी वारा पाऊस । क्षीती न त्याची या सिध्दास । उभे राहती तासनतास् । उन्हांत वा तरुतळीं ॥१९॥
मनाशीच कांही बोलती । काठी जमिनीवरी आपटीती । किंवा फडफडा मारिती । आपुल्याच देहावरी ॥१२०॥
थंड पाण्याचें नित्य स्नान । विहिरीत कधी डुंबून । कधीं घेती घागरी ओतून । भक्ता कुणा सांगोनी ॥२१॥
कुणा भाग्यवंता रात्री । श्रीकृष्णलीला निरुपती । पदें हिंदुस्थानीही गाती ।  तन्मय होऊन निजानंदे ॥२२॥
धुळे शहरीचे भक्तवर । वामनराव पराडकर । सेवेसाठी तत्पर । आले सन्निध तयांच्या ॥२३॥
एकोणीसशें सहा सालीं । वृत्ती तयांची लीन झाली । गोंविदपदी सेवा केली । अंतरकालपर्यंत ॥२४॥
आतां हें “आनंदवन” । भक्तां झाले नंदनवन । आर्तशरणार्थी संजीवन । गोविंदकृपा जाहली ॥२५॥
या सिध्दपुरुषाचे पूजन । करूं लागले अवघे जन । मानोनी तया ईशासमान । नतमस्तक जाहले ॥२६॥
पूजा करिती नित्यनेम । तुळशीपत्रादि समर्पून । धूप दीप नैवेद्य करून । प्रसाद सकळां वाटिती ॥२७॥
रात्री कथाकीर्तन । नामस्मरण वा भजन । करिती कधी निरूपण । महाराज लहर आलिया ॥२८॥
सद्गुरुंच्या दर्शनासाठीं । भक्त करिती सदैव दाटी । गोविंद गुरुची केवळ दिठी । क्षेमकरी अशेख ॥२९॥
भक्ति वैराग्याच्या आगरु । मुखीं सदा “श्रीवाहेगुरु” । समाधिस्थिती सहज सुंदरु । मानसपूजा करिती ॥१३०॥
तात्यासाहेब पारनीस । महाराजांचे भक्त खास । नित्यनेमे येती दर्शनास । गुरुवार दिवस चुके ॥३१॥
हे नामांकित अंमलदार । पोलीस खात्याचे फौजदार । परि ठेविती बहू आदर । संतसज्जनादिकांचा ॥३२॥
महाराजांची सेवा निष्काम । चाकरी सरकारी त्यजून । तहहयात केली मनोमन । भाऊराव कुळकर्णी यानीही ॥३३॥
सरकारी बडे अधिकारी । तसेच उदीम व्यापारी । येऊ लागले सोनगीरी । स्वकाजा आणि दशनार्थ ॥३४॥
रूप सोनगिरीचे पालटले । क्षेत्र स्वरूप तया आले । पाटील कुळकर्ण्यासी काम वाढले ।व्यवस्था उत्तम राखण्याचे॥३५॥
भाईदास दयाळ गुजर । पोलीस पाटील आजवर । त्रस्त झाला अनावर । वाढता व्याप पाहूनी ॥३६॥
म्हणे गुरुगोविंद वेडापीर । नसती आफत आम्हांवर । याला एकदां गांवाबाहेर । फेकून दिला पाहिजे ॥३७॥
गावातील पांचसहा खट । यानी योजीला एक कट । धजावले हे महादुष्ट । काढण्या कांटा संताचा ॥३८॥
एकोणीसशे नऊ साल । सकाळीं आठची पवित्र वेळ । परि दुर्जना कुठली काळवेळ । दुष्कर्म करण्यासिध्द झाले ॥३९॥
देशपांडे, कुळकर्णी, गर्गे । त्यांच्यसवे भिल्ल चवघे । फलटण अशी घेऊन संगे । आला पाटील विहीरीवर ॥१४०॥
पायरीच्या कुव्यावर । स्नाना गेले संतवर । तोंच अकस्मात तयावर । घाला केला दुर्जनांनी ॥४१॥
सुरवात करिती मारण्यास । काठीस न मिळे उसंत । महाराज परि महासंत । लीला प्रभूची पाहती ॥४२॥
काठी मोडली वेळूची । परि शांति न ढळली गुरुंची । म्हणती “पुराण्या लकडीची । काय तमा आम्हांसी ॥४३॥
आणावी काठी नवीन । हौस घ्या पुरवून । तो प्रभू रघुनंदन । धिंवसा तुमची पुरी करो” ॥४४॥
पाटील म्हणाला भिल्लास । हाणा मारा या धटिंगास । परि भिल्ल न धजती या कामास । स्वस्थ उभे राहिले ॥४५॥
गांवात गेली बातमी । महाराजांस पिटीले पाटलांनी । गर्दी जाहली आनंदवनीं । पोरेंटोरे धावली ॥४६॥
पाटलाचा दरारा बहूत । कोणास होईना हिंमत । केवळ बघेची झाले समस्त । बालभेचीनी निमित्ते ॥४७॥
इथें चालला असता आकांत । काय घडला पहा वृतांत । झाला त्य क्षणीं दृष्टांत । किसनसिंग गढीवाल्याना ॥४८॥
हे थाळणेरचे रहिवासी । आले होते सोनगीरीसी । कांही कामानिमित्ते त्या दिवशी । शब्द कांनी आल तयांच्या ॥४९॥
“सोया क्यूं” उठा वेगे । दुर्जन मज मारिती अवघे । परि मज न त्याची वाऊगे । काळ मात्र सोकावेल ॥१५०॥
अन्यायाचे परिमार्जन । करावया सवे दोघेजण । तात्काळ गेले धाऊन । किसनसिंग तसे धनसिंगही ॥५१॥
गर्दीत काढून वाट । गेले महाराजसमीप थेट । दिल्या ठेऊनी मुस्कुटांत । भिल्ल आणि इतरांच्या ॥५२॥
तयाचा पाहूनी आवेष । धीर आला इतरांस । देखोनी जनक्षोभास । पळाले चांडाळ तत्क्षणीं ॥५३॥
महाराज तसे शूर । रणांगणाचें अद्वितीय वीर । शक्तीनें जणू कुंजर । परि स्वस्थ राहिले ते वेळीं ॥५४॥
मनांत त्यांच्या येते जर । केले असते या सर्वां जर्जर । सपाट सार्‍यां भूईवर । क्षण मात्र न लागतां ॥५५॥
परि म्हणाले प्राक्तन आपुले । कधी कुणा काय चुकले । ज्याने त्याने ते भोगीले । पाहिजे निश्चित या जन्मीं ॥५६॥
पोलीस इन्स्पेक्टर गढीवाले । त्याच्या कानीं वृत्त गेलें । ठाईच ते स्थळीं पातले । चौकशी करावया तत्पर ॥५७॥
जाबजबाब जाहले । गुन्हेगारांसी कैद केले । तालुक्यासी घेऊन आले । लाठयाकाठयासहित ॥५८॥
महाराजासीं करण्याउपचार । बाबासाहेब बहाळकर । कुंटे इत्यादि डॉक्टर । त्वरे आले सोनगीरीं ॥५९॥
अंगावर होते तीव्र वळ । जखम तैसी डोळ्याजवळ । वाहात होते रक्त भळभळ । पाहूनी द्रवले मन तयांचे ॥१६०॥
केला त्यांनी योग्य इलाज । नको जरी म्हणती महाराज । या उपाधीची काय गरज । देह माती सारखी ॥६१॥
जोशी नामें अधिकारी । होते प्रांताच्या हुद्यावरी । अभियोग त्यांच्यासमोरी । साक्षी पुरावे जाहले ॥६२॥
रघुनाथसिंग परदेशी । सोनगीरीचे रहीवासी । साक्ष तयानि दिली खरी । गोविंदगुरुंच्या बाजूनें ॥६३॥
महाराजांचे भक्तवर । वामनराव पराडकर । कुळकर्णी आणि इतर । साक्षी झाल्या अनेकांच्या ॥६४॥
महाराजांनी कुणासही । नव्हते सांगितलें कांहीही । निवेदन कराया न्यायालयीं । कोणत्याही प्रकारें ॥६५॥
सरकारी वकील नामांकित । कायद्याचे गाढे पंडीत । कामांत आपल्या निष्णात । साठे, गणेश बाळाजी ॥६६॥
यानीं हा खटला विवेकें । चालविला बहूत निकें । खोटया साक्षिदारांस फिके । वादविवादे पाडिले ॥६७॥
आरोपीकडे करून निर्देश । प्रांत सद्गुरुसी पुसत । यांनी मारिले तुम्हांस । गोष्ट सत्य कि असत्य ॥६८॥
तै हांसोनी बाबजी म्हणती । जरी सत्य तयांची कृती । हे बिचारे मूढमती । “हमने भी मारा” इन्हीको ॥६९॥
महाराजांची आगळी जबानी । थक्क झाले सगळे ऐकूनी । प्रश्न केला प्रांतसाहेबांनी । तुम्ही कशानें मारिले ॥१७०॥
“घांसके पत्तीसे मारे” । तात्काळ महाराज उद्गारले । प्रांतसाहेब उमजले । मतीतार्थ या कथनाचा ॥७१॥
खटल्यांतील आरोपींना । शिक्षा केली पांचही जणांना । दाखविला सश्रम कैदखाना । दंडही केला बहुत ॥७२॥
परि संतजन हे दयाळु । दुष्टदुर्जनासही स्नेहाळु । महाराज होऊन कृपाळु । क्षेम अपराध्यांचें चिंतीले ॥७३॥
मग अपराध्यां झाला अनुताप । सरले तयाचें केले पाप । बाबजींचा सुरवाड दृष्टीक्षेप । सोडवी त्यांना अपिलांत ॥७४॥
महाराजांची ही हकीगत । सर्वत्र झाली प्रसृत । खानदेशी गाजली किर्त । सोनगीर गांव उजळले ॥७५॥
महाराज ज्या जागेवर । राहिले होते आजवर । खानदेशाचे कलेक्टर । आले चौकशीच जागेच्या ॥७६॥
वर्षे तीस वा बत्तीस । महाराजांचा येथील वास । जाणोनी त्या वहिवाटीस । आक्षेप न घेतला तयांनी ॥७७॥
साहेबांचे ऐकोनी वचन । हर्षले सकल भक्तजन । गोविंद गुरुंचे पवित्र चरण । तेणे सोनगीरी स्थीर झाले ॥७८॥
कलेक्टरसाहेब बहादूर । राहिले मुक्कामास बंगल्यावर । तैं काय झाला चमत्कार । ऐका श्रोते सावध ॥७९॥
घोडा त्यांचा झाला आजारी । ऐकाऐकी टेकडीवरी । घसरून पडला भुईवरी । मोडला पाय तयाचा ॥१८०॥
लाडकी तयांची लेक । झाली तिही बेशुध्द अचानक । कारण नसतां कांही ऐक । उमज पडेना कुणाही ॥८१॥
लागोलाग धुळ्याहून । आले सिव्हील सर्जन । उपाय केला मनोमन । परि साहेब झाले संचित ॥८२॥
इकडे गोविंदमहाराजांनी । भाऊरावास विभूती देऊनी । पाठविले अगत्ये करूनी । बंगल्यावरी साहेबांच्या ॥८३॥
विभूती लावितां मुलीस । गुण तात्काळ आला तीस । आश्चर्य वाटेल साहेबांस । अतर्क्य गुरुंची लीला म्हणे ॥८४॥
बांबूच्या पाल्याची धूरी देतां । घोडाही झाला क्षणीच उठतां । हें आश्चर्य डोळां पाहतां । थक्क झाले सर्जनादि ॥८५॥
साहेब मनीं गहिंवरला । भाऊरावासंगे निरोप दिला । कलेक्टर जरी अविंध झाला । “सलाम” तयाचा स्विकारणें ॥८६॥
ही संतकथा सकलांचे । प्रिय करील दुरितांचे । वारील दु:ख भवभयाचे । गोविंदकृपा होईल ॥८७॥
धन्य धन्य सोनगीर । प्रभू गोविंद जया आधार । धन्य तयांचे भक्तवर । आनंद वर्षे “आनंदवनी” ॥८८॥
राधे गोविंद राधे गोविंद । नित्य लागे मना छंद । तेणें भेटेल आनंदकंद । श्यामसुंदर मुरारी ॥८९॥
हें जयानीं कथिले तत्व । ते सद्गुरु केशवदत्त । “कथानायक” भगवदभक्त । शिष्योत्तम गुरुगोविंदाचे ॥१९०॥
याच अनुबंधे तुम्हांस । पूर्वकथा ही सुभग । निवेदिली मी रसिक । संत गोविंदगुरूंची ॥९१॥
या कथेचा उत्तरार्ध । करील आपुले जीवन सार्थ । सांगेन मी यथार्थ । पुढील अध्यायी सुवर्म ॥९२॥
इति श्रीयशोधन विरचीत । श्रीसद्गुरु केशवदत्तचरित । होवो सकलां सुखद । अध्याय पहिला संपूर्ण ॥९३॥
॥ इति प्रथमोऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP