कुशलवोपाख्यान - अध्याय सातवा

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.


( उपजाति )
अशांत आली चतुरंग सेना, जीच्या रजें भानुसि भू दिसेना ।
अन्योन्यशब्दग्रहणीं स्व भेरी वृंदस्वनें घे लटिकेंचि भेरी. ॥१॥

( गीतिवृत्त )
‘ कोठें हय ? कोठें हय ? ’ असें म्हणत धांवले पुढें सादी, ।
रंभास्तंभनिबद्धस्वहयासि तदीय दृष्टी आसादी. ॥२॥
निकटस्थ लववयस्यस्तोमातें म्हणति वीर ते, ‘ कोणी ।
हरिरंभासंबंधें केली अमरावती तशी क्षोणी ? ’ ॥३॥

( अनुष्टुप् )
ऐसें ऐकोनि, म्हणती विप्रांचीं त्यांस लेंकरें, ।
‘ हयरत्न लवें वीरें रंभेशीं बांधिलें करें. ’ ॥४॥

( स्रग्धरा )
एवं पूर्वाश्रमस्थद्विजवचन तिहीं सेविलें स्वात्मकानें,
हांसोनी वीर तेव्हां म्हणति, ‘ न कळतां, बांधिला अर्भकानें, ।
रंभेपासूनि आतां, उशिर न करितां, रामयज्ञीयवाजी
सोडा, सोडा, अयोध्यानगरगतपथीं चालवा, चालवा; जी ’ ! ॥५॥

( पृथ्वी )
धनू धरूनियां करीं तुरगमोचनोपक्रमीं,
लव त्वरित धांवला विगतभी महाविक्रमी, ।
म्हणे ‘ रणधुरीण हो ! धरुनि गर्व निःसार हा,
वृथा मज न जिंकितां, हरिस सोडितां कां ? रहा. ’ ॥६॥

( हरिणी )
अशि परिशिली वाणी त्याची तिहीं जरि त्या क्षणीं,
तदपि भट ते झाले सिद्ध स्वघोटकमोक्षणीं. ।
मग लव तदा त्या वीरांच्या करांसि शरें हरी,
धरणिधरपक्षांतें वज्रेंकरूनि जसा हरी. ॥७॥

( वसंततिलका )
विच्छिन्नहस्त भट ते म्हणती, ‘ धरा हो !
पाडा किशोर धरणीवरि, हा न राहो ’ ।
कोपेंकरूनि मग सैनिक त्या प्रधांनीं
एकावरी बहुत वर्षति आयुधांनीं. ॥८॥

( अनुष्टुप् )
न स्पर्शती लवांगाला तीं शस्त्रें देहघातकें, ।
जैसीं श्रीगौतमीतोयस्नातमर्त्यास पातकें. ॥९॥

( शार्दूलविक्रीडित )
त्यांच्या शस्त्रगणासि, ओढुनि धनुर्वल्लीस वेगें करें,
योगी संसृतिबंधनाप्रति, तसा छेदी स्वबाणोत्करें; ।
सादी, पत्ति, रथी, अनेकपपक, श्रांतोनि भूमंचकीं,
गृध्रव्रातवितानसावलिस ते घेती निजेलास कीं ॥१०॥
केले स्यंदन चूर्ण बाणनिकरें, वाजी द्विधा छेदिले,
वीरांचे शुभ देह वांटुनि शिवागृध्रादिकांसी दिले; ।
शुंडादंड्विहीन भूमिपतित व्याक्रोशती वारण,
कोणाच्याहि शरेंकरूनि न घडॆ त्याचें रणीं वारण. ॥११॥

( स्रग्धरा )
हातीं कोदंड, देहीं दृढ कवच बरें, अक्षयी दोन भाते,
रक्षोवृंदस्थरामस्मृतिस उपजवी जानकीसूनुभा ते. ।
पाचां पाचां शरांहींकरुनि न हृदयीं भेदिलें कोणत्याला ?
एवं युद्धप्रसंगीं बहु बळ वधिलें; वारितो कोण त्याला ? ॥१२॥

( शार्दूलविक्रीडित )
केलें यापरि बालकें निज बळीं शार्दूलविक्रीडित,
जाला याकरितां रिपुघ्न परम क्रोधानळें पीडित. ।
आला बैसुनियां रथीं शरधनुष्पाणी, कृपाणी, रणीं; ।
त्यातें ‘ तिष्ठ ’ म्हणे, स्वकीय मतिला ठेवूनि तन्मारणीं. ॥१३॥
शत्रुघ्न क्षितिजासुतें खर शरें भाळीं उरीं ताडिला;
चारीही हय वेधिले, ध्वज मग च्छेदूनियां पाडिला; ।
होते जे रथचक्ररक्षक भट, स्वर्गासि ते धाडिले;
चापज्या हरिली; शिलीमुख असे बारा लवें सोडिले. ॥१४॥

( गीतिवृत्त )
सज्ज करुनि चापातें, शत्रुघ्न म्हणे लवासि, ‘ सांभाळीं. ’ ।
मग खरनाराचत्रय खदिरानळनिभ समर्पिले भाळीं. ॥१५॥

( वसंततिलका )
तो तेधवां स्मितजितौषधिपास्य मानी
त्या सायकासि बिसतंतुसमान मानी. ।
त्यातें म्हणें लव, ‘ विगर्वित बाहुसारें,
वीरा ! तुझें बळ दिसें इतुकेंचि सारें ! ॥१६॥

( शार्दूलविक्रीडित )
ऐसें बोलुनियां, लवें निरखिला शत्रुघ रौद्रेक्षणें;
केला चाप तुरंगसारथिरथध्वंसाकुलात्मा क्षणें. ।
तो बोले शरयुक्त कार्मुक करीं घेऊनियां दूसरें,
‘ जा बाळा ! तुज जीवदान दिधलें, दे पाठ, मागें सरें, ’ ॥१७॥
ऐसें बोलुनि, राघवें खरशर क्रोधें तदा सोडिला,
तो बाण स्वशिलीमुखें लवभटें मध्यें द्विधा तोडिला; ।
होता सद्गतिमान्, अधःपतन तैं जालेचि त्याला परी,
वादी जे नर कूटसाक्ष वदती, तत्पूर्वजांच्या परी. ॥१८॥
शत्रुघ्नें दुसरा शिलीमुख तदा बाणासनीं जोडिला,
तोही चापसमेत भूमितनयापुत्रें शरें तोडिला. ।
पूर्वीं ज्या विशिखें द्विजारिलवणायुःप्राशिलें भूवरी,
त्यातें, त्याच धनुर्लतेप्रति, तदा सौमित्रि हातीं धरी. ॥१९॥
सोडी वन्हिनिभाशुगाप्रति, वदे ‘ मेलाशि रे ! या क्षणीं. ’
तेव्हां बाण अमोघ हें समजला, आलोकितां स्वेक्षणीं. ।
‘ यातें अग्रज भंगिता, परि नसे; मी जानकीच्या महा -
पातिव्रत्यबळेंचि खंडिन; ’ म्हणे ‘ आला असो भीम हा. ’ ॥२०॥

( गीतिवृत्त )
ऐसें वदोनि, केले दोन तयाचे निजाशुगें तुकडे; ।
आले तत्पूर्वार्ध च्छिन्नाहिनिभ स्वभंगहेतुकडे. ॥२१॥

( स्रग्धरा )
आधीं चापासि खंडी, मग जनकसुतासूनुवक्षस्थळाला,
त्या काळीं मोहभारें क्षितिवरि सहसा देह त्याचा गळाला. ।
झाली नेत्रांबुजाला रजनि, न समजे युद्धभू, गेह वा हे.
त्या बाळाला सचैल स्नपनचि घडलें, शोणिताच्या प्रवाहें. ॥२२॥

( शार्दूलविक्रीडित )
आली मृत्युसमा यदा अशि रणीं मूर्च्छा महामानिला,
त्या काळीं हतशेषवीरनिकरें आनंदसा मानिला. ।
भेरींच्या प्रकरासि ताडिति, मुखें शंखासि ते फुंकिती;
त्यांचा हर्ष न सांठवे त्रिभुवनीं, तो म्यां वदावा किती ? ॥२३॥
झाला, त्यासि विलोकितां सदय तो शत्रुघ्ननामा कृती
‘ शिंपा यासि, ’ म्हणे भटांसि, ‘ दिसतो हा बाळ रामाकृती. ’
छायावायुजलोपचारित लव स्वयंदनीं स्थापिला,
सेनायुक्त, हयासि सोडुनि, निजायोध्यापथें चालिला. ॥२४॥

( उद्गोतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं ।
अध्याय सातवा हा श्रवण करावा गुणज्ञमुख्यांनीं ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP