कुशलवोपाख्यान - अध्याय दुसरा

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.


( द्रुतविलंबित )
नव सहस्त्र समा क्रमिल्या भल्या,
प्रकृति त्या सुख फारचि लाभल्या, ।
नृपतितें वश नित्य असे प्रजा,
रघुवरासि परंतु नसे प्रजा ॥१॥

( मंदाक्रांता )
मोठ्या काळेंकरुनि मग ती गर्भिणी होय रामा;
रामातें ते बहु सुख करी पांडुंवक्त्राभिरामा; ।
ज्याची दृष्टी स्वसुतवदनप्रेक्षणातें भुकेली,
केली स्त्रीशीं दशरथसुतें त्या चतुर्मास केली ॥२॥

( गीतिछंद )
तदनंतर रघुकुलवर पाहे स्वप्नास पांचवे मासीं ।
प्रातःकाळीं सांगे करुनि नमस्कार तें गुरूपाशीं. ॥३॥

( मंदाक्रांता )
‘ गंगातीरीं जनकतनया त्यागिली देवरानें,
शोकग्रस्ता घडिघडि रडे फार उच्चस्वरानें. ।
कोमेलेसें वदन, सुटला मूर्धजांचा कलाप,
दीना वाणी, करि परिपरि काननांतीं विलाप. ॥४॥

( गीतिछंद )
अशि जनकनृपसुतेची स्वप्नांतीं पाहिली अवस्था मी, ।
मज सुख तीळ नच वाटे, चिंतेनें व्यापिलें मन स्वामी ! ’ ॥५॥

( अनुष्टुपछंद )
ऐसें भाषण रामाचें ऐकोनि ऋषिसत्तम ।
बोलत जाहला त्याशीं हरिता शिष्यहृत्तम. ॥६॥
‘ श्रीरामा ! जलदश्यामा ! देवर्षिनिकरप्रिया ! ।
गर्भशांत्यर्थ सीतेची कर पुंसवनक्रिया. ॥७॥
कृष्णपक्ष सरे तावत् करावें विप्रतर्पण; ।
इहामुत्रहि कल्याण देतें होय द्विजार्पण ’ ॥८॥

( रमावृत्त )
नृपति तदा, नमुनि करें कुशासनातें,
कुलगुरुच्या करि बहुमान्य शासनातें ।
हरिजिदरिप्रति हरिसैन्यराजराजा,
मग ‘ जनकक्षितिपतिच्या ’ म्हणे ‘ घरा जा ’. ॥९॥

( पुष्पिताग्रा )
जनकनृपवरासि सांग आदौ नमन करूनि मदीय वंदनातें. ।
मग वद, ‘ तव दर्शनैकवांछा बहुत असे अजसूनुनंदनातें. ’ ॥१०॥
धरुनि बहुतशी विनम्र मुद्रा, कुशिकसुतासि महातपःसमुद्रा ।
विनवुनि बहुपुण्यसंघराशी, ऋषिजनवेष्टित आणिजे घराशीं. ॥११॥
अशी दशवदनेभसिंहवाणी परिसुनि, लक्ष्मणवीर बद्धपाणी ।
म्हणुनि, ‘ बहु बरे, ’ सुबुद्धिखाणी, सजनक कौशिकविप्र शीघ्र आणी ॥१२॥
नमन करुनि लक्ष्मण स्वहातें, मृदुचि वदे सुरवंद्यविग्रहातें; ।
‘ सजनक मुनि येतसे पुराला, झडकरि पूजुनि आणिजे घराला. ’ ॥१३॥
करुनि अनुजवाक्य मान्य, राम त्वरित उठे त्रिजगन्मनोभिराम, ।
ऋषिजनयुत जाय त्या समोर प्रमुदितचित्त, जसा घनास मोर. ॥१४॥
नमुनि, करुनि पूजन स्वहातें, हरि मुनिच्या प्रभु तो पथश्रमाला, ।
विनवुनि बहु पुण्यसंग्रहातें, प्रमुदित घेऊनि ये निजाश्रमाला. ॥१५॥
मग कुलगुरुसर्वविद्वसिष्ठप्रभृति महीसुर, कौशिकादि शिष्ट, ।
करुनि सुखि महर्षिसत्तमाप्त, प्रभु करि पुंसवनासि तो समाप्त. ॥१६॥

( अनुष्टुप् )
तदनंतर गंधाढ्य दिव्यकेलीगृहांतरीं ।
कोणा एका दिशीं रात्रौ तोषवूनि मधूत्तरीं, ॥१७॥

( गीतिछंद )
घेऊनि निज अंकावरि जनकसुता गर्भिणी नवी रमणी, ।
तीस पुसे लंकावरकाल, क्षितिपाल, सर्ववीरमणी; ॥१८॥

( पंचचामर )
‘ कृशांगि ! पांडुरानने ! प्रजाफलोद्भवे लते !
त्रपा त्यजूनि सांग, जे मनीं स्पृहा असेल, ते. ।
विदेहराजनंदिनि ! प्रिये ! पवित्रमानसे !
तुला अदेय वस्तु राज्यमंडळांत या नसे. ’ ॥१९॥

( अनुष्टुप् )
म्हणे श्रीरामरमणी, रमणियवपुर्धरा, ।
धराकन्या, जगत्पद्मा, पद्माक्षी, कंबुकंधरा. ॥२०॥

( प्रहर्षिणी )
ऐकावें मुनिवदनोद्गतश्रुतीचें सद्ध्वान श्रमहर सर्वसंसृतीचें; ।
देखाव्या मृगकुलसंकुला, विशाला, विप्रांच्या परम पवित्र पर्णशाला; ॥२१॥
देखाव्या ऋषिवनिता भल्या, कुलीना, निर्लोभा, निजहृदयेशभक्तिलीना, ।
नीवारच्छदफलकंदनीरमूळें सेवूनि, प्रमुदित ज्या समाधिमूळें ॥२२॥
देखावी सुरतटिनी लसत्तरंगा, पापौघश्रमशमनी, शिवांतरंगा, ।
जे वाहे सलिलमिषें सुधाचि सारी, आलोकेंकरुनचि जन्मम्रुत्यु सारी ’ ॥२३॥

( दंडक )
जनकनृवरनंदिनीचा असा ऐकतां दोहद,
करुनि सरस हास्य, तीतें म्हणे शर्मसंदोहद. ।
उदधिउडुपहायनें त्वां जर्‍ही सेविलें दंडक,
तरि हि न तव तृप्ति चित्तीं कशी ? काय हा दंडक ? ॥२४॥

( अनुष्टुप् )
जा सकाळीं वरारोहे ! देखायास्तव पावनें, ।
शांतसत्त्वगणाकीर्णें, गंगातीरतपोवनें. ॥२५॥

( अमृतध्वनि )
ऐसें म्हणोनि रघुवंशावतंस मग सीतेसवें प्रमुदित
केलीगृहीं जडितमंचीं निजे स्वजनरक्षार्थ जो समुदित. ।
निद्रा तदा नयनमार्गेंकरूनचि शरीरांतरीं प्रसरली;
राहोनिया प्रहर दोन स्वयेंचि मग सोडूनि दूर सरली. ॥२६॥

( मालिनी )
मग निशिचर, चार, प्राज्ञ, विश्वासराशी,
नमन करुनि रात्रौ श्रीअयोध्यावरासी ।
म्हणति, ‘ मरणजन्मच्छेदका ! भूसुतापा !
जन सकळहि गातो त्वत्सुकीर्तिप्रतापा. ’ ॥२७॥

( इंद्रवंशा )
पृथक् पृथक् चारजनाननें अशी, लोकश्रुती ऐकुनियां, तदा वशी ।
तयास आज्ञा मग मर्त्यदेव दे; त्यांतील एकासह तो असें वदे; ॥२८॥

( अनुष्टुप् )
‘ माझें, वा मम भार्येचें, बंधुचें, जरि दुष्कृत, ।
जालें असेल तुजला प्रकृतीच्या मुखें श्रुत, ॥२९॥
तरि सत्य वदें, चारा ! कैशी स्थिति असे जनीं; ।
दंडापासुनि भीतीतें कदापि न धरि मनीं. ’ ॥३०॥
ऐसें ऐकोनि, नमुनी, चार तो राघवाप्रति ।
कथिता जाहला ज्यातें, ऐका त्यातेंचि संप्रति. ॥३१॥

( गीतिछंद )
“ काचित् खळरजकाची गृहिणी कलहार्तमानसा होती,
न विचारुनी धवातें, पळोनि गेलो पितृक्षया हो ! ती. ॥३२॥
अनुचित जाणुनि कन्या जामातृगृहासि आणिली तातें, ।
हातीं देतां जाला, त्यातें जोडूनियां स्वहातातें. ॥३३॥
बहुविध सांत्वन केलें, परि तत्क्रोधाग्नि लेश न विजाला, ।
रोषारुणदृक्, दष्टाधर, ऐसें रजक बोलता जाला. ॥३४॥
‘ पुनरपि दशवदनसदनगता घरीं नांदवीतसे रामा, ।
तो काय मी ’ ? म्हणउनी बाहु उभारूनियां वदे, रामा ! ॥३५॥
‘ राजा म्हणउनि सरलें त्यातें, परि मी तसें कदा न करें. ’ ।
आयकिलें इतुकें, हें बोलत होता असें सुहृन्निकरीं. ॥३६॥
स्वर्गंगेच्या सलिलीं आयकिला पाहिला नसे पंक; ।
त्रिजगद्गेयचरित्रा तद्वत् कैंचा तुला असे पंक ? ॥३७॥
सकृदुच्चारणमात्रें तरती दुरितार्णवीं महापापी, ।
निरत शिवहि मग तव गुणसुधेसि जन कोण कीं न बापा ! पी ? ॥३८॥
पितृवचन सत्य केलें, खळ वधिले, त्रिदशविप्र तोषविले, ।
निजगुणमुक्तादामें दिव्यस्त्रीकंबुकंठ भूषविले ॥३९॥
जन दुर्वार तथापि, स्वैर सुधापानमत्त बोलतसे. ।
सकलकलुषतिमिररवे ! प्रामाण्यचि युक्त हेहि बोल तसे. ” ॥४०॥

( अनुष्टुप् )
ऐसें ऐकोनियां, राम चिंतेला मानसीं धरी. ।
लोकापवादवित्रस्त विचारातें मनीं करी. ॥४१॥
‘ जाली वन्हिमुखीं शुद्धि, तथापि जन निंदिती; ।
टाकावी, कीं न टाकावी हे शुद्धचरिता सती ? ॥४२॥

( गीतिछंद )
कैशी हे त्यागावी सद्वृत्ता, साधुसंमता, प्रमदा ? ।
श्रोत्रीयमुखें जैशी त्याच्या स्वाचारपद्धती न कदा. ॥४३॥
त्यागीन अवश्य इला, विप्र जसे कलियुगीं निज श्रुतिला. ’ ।
ऐसें हृदयीं चिंती, वारंवार स्मरोनि साश्रु तिला. ॥४४॥
‘ जलजलसद्रम्यमुखी नवनवनीतांपरीस मृदुला हे, ।
शिव ! शिव ! मजविण भीरु न वनवसतिदुःख भोगणें लाहे ’ ॥४५॥
एवं चिंतव्याकुल दीनास्य न तो वदे, निजे हाले. ।
सेवार्थ भरत, लक्ष्मण, शत्रुघ, तया समीप तों आले ॥४६॥
अतिदीनमानसातें रामातें पाहतांचि, ते सुमती, ।
शत्रुघ्न, भरत, लक्ष्मण परस्पर उपांशु यापरी वदती. ॥४७॥
‘ जाला उशीर, यास्तव आला कीं कोप रामचंद्राला ? ।
दानें द्विजांसि न दिलीं, हें गमलें कीं क्रियावितंद्राला ? ॥४८॥
एवं दुःखाकुल ते, वंदुनि, म्हणती पवित्रवृत्तातें; ।
‘ कां न सुखविशी आम्हां, भृत्यांतें त्वत्पदस्थचित्तातें. ’ ॥४९॥

( आर्या )
ऐसें वदोनि, वंदिति ते सारे रामपादपद्मातें,
भक्तमयूरेश्वरक्रुतिचित्ताच्या केलिसद्मातें. ॥५०॥
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं, ।
हा दुसरा अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं. ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP