मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १२८१ ते १३००

दासोपंताची पदे - पद १२८१ ते १३००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१२८१
नयन वो ! दोन्ही ठेले निदानीं; स्वरूप तें भरलें मनीं. ॥१॥धृ॥
आत्मयां ! तें वो ! पाहीन मीं नयनीं. ॥छ॥
हृदयभुवनीं, स्मरतु आहे मनीं; घेतां सुखकरु श्रवणीं.
श्रीदिगंबर सगुण, चिद्रूप, सुरनर सेवित जनीं. ॥२॥

१२८२
नयन वो ! धालें; स्वरूप देखिलें; मनस गुणी गुंपलें. ॥१॥धृ॥
आजि वो ! माझें आरत संपादलें ! ॥छ॥
हृदय निवालें; दुःख परिहरलें; सुखें गगन कोंदलें !
श्रीदिगंबरु देखिला वो ! सैये ! आतां येणें जाणें कुंठलें ! ॥२॥

१२८३
विपरीत कैसें देखिलें ? वो ! माये ! शरीर जाहालें काये ? ॥१॥धृ॥
मन वो ! माझें परतोनि ठाया न ये ! ॥छ॥
गुणमती खाये; गुणहीन माये; दत्त निजरूप सखिये !
श्रीदिगंबर अगुणगुणान्वित माझां मनीं, मद्गत आहे. ॥२॥

१२८४
भिन्न.
नयन श्रमले माझे वाटुली पाहातां,
न दिसे सोये येतां दूरूनि धांवतां.
प्राणु न राहे. केव्हां पावसी ? बा ! अवधूता ! ॥१॥धृ॥
केधवां येसी ? सद्गुरुराया !
धीरु न धरे भवविजनी ! कां न पवसी ? ॥छ॥
तुजविण येकलें न गमे परदेशीं.
दिगंबरा ! सांग आतां, केधवां पावसी ?
भक्तकरुणानिधी आपणां कां ह्मणविसी ? ॥२॥

१२८५
( चालि भिन्न. )
गुणकृत सकळ ही जन भान, वो ! जैसें आभासे मृगजळ वो ! सैये !
गुणहीन स्वरूप अवधूत नेणोंनि मीं तेथें मनें वेधलियें.
सत्य मानू करणी आनंदलियें.
बाइये ! नेणों, मृगजळ चि मीं जालियें ! अवो सैये ! ॥१॥धृ॥
अवो ! गोरिये ! असतां जवळि, माझी मीं चि दुरावलीयें.
अवो ! गोरिये ! मनस चंचळ स्थिर नव्हे; मीं मज न कळे माये !
कैसें मीं करूं ? निश्चळ करितां नोहे !
कद्रवणा काये पुसों मीं कवणें उपाये ? सैये ! ॥छ॥
परकृत सकळही जनकर्म वो ! जैसें आपणावरि घेणें वो !
गुणकृत सर्व शुभाशुभ तर्‍हीं परि अवो ! तेणें बाधलियें !
आपुलि स्थिति नेणत आनंदलियें ! आत्मयां मि वो !
दिगंबरा भूललियें ! ॥२॥

१२८६
कांबोद.
हृदयपुर वो ! पाटण अवधूतु राजा मीं पाहिन !
आत्मारामु जीवाचें जीवन ! भेटीं मन आपुलें देयीन ! ॥१॥धृ॥
सखिये ! मज न साहे दुसरें ! जाणपण करा वो ! बाहिरे ! ॥छ॥
दृष्टीची करीन सांडणी ! मीपण काढा वो ! येथूंनि !
द्रष्टेपण न साहे साजणी ! दिगंबरीं मिळैन मीळणी ! ॥२॥

१२८७
कोटि जन्म करितां सोसणी नाहीं रूप देखिलें नयनीं !
तें अवधूतु वो ! साजणी ! कैसी करूं ययाची सांडणी ? ॥१॥धृ॥
माझया जीवाचें जीवन; कैसी करूं ययाची जतन ? ॥छ॥
ठेविन बुद्धी ही परुतें मीपण सांडुनी आरुतें,
योगधन माझें हें निरुते; दिगंबर लाधली सुमतें. ॥२॥

१२८८
हृदयीं वो ! आठवे सगुण कृष्णश्याम कमळनयन;
तेथें माझें गुंतलें चेतन; रूप ययाचें मनसमोहन. ॥१॥धृ॥
सखिये ! तें पाहिन नयनीं ! आळंगिन हृदयभुवनीं ! ॥छ॥
घडलें वो ! गुणाचें श्रवण; द्वैतमती जाहालें हरण;
दिगंबरें हरिलें चेतन; परती न धरी वो ! तेथूंन ! ॥२॥

१२८९
शब्दब्रह्म करितां श्रवण न निरसे आपुलें अज्ञान.
तें चि नित्य भजतां साधन वादीं मति होताहे प्रविण. ॥१॥धृ॥
बाइये ! मीं नाइकें श्रवणीं येका गुरुचरनावांचूंनी. ॥छ॥
स्वस्वरूप नेणोनी तें होये बंधाचीं कारणें.
दिगंबरउदयसुदिनें मायामय तमस छेदणें. ॥२॥

१२९०
आइकिलें बोलतां बोलणें; नेणे मन विश्रांती कारणें;
अभिमान हैतक जाणणें, होये अभिमाना चि कारणें. ॥१॥धृ॥
सस्वीये ! अधीं पाहिन आपणा; नाइके मीं परावी कल्पना. ॥छ॥
ग्रंथ बुद्धी पाहातां न कळे; गुरुगम्य पाहाणें वेगळें !
दिगंबर सुदीनें नीवळें; नातरि, डोळस आंधळें ! ॥२॥

१२९१
श्रवण नव्हे या श्रवणें; पाहासी तें पाहाणें पाहाणें;
मना ! मुळीं खुणेचें देखणें चंद्रेवीण न सुधें चांदणें ! ॥१॥धृ॥
सखीये ! मज पाहातां, आपणां आपपर न नुरे कल्पना. ॥छ॥
प्राणसंगु सांडूनि राहाणें अभावली त्रिपुटी पाहाणें.
सांगितलें खुणेचें बोलणें, दिगंबरस्वरूपें असणें. ॥२॥

१२९२
चिंद कांबोद.
येइं रे ! प्राणसखया ! माझी कैसी सांडिली माया ?
न धरीं मीं हें जड शरीर अतिक्षीण तुजवीण आत्मयां !
देवराया ! तुजवीण रे ! आत्मयां ! ॥१॥धृ॥
आतां येथूंनी पाहिन पायां ! स्वभक्तवरदा ! येइं ! येइं !
निवारीं आपदा ! ॥छ॥
कठिण मन न करीं ! देवा ! माझें भयद हरीं !
दिगंबरा ! मीं तुझी वाटुली पाहातिसे ! गीत नेणें मीं दुसरी ! ॥२॥

१२९३
॥ जाति ॥
वरदस्वरूप कइं पाहीन ? वो ! श्रमु तयाप्रति सांगैन ! ॥छ॥

१२९४
॥ मल्हार ॥        ॥ चिंद ॥
श्रीदत्तीं रती जाहाली; गुंतली प्रीति; न रमे वृत्ती परसाधनें. ॥१॥धृ॥
येथुंनी आतां न साहे तेणेंसीं भेदु ! श्रमली बहु गुणसेवनें ! ॥१॥
चांदणें आंगी न साहे चंदन माये ! बाधकें होती गुणगायनें
देॐ तो केव्हां येईल श्रीदिगंबरु ? धरिला संदु बहु या मनें ! ॥२॥

१२९५
॥ जाति ॥
या मनीं विकल वो ! मीं दत्तीं वेचली, वेचली वो !
श्रीदत्तीं वेचली, वेचली वो ! ॥छ॥
न ये न ये वीसरा; न यें न ये वीसरा;
जा ! वो ! आतां साजणी ! भेटि करा ! ॥छ॥
आणिजा दत्तु वेगीं ! जा ! जा ! मीं प्राणु न धरीं ! न धरीं वो ! ॥छ॥
चलाचल दाखवा ! चलाचल दाखवा !
या बो ! सुंदरा ! अवधूता भेटवा ! ॥छ॥

१२९६
संगीत हेजीज तिवडा.
विनटला, येकांगु जाला, देहीं दुजा नव्हे पारिखा.
सदसंतमायामृषारहिताद्वैतात्मैवामृतता पावनु गुणेशु नीयता, ॥१॥
प्रथमु नमिला. ॥१॥धृ॥
गगनु निराकारु ठेला; त्रिगुणमंडळ विसरला;
वीरतीवरी मीरउं न ये नये जाणिवेसी. ॥२॥
प्रथमु नमिला. निशब्दीं भूतगळितु निजगुणी सहितु गुणगणनिधान शोभतु
प्रपंचु कदा नेणतु, दिगंबरपदीं विरमतु प्रथमु नमिला. ॥३॥

१२९७
॥ शंकराभरण ॥
देह सोडि सैये ! प्राणु जळाती
तु जैसा मीनु आदिगुरो ! दत्तात्रेया ! देवा ! येईं गा ! देवा ! ॥१॥
सच्चिदानंदा ! देवा ! येईं ! सच्चिदानंदा ! भवसिंधु कें तरावा ?
दावा वो ! पारु दावा ! वियोगु कैसा साहावा ? काय करूं ? जि देवा ! ॥छ॥
कवनी वो ! सखि ! सैये ! भेटविल दत्तु माये ? देइन प्राणु बाइये !
नये वो ! सखा नये ! दिगंबरा ! देवा ! पावें पावें दीनदयाळा ! ॥२॥

१२९८
नवरोज.
रूपगुणश्रवणें मन पारुषलें; अवधूतीं बाइये ! आसक्त जालें !
देहावरि न रमे; गुणहिन ठेलें; येणें श्रीदत्तें वियोगदुःखें हालें ! ॥१॥धृ॥
मळयानीळु वो अंगीं न साहे ! शीतळ चांदिणें पोळित आहे !
दत्तेवांचूंनी शरीर न धरीं, माये ! ॥छ॥
माझी आस्था कोण जाणयील ? कवण येणेंसीं भेटि करील ?
दुजेपण माजिचें निरसील ? दिगंबरें श्रमासि केलें मूळ. ॥२॥

१२९९
सिद्धपुर पाटण; अवधूतु राजा; जननी जनकु आत्मा माझा.
ब्रह्मदेव जे याची करिती पूजा.
सावळा डोळसू शोभती च्यार्‍ही भुजा ! ॥१॥धृ॥
दैवें ठेंगणें दुरि पडलियें; कर्म कवण अंतरलीयें ?
मायेबापाचें मूख मीं वीसरलियें ! ॥छ॥
भक्तजन सुहृदगण अगणीत, येकठ येकली पडलीयें येथ;
गुप्तपंथु न कळे; भ्रमलें चित्त ! दिगंबरे ! पुरवीं येकुदां मनोगत ! ॥२॥

१३००
बहुतें बाळकें असतां पासीं, जननी कठिण करीं येकासी;
तयाची पाहातां दुर्गति कैसी ? तैसें जाहालें मज. मी नाहीं पासीं ! ॥१॥धृ॥
दत्ते ! माये ! वो ! कां दुरि धेलें ? येकलें नि येकटें म्यां काये केलें ?
भक्तजनसंगतीं असैन खेळें मेळें ! ॥छ॥
जन्मा चि पासुंनि अंतर जालें ! परतोंनि वदन नाहीं दाखवीलें !
गुणगणवैरियां हातीं दिधलें ! दिगंबरे ! हृदय वियोगदुःखें पोळें ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP