मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ११०१ ते ११२०

दासोपंताची पदे - पद ११०१ ते ११२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


११०१
जनीं जन, वन, धन, जाया, भजतां, माया बहु गुण होये.
आयुष्यबळ चळ; निश्चळ करितां वृथा आयासु जाये.
क्षितितळगतजळ वाहे सरिता, धरितां धरिलें न जाये रे !
क्षणक्षणें क्षिण, क्षर, नश्वर, हे शरीर; तंवं न राहे रेया ! ॥१॥धृ॥
सर सर रे अज्ञाना ! धरितासि तो भ्रमु वायां !
देह, गेह सर्व भ्रमाचें; फळ केवळ मृगजळ माया रेया ! ॥छ॥
दिनें दिनें वणवण करिसी काह्या ? वायां धन, धनसोसू.
दीनपण सांडी; दीनदयाकरु ईश्वरु गुरु अविनाशू.
दिगंबरु निजहृदयीं धरिपां ! बापा पूर्णपुरुषु.
बहु विध मृगजळ; पडलासि तमसीं तो गुणदोषु. ॥२॥

११०२
देखावा तरि आत्मां चि; आइकावा तरि तो चि;
केवळ प्रवृत्ति मनाची तेथें चि करावे.
योगसेवया निदध्यासन करावें नित्यात्मचिंतन;
एवं मन, बुद्धि, करणगण तेथें चि अर्पावें.
आत्मइतर सकळ मिथ्या; माया मृगजळ;
स्वप्न पाहोंनि पाल्हाळ वृथा; काज नाहीं. ॥१॥धृ॥
इतुलें चि साधन ज्ञान योगभूमिका पहिली जाण.
गुरु सांगती आलया ! व्यर्थ न करिजे तया;
माप लागलें सेवया ? कां; रे ! भुलतासी ? ॥छ॥
शास्त्रांचें अपारपण; वरि परस्परविरुद्ध लक्षण;
असाध्य साधे; तैं कारण होये दंभासि.
वेदें करूंनि पूर्णता ते तंवं न ये सर्वथा;
आली तरि घेतां अर्थसिद्धांतु न कळे.
येरि काइसी योग्यता वृथा विषयपर. ॥२॥
येक स्वस्वरूप शुद्ध कळे; तैं अपर मिथ्यात्व निवळे;
जें सत्य स्वरूप नियमलें तया भानाचें.
मृगजळाचा डोहीं साच किरण कळे जयीं;
तेथें थाकु तो पाहोंनि कायी काज तेथें ?
गुणभानव्यतिरेकें तत्व भजतो ठाइ कें ?
येथ सहज लटिकें; ऐसें सहज कळे. ॥३॥
किं पृथगसंतांचें भान; तें मात्र जाणावें अधिष्ठान;
जळौघवेग ते किरण मृगजळाचे जेवि.
तेवि नामरूपगुणाभासें आत्मा चि भासतु असे;
ह्मणौनि आत्मज्ञानें सर्व कैसें आत्मत्वें कळे ?
दिगंबराचें होईजे; तरि ऐसें चि जाणिजे.
येरा सहसा नृमजे वर्म येथील काहीं ! ॥४॥
श्रुति :-
आत्मा वा अरे द्रष्टव्यः
आत्मा देखावा, आइकावा, ह्मणौन प्रथमाधिकारियांकारणें प्रवृत्ति
होआवी, ह्मणौनि बोलिला. परि आत्मा दृष्टिगोचरु नव्हे. ॥छ॥

११०३
दृढ घालुंनि आसन, करूंनि मुद्रेचें अवलंबन,
आत्मा देखावा ह्मणौन, योगु करिती.
येकांतें मुद्रा भूचरी, खेचरी, चाचरी, अगोचरी,
येक सहज मुद्रया अंबरी ठेविती लक्ष.
तें पैं अघवें कुमत; नव्हे वेदविहित;
मंदमतीचें निर्मित भ्रांत भजताती. ॥१॥धृ॥
ऐसा कव्हणीं न भजा गुरु; नव्हे तो तत्वविचारू.
कैसा देखणा देखिजे ? डोळां नयनु पाहिजे ?
आत्मा लक्षें साधिजे; ऐसें कैसेनि घडे ? ॥छ॥
येक मानिती मणिमयु; येकां ज्योतिस्वरूप ध्येयु;
येक ह्मणती ज्ञेयु अनारिसा आत्मा.
परमाणूंहूंनि सानेंपणें गगन व्यापिलें असे जेणें;
बुडाला तयामाजि पाहाणें प्रपंचु हा.
ऐसें आपुलालें मतभ्रमें भूललें समस्त;
अनुवदती कुश्चित तयां न कळे काहीं. ॥२॥
बाहुदंडप्रमाणें सहजमुद्रया येका देखणें;
सहजसमाधिअभिमानें बोलती निष्ठा.
लक्षीं लक्षितां पोकळ, तें चि भरींव दिसे केवळ;
नितळ निवळ जळ तैसें कोंदाटे.
तें ही तया चि सारिखें, दृश्य केवळ न चुके;
वेदमतेंसीं पारिखें कवण मिरवी तया ? ॥३॥
येका प्रभा पीतवर्ण, आरक्तादि नाना वर्ण,
मिळित करूंनि नयन भावना करिती.
एवं द्रष्ट्याचें अज्ञान आणि दर्शनसंबंधी ज्ञान,
तें दृश्य आत्मां कैसेंन येइल मानूं ?
दिगंबराचा चरणीं कवणा ऐसियातें मानी;
उपपादिता वचनीं दोषु परमु असे. ॥४॥
श्रुति :-
न संदृशे तिष्ठति रुपमस्य ॥छ॥
आत्मतत्व दृष्टिगोचरु नव्हे. तरी पूर्ववाक्यासि दोषु लागला,
आणि साक्षात्काराची प्रवृत्ति मोडाली. ह्मणौन पूर्ववाक्य -
दोषनिवृत्त्यर्थ आणि साधनप्रवृत्त्यर्थ
मनें आत्मा देखावा, ऐसें वचन बोलतो.

११०४
शब्द बोलती कुशलपणें तो चि योगु ऐसें न ह्मणणें;
ग्रंथ चातुर्य साधणें साधन नव्हे.
हस्तक्रियेची कुशळता न मनावी तैसी चि जाणतां;
तीर्थयात्रा परिभ्रमतां योगु तो नव्हे.
वर्म इंद्रिया वेगळें जेथें शरीरा नाडळे;
अंध करूंनिया डोळे मूळीं राहणें असे. ॥१॥धृ॥
आत्मा मनसें चि देखावा बाह्यव्यापार सांडूंनि अघवा;
येर सकळ करणें वाॐ विण येके तेणें
मनोजयाचीं साधनें योगु न ह्मणावीं. ॥छ॥
प्रत्याहारु तो उपचारु, दमु तो ही परि व्यवहारु.
योगु राखावया स्थीरु उपाय हे.
त्रिबंधु धारणा, ध्यान योगीं व्यवहारुसंपादन,
जें जें कीजे आचरण तें तें बाहेरि सवडे.
हातीं मन चि नलगे, तरी यणें काये योगें ?
मुळ खांडूंनि वावुगें झाड जोपितासि. ॥२॥
दृष्टीचें देखणें गळे, अंतरीं मनाचे निवळे,
तरी चि ते आकळे भूमिका योगाची.
असो ! पां ! शरीर चंचळ व्यापारीं करणगण सकळ,
मन अंतरीं निश्चळ केवळ असतां
योगमतीचें करणें मार्गु जाणती स्याहाणे;
एवं मनाचें देखणें; सर्व कारण येथें. ॥३॥
मनें केला तो त्यागु; अत्यागु तो अत्यागु;
योगु मनें तो चि योगु; अयोगु दुजा.
मनें उजलली ते बुद्धी; मानी मनें ते समाधि;
ऐसें मन तें आधीं हातीं घेइजे.
मनें गुण निरसन; मनें स्वरूपदर्शन;
दिगंबराचें सेवन मनें वांचूंनि नसे. ॥४॥
श्रुति :-
मनसैवानुद्रष्टव्यम् ॥छ॥
साक्षात्कारप्रवृत्तिकारणे मनोनिग्रहार्थ चि आत्मा मने देखावा ह्मणता परि आत्मा मनोगोचरु नव्हे. स्वप्रकाशमयु, अक्षरु. त्यासि कोण्ही पाहाता ना तो कोण्हासि पाहाता, ऐसा अखंडु असे. ॥छ॥

११०५
मन चि जेथें अपवित्र, तेथें काये करी शिखासूत्र ?
वरि वरि केले आचार पावन करिती.
ह्मणौनि सकळ सांडावें; मन चि स्वाधीन करावें;
मग मानसा पावावें योगतया. ऐसें ह्मणौनि राहिले, मनोधर्मीं गुतले,
योगविषयीं आंधळे, तें कां न ह्मणावें ? ॥१॥धृ॥
मनस हें गुणिक, विकारी, अविधामय, चंचळ भारी.
येणें केलें तें सकळ वल्ली वासनेचें फळ.
केवि शेविती कुशळ दुःखमुळ पां ! तें ? ॥छ॥
मनोगोचर जें भान, तें काल्पनीक, स्वप्नासमान;
करी तयाचें निराकरण तरि ते बुद्धि.
मनोरथासवें जातां वरि पडिजे तया अनर्था;
मनोधर्मु तो पाहातां अज्ञान कायी ?
आतां मनाचें करणें योगाप्रति न करणें
कर्मजनितें बंधनें जीवा उपजती. ॥२॥
मनस कार्य आदरी; आदरें तें योगी न करी;
तरी चि पावे थोरी तया ईश्वराराची !
मन चि माया केवळ, मन संसारु, संसारमूळ;
निष्ठाहीन केवळ भलयतें करी !
तया मनातें मारिजे ! योगु तरि चि लाहिजे !
मनें माजलें न माजें भवभय समग्र ! ॥३॥
ऐसें मन मारावें ! हें कर्म मनें चि करावें;
मन चि आपुलें नव्हे तेव्हेळीं कैसे ?
ऐसे निर्द्धारें जाणोनि गुंपते जाले सुजाण;
मग सेउंनि गुरुचरण युक्ति पावले.
आत्मविषयीं अज्ञान जेणें भ्रमित जालें मन;
करूंनि तयाचें स्फेटण योग उमजले. ॥४॥
स्वस्वरूपज्ञाने मन तें चि तें प्रज्ञानघन,
योगनिष्ठे कारण होतें जालें.
जैसा त्रिदोषु उतरे, मग तो नरु यथाचारें
आपुला धर्मी वावरे; ऐसें होये.
मन अविद्या रहित सेव्य ह्मणतां समस्त,
तव न सरे वचन येथ दुर्मतीचें ॥५॥
अविद्येचां निरासीं ठाॐ नाहीं स्वस्फुरणासि;
शुद्धे ब्रह्मीं निराभासीं मनत्व कैंचें ?
एवं अविद्यागुणकार्य, मन सर्वथा हेय;
स्वस्वरूपसन्मय अद्वैत ब्रह्म.
ऐसें मनाचें जाणणें आणि वाचेचें बोलणें;
दिगंबरीं ते न मने स्थिति सहजाची.
श्रुति :---
यतो वाचो निवर्तंते अप्राप्य मनसा सह ॥छ॥
मनावाचेसि अगोचरु अक्षरु आत्मा तो कैसा ?

११०६
नामें, रूपें, गुणकारें, बाह्य दृष्टीचेनि व्यापारें,
देहो चि मीं ऐसें जाणे खरें; तैं तो सूये.
सूर्याचा अस्तमानीं चंद प्रकाशें करूंनि
पाहे आपुला नयनीं मीं देहो ह्मणौनिया.
शशिसूर्य अस्तवती, तैं अनळाची ज्योति;
तिया देहो मी प्रतीति आत्मा आपुली जाणे. ॥१॥धृ॥
ऐसें आपणा आपुलें ज्ञान साक्षात्कारें करूंनि,
जाणु मानी तो जाणता होये अनुभववेत्ता.
येरु अपरु नेणता अनुमानु करी. ॥छ॥
शशिसूर्य अस्तमानीं, पावकु शांतु असतां स्वस्थानीं,
दावी दीसे कासेनि आत्मा प्रकाशे ?
तरि जैसा साक्षात्कारु दृष्टीचा तैसा चि तो वाग्ज्येतीचा;
वचनें चि प्रकाशकु आंगाचा आंगे होये.
साक्षत्काराचें लक्षण स्थूळ शरीरं करूंनि;
ऐसें तयाचें हें चिन्ह परि अन्यथा नोहे. ॥२॥
शशिसूर्याते अस्तमान पावकु गेला मल्हवोन,
वाचेचा ठायीं मौन केवळ असतां.
कवणें प्रकाशें प्रकाशे ? आत्मा दावी आपणां दिसे ?
उपजलें असतां ऐसें कैसा साक्षाकारु ?
तरि बाह्य ये प्रतीती जैसा आत्मा जागृती;
तैसें स्वयं चि स्वज्ज्योती असे प्रतीयमानु. ॥३॥
स्वप्नी, मरणी, सुषुप्ती आत्मा प्रकाशे स्वयंज्योति;
देहापासाव प्राप्ति देहांतरीची.
देहादि करणगण स्वप्रकाशीं चि करीति मग्न;
पुनरपि तें उत्पन्न स्वप्रकाशें चि करी.
मनाबुद्धीचें देखणें सर्वस्व प्रभेचेनि गुणे;
नाहीं लोपती कारणें सत्यान्वयविशेष. ॥४॥
जैसा जागृती देहाकारें निजाकाराचेनि विसरें
आत्मा सत्य शुद्धाकारें होये प्रतीयमानु;
तैसा चि अवस्थात्रयनिरासे, प्रतीयमानु होये स्वप्रकाशें.
तेथें देहादि प्रपंचु नसे; भान चि काहीं.
दिगंबरातें पावला, तो चि जाणे ऐसी कला;
येरीं आत्मा मानिला शास्त्रश्रवणे दूरी. ॥५॥
॥ श्रुति :-
याज्ञवल्क्य. किं ज्योतिरेवायं पुरुष इति ॥छ॥
आत्मज्योति: ॥छ॥
चंद्रज्योतिः ॥छ॥
अग्निर्ज्योतिः ॥छ॥
वाग्ज्योतिः ॥छ॥
आत्मज्योतिः ॥छ॥
कतम आत्मेति योयं विज्ञानमयः पुरुषः ॥छ॥
तें चि शुद्ध ब्रह्म नामरूप गुणाकारत्वें अवघें चि विश्व होये. ॥छ॥

११०७
विविक्तात्मज्ञानवशें आत्मा सहजु ज्ञेयु स्वप्रकाशें,
विण द्वैत स्फुरणरसें स्वानंदमयु.
एवं सच्चिदानंदैकरसु आत्मा तो सहजप्रकाशु,
अनुभवियां युक्तिविशेषु संप्रकटु हा.
तेथें भान निरस्त, जें कीं जालें तद्गत;
स्फुरे तयीं तदन्वित तें ही वेगळें नसे. ॥१॥धृ॥
तरि नाम, रूप आणि कर्म अवघें चि तें परब्रह्म.
मृगजलाचे कल्लोल जेवि किरण सकळ.
तैसें सत्येसीं वेगल मायामय न दिसे. ॥छ॥
सांडूंनि उन्मनी अवस्था ज्ञानमयी प्रकृति आश्रयिता,
ज्ञाता, कर्ता, भोक्ता अवस्थांचा होये.
तैं दृष्टीचेनि आकारें आकार दृश्यत्वें स्फुरे;
द्रष्टा आत्मा चि निराकारें दृश्य सकल.
स्वप्नीं दिसे तो आभासु जैसा दे पुरुषु,
येतां जागृतीप्रति ग्रासु करूंनि ठाये. ॥२॥
स्फुरणांचेनि आकारें आत्मा वक्ता चि आकारें;
मग रूपीं सकलां भरे नामाकृती.
सुवर्णाची टांकसाळ, सुवर्णमय नाणें सकल;
तैसें अनुवदतां केवल ब्रह्म चि नादाकारें.
नामें ह्मणौनि सकलें ब्रह्ममय चि केवलें;
रूपीं जडती, नीवलें अर्थवाद तेणें. ॥३॥
नामें रूप प्रकाशितां श्रवण करी जो श्रोता,
तो ब्रह्म न होतां तेथें न घडे योगु.
ह्मणौनि आत्मा चि श्रवणाकारें नादरूपी अभिन्नु संचरे;
तो नादु चिदंबरें जिरे स्वरूपीं.
ऐसें श्रवणवचन; रूप तेणेंसीं अभिन्न;
परब्रह्म निर्गुण सर्व भासत असे. ॥४॥
ज्ञानाश्रयाचेनि अंगें ज्ञानेंसि ज्ञेय अवघे;
ब्रह्म स्फुरे ज्ञानयोगें; जाणिजे खुण.
कर्म तद्वत सकल कर्ता आत्मा तन्मूल;
तरि जें क्रियेचें पाल्हाळ परब्रह्म तें ही.
ऐसें जाणोंनि राहिजे; ब्रह्म सकल पाहिजे;
देहें देवो चि होइजे योगसाधनवंतीं. ॥५॥
ब्रह्मा आणि तृणस्तंभ ब्रह्म समान स्वयंभ;
देवभक्त लाभअलाभे शिष्यगुरू.
व्यवहारतांहीं व्यवहारीं अभेदु भजिजे ययाचि परी.
भेदु तो वांचूंनि पामरीं नये मानूं.
दिगंबरातें पावले, ते हें जाणोंनि राहिले.
येर भेदें चि नाडले; जनको जाण कित्ती ? ॥६॥
श्रुति :-
त्रयं वा इदं नाम रूपं कर्म ॥छ॥
ब्रह्मैतद्धि सर्वाणि नामानि बिभर्ति ॥छ॥
ब्रह्मैतद्धि सर्वाणि रूपाणि बिभर्ति ॥छ॥
ब्रह्मैतद्धि सर्वाणि कर्माणि बिभर्ति ॥छ॥
सर्वं खल्विदं ब्रह्म
आतां भेदवादी कैसा ? ॥छ॥ :-

११०८
प्रकृतीचेनि वेद्यपणें वेदनाश्रयातें जाणणें,
नुरलेनि जाणतेपणें स्थिती असतां.
पृथग संतगुणभान, तेथें चि जाये समावोन,
जेवि कणिकाभेददर्शन विघरलां घृतीं.
ज्ञानज्ञातृत्वज्ञेय सर्व जालें येकमय
सत्य अवघें सन्मय, ध्येय निवल पद. ॥१॥धृ॥
तेथें त्रिपुटीचे व्यापार परिकुंठित जाले समग्र;
स्वस्वरूपाचें स्फुरण तें ही नुरे संवेदन.
निर्विकल्प निर्गुण तत्व सहज ठेलें. ॥छ॥
तेथ कवणु पाहे आणि कासेन ? आणि पाहिजे ते कें भान ?
दृश्य त्रिपुटीचें निराकरण येकत्वें स्फुरे.
कें घ्राणु ? कैंचा परिमळु ? जाणतां तयाचा केवळु.
गंध त्रिपुटीचा सकळु आभासु लोपला.
स्थूलसूक्ष्मकारण देहत्रयाचें अभान;
धर्मरहित करणगुणगण ठेले. ॥२॥
वाच्य ना वाचक, वचन श्रोतृत्व, शब्द श्रवण,
कवणें कवणाचें ज्ञान कासेन करणें ?
दुजेपण चि सकल जेथें जाहालें निर्मुळ;
निर्व्यापारीं सहज स्थूळ शरीर ठेलें.
जाणपणाची त्रीपुटी तेवि क्रियेची ही नुठी;
चित्त विरालेंसे पोटीं निर्विकल्पे स्थितीचां. ॥३॥
कवणें काये मानावें ? कवणें काये जाणावें ?
कवणें काये ह्मणावें ऐसिया स्वरूपा ?
मन बुद्धि ना अहंकरण; विरोनि गेलें प्रवर्तकपण;
आतां इतुलें हें प्रलपन, हें ही कैंचें ?
सर्व प्रकाश हे जेणें; तैं पैं कासेन जाणणें ?
डोळां डोळे न पाहाणें, ऐसें न घडे जेवी. ॥४॥
जाणितलें तें ज्ञेय चि; तेथें जाणें जाणणें तें चि.
यापरि महिमा ज्ञानाची जाणतां न ये.
ज्ञानाश्रयो तत्वता, तो कासेन जाणावा ज्ञाता ?
एवं सांडूंनि ज्ञानरूपता सहज असणें.
ऐसें अगम्य सद्रूप, चिदानंदस्वरूप,
दिगंबर, निर्विकल्प आपेआप निवळे. ॥५॥
श्रुति :-----
यत्र त्वस्य सर्वमात्मैवाभूत् ॥छ॥
तत्केन कं पश्येत् ॥छ॥
ऐसें निर्विकल्पें आत्मस्थिति सर्व येकाकारत्वें निर्विकल्प असतां पाहाणें,
आइकणें, बोलणें जाणणें हे न घडे चि.
स्थूळत्वें सूक्ष्मत्वें निर्विकल्पस्वरूपत्वें हीं परि पाहाणें आणि जाणणें
घडे चि. आतां तें कैसें पां ?
मना वाचेसि आगोचरु तो आत्मा कैसा ? :----

११०९
जया स्थूळत्व ना सूक्ष्मत्व, र्‍हस्वत्व ना दीर्घत्व,
शून्यत्व ना साभासत्व, वर्णु ना व्यक्ति,
रूप ना जेथ छाया, तमस प्रकाशु ना माया,
व्योमादि भूतपंचका तया नसे स्थान मान.
शुद्ध, असंग, अक्रिय, निरंजनपदज्ञेय.
गुणरहित, अव्यय, सर्व शिवमान. ॥१॥धृ॥
ऐसें अक्षरपद संपूर्ण जे अनुवदत्ती ब्राह्मण;
गुणरहितीं केवळ दृश्य जालें; मृगजळ
नित, विचळ, निर्मळ, शिव, स्थिरावलें. ॥छ॥
निरवैव जैसें गगन, परि तें अशून्य शब्दहीन;
कल्पांतीचें संपूर्ण उदक जैसें.
परि सर्वत्ररसहीन सारद्रादिधर्मविहीन
आंगीं आडलें जीवन नाडुलें तें.
रूपु पाहातां जीवनीं शब्दु उमटे श्रवणी;
येथें तेही गुण गुणी दोन्ही न दीसती. ॥२॥
प्राणधर्मीं सूटलें, देहादि प्रपंचा ना तळे,
करणसंघाता न मिळे आत्मतत्व.
सत्वादिगुणवर्जित, अवस्थाचतुष्ट्याअतीत,
देहचतुष्ट्यविमुक्त, भोक्तें ही नव्हे.
अतद्वादाचें बोलणें, तें हीं राहिलें जाणणें,
जयाचेनि सत्यपणें माया कोठें ही नसे. ॥३॥
अरामपण देहिचें, अभान जेथ ययाचें,
भयाभय रजोवृत्तीचें नाम चि नसे.
जेथ पूर्व नां अपर, बाह्य नां अंतर,
सदोदित निरंतर सर्वत्र जें.
अनुभवीं तें कव्हणा ? सेखीं स्वयें ही आपणा,
होये विषयो तें आना, ऐसें कैसेनि घडे ? ॥४॥
नेति ह्मणों सरलें, दृष्टांत अभावें गेले;
बोलु बोलते हारपले तया चि माजी.
देवभक्तपणें बुझलीं; गुरुशिष्यत्वें हारपलीं;
जीवेश्वरत्वें अभावलीं जेथिचीं तेथें. दिगंबर तें अक्षर, शुद्धतत्व, स्वस्थिर;
आतां जयाहूंनि पर काहीं बोलणें नसे. ॥५॥
श्रुति ॥
एतद्वैतदक्षरं गार्गि ब्राह्मणा अभिवदंति ॥छ॥
अक्षरा आत्मयांतें कोण्ही देखता नादेखणें दृश्य,
तरि हे प्रतीति व्यवहारी कैसी ? ॥छ॥

१११०
माये अविद्ये वेगळें शुद्ध अद्वय ब्रह्म संचलें.
तें न कळे; न चळे; न ढळे स्थितिपासाव.
तें असत चि जैसें तैसें निजमायायोगवशें
द्वैतासारिखें आभासे जालयापरी. तइ इतर होउंनि, पाहे इतरा लागुंनि;
आइके; जाणे; अनुमानि; स्फुरे त्रिपुटीरूपें. ॥१॥धृ॥
ऐसें द्वैताचेनि आभासें स्फुरे ब्रह्म चि प्रकृतिविशेषें.
सेखी अचळ, अमळ, गुण त्रिपुटी वेगळ,
शुद्ध, सहज, सकळ, असे जैसें तैसें. ॥छ॥
अंतःकरण पंचकाकारें ज्ञातें भोक्तें कर्ते स्फुरे;
सात्वीक सर्गु तो अंकुरे ज्ञानशक्तिद्वारा.
चेष्टा, ज्ञान,कर्म, करण, आपण चि होये अर्थसाधन;
राजसाहंकारें क्रियेपासूंन पंचदश तत्वें.
जाला तामसें विषय; द्रव्यशक्ती द्रव्यमय;
कार्य पंचविध ज्ञेय; तें पैं भाग्यस्थानीं. ॥२॥
ऐसें ब्रह्म जगदाकारें स्फुरे गुणाचेनि व्यापारें;
तेथ इतर कार्यें, इतरे कर्ते न निपजे.
गुणव्यतिरेकें पाहतां आणावी न लगे अकर्मता
शुद्धा, सहजा, अद्वैता आत्मयातें.
ऐसा विशुद्धीं व्यवहारु भासे विवर्तु समग्रु.
दिगंबरु निर्विकारु सिद्ध सहज असे. ॥३॥
श्रुति :-----
यत्न हि द्वैतमित्र भवति तदितर इतरं पश्यति ॥छ॥
ऐसें अद्वय अखंड ब्रह्म माया अविद्यागुण.
योगें द्वैतापरि व्यवहारे. तो व्यवहार मायामयत्वें
विवर्तरूप; तो विवर्ताभासु अधिष्ठानीं चि सामावे.
शुद्ध अद्वय उरे, तेव्हेळीं कैसें ?॥छ॥
११११
सर्वं खल्विदं ब्रह्म, एकमेवाद्वितीयं हें वर्म,
जाणतां सर्वत्र सम, परब्रह्म येक.
आत्मैवेदं इत्यादिक, ब्रह्मैवेदं वचन आणिक,
एवं ब्रह्म आत्मां सकळैक मतें वेदाचेनि.
तें चि सद्गुरूवचनें आथी निवळ देखणें;
वरि साधूंचें बोलणें; तें हीं प्रमाण थोरा. ॥१॥धृ॥
ऐसें जाणती ते येक धन्य ब्रह्मवेत्ते सुब्राह्मण !
येर पशू; कीं पामर भेदवादी; गोखर;
तयां न चुके, येरधार पढतमूढा. ॥छ॥
भेद विषयीं संवेदन, येथ काइसें दुर्लभपण ?
श्वाना, गोवळा हीं परिस्फुरण असे भेदाचें.
तें चि सांगे जै सद्गुरु, तैं तो काइसा ईश्वरु ?
मंदमतीचा आचारु जाणावा तो.
हरळ वेचिती गोवळें; तीं काये होतीं मुक्ताफळें ?
धाव घेतली कपाळें; मग न चले काहीं ! ॥२॥
अवलंबूंनि अविद्यागुण, लक्षूंनि मायावी सगुण,
प्रत्यक्षु भेदु मानून प्रमाणें वदती.
स्वप्न स्वप्न दृष्टी जो पाहे, तें त्यातें सत्यचि होये;
भ्रमु न निरसे, तवं काये छेदे भान ?
तेथें अवस्थाजनित ज्ञान जयांचें संमत,
ते बा ! न होती पंडित मुक्त मुमुक्ष कहीं. ॥३॥
देहाद्यवस्था निरासे जो पाहे स्वरूप प्रकाशें;
तयाप्रति हें काइसें कुवाडें मां ?
येर देहेंसीं पाहाती तवं न येते प्रतीती;
मग कुमतें उठती; भेदमती घेतले !
युक्तिवादाचेनि बळें डोळसां ह्मणती आंधळे.
तवं पशू माधवले; होडे मालिवे ढोर ! ॥४॥
माध्यान्हीं दिवसां गर्भांधें केली निशा;
ते अतिकुशलां विदुषां कैसेनि माने ?
प्रथम आपुलें अज्ञान; वरि स्फुरे विपरीत ज्ञान;
तदनुसार श्रवण करूंनि शास्त्रांचें,
ज्ञानमार्गा चूकले; आड पर्वत पडले.
दिगंबरातें पावले, जाले कृतकृत्य ते ! ॥५॥
श्रुति ॥ :-
अथ योsन्यां देवतामुपास्तेsन्योसावन्योहमस्मीति न स वेद यथा पशुरेवं विधं ॥छ॥

१११२
च्यार्‍ही वेद मुखोद्गत; आणि तितुले हीं सार्थ;
येर शास्त्रवाद समस्त करतळामळक.
पुराणकथेचा सागरु, चौदा विद्यांचा सुरतरु.
तया येकू चिं साक्षात्कारु आपला नाथी.
तेणेंकरूंनि सकळ वायां गेलें तें पाल्हाळ;
जन मोहूंनि केवळ असे फळ काहीं ? ॥१॥धृ॥
ऐसें येक अक्षर नेणें; निजस्वरूप अनुभवखुणें.
येर साधन अपार करी बहू संवत्सर
शतकोटि सहस्त्र; तेणें सुटिका नव्हे. ॥छ॥
अश्वमेधादि अपार याग केले समग्र;
क्रियाकुशलत्वाचें भांडार ब्राह्मणु ऐसा.
विहिता कर्माचें अनुष्ठान सिकावें तया येकापासूंन.
आणि दाता तरि मेरु प्रमाण सुवर्ण दे.
तें पैं विहित सकळ दे अंतवंत फळ.
ज्ञानरहीत कुशळ कैंचें प्राणियांसि ?॥२॥
देहें विहित आचारतां उसंतु नाहीं सर्वथा;
जालाही, न मनी चित्तामाझारी श्रमु.
यावरि जें तपस काहीं तें आचरला तितुलें हीं;
आणि पुढें ही गगणा नाहीं आचरणकाळाची.
आत्मज्ञान चि येकलें जया नाहीं प्रकाशलें;
त्याचें सकळ ही केलें भवजनक होये ! ॥३॥
वैष्णवांमाजि अग्रिकु; शैवांमाजि जो स्वयं येकु,
येरां देवांचा उपासकु, ऐसें ही हो.
निरंतर भरितें प्रेमाचें; निरंतर ध्यान सगुणाचें;
जप; अनुष्ठान; कीर्तनाचें नित्य प्रेम.
येके ज्ञाने वांचून नव्हे अविद्याछेदन;
येर वृथा. निरंजन भवहरण नोहे. ॥४॥
शरीर करवतीं दीधलें; शिरस शिवा समर्पिलें.
ऐसें चि सुकृत केलें अनंतकाळ.
सलोकता, समीपता, स्वरूपतां, जालीयां मुक्तीची योग्यता.
हरिहरादिकां आवडता जीवाहूनि हो.
तर्‍ही अंतवंत फळ तो जें पावे, तें सकळ
दिगंबरें हें पाल्हाळ सर्व दूरि केलें. ॥५॥
श्रुति :-
यो वा एतदक्षमविदित्वा गार्गि अस्मिंलोके जुहोति ॥छ॥

१११३
यातीचा होये ब्राह्मणु; परंतु वेदाक्षरविहीनु;
जेणें आजन्म यागयज्ञु देखिलाचि नाहीं.
न ये प्राकृतेवीण वचन; नामें हीं नेणें वैयाकरण;
सांग क्रियेचें आचरण टाकेचि ना.
येक स्वस्वरूप जाणे; येर काहीं चि जो नेणे;
निष्ठा निरंतर मनें तेथें पालटु नाहीं. ॥१॥धृ॥
तो चि ब्राह्मणु ह्मणिजे. वेदवादी तयासि भजिजे.
अभिमानें जे नाडले, ते तंवं प्रत्यक्ष ठकले.
होती दुःखाचे डोहळे तयां कृपणासी ! ॥छ॥
पात्रीं ना संभवे दान; तपसु न करी अनुष्ठान;
कैसें संस्कृत वचन ? तें जाणे चि ना.
विष्णूचा ना शिवाचा उपासकु कव्हणा देवाचा;
इच्छेअधीनु जयाचा विचरे देहो.
पाहातां अंतर निर्मळ; मन स्वरूपीं निश्चळ;
जया अक्षर केवळ ब्रह्म सकळ स्फुरे. ॥२॥
आरुषु दिसे पाहातां; पौराण नेणे कथा;
स्वाभावीकु शब्दु बोलतां पडे विसरु.
कुशळता न वर्त्ते देहीं; सर्वथा तो भलया तैसा ही;
परंतु अक्षर ब्रह्माचा ठायीं निरंतर निष्ठा.
नित्य स्वरूपदर्शन, नित्य स्वरूपीं रमण,
लय विक्षेप दहन जया सर्वदा स्फुरे. ॥३॥
कर्मयोगी, अथवा त्यागी, परि ऐसा अक्षरनिष्ठु जो जगीं,
जनीं असोनि असंगी जना वेगळा.
येणें स्थूळे असतेन, अथवा विलया गेलेन,
जो वर्ते अतिक्रमूंनि यया लोका.
जेथें तेथें तो समानु; स्वर्गीं हीं पूज्यमानु;
ब्रह्मा दुसरा; ब्राह्मणु ऐसा समर्थु होये ! ॥४॥
जया नाहीं अक्षरज्ञान, येर कर्मवतें संपूर्ण,
याग, तपस, विहिताचरण, भजन देवाचें;
तो शरीर सोडूंनि जाये; इंद्रपदा ऐसें हीं लाहे;
तथापि समानता न ये तया समर्थाची !
होये भूपेसीं समानु, ऐसा दरिद्री कवणु ?
एवं कर्मटु कृपणु दीनु तया लक्षिता ! ॥५॥
कर्मिष्ठ जें पद मानी, ते जयाची पाउटणी;
बैसोंनि तये स्थानीं शेविजे जया;
तें तो ब्रह्मिष्ठु चि सहजें ऐसें निर्धारें जाणिजे.
देवांमाजि ही दुजें न ये समानतें.
दिगंबराचा जाहाला. पद तो येसणें पावला.
पाहातां याहुंनि आगळा होये सहजु गुणें. ॥६॥
श्रुति :-
यो वा एतदक्षरमविदित्वा गार्गि विदित्वास्माल्लोकात्प्रौति स कृपणः ॥छ॥
ज्ञानदेव तु कैवल्यम् ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति ॥छ॥

॥ मल्हारु ॥
१११४
विरजु, विज्वरु, निर्विकारु, गगनाहुंनि महाअपारु,
अजु, अव्ययु, थोरु महामायेहुंनि,
नित्यु, अढळु, अचळु, गुणरहितु, केवळु,
आत्मा जाणोनि कुशळु काये करी ज्ञानी ? ॥१॥धृ॥
प्रज्ञान मग पाठीं करी, तो चि ब्राह्मणु ये संसारी;
नेणोंनि अनुभव, जल्पे वाचाळु, न पवे तो तयांची थोरी, रे ! बापा ! ॥छ॥
व्यर्थ श्रमासि कारण होये ह्मणौनि.
दिगंबराचें जाहाले, तेथें निष्ठेते पावले;
येरा अधिक न कळे वाग्विस्तराहूंनि. ॥२॥
विरजः पद आकाशादज आत्मा महाध्रुव;
तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः ।
नानुध्यायाद्बहूञ्शब्दान्वाचो विग्लापनं हि तत्

१११५
सन्मात्र ब्रह्म अव्यय, आत्मस्वरूप शुद्ध ज्ञेय,
तें चि युक्त चिन्मय स्फुरे गुणसाम्ये.
तेथें प्रकटती गुण; मग तयांसीं मीलोन
मनोमय स्फुरे जाण गुणत्रयधर्में ॥१॥धृ॥
देॐ तुज प्रति नाहीं; मूळ विचारूंनि पाहीं !
सत्येंसीं द्वैत मूळीं असाचार स्वस्थिती निश्चळ होइं रे बापा !
सर्वेंद्रियगुणभासु, तूं चि साकार, साभासु,
पुण्यपापा अधिन, वशु, जाहालासी.
यथाचारें भ्रमण जालें तुज चि लागुन;
स्वर्गनरकपतन सत्य परियेसीं. ॥२॥
मग करितां कर्मानुष्ठान, सत्व शुद्धीतें लाहोंन,
गुरुमुखें स्फुरतां ज्ञान स्वरूपाचें,
तेणें अविद्यादहन, गुणा सकळां छेदन,
जालें स्वरूपबोधन; मग भय कैंचें ? ॥३॥
ह्मणौनि सेवावा सद्गुरू चि ब्रह्म जाणावें आत्मा चि
पूर्वपक्षु सहज चि येर बोलणें जालें.
दिगंबरें वांचूंन ऐसी न पविजे खुण !
जेहीं सेविलें सगुणू ते चि धन्य जालें. ॥४॥
स वायामात्मा ब्रह्म ! विज्ञानमयो मनोमय: ॥

१११६
जो आपुला ठायीं सकळ भूतें पाहे सर्वभूतीं आपणातें,
तो न इछी परुते जाणपण कांहीं.
येर पुसिलें पुसती, नित्य नूतन सीकती,
जाणपण मीरविति यये स्थूळ देहीं. ॥१॥धृ॥
बहु जाणे तो नेणता जनु; तत्व जाणूंनि नेणे सज्जनु;
वादु पडला अघवी येथ जिंके, तो हारवी.
खुण जांए अनुभवी; येरां अनुमानु ! ॥छ॥
बट बटायमानें जैसी कीं विणा जिंकिली भेकी
मज पाहातां हे ही तैसी कीं गति जाली ?
दिगंबराचें दर्शन, जया स्वरूपवेदन
तया कुयुक्ती छळण; ऐसी कोण बोली ? ॥२॥
यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ॥
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥छ॥

१११७
जीवन्मुक्ताचें शरीर ब्रह्म चि ऐसें दिसे साकार;
परि पाहातां अंतरज्ञान वेगळें चि.
बाह्य नयनीं साकार दीसे भानगोचर,
नानाविध समग्र, परि अवघें चि. ॥१॥धृ॥
ब्रह्म चिन्मय स्फुरे येणें गुणनामें आकारें;
सर्व असर्व सर्वदा भेदु न गमे सत्पदा;
जनीं विजनत्व सदा मुक्तु स्वरूपें स्मरे. ॥छ॥
कणिकाभेदीं घृत अभिन्न, नानालंकार तें कांचन,
ऐसें मुक्ताचें जाणतेपण संसारीं.
दिगंबरें पूरता जाला स्वरूपजाणता,
तो बा ! नव्हे मागुता जडदेहधारी. ॥२॥

१११८
ब्रह्म सर्वत्र अभिन्न, त्रिविध भेद अतिक्षीण,
ऐसें केवळ नेणोन जो कीं भेदु भावी,
तया न चुके संसारु; कर्मबद्धु तो नरु;
मरे मरोंनि उपजु मरु पुडती सेवी. ॥१॥धृ॥
तेथें जाणपण जाये वायां; गति नाहीं भेदुवादियां.
द्वैतमतीचें देखणें उठी तेणेंसीं जाणणें;
याती सुटलें कवणें गुणें सेविजे तया ? ॥छ॥
मुळीं आपुलें अज्ञान तरि चि बाह्यभेदज्ञान,
तया मानिती सज्जन; ऐसें केवि घडे ?
पशुपामराहीं परि भेदु सहज अंतरीं;
दिगंबरीं हें चि तरि. गुरु कासया पुढें ? ॥२॥
मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति

१११९
आपुला मनीं विचारावें; मानैल तें सुखें करावें;
जें धरितासि तें तुझें नव्हे रे !
अवघें चि सोडूंनि द्यावें. तत्व उरैल सहजस्वभावें रेया ! ॥१॥धृ॥
गुणहीन रे ! गुणहीन रे ! गुणहीन गमितां न य्रे !
जेथिचें तेथें मनें विरोंनि जाईजे.
ध्येय, ध्यान तेथ काये ? रे ! बापा ! ॥छ॥
करितां अनुसंधान विशेषें न ये गगनातें गगनपण जैसें.
तें चि सुटे तैं निर्वाण. व्योम जैसें तैसें.
मन विरउंनि नुरवी सानसें दिगंबरीं समाधान ऐसें रेया !

११२०
जें मीं ह्मणौनि तत्व भजसी, तें तुं सर्वथा न होसी !
आतां सोडीं रे ! ते स्वरूप वासनेसी रे !
न घडे तो यत्नु कां करिसी ?
बळें मिळतासि कां गुणदोषीं ? रेया ! ॥१॥धृ॥
सहज चि रे ! सहज चि रे ! सहज चि स्वरूप आहे !
सहजपण जेथें सहजा मायिक भजतासि कां अनुपायें ? रेया ! ॥छ॥
सैंधव मिळे सागरातें जाणे तया जळधरा;
तैसा जाण तु न धरीं विचारा रे !
सुखस्पंदु नव्हे खरा रे ! जाण सहज चि दिगंबरा रेया ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP