मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १०६१ ते १०८०

दासोपंताची पदे - पद १०६१ ते १०८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१०६१
सासुरवास.
माये खालील लेंकरूं; चित्त कैसें दृढ धरूं ?
मातें सासुरें संसारु भरु वीषयांचा.
कामु वडील सासुरा; अनुज क्रोधु त्या दूसरा;
कृतकर्माचा मातेरा; माये ! वेगु त्यांचा.
कामुकल्पना वीवसी सासू बैसलीं मूळेंसीं;
तृष्णा दुसरी परियेसी; थोरु भेॐ तीचा !
त्याचें विपार संतान, नानावीध गोत्रजन,
मातें केवळ मरण माये ! संगु त्याचा. ॥१॥धृ॥
कैसें कठीण मन ? वो ! मायेचें कैसें कठीण मन ? वो !
कैसें कठीण मन ? गेली मज सांडूंन !
बहु, लागले दीन वो ! ॥छ॥
मायेचें दाहां घरिचें हें अन्न; कैसें रक्षूं येणें प्राण ?
मातें वीषेंसीं समान माने बाइये ! वो !
सेवा करितां ययांची, साहे तूटि शरीराची;
वय गेलें अवघें चि माझें गोरिये ! वो !
जरा पावली लवलाहे; मागें काळु दांत खाये;
धरूं कवणाचे पाये ! सांग, वेसिये वो !
दिगंबरा पां ! जाउंनि कव्हणी, करा ऐसें ज्ञान ::-
मातें दावा पां ! वदन त्याचें सखिये ! वो ! ॥२॥

१०६२
तुझें करितां सेवन, गुणनामसंकीर्तन,
सत्यमहिम्नश्रवण, चित्त पारुषलें.
देह भावनावीकळ; ठेलें वासनेचें बळ;
गुणमतीचें पाल्हाळ; डाल छिन्न जालें.
देहभावना उडाली; भाना ते चि गति जाली;
अहंमति पांगूळली; चित्त न विचळे.
शुद्ध स्वरूप निष्कळ; सहजें नीवळलें मूळ;
व्योम गीळूंनि वीषाळ षाळ कोंदाटलें. ॥१॥धृ॥
तव नामस्मरण तारी रे ! वरदा ! नामस्मरण तारी रे !
नामस्मरण तारी यये भवसागरीं ! दुजें न पवे सरि रे ! ॥छ॥
वरदा करितां मूर्तिध्यान भेदमतीदहन, गुणी गुंपती त्रिगुण गुणगण माझें.
रविचंद्र लोपले; तेजोमय नीवळलें;
रूप नीगमा न कळे सत्य, सत्य, तूझें !
येर साधनें अचाड; योग न लगती गोड;
जाणपणाचें प्रचंड काये करूं वोझें ?
दिगंबरा ! तूझी आण, ऐसें सुफळ भजन.
आतां यावरि दर्शनफळ कोण बूझें ? ॥२॥

१०६३
वैराग्य वाचूंनि देवा ! नावडे संन्यासु जीवा.
जनु वायां विण मवा आसक्तु किजे.
पदार्थपूर्वक ज्ञान, महावाक्य श्रवण,
तैसें तें मीं प्रलपन केवि पां ! मानूं ? ॥१॥धृ॥
ज्ञानहीन कैसा गुरु मानुं ये तो इश्वरु ?
तेणें कैसा संसारु तरीजे ? देवा ! ॥छ॥
येक मनस चंचळ; वरि समस्त योगबळ;
तितुलें तें निर्फळ कैसें न ह्मणों ?
रंगेविण जैसें कांहीं माणिका मोल चि नाहीं;
दिगंबरेंविण देहीं तेवि साघम. ॥२॥

१०६४
कुशळत्व बहू, देहीं प्रेम विश्वासु नाहीं;
तो भक्त सदेही केवि मानिजे ?
अनुभवहीन वरी शास्त्रें पढला च्यार्‍हीं;
तयाचे देखोंनि थोर केवि मीं भजों ? ॥१॥धृ॥
घ्राणेंविण मुक्ताफळ घातलें ही सूढाळ;
काये तें मुखकमल घातलें ही सूढाळ;
यातिसी ठाॐ चि नाहीं; कर्म आचरे देही;
तयाचा आचारु कांहीं काहीं मानीजे जगीं ?
दिगंबरें येकें विण अपार अवळंबन
तें व्यर्थ, ह्मणौन सहज कळे. ॥२॥

१०६५
सकळकरणसंगु येणेंसीं काइसा योगु ?
शरीरें गगनमार्गु चालतां न ये.
अवस्थांचें स्फुरे भान तवं कैचें ब्रह्मज्ञान ?
निर्विकल्प समाधान बोलतां न ये. ॥१॥धृ॥
जाणणें, ना नेणणें, विसरु ना स्फुरणें,
सहजीं सहजपणें समाधि असे. ॥छ॥
देहसंगु न सूटे, भान जवं न तुटे; तव तें कैसेनि भेटे निजात्मपद ?
अभावाचें देखणें तें ही लक्ष सोडणें;
दिगंबरीं पावणें तें ऐसें जाणिजे. ॥२॥

१०६६
कासया सेविसी वन ? लाविसी कां लोचन ?
तुझे तुतें जव ज्ञान प्रकटनाहीं ? कासया आसन, ध्यान, एकांतसेवन ?
जरि मीं तें कवण ? न कळे ऐसें ! ॥१॥धृ॥
कासया सेविसी गुरु ? वाहसी पुस्तकभारु ?
तुझा असाक्षात्कारु तूज जैं असे. ॥छ॥
कासया बोलसी खूणा ? कासया धरिसी मौना ?
कासया करिसी नाना विकार देहीं ?
कासया दंडिसी काया ? न तुटे संसारू माया.
दिगंबरा येका तया शरण जाईं. ॥२॥

१०६७
कमळनयन गुणीं भरलीं कमलें दोन्हीं.
कमळें कमळें कमळीं धरूंनि देईन येक.
कमळीं कमळा थारा. अरे ! अरे ! दीनकरा !
स्थीरु राही. सोइरा पाहाणें असे. ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सखये ! हें कमळ स्पंदत आहे !
कमळनयनु नये ! काये मीं करूं ? ॥छ॥
सरोजें सरोवरें जालीं; सरोजीं जळचरें मीळी;
सरोजां गती कुंठली; न चले काहीं !
सरोजीं लागती बाण; सरोजीं गुंतलें मन; सरोज मीं देइंन. भेटी करा ! ॥२॥
कमळनयनें वीण कमळजा, जन, वन, कमळनीप्रति मरण पावतें जालें !
कमळकोशु वो ! धाला ! कमळीं वर्षावो केला !
कमळीं प्रकटु जाला ! दिगंबरू ! ॥३॥

१०६८
दाहामाजी उठी, बैसे, तया कां लागलें पीसें ?
वार याचें माये ! कैसें खेळतें आंग ?
‘ झाड तरी तें बरें, ’ ऐसें बोलती चतुरें;
पायां पडाती पामरें आसनावरी. ॥१॥धृ॥
आठामाजी अतिग्रहो नामें मंडळीं राहो;
अष्टांगें कासया देहो विकळु किजे ? ॥छ॥
चंद्राचि घेउनि कळा उजळिजे सुनीळा; इंद्रें इंद्रु कां धेला वामनु सये ?
दिगंबर गुणा गुणी प्रकटला रजनी,
दिगंबरु नीजध्यानी प्रकटु होये. ॥२॥

१०६९
काळातें नाकळे काष्ठ सळे जेणे करितां;
हरि हर ते ही परिशंकले पाहातां. ॥१॥धृ॥
येउंनि नयनीं बैसलें; मनस हिरोनि नेलें बाईये ! वो ! ॥छ॥
जित चि जीवासि जेणें होये सिद्ध मरण.
दिगंबरअवशतें भवमतिहरण. ॥२॥

१०७०
जीवाचें मरण होतें आइकलें श्रवणी.
अजितें नयन गुणी देखिलें गे ! माये ! ॥१॥धृ॥
चित्त दुचित पडलें वो! सखिये !
करणधर्म सोये अंतरलीं माझे ! ॥छ॥२॥
सकळ विषयसुख आतां कैंचें पुडती ?
दिगंबर मजप्रति प्रकट जालें !

१०७१
सकळ विषय सुखकर मतिहरणा !
भवसंजीवनगुणगहन निर्दळना ! ॥१॥धृ॥
तुज भीण दत्ता ! केउतें बाळपणें ?
तुझेनि पूर्णपणें नुरिजे रेया ! ॥छ॥
सुखद स्वजन, जन, धन मतिदहना !
दिगंबरा ! तुझें आतां सांगिजे हें कवणा ? ॥२॥

१०७२
श्रवणीं पडलें पुरे; मन आंगीं झगटे;
प्रकट चि नेटे पाटे मनस हरी. ॥१॥धृ॥
तेणेंसीं संग पडला गे ! बाइये ! गेलयां परति नोहे पुडती मज. ॥छ॥
नयनीं पडे तै त्रिपुटीसि विलयो. दिगंबरें विसरली अवघाचि विषयो. ॥२॥

१०७३
योगिया लाविलें वेड गुणमतिहरणें !
सदनें सांडूंनि वनें भ्रमती कैसे ? ॥१॥धृ॥
तेणेंसी मज येकातुं घडला. प्रयत्नु न चले; केला; कुंठलियें. ॥छ॥
देव देवपण भीति; न करिती स्मरण;
दिगंबरें धरिली; जीवासि आलें मरण. ॥२॥

१०७४
गुणाचा नव्हे मी; यासिं कैसि करूं ? साजणें !
दिधलें न पुरे; उठी जीवाचेनि मरणें. ॥१॥धृ॥
दत्ता ! क्षण येकु जाइं रे ! परुता.
परावी नेणसी वेथा अपरवशा ! ॥छ॥
जीवें चि नूरिजे. मग काये करू ? साजणे !
दिगंबरें जन ऐसें ठकियेलें अगुणें ! ॥२॥

१०७५
कमळनयनरूप देखिलें वो ! नयनीं;
मनस गुंतलें गुणीं; उपडे चि ना. ॥१॥धृ॥
भेटि जाली. मीं तृप्ति न लाहें ! पुडतोपुडती सुख ऐसें चि पाहें ! ॥छ॥
शुद्ध. श्यामळ परब्रह्म; वो ! गोरिये !
दिगंबरु अनुपम्य अवधुतु बाइये ! ॥२॥

१०७६
करितां श्रवण मन चि गुंतलें चरणी;
स्मरणें तन्मय भाव; अवधूत वदनी. ॥१॥धृ॥
नावडे मज तेणें वीण दूसरें.
मनस गुंतलें भरें; परति ने घे. ॥छ॥
श्रवणाचें सुख मज नयनीं सांपडलें.
दिगंबर येणें पंथें विचरतां देखिलें. ॥२॥

१०७७
चरणकमळरसरत मधुकर ते
भ्रमति सज्जन जन मना बुद्धी परुते. ॥१॥धृ॥
तें पादांबुज धरीन मीं हृदयीं; आणीक न मगें काहीं दत्तात्रया ! ॥छ॥
श्रीमुखकमळ तुझें अनुपम्य जगती !
दिगंबरा ! मन माझें करूं तेथ वसती. ॥२॥

१०७८
वाटु पाहातां वेळु जाहाला, वो ! बाइये !
श्रीदत्तु गुंतला कोठें ? अझुणी कां न ये ? ॥१॥धृ॥
तो माझा प्राणु ! आत्मा ! सखिये !
मन हें न धरे. माये ! काये करू ? ॥छ॥
उपाये करितां, सर्व विपरीत जाहालें !
दिगंबरें अवृत्तीं अंतर भरलें. ॥२॥

१०७९
अरे ! मुनिजनप्रिया ! पंकजनयना !
श्रीदत्ता ! सद्गुरू ! भवभयकरमथना ! ॥१॥धृ॥
आत्मा तुं, जीवीं जिवलगु सोयेरा.
न भजें तुजवीण परा, दीनपति ! ॥छ॥
कालाग्निशमनरूपा ! निजगणवरदा !
दिगंबरा ! परब्रह्म तूं गुणविषदा ! ॥२॥

१०८०
आपुला होउंनि मज दुरि कां बा ! धरिसी ?
तुजसीं अंतरें होतां पडयीन तमसी. ॥१॥धृ॥
पुडती संदेहो; कवणासि पाहे पां ?
आत्मया ! मायेबापा ! दत्तात्रेया ! ॥छ॥
द्रष्टा तुं ह्मणउंनि प्रतीति जाहाली.
दिगंबरा ! अतःपर कर्मज न घली. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP