मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ७८१ ते ८००

दासोपंताची पदे - पद ७८१ ते ८००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


७८१
हा वो ! गुणांचें भाजन माये ! योगियांचें धन;
दोषांचें दहन हा योगिराज. ॥१॥धृ॥
माये ! धरीन वो ! अंतरीं; न विसंबे क्षणुभरी;
हृदया सेजारी करीन सेज. ॥छ॥
हा देवांचा ही देॐ; निजमायेचा अभाॐ;
आनंदाचा ठाॐ श्रीदिगंबरु. ॥२॥

७८२
लीलाविश्वंभरा ! अरे ! विज्ञानसागरा !
सद्गुरो ! दातारा ! करुणामूर्ति ! ॥१॥धृ॥
येइं येइं रे ! झडकरूनी; तुझा विषयो माझा मनीं;
प्रीति अंतःकरणीं ते मावे ना. ॥छ॥
स्वमायया गुणगुप्ता ! अरे ! मायाविवर्जिता !
परमानंदभरिता ! श्रीदिगंबरा ! ॥२॥

७८३
हा वो ! सावळा, सुंदरू, स्वभक्तकल्पतरू,
योगियातें गुरू, माये ! देवदेॐ. ॥१॥धृ॥
म्यां देखिला वो ! नयनीं; माये ! भरला अंतःकरणीं;
गुणगण याचा गुणीं तल्लीन जाले. ॥छ॥
मन नेणें; परती गुंतलें आसक्ती; भेदाची अस्फूर्ति ते दिगंबरीं. ॥२॥

७८४
सुरतरुचिंतामणी जरि वरि पडती येउनी;
तर्‍हीं परि मीं त्याहुंनीं न धरीं माये ! ॥१॥धृ॥
मज न करावें सिकवण; माझें वेधलें हें मन;
संगें मीं जायीन तया चि मागे. ॥छ॥
मोक्षाचें मज नाहीं; गुणकृत येर तें काई ?
दिगंबराचा पाई मज भेटि करा. ॥२॥

७८५
न साहे गुणतर्कु; म्यां सांडिला विवेकु;
काइसा हा लौकिकु ? तो दूरि करा. ॥१॥धृ॥
काये कैं कैं वो ! कैं डोळां मीं पाहीन ? श्यामळा !
सुरनरगणपाळा ! श्रीअवधूता ! ॥छ॥
निर्गूण वो ! गुणवंत माये ! ब्रह्म सदोदीत,
दिगंबर अव्यक्त व्यक्तीसि आलें. ॥२॥

७८५ अ
प्राणाचा वो प्राणु माये ! पंकजलोचनू;
कैं माये सगूणूं मीं देखयीन ? ॥१॥धृ॥
मज भरला वो ! अंतरीं माये ! जीवाचा जिव्हारीं.
तैसा कैं बाहेरी पाहिन माये ! ॥छ॥
जनधनयौवनकाया मीं नाश्रयीं हे माया.
दिगंबरेंविण वायां सर्व ही माये ! ॥२॥

७८६
बहु दिन जाले भेटी; भेटि न दिसे वो ! लल्लाटीं;
वियोगदुःख पोटीं भरितें आलें. ॥१॥धृ॥
माये ! जळधरू वो ! नयनी;
बहु द्रवताति जीवन; शोके आक्रंदन गर्जन तेथें. ॥छ॥
आजि दर्शनाचा भासू; तो विजूंचा प्रकाशू;
सुखाचा विनाशू प्रळयो माये ! ॥२॥
वोसरु वोसरला; माये ! न दिसे जीवनकला;
दिगंबरेंवीण जाला दुःखासि योगु. ॥३॥

७८७
चरतर चंचल मन माये ! नाश्रयी कारणा;
परमार्थ हीन प्रलाप करी. ॥१॥धृ॥
येणें नाशिलें श्रमहरण गुण रहीत योगधन;
वनजनसदनधन धरूनि ठेलें. ॥छ॥
गुणकरणें चळबळिती; तेणें तगबग होत आथी;
दिगंबरेवीण स्थिति मी केवि पावे ? ॥२॥

७८७ अ
येणें जाणें मज नाहीं गे ! मन कुंठलें परति नाहीं;
या जीवासि परx नाहीं. ॥छ॥
पुडती भेटणें केउतें ? कवळिन दोहीं बाहीं;
रूप आळंगीन दोहीं बाहीं. ॥१॥धृ॥
केव्हां देखइन ? माये ! वो ! धरीन मीं दोन्हीं पायें ?
कवळीन दोन्हीं पायें ? ॥छ॥
कमळनयनु भेटवा. वियोगु मनीं न साहे.
हृदयीं भेदु न साहे. ॥छ॥
येणें जीवें काज नाहीं वो ! हितें विहितें ही चाडु नाहीं.
साधनयोगें चाड नाहीं. दिगंबरें वीण सखिये !
मीं नेणें परमार्थ देहीं. पुरुषार्थु न मनी काहीं. ॥३॥

७८८
विण जळें तळमळी वो ! मीनु पडला महिमंडळीं.
हा मत्स्य ये भूमंडळीं. तैसी गति मज सखिये !
मीं वियोगें व्याकुळ जाली. अवधूतेविण वायां गेली. ॥१॥धृ॥
केधवां जायीन तेथें वो ! माझी माये अवधूतु जेथं;
सखा श्रीदत्तु जेथें; आळंगीन निजहृदयीं.
सुख होईल तेणें मनातें. विश्रांति लाहीन चित्ते.
पाडस चूकलें वनीं वो ! कोठें गेली कुरंगिणी ?
तें कें गेली हरीणी ? दिगंबरें मज तद्वत
सांडिलें भवनिर्वाणीं. प्राणासि होतसे हानी. ॥२॥

७८९
भवनदी बुडताहें वो ! गति पांगुळली येथ माये !
बहु भागलीयें. करूं काये ? अवधूता ! कयी पावसी ?
आणिकाचा हातु न साहे. मज पराची कास न साहे. ॥१॥धृ॥
आतां दृढ करूं काये वो ! माझें हृदय दुभागताहें.
अंतरभू फूटताहे. श्रीदत्तु नयनीं न दिसे.
आश करूनि वाटुली पाहे; नयनीं वाटुली पाहे. ॥छ॥
दीर्घस्वरें आळवीन वो ! श्रीदत्ता ! ये ह्मणउंन;
अवधूता ये ह्मणउंन. दिगंबरा तुजवांचूनी येथ
सोडवी न कवण; वरि पडतां हे निर्वाण. ॥२॥

७९०
॥ चाली भिन्न. ॥ चंद्रावळीची ॥
कृष्ण ! श्यामा ! कमळनयना ! निर्गूणगुणा ! योगयुक्तचित्तभूषणा !
परब्रह्म ! आनंदघना ! पूर्णवेदना ! तुझा नित्य विषयो मना. ॥१॥धृ॥
येइं, येइं, येईं स्वस्थाना, हृदयस्थाना, योगिराया ! तमोहरणा ॥छ॥
कार्त्तवीर्य ! वरदमूर्ती ! कमलापती ! गुणत्रयगळीतमती !
दिगंबरा ! स्वरूपज्योती ! अगम्यगती ! तुझा ठायीं विरामो वृत्ती. ॥२॥

७९१
भवभ्रमश्रमदहना ! प्रवृत्तिक्षीणा ! अनंतगुणभाजना !
सुवर्णावर्णा ! देखयीन कयीं सगुणा ? ॥१॥धृ॥
येइं, येइं, अब्जलोचना. पासूनि चरणा भीन न करी स्वजना. ॥छ॥
योगिराया ! अत्रिवरदा ! संपूर्णपदा ! गुरो ! नीरसीं प्रमादा.
दिगंबरा ! सहजसिद्धा ! चित्सुखप्रदा ! दूरि करीं भेदा त्रिविधा. ॥२॥

७९२
आंगीं चंदन चर्चिलें; शोभीत जालें.
भाळीं सुरंग पीवळें; वस्त्र सुवर्णा आगळें;
प्रावरण केलें. धूपें शरीर धूपिलें. ॥१॥धृ॥
ऐसा कैं मी देखैन ? निवैल मन. कुंडलीं शोभती श्रवण. ॥छ॥
किरीटु अतिशये शोभला सूमनमाळा.
दत्तु डोळसु सावळा सुभक्तसंगें मीरवला.
आनंदु केला. दिगंबरें स्वजनु तारियेला. ॥२॥

७९३
चरणकमळजळमळमोचन ! प्रवृत्ति हरण !
घेइंन प्रेमवर्धन. सकळनिश्चलशिळकरण गण
ऐसी होइंन. करीन मीं हृदयीं ध्यान. ॥१॥धृ॥
दत्ताचें मुख आठविन. वेधलें मन.
तेणेंवीण न स्मरे आन. ॥छ॥
सदन, स्वजन, धन, धनद, माये !
करूं मीं काये ? मायामय स्थीर न राहे.
हातूंनि सूटला सैये ! मग मागुता नये.
परमोपायें दीगंबरु आजि प्रतिभासला आहे. ॥२॥

७९४
सद्गुरूचा संगु दैवे जोडला, वो ! दैवें जोडला
बहुतां जन्माची हे भेटि वो !
येथें अंतर पडतां पडैन कवणें कपाटीं ? वो !
सहसा ठायासि न ये. मग मीं कें पाहों या दृष्टी ? वो !
मन चंचळ भारी; करिताहे परम कष्टी वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे वो ! अवो ! सुंदरे ! वो !
उपदेशु करि कां काहीं वो ! चित्त दुश्चित माझें
उमजा प्रति न ये काहीं वो ! ॥छ॥
काम क्रोध वैरी वैर साधिती, वो ! वैर साधिती वो !
आशा, ममता, तृष्णा भारी वो ! यांचे आघात मोठे.
कैसे पाहों कवणे परी वो ! हीता विसंच पडतां
न दिसे निमिष ही भरी वो ! झणें अंतर माये ! पडैल ये दिगंबरीं वो ! ॥२॥

७९५
मायेबापु माझें कूळ समर्थ, वो ! कूळ समर्थ वो !
दीधली यें दूर देशीं वो ! पडती परती नाहीं.
कठिणता ऐसी कैसी वो ! दुःखें हृदय फूटे !
सांगों मीं कवणापासी वो ? पंथु पाहात ठेली.
त्याची खंति वाटे जीवासी वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे ! वो !
अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो ! जाणवी माये ! ते मातु वो !
प्राण जातील वायां ! करीन मीं आत्मघातु वो ! ॥छ॥
कामक्रोध मातें मुळीं बैसले वो !
मुळीं बैसले वो ! दंभ दर्प वैर करिती वो !
मदमत्सर दूजें पडला जीउ अतिभ्रांती वो !
यत्नु न चले चि कांहीं योगातें लाविली ख्याती वो !
वेगी झडकरि जायीं. जाणवी दिगंबराप्रति वो ! ॥२॥

७९६
दत्ते धेनूचें मीं वत्स धाकुलें वो ! वत्स धाकुलें वो !
मागुताहें येकु पान्हा वो ! कैसी देउं निघाली ?
लागो नेदी मज थाना वो ! कैसें लल्लाट माझें !
बोलु मी ठेउ कवणा ? वो ! मीं पोटिचें बाळ.
आहे नाहीं कळेना वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरे ! अवो ! सुंदरे ! वो !
अवो ! सुंदरे ! वो ! अवो ! सुंदरे ! वो ! हृदय उल्लताहे माझें वो !
दुःख कवणासि सांगों ? आहारु दूजा नेणिजे वो ! ॥छ॥
नव मास पोटी होतियें कैसी वो ! होतियें कैसी वो !
तुझेनि स्वरसें धाली वो ! जन्मु कां मज दिधला ?
उपेक्षा कासया कैली ? वो ! आतां येथूंनि तर्‍हीं जेथिची तेथें मज घाली वो !
दिगंबरे ! माये ! भारी होती आश केली वो !

७९७
दिगंबराचें मीं बाळ धाकुलें वो ! बाळ धाकुलें वो.
मांडियेवरि ठावो मागें वो ! मातें लोटूनि घाली; कवणा पाहो पुढें मागें वो !
नयनीं आंसुवें गळती. तूटि पडली कवणें अंगें ? वो !
दूजा ठाॐ चि नाहीं. लागो मी कवणा मागें वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरें ! अवो ! सुंदरें ! वो ! अवो ! सुंदरें ! वो ! अवो ! सुंदरें ! वो !
ऐसें जीणें काये करूं ? वो ! आतां मरण चि भलें !
मोडला माझा आधारु वो ! ॥छ॥
हडतिया दृष्टी पाये पाहीन वो ! पाये पाहीन वो !
कैसी पाहों याचें वदन वो ! येणें नीरास केली.
आतां मग जाती प्राण वो ! देवें जाणोंनि ऐसें
दिधलें मज आलिंगन वो ! तेणें सर्वांग धालें दिगंबरें अमृतपान वो ! ॥२॥

७९८
शुद्ध श्याम रूप देखिलें शिवणा वो ! देखिलें देखिला शिवणा वो !
तो चि वेधु धरिला मनें वो !
कैस्या आठवती भूजा कटकांगद भूषणें वो !
वस्त्रें सुवर्णवर्णें; सूटलीं तीं उपमानें वो ! पीत चंदन भाळीं.
उटितें श्वेत चंदनें वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरे ! अवो सुंदरे वो ! अवो सुंदरे वो ! अवो सुंदरे वो !
उसंतु न दिसे मना वो ! चित्त आसक्त जालें.
पाहीन कमळनयना वो ! ॥छ॥
किरटिकुडलांचें तेज फांकलें वो ! तेज फांकलें वो !
तें जीणें चंद्रसूर्यासी वो ! मुखीं तांबोळु बरवे;
दृष्टांतु न दिसे तयासी वो !
चरणीं विश्वासिगति; धन्य अनुसूयेची कूंसि वो !
दिगंबरु परब्रह्म होतें तीचा गर्भवासीं वो ! ॥२॥

७९९
दृष्टादृष्ट दृष्टी पुष्टि न मनीं वो ! पुष्टि न मनीं वो !
कष्टी मीं जालीयें भारी वो ! येणें संसारपंथें
स्वहीत तें पडलें दूरी वो ! बोलु कवणासि ठेउं ?
मनस हें मज माझें वैरी वो ! जालें भ्रमीत गुणी.
स्थिर नव्हे कव्हणियें परी वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरे ! भूलली मी अविचारीं वो !
भेटी श्रीदत्तु आणी; निवारील माझें भुररें वो ! ॥छ॥
देह गेह स्नेह हेय सकळ वो ! हे हेय सकळ वो !
दुःख जनक हें भान वो ! याची प्रतीति नलगे.
समाधी पडैल सिरिं वो !
हींत नाशैल माये ! अनुबंधा लाहेल मन वो !
मातें काहीं चि नलगे दिगंबरें येकें वीण वो ! ॥२॥

८००
नित्यानित्यवस्तुसिद्धवेदन वो ! सिद्धा वेदन वो ! सद्गुरूवांचूनि नाहीं वो !
ग्रंथ बहुसाल वायां पाहोंनियां काज कायी वो !
तेणें श्रमू चि वाढे; अहंकारु उपजे देहीं वो !
तरि तें पाल्हाळ सर्व संडावें अक्षुब्धें डोहीं वो ! ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! सुंदरे ! गुरुचरणीं हें मन भरे वो !
मज ऐसें चि करि कां ? नावडे जीवा दुसरें वो ! ॥छ॥
यज्ञदानपव्रत वैदीक वो ! व्रत वैदीक वो ! मोक्षासि नव्हे कारण वो !
फलें आपुलेनि फळे तें चि तें कर्मबंधन वो !
संत जाणती; साधू सेवीती श्रीगुरुचरण वो !
तरि मी सांडूंनि सर्व दिगंबरातें पाहीन वो ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP