मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ६६१ ते ६८०

दासोपंताची पदे - पद ६६१ ते ६८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


६६१
स्वयं पाकें पचिलें अन्न. भाणा बैसलें तेथें श्वान रे !
अन्नाचें पवित्रपण तें चि पळालें तेथून. ॥१॥धृ॥
तैसें मन हें दुराचारी. स्वयंपाकु तो वरि वरी. ॥छ॥
यातीपासूंनि अंतरला; तो अन्नें कैसा सोवीळा ?
दिगंबराचें चूकला; शुद्धि नाहीं त्या चांडाळा. ॥२॥

६६२
ब्रह्म - इत्यादि दारूणें सजीली पापें जेणें;
कांटाळा ऐसा नेणें; तो क्रोधु धरिला मनें. ॥१॥धृ॥
आतां वरि वरि पवित्रपण. बुडालें तीर्थीं श्वान. ॥छ॥
मन भ्रमे कुश्चिळ ठाये. वासना तेथें जाये.
दिगंबरीं विरति न धाये. त्याचें पवित्रपण तें काये ? ॥२॥

६६३
देह सर्वथा अपवित्र; कर्मयोगें जालें पवित्र रे !
देही कर्मगुणव्यापार जीउ कर्त्ता नीरंतर. ॥१॥धृ॥
आतां तयाची निर्मळता कर्मातें पवित्रता. ॥छ॥
कामक्रोधाचें वीटाळ जीवे धरिले असतां मळ;
कर्म निपजे अनिर्मळ दिगंबरातें सकळ. ॥२॥

६६४
केलें शूद्रें वेदाध्ययन; चांडाळें देवार्चन;
रजस्विला पाची अन्न; तें केवि होये पावन ? ॥१॥धृ॥
तैसें, जाणा रे ! प्रसिद्ध ::- स्वशुद्धी सकळ शुद्ध. ॥छ॥
आत्मशुद्धीचें सोवीळें. न विटाले; गुण विटाळें.
दिगंबरेसीं येकत्व जालें. विश्वाचें दुरित पळालें. ॥२॥

६६५
पाषाणु उदकीं बुडाला. त्याचा भीतरु नव्हेचि वोला.
उपदेशु वायां गेला. खळु न वळे, न वळे, काहीं केला ! ॥१॥धृ॥
आतां बोधोनि काज कायी ? गुणबद्धासि वितरागु नाहीं. ॥छ॥
बोलिलें चि कित्ती बोलावें मुंडले ते कित्ती मुंडावें ?
दिगंबरातें असो अघवें. पुढें विषयिका न दिसे बरवें. ॥२॥

शब्दें जेणें पर्वत द्रवती; शशिसूर्य गति विसरती रे !
ते बा ! न चलती मूर्खांप्रति ! तया वैराग्य नुपजे चित्तीं. ॥१॥धृ॥
आतां हारवि रें ! सुजाणा ! कां श्रमविसी या अंतःकरणा ? ॥छ॥
शब्दें थरथरिली मेदिनी. जाले तन्मय लोक तीन्ही.
तो न धरे चि मूर्खां मनीं. दिगंबरा ! येथ न चले करणी. ॥२॥

६६७
शब्दें पावकु तो ही निवाला; अकाळीं घनु वर्षला;
साधु जनासि आनंदु जाला; तो मूर्खा न कळे; काहीं केला ! ॥१॥धृ॥
आतां जळो तयाचे जीणें ! देवा श्रमलों मीं सन्निधानें ! ॥छ॥
गति कुंठित जाली पावना ! शब्दु माझा हो ऐसा येसणा !
मूर्खातं नये चि मना ! काहीं केलयां त्यागु स्फुरेना ! ॥२॥
सप्तसागर मिळे क्षीती. शब्दु आइकोनि येकत्र होती.
दिगंबरा तो मूर्खाप्रती शब्दु न चले. कुंठली माझी मति ! ॥३॥

६६८
वरपडि करिती वमना. कांटाळा कैंचा श्वाना ?
प्रेतदुर्गंधु आवडे मना. तैसें विषयीक विषयो सोडीना. ॥१॥धृ॥
आतां मर मर किती करणें ? बोल तया लाजीरवाणें ! ॥छ।
सेंबुडावरी बैसे मासे. क्षीरसागरु मातीसि.
तेचि बंधन होये तियेसी. प्राणु दे, मरे गुंतोनि जैसी ! ॥२॥
विषयी कां तैसेंचि जालें ! मन विषयरसीं गुंपलें.
दिगंबरेसी अंतर ठेलें. संसारीं आसक्त पडिलें. ॥३॥

६६९
आत्मा तूं येकूचि देही. दुजेपणाचा न पडे संदेहीं.
तया जाणतां आपुलां ठायीं. भेदु कल्पितु कोठेंचि नाहीं. ॥१॥धृ॥
कैचा जीउ ? कें ईश्वरु ? प्रपंचु भेद विस्तारु ? ॥छ॥
अयमात्मा ब्रह्म, हे श्रुति - वरि अनुभउ आला प्रतीती.
दिगंबराची हे अनुभूति. येथ शाब्दिक वाद न सरती. ॥२॥

६७०
दृश्य सांडूंनि द्रष्टा पाहातां, तोचि ब्रह्म गुणातीतु होता.
परमात्मा त्याप्रति वृथा. भेदु भावितासि काये भ्रांता ? ॥१॥धृ॥
रे ! येथें कुयुक्ति सांडूनि देयीं. अनुभवीं निश्चळु राहीं. ॥छ॥
नान्योस्ति द्राष्टा, हे श्रुति सिद्ध आली सद्यःप्रतीति.
शाब्दिकांची कायीसी युक्ती ? दिगंबरें तुटली सर्व भ्रांति. ॥२॥

६७१
औपाधीक सत्यचि होतें. सत्यज्ञानें तरि तें उरतें रे !
सत्य गमितां जेथिचें तेथें, सत्य कोठें चि दुसरें न वर्ते. ॥१॥धृ॥
जनां वायां भजसी कुमतें. सर्व ब्रह्म, हे वैदीक उक्ती. ॥छ॥
सत्या प्रतियोगी असत्य. सहज चि मिथ्याभूत.
भेदु भजिजे, हें कवण मत ? दिगंबरीं ते अघट मायाकृत. ॥२॥

६७२
जीवशिवासि अंतर करिती. येथ युक्तीचि आन काहीं नाथी.
अनुभवें होतां प्रतीति. वरि मस्तकु केवि उचलिती. ॥१॥धृ॥
सांगै, तूंचि तूं, आधीं कवणु ? यये अर्थीं काइसां अनुमानु ? ॥छ॥
आप जाणतां चिन्मय गूणें, न सरती च्या - र्‍ही प्रमाणें.
दिगंबरातें कैसें माने ? होये रोकडी प्रतीति जेणें. ॥२॥

६७३
दीपु लाउंनि नयनु पाहासी. भूमि वायां कां चाळितोसी ?
तूंचि आत्मा; उपलब्धि ऐसी. सिद्ध नेणोनि, अनुमानु करिसी. ॥१॥धृ॥
जनां सांडि रे ! अनुवादू. आप जाणोंनि करीं शब्दू. ॥छ॥
तमेव धीरो विज्ञाय; ऐसें वैदीक वचन आहे.
आप जाणोंनि युक्तीसि लाहें. दिगंबरपद भज अनुपाये. ॥२॥

६७६
पंक्ती बैसलों भोजना. तेथें भाणें दृष्टी दिसेना,
आभाॐ देहादिकरणा कोठें घालावें अवदाना ? ॥१॥धृ॥
आतां प्रसादु वायां गेला. वीण भोजनें आत्मा धाला. ॥छ॥
उभां ना बैठा ठायीं. ठायाचें भान चि नाहीं.
जेवावे कैसें कई ? दिगंबरा ! वृत्तिविलयी. ॥२॥

६७७
पर्यंकु तो भूतळीं. नीजणें बुद्धीमूळीं.
तेथ सगळी सेज चि गिळी. आंग घातलें पोकळी. ॥१॥धृ॥
ऐसी विश्रांति करणें आह्मा सांडुंनि कर्माकर्मा. ॥छ॥
अवस्थांचा संचारु नाहीं. नीजीं नीज वर्ते ठायीं.
दिगंबरु आत्मा देही. आता नीज तयातें कायी ? ॥२॥

६७८
स्थिति राहोंनि कर्मे करितां स्फुरे कर्मीं अकर्मता रे !
तेही न सरे गुणातीता सहजाची सहजावस्था. ॥१॥धृ॥
आतां कर्म होतां गुणीं करावी कां सांडणी ? ॥छ॥
मृगजळाचेनि पुरे न वाहावती चतूरें.
गुणमुक्तें दीगंबरें गुणमुक्त चि सकळ खरें ! ॥२॥

६७९
करितां हीं करणें नाहीं; न करितां अकर्म तें ही
निर्विकारु ठाइंचा ठाईं. देह सहीतु आत्मा अदेही. ॥१॥धृ॥
रे चंचळ ही तें नीश्चळ कैसें वाहातसे मृगजळ ? ॥छ॥
कर्म अकर्म दोन्ही वाॐ. समतेचा सहज भाॐ.
तोही तेथूनि माझा जाॐ. मीं असैन ठाये ठाॐ. ॥२॥
अवकाशु नाहीं बोला. वृत्ति न साहे निर्मळा.
दिगंबराची हे कळा जाणवेना विज्ञान शीळा. ॥३॥

६८०
गुण रहीत सहीत अवघे, अक्रीया क्रीयाभावें,
सहजाचा पालटु नव्हे. तरि संकोच कां मानावें ? ॥१॥धृ॥
बोले बोले रे ! सुजाणा ! नाहीं पालटु या निर्गुणा. ॥छ॥
काये पाहाणें चढु, ऊतारु ! मृगजळाचा हा पूरू ?
निजगूणें दीगंबरू नेणें पालटु ! न धरी विकारू. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP