मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ३८१ ते ४००

दासोपंताची पदे - पद ३८१ ते ४००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


३८१
भावविनाशन, भवमतिखंडन, गुणसंछेदन, नाम.
दुःख - दोष जेणें जाति विनांशोंनि. हृदयीं न संवरे प्रेम. ॥१॥धृ॥
तें माझें जीवन परम - सनातन गुणसंकीर्तन तूझें.
येर ज्ञान ध्यान योगादिसाधन करितां हें मज लाजे. ॥छ॥
भेदविनाशक स्वानंददायक निजसंपादक सार.
दिगंबरा ! तुझें नामचि साधन साधीन मी निरंतर. ॥२॥

३८२
अगणित चंद्र मुखावरि वारिन, बलि संपादीन माये !
आदिगुरुरूप कैसेनि वर्णवे ? उपमा न जे मन साहे. ॥१॥धृ॥
सुर - नर - सिद्ध - निरंतर - सेवित गणसंपूजित माये !
ज्ञान, योग जेथ विश्रांती पावले; तै तया कारण होये. ॥छ॥
मणीगणमंडित कीरिट - कुंडल - युक्त सुशोभित कैसें ?
दिगंबरमुख मायावर्जित ब्रह्मचि केवळ जैसे. ॥२॥

३८३
पीत वस्त्र, पीत कानक भूषण, भाळीं चंदन शोभे;
अवधूतरूप सींहासनीं; पुढें मागें सूभक्त उभे. ॥१॥धृ॥
श्यामळ वो ! नीरजाकृत लोचन सखिये ! पाहिन डोळां.
रूपलें हें मन; परति न धरी; आनंदी जीउ निमाला. ॥छ॥
अधर सुरंगीत; तांबूल बरवत; प्रभा दशनज फाके.
दिगंबरे विश्व मायिक सकळ येणेंचि लोपलें येकें. ॥२॥

३८४
सुव्रत हेंचि माझें ::- करीन स्मरणा. तुजवीण न करी कल्पना. ॥१॥धृ॥
मीं राहिन तुज पां ! सुव्रतफळ सेवना. ॥छ॥
मनस गुंतलें माझें नीरंतर. नेघे आपुली संभावना.
दिगंबरा ! तूंचि सनातन तत्व तैं. आणीक न धरीं मीं वासना. ॥२॥

३८५
सानंदपद माये ! श्रीदतू देखणा. तेणें माझी हरिली चेतना. ॥१॥धृ॥
मीं कइसे करूं वो ! कुंठली देह - भावना. ॥छ॥
करणें निमालीं. जालीं मी सत्पर. अतिक्षिण गुणवासना.
दिगंबर सारभूत सत्य निर्गुण द्वैताची नुरवी संभावना. ॥२॥

३८६
परमानंदु, माये ! सुरधीहरणु, गुणहीनु, माये ! हा अगूणु, ॥१॥धृ॥
मीं पाहिन नयनीं. हा मज बैसला न मनी. ॥छ॥
परती निमाली; ठेली तदधीन. नेघे मन दूजी वासना.
दिगंबर परब्रह्म भेदशून्य हें. येणें हरिली माझी कामना. ॥२॥

३८७
सगुण रूप तुझें हृदयीं गमेना. मन माझें पाहातां उरेना. ॥१॥धृ॥
म्या काये वो ! करणें ? मीं मज चोरिलें येणें. ॥छ॥
शुन्यता जालीं भावीं निरंतर. भेदाची काइसी कल्पना ?
दिगंबर पारमुक्त निरंजन वो ! मी मज पाहातीसें आपणां. ॥२॥

३८८
पढतमूर्ख जो कीं न धरी स्वमना; गुणहीन स्वरूप भजेना. ॥१॥धृ॥
मीं कायें वो ! सीकउं ? अहंमानें नाडले बहूं. ॥छ॥
मनोवृत्ति ज्याची नित्य कामातूर, नेणें आत्मतत्वभावना.
दिगंबर - भाव - मुक्तां गतिचि न दिसे. बद्ध ते ! जळो त्यांची कामना ! ॥२॥

३८९
नये वो ! नये वो ! गूणा नयन लोधले ध्याना.
गुणवेधु साहेना. अगूणा गुणात्मकु. ॥१॥धृ॥
कैं देखैंन नयनीं माझें आरत. ॥छ॥
न सोडीं, न सोडीं ध्यान. पाहिन यथाची खूण.
दिगंबर निर्गूण. गुणगणान्वित. ॥२॥

३९०
नयन श्रमले माये ! दुरूंनि वाटुनी पाहें.
येतां न देखें. काये करूं मीं वो ! आरज ? ॥१॥धृ॥
दुरि ध्येलें वो ! सखिये ! मज येथूंनी. ॥छ॥
कवण करील भेटी ? आस्थां लागली मोठी.
दिगंबरु ये दृष्टी पाहीन मी आरुष. ॥२॥

३९१
कमळ नयनूं माये ! नये चि; करूं मीं काये ?
मन माझें न राहे; जालेंसे भ्रमित. ॥१॥धृ॥
न जिये वो ! मीं. सखिये ! बहु आरत. ॥छ॥
दाउंनि गेला वो ! रूप. वयासि लागलें माप.
दिगंबर स्वरूप कैं मीं देखइन ? ॥२॥

३९२
श्रवण श्रवणगुणीं रूपीं नयन दोन्ही
मन जडलें ध्यानीं तुझां निरंतर ॥१॥धृ॥
परतेना रे मनस माझें तेथूनि ॥छ॥
हृदय भरलें प्रेमें वाचा घेतली नामें
दिगंबरा संभ्रमें नाचें हें मनस. ॥२॥

३९३
कवण सुकृत माझें ! स्वरूप देखिलें तुझें !
देवराया आरजें, साधनें वांचूंनीं. ॥१॥धृ॥
कइं नेसी ? मीं येइन तुज सांगातें. ॥छ॥
न सोडीं, न सोडीं आतां. भेटसी कैं मागुता ?
दिगंबरा भववेथा बहू अनुभविली ! ॥२॥

३९४
कानडा
स्व - पर - जनी तुज वांचूंनि नेणें मी विपरीत.
मनस तें हीं तुझांचि ठायीं; माझें नूपडे चित्त. ॥१॥धृ॥
तूं ये रे ! गुणनिधान ! माझां बैस हृदयीं.
तुजवीण न स्मरो कांहीं. विरो मन तुझांचि ठायीं.
दत्ता ! रे ! सत्य जाणयीं. ॥छ॥
कर्मसाधनीं सूटिका जनी न पविजे पर पारु.
दिगंबरा ! तूं बोल मां ! मातू; धरीन तोचि विचारु. ॥२॥

३९५
डोळ्य़ां डोळा जीवनकळा, सुखाचें सुखसार,
आठवे. देही वीसरूं नाहीं. दत्ता ! तूंचि माहेरा. ॥१॥धृ॥
मीं नेणें मंत्र विधान. नेणें, बोलों मीं काहीं ?
मन माझे गुंतलें, पाहीं, श्रीदत्ता ! तुझाचि ठायीं.
पुनरपि भेटसी कयीं ? ॥छ॥
तुजवांचून हें परजन माने थोर निदान.
दिगंबरा ! तूं जीवन. हेतुमातु न कळे आन. ॥२॥

३९६
रूप ना छाया, गुणु ना माया, क्रीया कर्म विहीन,
शून्य, अशून्य लोपलें ज्ञान. मना नेणवे खूण. ॥१॥धृ॥
तूं रे ! निरंजन जीवा कां घेतासि धावां ?
वायांवीण भरसी हांवां. पाहे पां ! मूळिचा ठेवा.
कवणु रे ! देॐनि दैवां, करी पा ! सद्गुरू सेवा.
बोधु तो पडैल ठावा. ॥छ॥
देॐ तो देही दूसरा नाहीं. कहीं देॐ देवास ?
दिगंबरातें जाण स्वमतें; सांडीं सर्व साभास. ॥२॥

३९७
अगुण गुणी गुणनिदानी ध्यानीं मीपण खाये.
अभासु तोही न गमे; कांहीं देहीं विसरू होये. ॥१॥धृ॥
गुणा गुणी नलगे वारा. परात्पर मीं जाली.
चंचळ चळें मानसें मेलीं ॥छ॥
चित्त निमालें; चेतन ठेलें; मेलें द्वैत सकळ.
दिगंबरेसी मिळणी; ऐसी माया हे मृगजळ. ॥२॥

३९८
दृश्य विनाशें दर्शन ग्रासें. कैसे देखणें होये ?
द्रष्टत्व वायां सांडुंनि तया माया रहितु ठाये. ॥१॥धृ॥
तूं घे स्वरूप विचार, येर साधन वाया.
निश्चळपणें राहिजें ठाईं. गुणी गुण पाहासी कायी ?
तुजवीण काहींचि नाहीं. आत्मया निश्चळु होयीं. ॥छ॥
अवस्था च्यार्‍ही करूंनी दूरी, धरीं सहज ध्यान.
दिगंबराचें बोलणें ऐसें. मिथ्या येर साधन. ॥२॥

३९९
देखोनि चिन्ह रूपले मन; ध्यानचि लागलें माये !
परति नाहीं करणें कायी ? देही भोगु न साहे. ॥१॥धृ॥
हां वो ! गुण - कृत - सार अनुस्पंदु न करा.
चंचळ मन न चळे सैरा. न धरी बुद्धि विचारा.
जाणपण सारा, सारा. ॥छ॥
त्रिगुण - क्रिया गेली विलया. माया मान अमान.
दिगंबरातें देखिलें; तेथें गुणीं गुंपलें मन. ॥२॥

४००
सद्गुरूवीण बोलणें, ज्ञान, ध्यान तें वायां जाये.
कर्म सेवया न तुटे माया; वायां जाति उपाये. ॥१॥धृ॥
तूं दे रे ! दर्शना देवा ! श्री - दत्ता ! राया !
तुजवीण न तुटे माया. योग - धर्म जातुसे वायां.
न वचें मीं आणि - का ठाया. येइं बा ! श्री - योगिराया ! ॥छ॥
येक ते मौनी; येक ते ध्यानी; ज्ञानी; येक वाचाळ.
दिगंबरेंवीण चूकले प्राणी; करिती तळमळ. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP