मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ३४१ ते ३६०

दासोपंताची पदे - पद ३४१ ते ३६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


३४१
आरत जीविचें, भेटी जायीन, सखिये ! मन. निश्चळलें चैतन्य.
वियोगें न करीं योगसाधन, ध्यानधारण. मज जाणवे कठीण. ॥१॥धृ॥
येइं रे ! येइं रे ! अत्रिनंदना ! पद्मलोचना ! योगी - हृदय - नीधाना ! ॥छ॥
नयन स्पंदे; स्पंदे बाहुली; वृत्ति लागली; पंथु पाहें येकली.
दिगंबरा ! तूं गुरुमाउली, शांति साउली. मातें जन - भूलि जाली. ॥२॥

३४२
नळनीदळगतजळ चळे ढाळे ढळमळे. दळजळेसीं निराळें.
संगु असोनि संगा नातळे. तेवि संचलें गुणीं मन माझें जालें. ॥१॥धृ॥
सखिये ! हृदय जालें निर्मळ. नेणें मी स्थूळ.
स्फूरे गगन विशाळ. ॥छ॥
अवनी अनिळा - नळु जीवन नव्हे गगन. भान सकळही क्षीण.
दिगंबरु मी मातें आपण नीरंजन; तेथें नधरे मीपण. ॥२॥

३४३
त्रिगुण - विकळ माझें मनस, चंचळ, कामवश, तळमळ बहू करिताहे.
माझे मजचि नाकळे; गुणी बहीरंग पळे;
हीतविषयीं आंधळें; तया करणें काये ?
येणेंकरूनी चूकली; तुझी तुज अंतरली;
दत्ता ! तुं माझी माउली; तरि सोडितां नये. ॥१॥धृ॥
आतां पायां लागइन. तुज सोडूंनी जावया
मन परतेना माघारें. अपराधी मी हें खरें.
मायेबापु गुरुदेॐ तूं; तरि आतां काये भजो दूसरें ? ॥छ॥
डांगा हाणि - तळें जळ कैसें होइल वेगळे ?
मोडि पाहोनी जवळ फळ भेदिजे केवी ?
कार्यकारणीं दूसरें; तर्कु विवेकें न स्फुरें;
भेदु स्मरला वीसरें; सत्य न मने जीवीं.
दिगंबरा ! मीं अज्ञान तुझें पोटिचें;
ह्मणौन मजवरि तूं कठिणपण झणें दाखवीं. ॥२॥

३४४
बहु जन्म गेले वायां. श्रमु जाला जीवा यया.
गुणी गुण प्रवर्तले करितां क्रीया. ॥१॥धृ॥
अझुणी कां न ये वो ! माये ! काये मीं करूं ?
अवधूतू माये ! मातें भेटवा गुरू. ॥छ॥
गुण कर्म यये देहीं भजतां संतोषु नाहीं.
दिगंबराचे मी पाये पाहिन कई ? सैये ! ॥२॥

३४५
शम, दम, योगु, क्रीया गुरुवीण सर्व वायां.
न करीं मीं ते आयास. पाहिन तया सैये ! ॥१॥धृ॥
कमळनयनु माये ! भेटवा मज.
साधन योगाची सिद्धि तोचि सहज सैये ! ॥छ॥
जप, तपु, अनुष्ठान, दिगंबरू, ध्येय, ध्यान,
सकळ स्वहीत माझें, मूळीचें धन. ॥२॥

३४६
आठवसी प्रतिक्षणी. प्रीति भरली सगूणीं.
आनु ! मातें उपदेशु नावडे मनीं बापा ! ॥१॥धृ॥
येइरे ! येइंरे ! देवा ! घेउंनि जायीं.
तुजवीण दत्तात्रेया ! नावडे कांहीं बापा ! ॥छ॥
ज्ञान - ज्ञेय - वींचारणा ते मीं न करीं कल्पना.
दिगंबरा ! तुझें रूप रूपलें मना. ॥२॥
 
३४७
प्राणधन वोवाळीन; जीउ बळिं मी देईन.
अवधूता ! तुझां गुणी गुंपलें मन बापा ! ॥१॥धृ॥
येकुदां येइं रे देवा ! भेट हृदयीं.
परब्रह्म तुजहूंने दूसरे नाहीं बापा ! ॥छ॥
अगुणगुणाचा दिगंबरा निश्चयेसी
तूंचि तत्व. सत्य माझी वासना ऐसीं. ॥२॥

३४८
तुझें मातें सर्व देयीं; माझें तर्‍हीं सर्व घेईं.
तुंमींपणाचें साजणें न करीं कहीं; ॥१॥धृ॥
देवा ! वाउगी तर्‍हीं हे माया घालिसी काई ?
तुजप्रती सत्यरूपा दूसरें वायी. ॥छ॥
मी तूंचि सर्व होयी. कां तुं मींचि सर्व देहीं.
दिगंबरा ! भेद - स्पंदु न स्फुरे कहीं. ॥२॥

३४९
जनकु, जननी माये ! अवधूतु कोठें आहे ?
भेटवा वो ! मीं नयनीं पाहिन पाये सैये ! ॥१॥धृ॥
सांडूंनि गेला वो ! मातें येकलें वनीं.
पुढें नाहीं कोण्ही मातें गें ! पारिखा जनीं. ॥छ॥
काम क्रोध साहों कैसी ? जालियें तद्गुणीं पीसी.
दिगंबरे ! तू जननी; नेणसी कैसी ? ॥२॥

३५०
आठवले तुझे गूण; वरि वियोगाचे बाण.
भेदलें वो ! मन माझें. जाहाले क्षीण वो ! सैये ! ॥१॥धृ॥
नयन विकळ जाले; लोटलें जळ; तळमळ ते कित्ती साहों ?
न चले बळ. ॥छ॥
कई कई कई येसी ? येइन मीं तुजपासीं.
दिगंबरे ! तूं नयन - पालवें पुसीं. ॥२॥

३५१
कोटिचंद्र गेले लय, पाहोनि श्रीमुखछाया.
दिनमणि ते हारपले, पावले क्षया ऐसें. ॥१॥धृ॥
कइ मी पाहिन डोळां रूप सावळें ?
अवधूता ! तुझें माझे नीवती डोळे. ॥छ॥
देवदेवा ! देवेश्वरा ! शिवरूपा ! दिगंबरा !
कमळनयना ! बापा ! त्रीगुणप्रा ! ॥२॥

३५२
दीपाचा सुढाळपणीं पतंग पडले. तैसी करितासि कां वर - पडी रे !
आप जाणतां हें दृश्यचि माईक; जळो जळो तुझी खोडि. ॥१॥धृ॥
परोपरि मानसें वोखटीं. आचरती ते क्रिया खोटी. दुःख पावती सेवटी.
आत्महीत तया काहींचि न कळे. वळीता मरमर मोटी.
अवस्था गोचर, भान मायीक, सिवणा सत्य तें काहींचि नाहीं रे !
दिगंबरु गुरू भज कां आलया ! निवसील तूं तुझा ठायीं. ॥२॥

३५३
सदन, धन, जन, जाया भजतां रूपचि खरतर बाण रे !
काम राग तेथें वैरी नेटक भेदती अंतःकरण. ॥१॥धृ॥
अतःपर रूप मीं न भजें. माजयीन त्याचेनि माजें.
धिग्य ! यौवन हें काये कीजे ?
सकळ योग धन नाशैल येणें. वैराग्य देहीं नुपजे. ॥छ॥
चित्रिचें अळंकरण मृन्मयाचि सकळ. भौतिक जाण हें तैसें रे !
दीगंबर - रूप भज कां सन्मय मना ! वृत्ति विनाशे. ॥२॥

३५४
आमीष रसें काये भ्रमतासि रे ! मीना ! गळू तया अंतरीं आहे रे !
काळज फुटे; परि मुक्त न होसी; सांपडसी अनुपायें. ॥१॥धृ॥
परोपरी रसना नाडियले. कामवेग बळवंत केले.
योग - धन तें वाया गेलें. तत्व - श्रवणीं लागती डोळे.
करणगणमदें मातले. सकळ दम - शम जीत निमाले. ॥छ॥
रसनेचे मुख काये पाहातासि रे ! खरा ! योग - युक्ती अन्न सेवी रे !
दिगंबरु गुरु कैचा ? पुनरपि कैची संपूर्ण पदवी ? ॥२॥

३५५
स्वर वेधें वेधला भुजंगु डोले. हरिणु प्राणें निमाला रे !
तंत धन शब्द वितंत सूस्वर लक्षितासि रागमाळा. ॥१॥धृ॥
परोपपरी श्रवणें नाडिलें. अर्थु न भजे कांहीं केले.
नीरूपण हें वाया गेले. जन तत्काळीं भूललें.
बहिर्मुख अर्थु ने घेचि प्राणि. दिवसा नागवले. ॥छ॥
घारिका भक्षणीं छिद्रांची गणणा ! काये प्रणाण गव्हारा रे !
दिगंबर - नामें करि कां गर्जन. लाता हाण संसारा. ॥२॥

३५६
सर्प - दंष्ट्रा - स्पर्शें विष - निद्रा आली; तेथ प्राणासि परती चि नाहीं रे !
कामिकासि तैसा कामिणीचा संगु; वज्र - पाशु पडे देहीं. ॥१॥धृ॥
परोपरी कामें गोवियलें. विण पापें बंधन केलें.
मंत्र - उपदेशु न चले. मन - मनन - मानव्य गेलें.
रात्रि दिवसु तें चि ध्यान हृदयीं. योग - धन हारपले. ॥छ॥
कंडु निवारणीं सुख विश्रांति काइसी ? परतोनि कां न पाहासी रे ?
दिगंबरेविण संसार न तुटे. मा हें चि नित्य पावसी. ॥२॥

३५७
भयद बाधकु भारी मायिकु सिवणा.
भोगुंचि पाहे; परिचेॐ धरीना. ॥१॥धृ॥
नाडला हा जनु स्वहित नेणें. भुललान धरी सोये विपरीत - ज्ञानें. ॥छ॥
स्वहित सांडुनि बळें अहित चि जोडी.
मरे मीनु; परि, आमिष न सोडी. ॥२॥
ऐसा स्वभावो जळो ! न धरी रे गुणीयां !
अवधूत गुरु सेवी; तरसील माया. ॥३॥
दिगंबरेविण नाहीं आन हितकर्ता.
तयाचा होऊंनि सोडीं सगुण देवता. ॥४॥

॥ चालि भिन्न ॥
३५८
माये हें दुःख माझे जाणेल केधवां
प्रतिकारु कवणु य अर्थीं करावा ? ॥१॥धृ॥
अवधूतु ममता धरी ऐसें होतां.
न देखे सखिये ! येणें मनीं बहूं वेथा. ॥छ॥
ऐसें हें निष्ठुर मन नाहीं कवणाचें ? जैसें कठिण देवा दिगंबराचें ! ॥२॥

३५९
कमळनयना ! हरी दुःखना. तुझा संदु या मना.
भेटि देइं स्वजना. ॥१॥धृ॥
विषयीं मति मोहिली. भूलि जाली वरदा ! भ्रमु हरीं तु हा. ॥छ॥
आश तुझी बहु रे ! मातें. येईं रे ! सखया ! दिगंबरा !
सांडूंनि साधना, हित पर चिंता, ॥०॥
आणिक काम - ना, तुझे पाये आठवीं. देवा करीं करुणां. ॥२॥

३६०
कमळनयना ! अगण - गूणा ! सकळ - सूख - निधाना रे !
संगविहीना ! सानंदघना !
तुझा वेधु, तुझा स्पंदु, तुझा बोधु, लागो या मना रे ! ॥१॥धृ॥
बापा ! तूं माझे धन रे ! योग - मुद्रेचें साधन रे !
ब्रह्म शुद्ध सनातन रे ! तापत्रयाचें छेदन बापा ! ॥छ॥
देवा ! देवेंद्रा ! विज्ञान - सारा ! सर्वज्ञ ! स्वामी ! उदारा ! रे !
दिगंबरा ! करुणाकरा ! तुजवांचूनि नेणें दुसरा रे ! बापा ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP