मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
श्रीराम जयराम जयजयराम स्तोत्र

श्रीराम जयराम जयजयराम स्तोत्र

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


श्री ज्याची ललना, भुजंग शयना, पुत्रत्व पद्मासना,
पक्षी तो वहना, समुद्र सदना, वाणी रती या सुना, ।
कंठी कौस्तुभ भूषणा, सुखघना प्राधान्य पंचानना,
सारें विश्वकुटुंब राज्य गणना, त्रैलोक्य नारायणा. ॥१
राजे थोर धरातळीं अतितळी ते रावणें जिंतिले,
स्वर्गींचे सुर गेहकार्य करणीं जेणें सदां योजिले; ।
पाताळीं उरगांगनां हरुनियां चूडामणी घेतले,
द्वारीं नित्य उभे नवग्रह असे बंदीं किति घातले. ॥२
मंत्राचें बळ राहिलें, द्विजवरीं यज्ञक्रिया टाकिल्या,
रोडले अमरेंद्र, भाग हरितां अंगीं शिरा वाहिल्या, ।
धाकें कायतसे सदा वसुमती भीवोनि त्या रावणा,
लोकीं अन्य कदा समर्थ न दिसे त्रैलोक्य संरक्षणा. ॥३
जेणें शंकर अर्चिला निजकरें वाहोनि दाही शिरें,
तेणें तुष्ट पिनाकपाणि वरदे वोपी तया सादरें, ।
स्वर्गींचे सुर यक्ष किन्नर महा दैत्येंद्रराजे बळी
ते होतील हतप्रभाव समुदे तूझ्या प्रतापानळीं ॥४
यक्षा जिंतुनियां न पुष्पक निधी घेवोनि गेला घरा,
आला ऐकुनि दिक्पती दशदिशा त्या टाकिती सत्वरा ।
स्वर्गींचे मणि पारिजातसमुदे लंकांगणीं आणिले,
धेनू, कामदुधा, हयोत्तम, करी, द्वारीं बळें बांधिले. ॥५
रागें रावण निंदिती सुरपती जावोनि विष्णूप्रती
झालें वृत्त समस्तही विनविती, बोले तयां श्रीपती
होतों दाशरथी, तुम्हीं वसुमती घ्या वानरांच्या बुथी,
आहे दुष्ट किती ? वधोनि कुमती संतोषवूं ते क्षिती. ॥६
मैत्री मेळविले अजात्मजकरीं संभार यज्ञीं बरा,
तेव्हां राघव जन्मला, नृपतिला आनंद झाला पुरा, ।
नेला अध्वररक्षणा मुनिवरें, मार्गी वधी ताटका,
केली मुक्त पदीं चतुर्मुखसुता नामें अहल्या निका, ॥७
जनकनृपतिगेहीं भंगिलें चाप रामें,
परिणिलि मग सीता देवता सार्वभौमें, ।
पथिं भृगुतनयाचा मान सिद्धीस नेला,
रघुपति युगराज स्थापनें नेम केला; ॥८
यथातथ्य वाणी पित्याची कराया
सवें घेतली जानकी भव्यकाया,
त्वरें चालिला दंडकारण्यपंथें,
जनस्थान गोदावरी तीर्थ जेथें. ॥९
जगन्नायकाची हरी धर्मदारा,
दशग्रीव कापट्यवेषें उदारा,
वधीं राम वालीस सुग्रीवसंगें,
तरे वारिधी जाय लंके सवेगें. ॥१०
येथें राघव घातला परिघ हा शाखामृगीं घातला,
बांधाया गज मातला बिसगुणें इच्छा करी मातला, ।
हा तो मानुष पूतळा निजकरीं नाराच हा धूतला,
वक्षीं तीखट रूतला कपितळीं पाडी न त्या भूतला. ॥११
रामासीं झगडावयासि निधडा लंकेश आला पुढां,
रामें बाणसडा करोनि करडा त्या नाचवीलें धडा; ।
सैन्याचा रगडा सवृक्ष दगडा ते हानिती माकडा,
वाहे रक्त कडाड रावणदळीं केला शिरांचा हुडा. ॥१२
मर्दी रावण कुंभकर्ण समरीं त्या मेघनादा सवें,
सीता सोडविली बिभीषण पदीं संस्थापिला वैभवें;
आला तो शरयूतटासि भरता भेटे पुन्हां भूपती,
शोभे राज्यपदीं सुबंधुसह तो पूर्णेंदु सीतापती. ॥१३
ऐसी हे रघुनाथकीर्तनकथा शृंगारहारावली
नामें मुक्तमणी चरित्र पदकें भक्तीसुतें गुंफिली, ।
कंठीं भूषण शोभतांचि भुलल्या त्या मुक्तियोषा बळें,
त्यांचा संग निरीक्षितांचि रुसल्या गेल्या कुबुद्धी पळें. ॥१४
हे गाथा यश लाभ या क्षितितळीं सर्वार्थही भेटवी,
मोठी रामपरायणासि पदवी वैकुंठिची दाखवी, ।
केली माधवनंदनें कविवरें मंत्राद्यवर्णावळी,
तेरा गुंफुनि पावला गुरुकृपें धन्यत्व सन्मंडळीं. ॥१५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP