मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
संतनामावळी

संतनामावळी

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


ॐ नमो परब्रह्म पूर्णकामा ! ।
नित्य निरामय निर्गुणा ! । क्षीराब्धिशायी नारायणा ! । आनंदघना ! अविनाशा ! ॥१॥
मंगलमणिनिधाना ! । त्रिजगदखिलपालना ! । सज्जनघनचंदना ! । आराध्यलिंगा ! ॥२॥
शरणागतप्रतिपालन । करावया हेंचि कारण । ह्मणवूनि करिसी अवतरण । युगायुगीं निश्चयें. ॥३॥
जगदोद्धारणालागीं । अवतरसी युगायुगीं । महानुभाव संत जगीं । प्रगट करिसी निज रूपें. ॥४॥
ज्यांचें केलियां नामस्मरण । पावोनि सायोज्ज्य निर्वाण । पुनरपि जन्ममरण । नाश करणें स्वहित. ॥५॥
त्या भक्तांचीं नामाभिधानें । कांहीं बोलों यथाज्ञानें । कृपा करोनि विद्वज्जनें । द्यावीं अवधानें श्रवणार्थी. ॥६॥
व्यास, आंबरीष, रुक्मांगद, । विदुर, उद्धव, ध्रुव, प्रर्‍हाद. । वसिष्ठ, वामदेव, नारद, । पृथु, अंगद, अक्रूर, ॥७॥
सनक, सनंदन सप्तर्षि । शुक, भीश्म तेजोराशी, । जनक विदेही निश्वयेसी, । याज्ञवल्की, उपमन्यु. ॥८॥
दुर्वास, कपिल महामुनि, । वाल्मीक कवि पूर्ण ज्ञानी, । अगस्ति, ब्रहस्पति, जैमिनी । जे चिद्रणीं विराजती. ॥९॥
विश्वामित्र, पराशर । गुरुड भक्त, हनुमंत वीर, । मार्कंड ऋषीश्वर, । गंधर्व, तुंबर जवळीक, ॥१०॥
मयूरध्वज, मांधाता । शिबी, परीक्षिति, बिभीषण भ्राता, । रावण भक्त तत्त्वतां, । शरण उमाकांता सर्वस्वें. ॥११॥
मुचकुंद, बळी, पुंडलीक, । लक्ष्मण, भरत पुण्यश्लोक, । नळ, नीळ, जांबुवंतादिक, । मुख्य सैनिक सुग्रीव, ॥१२॥
भारद्वाज, गर्गाचर्यो, । भगीरथ, सुदामा, संजयो, । जगद्गुरु दत्तात्रेयो, । हस्तामलक चिद्भानु, ॥१३॥
अहल्या, द्रौपदी, जनकतनाया, । तारा, मंदोदरी, अनुसूया, । पार्वती, अरुंधती मूळमाया, । स्मरणें भवभया नाशिती. ॥१४॥
ऐशा अनंताच्या अनंत विभूति । कवण जाणे कैशा किती ? । जेथें मौनावती श्रुति, । तेथें मंदमति काय बोलों ? ॥१५॥
तृणांकुर पर्जन्यधारा, । असंख्य गगनींच्या तारा । सिंधुजीवन उर्वीभारा । काय पामरा गनवती ? ॥१६॥
एक एक रोमायी केवळ । अनंत ब्रह्मांडांची माळ । ऐसा व्यापक लक्ष्मीलीळ । भक्तवत्सल परमात्मा. ॥१७॥
त्या भक्तांचीं नामें । वाचे उच्चारूं सप्रेमें । मोक्षदायक उत्तमोत्तमें । परम संभ्रमें करूनियां. ॥१८॥
आता कलियुगीं सांप्रत । जें परब्रह्म मूर्तीमंत । तें चर्मदेहीं जीवन्मुक्त । साधु संत विचरती. ॥१९॥
कृतीं, त्रेतीं, द्वापारीं, । अनंत युगीं, अनंत अवतारीं, । भगवद्भक्त नानापरी । बोलिले वैखरी स्मरले ते. ॥२०॥
मुकुंदराज मुनीश्वर । विवेकसिंधूचा कर्तार, । जयत्पाल नृपवर । बोधोनि परिहार केला. ॥२१॥
मीन, मच्छींद्र, गोरक्षी जति । बुटी ( ? ) जालींद्र, कानिफा सती । गोपीचंद, मैनावती, । नाथपंथी सिद्धगुरु. ॥२२॥
रावल, चर्पट, चौरंगी, । हृदयानंद अच्यूत सारंगी, । नागार्जुन, जगन्नाथ वेगीं । शरण पांडुरंगीं निंबा, तो ॥२३॥
गैनी, निवृत्ति, ज्ञानेश्वर, । सोपान, मुक्ताई, अवतार । ब्रह्मा विष्णु महेश्वर, । मूळमाया हें चवथी. ॥२४॥
चांगदेव वटेश्वर, । मिराबाई आणि कबीर, । कनकदास, पुरंदर, । ऐका खेचर विसा, तो ॥२५॥
श्रीशंकराचार्य परमहंस, । नामदेव, तुळशीदास, । जनजसवंत, मुधेश, । मृत्युंजयस्वामी तो ॥२६॥
कूर्मदास, नरहरी सोनार, । धागा, रोही, गोरा कुंभार. । चोखामेळा महार, । निरंतर भक्तिमुक्त. ॥२७॥
गोणाई, राजाई, जनी, महादा, नारा, विठा गोंदा ज्ञानी, । नामयाचे पुत्र कलत्र जनीं । हें सज्जनीं जाणिजे ॥२८॥
जगमित्र नागा, सुरदास, । पिपा रजपूत महापुरुष, । विष्णुदास, माधवदास । राघवदास, नित्यानंद, ॥२९॥
सांवता माळी भक्तराज, । नरसी मेहता घेऊनि पेंज, । माळ घेतली हें चोज । अधोक्षजें दाखविलें. ॥३०॥
दासोपंत, जनीजनार्दन, । विठा रेणुकानंदन, । बहिरू पिसा, कृष्णारण्य ( ? ) । भानुदास पूर्ण पूर्णत्वें. ॥३१॥
जयदेव, महामुद्गलभट, । बाजीद पठाण, धना जाट, । सेना न्हावी, भक्तश्रेष्ठ । भू वैकुंठ पैं केलें. ॥३२॥
जनार्दन, एकनाथ, । रमावल्लभ, मालोपंत, । गोदडी, मुकुंद, महंत, । आणि अनंतदेव तो. ॥३३॥
नामा महादेव, कान्हा पाठक, । मक्तेश्वर, लतीफ देख, । ज्योति रानंद अलोलिक, । भक्त सम्यक जाणते ॥३४॥
सय्यद महंमद, कोमडक्या ( ? ) । कान्होपात्रा, नवलाख साळ्या, । रामानंदीं गेली विलया, । मूळ माया हे समूळ. ॥३८॥
चोभा साळया रसाळ, । नरहरी, एकनाथ, मैराळ, । शिवराम, अनंत, गोपाळ, । वंदूं त्रिम्मळ, अक्रूर. ॥३९॥
अज्ञानसिद्ध नागेश, । प्राणदास, मलुकदास । नमन दामाजीपंतास । निरंतरस्वामी दिवाकर ॥४०॥
सोनाजी आणि खोदू, । नानक, पिंजारी दादू, । शहाहूसेन, परमानंदु, । वडवाळसिद्धु नागेश ( ? ) ॥४१॥
केशवस्वामी, नामार्जुन, । चांगा, बोधला जगदारण्य, । संतोबा पोवार, आपण । वैराग्य: पूर्ण धगधगीत ॥४२॥
सदानंद, रामानंद, । अमलानंद, गंभीरानंद । ब्रह्मानंद, सहजानंद, । पूर्णानंद गुरुवर्य ॥४३॥
नीलकंठ, शांतलिंग, । जयराम, श्रीकृष्ण,  अभंग । गोपाळस्वामी अगाधबोध, । गंभीरनाथ प्रसिद्ध, । चिंतामणी सर्वदां. ॥४५॥
बाबाजी चैतन्यं स्वयंप्रकाश । तुकोबा तोचि भक्तकळसु, । शिवाजी गुरव, प्रेमरसू । सेवोनि समरसू झाला ॥४६॥
केशवस्वामी, लिंगबोध, । रामीरामदास प्रसिद्ध, । वामनस्वामी शुद्ध बुद्ध, । अगाधबोध बोधला ॥४७॥
काशीराज ........मुनी । विश्वनाथस्वामी पूर्ण ज्ञानी, । भगवंतपंत रघुनाथभजनीं, । आनंदमूर्ति गुरुभक्त. ॥४८॥
श्रीकृष्ण तुळशीअद्वय, । चिद्घनाराम कृष्णमय । उल्हास चैतन्यसांप्रदाय, । ऐसें आचार्य बोलती ॥४९॥
हे जीवन्मुक्त संतमाला । अखंड घालावी गळां । प्रिय जाली सत्तमाला । ह्मणऊनि हेळामात्र गुंफिली. ॥५०॥
संतमाळा वैजयंती । सरती केली साधुसंतीं । अर्पूनियां भगवंतीं । संसारगुंफी वारिली. ॥५१॥
स्मरण करितां प्रात:काळीं । दोष दहन होय होळी । स्मरतां संतनामावळी । स्वानंद जवळी नित्य वसे. ॥५२॥
अनंत पुण्यें असतील गांठीं । तरी संतमाळा शोभेल कंठीं । वैकुंठींहूनि उठाउठी । श्रीकृष्ण जगजेठी उडी घाली. ॥५३॥
माझिया भक्तांचीं नांवें । मी ऐकेन प्रेमभावें । ह्मणूनियाम माधवें । उडीनें यावें श्रवणार्थीं. ॥५४॥
प्रगट गुप्त असंख्यात । जीवनवासी समाधिस्थ । न्यूनभावें प्रणिपात । नमन दंडवत तयांसि. ॥५५॥
सहजीं सहज पूर्ण रंग । निजानंदें नि:संग । अक्षय अज अभंग । संतमाळा सांग त्याचेनि. ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP