सर्ग सहावा

` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.


याहून पूर्वीं शिशुपाळ आला, । जेणें विवाहोचित वेष केला. ॥
चाले जयाची चतुरंग सेना, । रजोविशेषें रवि हा दिसेना. ॥१॥
रुक्मी पुराबाहिर त्यास आला, । करून पूजा मिरवीत नेला. ।
वाजेत भेरी, बरवे नगारे, । ते भीमकाची नगरी सवारे. ॥२॥
शोभे महा कुंडिन राजधानी । संपन्न नानाविध संविधांनीं. ॥
शृंगारिल्या उत्कट राजवीथी. । समस्त शृंगाटक नोप देती. ॥३॥
प्रासाद अत्युच्च असे असावे, । सप्ताश्व जेथें बहु घे विसांवे. ॥
जेथें उभारेति महा पताका, । विचित्र वर्णा दिसती अनेका. ॥४॥
काश्मीरसंसेचित अंगणांनीं, । प्रवाळमुक्तामय तोरणांनीं, ॥
द्वारप्रदेशा बहु येति शोभा, । पण्यांगना नाचति त्या सदंभा. ॥५॥
चैद्येंद्र हा जानवशास आला, । नृपें पुरस्कार बहूत केला. ॥
चहूंकडे या प्रसरेत वार्ता. । आरंभ्हलें मूळ महा अनर्था. ॥६॥
स्त्रीरत्न हें कृष्ण हरील जेव्हां । स्वकीय नाशे पुरुषार्थ तेव्हां. ॥
म्हणोनि हा मागध सिद्ध झाला, । सहाय या चैद्य्नृपास आला. ॥७॥
हा दंतवकादिक पौंड्रकांनीं । आईकिजे सर्व उदंत कानीं. ॥
द्वेषी हरीचे हृदयीं जळाले, । मदें जरासंधमता मिळाले. ॥८॥
या वेगळे आणिक येति राजे, । बलिष्ठ ज्यांचा दळभार साजे. ॥
कित्येक हे चैद्यनृपा सहाया, । कित्येक हे कौतुकही पहाया. ॥९॥
तैलंग, कार्नाटक, पांड्य राजे, । त्या द्राविडांचा समुदाय गाजे. ॥
येती महाराष्ट महांभिमानी, । कित्येक ते केवळ मद्यपानी. ॥१०॥
काश्मीर, पांचालक, गौड येती । आवंत्य, बाल्हीक, अनेक जाती, ॥
कैकेय, गांधार अनेक आले, । सत्कार त्यांचे बहु फार केले. ॥११॥
झडकरि गणकांला भीमकें आणवीलें,
कनकमय विटांचें बोहलें घालवीलें. ।
दृढतर बसवील अर्गजाचेच लेवे,
वरिवरि करिजेती कस्तुरीचे गिलावे. ॥१२॥
तदुपरी सकळेंही मंदिरें धूपवीलीं,
परम रुचिर चित्रें कारुकीं काढियेलीं. ।
अति मृदुतरबाला ज्या महा उंच खाशा,
अति चतुर फरासीं अंथरील्या तिवाशा. ॥१३॥
विविध मधुर वाद्यें, चौघडे वाजताती;
अगणित दरबारीं भाट हे गाजताती; ।
तदुपरि मग ल्याल्या नेसल्या बायकांचे.
अगणित गण येती, सोयर्‍याधायर्‍यांचे. ॥१४॥
आता, माम्या, मावशा, सर्व आल्या. । धाड्या, भाच्या, आणिल्या सर्व साल्या. ।
सास्वा, जावा, माय, आज्या, बहीणी । आल्या, मानें त्या नणंदा, विहीणी. ॥१५॥
सकळहि मग तेथें राजपत्न्या मिळाल्या,
धरुनि मुलिस हातीं स्नानशाळेस आल्या. ।
दुचित मन तयेचें होय, कांहीं न चाले,
यदुतिलकविलंबें घाबिरे प्राण झाले. ॥१६॥
ते मांडिली रत्नजडीत चौकी, । मुक्ताफळांचे बसलीत चौकीं. ॥
लागे तिला जे समयीं हरिद्रा, । शची दिसे जीजपुढें दरिद्रा ! ॥१७॥
सख्या तिच्या काढुनि सर्व लेणीं, । हळूच तीची उकलीति वेणी. ॥
जेथें असे रत्नजडीत न्हाणी, । तेथें तिला नेउनि माय न्हाणी. ॥१८॥
जों जों पडे ईवरि उष्ण पाणी, । तों तों स्मराची झळके कृपाणी. ॥
हें मंगलस्नान तयेस झालें, । शरीर संप्रोछन सज्ज केलें. ॥१९॥
अत्यंत थोर गजरें अति शिघ्र आली,
राकाशशांकवदना सदनांत आली. ।
बाळातपीं कुटिल कुंतल वाळवीले,
आलीजनें अतिसुगंधहि धूपवीले. ॥२०॥
असें असे सर्व शरीर गोरें, । जयापुढें कांचन होय भोरें. ॥
प्रत्यक्ष हे दोष दिसोन याचे, । तथापि लेते नग सोनियाचे. ॥२१॥
भरजर अवघी हे नेसली उंच साडी,
पदर मग तयेचा सुंदरी लांब काढी. ।
पदकमळ जयेचें वंदीजे लोकपाळीं,
सिसफुल धरि माथां, भांग, टीळा कपाळीं. ॥२२॥
कांचोळी मोतियांची तटतटित वसे कंठदेशीं जयेच्या,
पेट्यांचें येकदाणे, तदुपरि दुलडी कंठदेशीं तयेच्या. ।
रत्नांची रुंद कांची अतिरुचिर जिच्या मध्यभागीं विलासे,
जालीसे क्षीण मध्यें म्हणउनि मदनें बंध किंवा दिलासे ! ॥२३॥
कोथिंबिरी, टोपण, घोंसबाळ्य़ा, । शोभेत कानीं जडिता निराळ्या. ॥
मुक्तामयें तानवडें, विचित्रें । ल्याली असे, जे वदनांत पत्रें. ॥२४॥
दंडीं धरी रत्नजडीत वांकी, । ल्याली असे, बेसर दिव्य नाकीं, ॥
गोंडाळ ईचे बहु हात गोरे, । बसेत जेथें अति सज्ज दोरे. ॥२५॥
त्या बांगड्या उत्तम सोनियाच्या, । मधें मधें शोभति माणिकांच्या; ॥
हे पाटल्या, हात - सरांस ल्याली, । अत्यंत किर्मीरित कांति झाली. ॥२६॥
त्या आरशा घालुनि आंगठ्याला, । ल्याली असे सुंदर आंगठ्यांला, ॥
साध्या, बिलोरी, नकशीजडीता, । दशावतारांकित मूर्तिमंता. ॥२७॥
तीच्या सरीचे न बसेत फांसे, । म्हणोन कांहींयक माय हांसे. ॥
चितांक चिंताकुल लेत नाहीं, । तद्वाक्य चित्तांत न धेय कांहीं. ॥२८॥
घाली गळां रत्नजडीत पेटी, । लावण्यसिंधूंत निघे अपेटी. ॥
चापेकळ्यांच्या मिरवेत माळा, । मुक्ताफळांच्या दिसती अमाळा. ॥२९॥
ते जोड पायीं सज सांखळ्यांचे, । शोभेत दोन्ही सर पोवळ्य़ांचे. ॥
बाळा, कडीं, पैंजण जाण ल्याली, । त्या खालते घुंगुर सज्ज घाली. ॥३०॥
अनवट निटल्या ही जोड त्या जोडव्यांचा,
अनुपम उमटे हा शब्द पोल्हारियांचा. ।
रुचिरतम विरोद्या शोभती अंगुळीला,
कितियक नग लेतां भार झाला मुलीला. ॥३१॥
क्षणभरि परि तीचें चित्त हें स्वस्थ नाहीं,
म्हणउनि नग तेव्हां लेतसे स्वरूप पाहीं. ।
अविरल मग बाळा मोकळे केश बांधे,
वदनविधुभयानें ध्वांत हे कावरोधे. ॥३२॥
सुस्नात देवी मग ते सुशीला । प्रवेशली येउनि वज्ञशाळा. ॥
जे पीत खंबाइत उंच नेसे, । जे रेमपीठावरि सज्ज बैसे. ॥३३॥
जे येकलें मंगल मंगळाचें । तें येकदाणें मिरवें गळांचें. ॥
बाल्या धरी रत्नजडीत कानीं, । नासेस मोतीं विलसे सुपानी. ॥३४॥
जीच्या स्वरें लाजतसे विपंची, । माजीं जिच्या रत्नजडीत कांची. ॥
ल्याली असे जे मुद, राखडीला, । झाली असे तांतडि तांखडीला. ॥३५॥
पुण्याहवाचन करून बसेत दोघें,
आहेर घेत असती द्विजमंत्रयोगें. ।
बैसे पुढें अति सुलक्षण ते कुमारी,
नीराजनें करिति तीस अनेक नारी. ॥३६॥
पद्मापदोपासक, अग्निहोत्री, । पुरोहित, श्रोत्रिय वत्सगोत्री ।
पुढें निघे उत्तम संप्रादायी, । ज्याभोंवते भोंवति वाजपेयी. ॥३७॥
अथर्ववेदें गृहयज्ञ केला. । ते भीमकीला अभिषेक झाला. ॥
हिरण्यगोभूतिलवस्त्रदानें । ईच्या करें देवविलीं नृपानें. ॥३८॥
मिळति सकल तेथें ऋग्यजुः सामवेदी,
शतपुरुष जयांची हे अविच्छिन्न वेदी. ।
त्वरित बहुत केली मंडपादि प्रतिष्ठा,
धरणिपतिस देवीं ब्राह्मणीं थोर निष्ठा ॥३९॥
देशोदेशींहून ते विप्र येती, । कीर्ती याच्या निज जे आयकेती. ॥
देती गांवीं टाकुनीयां कुटुंबें, । लागे मागें अर्भकांचेंच लोंबें. ॥४०॥
वर्‍हाडी, कर्‍हाडी, बहू खानदेशी, । वर्‍हाडास येती कनोजे, विदेशी ॥
तसे कानडे, कोंकणे, वागलाणे, । महा मस्करे माथुरे, जे शहाणें. ॥४१॥
कित्येक हे येति दशावधानी, । जे कुंडलें हालविताति कानीं. ॥
पदोंपदीं देति महापरीक्षा, । जाली असे सौमिक ज्यांस दीक्षा. ॥४२॥
भजेत कोणी जन माधवाला, । आराधिती एक उमाधवाला, ॥
सेवीत कोणी द्विज अंबिकेला, । नसेच हा वस्तुविवेक केला. ॥४३॥
अपार ते दीक्षितभार येती, । समागमें जे पशु वागवीती. ॥
प्रत्यक्ष दंभप्रतिमाच जे कीं । आस्था नसे हे सदसद्विवेकीं ! ॥४४॥
कित्येक तेथें अजपा जपेती, । अव्यग्र जे उग्र तपा तपेती. ॥
समाधिसेजे द्विज जे निजेले, । पडेति ते कोठुन कर्मजालें ? ॥४५॥
पढेत अध्याय सदा क्रमाचे, । बोलेत जे बोल पराक्रमाचे. ॥
कित्येक तेथें पढताति पांच्या, । कित्येक माळा धरिती जपांच्या, ॥४६॥
कृष्णातीरींहून ते माध्व आले, । ज्यांच्यामागें शिष्यसंभार चाले. ॥
आंगोआंगीं लाविती श्रीशमुद्रा, । ग्रंथोग्रंथीं निंदिती नित्य निद्रा. ॥४७॥
हातीं घेती तीर्थगंड्या, गवाळीं, । चंबू, चंच्या, आसनांचीं चवाळीं, ॥
माथां ज्यांच्या शोभती उंच टोप्या, । विद्या गर्वें वाटती सर्व सोप्या. ॥४८॥
स्वधर्में गोदेच्या उभयपुलिनीं वास करिती,
सदा श्रीकृष्णाच्या चरणयुगुलीं जे विचरती. ॥
सदां चारी वेदाध्ययनरत वेदांत पढती,
तयांचे हे तेथें अतिशयित सन्मान घडती. ॥४९॥
द्विज परम शहाणे, हे महाराष्ट्र येती ।
तदुपरि मग तैशी गोडखे, गुजराती, ।
मिळुनि सकल तेथें मंडपामाजि आले,
सविनय अवघे हे भीमकें पूजियेले. ॥५०॥
हातीं जयांच्या झळकेत झार्‍या, । त्या धोतरांच्या विलसेत धार्‍या, ॥
काशीनिवासी कितिएक आले, । सत्कार त्यांचे बहु फार केले. ॥५१॥
गाणेश, जे शांभव, सौर आले, । एकांत ते एक मिळोन गेले. ॥
जे पुजिति शाक्त विविक्त यंत्रें, । घेती बिर्‍हाडं बरवीं स्वतंत्रें. ॥५२॥
येती पुढें जे जन हे वर्‍हाडे, । मिळेत त्यांला बरवीं बिर्‍हाडें. ॥
राहेत देऊन कित्येक भाडें, । धरूनि कित्येक अपूर्व झाडें. ॥५३॥
कित्येक ते देत असेत बाडें; । फिरेत कित्येक उगीं लबाडें; ॥
आटोपिले मंडप यायजूकीं; । आक्रांदती अंध अनाथ, मूकीं. ॥५४॥
शोभेति वोटे बरवे विटांचे, । समूह जेथें बसती विटांचे; ॥
साध्वी महा सुंदर लोकदारा । ज्यांच्या भयें येत नसेत दारा ॥५५॥
बाजार जारीं बहु वेष्टियेले । बाहेर सच्छ्रोत्रिय काढियेलें; ॥
आलोकिती नित्य परांगनांतें, । लावीत त्यांसीं अनुकूळ नातें. ॥५६॥
येती महादोंदिल मोठपोटे; । भारीपणें हे कितियेक लोटे; ॥
धरून बैसेत वृथा प्रतिष्ठा, । द्रव्यार्जनीं मुख्य धरीत निष्ठा. ॥५७॥
शिष्यांस जे केवळ राबवीती, । जे स्नानसंध्या बहु लांबवीती. ॥
उगाच ज्यांचा पसरे पसारा, । भुलोन गेला मग लोक सारा. ॥५८॥
जेव्हां येती भार नैय्यायिकांचे, । गोळा होती प्राण मीमांसकांचे; ॥
हातीं पायीं फूटती ज्यास जीभा, । जेव्हां तेव्हां बोलतां वाद ऊभा. ॥५९॥
परस्परें शिष्य करीत पृच्छा. । म्हणेत, ‘ तूं बोलसी काय, तुच्छा. ॥
बोलों नको तूं; क्षण एक राहें; । माझा उपन्यास समग्र पाहें. ॥६०॥
बोलेन आतां अनुमान खंडी. । तुम्हांमध्यें हें मत कोण खंडी ? ॥
तर्कांत युक्ती चढती उदंडा, । घेऊं नको व्यर्थ उगा वितंडा. ॥६१॥
काढूं नका ये समयीं कपालें. । याच्या विचारें उठती कपाळें. ॥
हें निग्रहस्थान तुम्हांस आलें; । नैय्यायिकांचें यश थोर झालें. ” ॥६२॥
वदेत मीमांसक योग्यताभरें, । “ वेमातुरी व्यर्थच चक्र वीवरे. ॥
असेत हें केवळ बुद्धिरोधनें; । नसेत कांहीं परलोकसाधनें. ” ॥६३॥
वेदांती म्हणताति, “ शास्त्र बरवें आमूळ आलोडिलें,
त्याचा हा परिपाक आजि दिसता; या पंडितां मोडिलें. ।
कैंचे न्याय ? किमर्थ याग करणें ? संसार हा पारखा.
मिथ्याभूत समस्त जाणुनि तुम्हीं अद्वैत हें वोळखा. ” ॥६४॥
प्रतिष्ठेनें येती कितिक कविराजेंद्र सदना,
जयांच्या पद्यांच्या अनवरत चालेत रचना. ।
तयांचे दाटीनें अपरिमित दाटेत सदनें,
कुरंगाक्षींचीं जे अति चतुर पाहेत वदनें. ॥६५॥
त्यानंतरें अति अलंकृत राजदासी
वाद्यस्वनें निघति बाहिर संपदांसीं. ।
हत्तीवरून चिकसे आणि मोगरेलें
वांटीत जाति नगरांत; अपूर्व जालें. ॥६६॥
आज्ञा नृपें स्ववनितेस हळूच केली.
ते सुंदरीं त्वरित पाकगृहांत आली. ।
रांधून घेत तंव त्या मग रांधणारी,
ज्या धूतलेंच बहु धूतिल हो धुणारी. ॥६७॥
वसेत जेंव्हां तळणें तळाया, । ते अर्भकें धांवति आतळाया. ॥
आकांत होती बहु लेकरांचे । वाजेत तेथें धबके करांचे. ॥६८॥
ठेवूनि शाका वर त्या शिजाया । कढींत घालीत वडे भिजाया. ॥
खोवोन आधीं पदरास पोटीं । नितंबिनी उत्तम डाळी वांटी. ॥६९॥
सुदेवपत्नी अति मंद आली, । भाग्योदयें जे सुकुमार जाली. ॥
असे शहाणी उसळून सोले, । जीच्या करें सूरण फार सोले. ॥७०॥
अत्यंत आणीच विकारल्याला; । उपाय जाणेच विकारल्याला. ॥
करीतसे जे गुण पापडीला; । तथापि जाला श्रम बापडीला. ॥७१॥
तळणवळण केलें, कोरकें सिद्ध जाले.
त्वरित परम तेथें भात हे वेळियेले. ।
रुचिर बहुत शाका फोडण्या देयिजेती.
तदुपरि मग तेव्हां आंघुळी सांगिजेती. ॥७२॥
स्नानें करून मग विप्र समस्त आले.
सत्कारपूर्वक यथोचित बैसवीले. ।
पात्रें सुवर्ण रुचिरें मग मांडवीलीं.
गंधाक्षतें कितियकीं मग चालवीलीं. ॥७३॥
कोशिंबिरी विविध, मीठ, मिरें, मुळेही
तेथील हे त्वरित वाढिति ते मुळे ही. ।
अत्यंत जें रुचिर रोचकतेस आल,
तें वाढिजे कितियकीं अति शीघ्र आलें. ॥७४॥
वाढावया निघति सुंदर त्या सुशीळा,
वीजेहुनी चपळ ज्या चमकेति वाळा; ।
ज्या लोणचीं रुचिर, पापड, पत्रशाका
वाढीत जात असतां भुलवीत लोकां. ॥७५॥
त्यानंतरें विविध ओदन वाढिजेती,
अत्यंत जे निवति ते मग कोढिजेती. ।
शोभेति ते सघृतशर्कर पायसान्नें.
अत्यंत फार पिवळीं बरवीं वरान्नें. ॥७६॥
अत्यंत वर्तुल वडे अरवार भारी
वाढीति त्या गजगती सखवार नारी. ।
ते वोटवे सरवळे आणि मालत्यांला
वाढीत जाति बहु बारिक सेवयांला. ॥७७॥
त्या पोळियांच्या चळथा रचाया । परस्परें बाहति बायका या. ॥
घार्‍य़ा, पुर्‍या, तेलवर्‍या विदग्धा । वाढीत दुग्धें कितियेक मुग्धा. ॥७८॥
वाढीत तेथें बरव्या करंजा । ज्या सुंदरी रांधविती बिरिंज्या. ॥
कोणी घड्या घालून मांडयांच्या, । नेती पराता मग सांडयांच्या. ॥७९॥
मुखेंदु हे निंदिति आरशांला, । त्या काय नेणते अनारशांला ? ॥
नितंबपर्यंत पडेत वेण्या । त्या सुंदरी वाढितसेत फेण्या. ॥८०॥
जेव्हां घृतान्त परिवेषण सर्व जालें,
आपोषनादि मग कृत्य समग्र केलें. ।
पंक्ती अनेक बसती विविधप्रकारा
बाळा तथापि करिती बहु येरझारा. ॥८१॥
जेथें नद्या लोटति या घृतांच्या
दह्यां, दुधांच्या, मधुरा मधाच्या; ।
पडेत हे पर्वत शर्करांचे,
लोपोन गेले रव कर्करांचे. ॥८२॥
मागेत कोणी द्विज ते फराळा. । आरंभिती पाक किती निराळा. ॥
भक्षीत कोणी मग ते हविष्यें; । तसींच त्यांचीं असती भविष्यें. ॥८३॥
कितियक सुख तेथें स्वीय जिव्हेस देती.
अनियत हरिनामें भक्त कित्येक घेती. ।
विविध परम होतो नामसंघोष जेथें;
घडिघडि बहु देते भीमकी कान तेथें. ॥८४॥
सहज निजजिवाचा जीव जो अंतरींचा,
निशिदिवसच लागे वेध त्या श्रीहरीचा. ।
अनिश हृदय तीचें तत्स्वरूपाभिलाषी;
मुखकमल तयेचें तद्रुणौघाभिलाषी. ॥८५॥
करजळ पुतळ्यांतें नित्य चोरून पाहे;
परि निजजननीचा अंतरीं धाक वाहे. ।
घडिघडि करिते जे प्रश्न विप्रश्निकांला.
हळुच मग निवारी बंधुसंबंधिंकांला. ॥८६॥
क्षितिवरि पदरेसीं नित्य निद्रा करीते.
व्रत नियमतपस्या अंतरीं आदरी ते. ।
स्वन जंव अजिरीं हे आयके वायसाचा,
उठुन कवळ त्यातें धालवी पायसाचा. ॥८७॥
न वदति सखयाही सर्वथा तत्प्रसंगीं.
श्रमित बहुत जाली अंग टाकी पलंगीं. ।
परम विकळ बाळा फार चिंता करी ते,
अनिश यदुपतीचे पाय जे आठवीते. ॥८८॥
महा विश्वासाचे निलय बहु आनंदलतिका;
द्वितीया हे तैसी अतिचतुर शृंगारकलिका. ।
सख्या दोहीं भागीं वसति सरसा सावधपणें.
कनिष्ठेच्या वक्राभिमुख करिजेतें मुख यिणें. ॥८९॥
अद्यापि वैकुंठनिवासयेना; । तेथून त्याचें मन हें निघेना; ॥
लग्नास तों रातिच आड आहे; । करीच ना ईश्वर कां कृपा हे ? ॥९०॥
जाली असे हे प्रतिकूळ गौरी, । ह्मणोन हा काय न येच शौरी ? ॥
अत्यंत दैवेंकरि हीन जालें, । ह्मणोन ये दीनदशेस आलें. ॥९१॥
हरून माझ्या जिवसावजाला. । तो आजि कैसा हरि साव जाला ? ॥
आतां कशाची मज जीवनाशा ? । जालें असें सन्मुख जीव - नाशा. ॥९२॥
जो द्वारके ब्राह्मण पाठवीला । अद्यापि नाहीं परतोन आला. ॥
जे भक्त कृष्णाप्रति पावताती । फिरोन ते काय घरा न येती ? ॥९३॥
वाटेस अद्यापि असे निजेला ? । किंवा घरींहून नसेच गेला ? ॥
कीं द्वारकेची पदवी न चाले ? । कीं कृष्ण जातांच विरुद्ध बोले ? ॥९४॥
प्रत्युत्तरें हे न सुचेत याला ? । किंवा सभाक्षोभ तयास जाला ? ॥
किंवा निषेधी वसुदेवदेवा ? । सक्रोध संकर्षण हा वदे वा ? ॥९५॥
कीं लागला वैदिक तो गुणाया ? । कीं लुब्ध जाला भगवद्गुणां या ? ॥
त्या संपदा देखुनि थोरथोरा । कीं गुंतला ब्राह्मण पाहुणेरा ? ॥९६॥
किंवा बसे नित्य करीत इष्टी ? । कीं चालतां श्रोत्रिय होय कष्टी ? ॥
स्वाभाविक च्छांदस वृत्ति ज्याची । पाहातसें व्यर्थच वाट त्याची. ॥९७॥
जेथें नसे आदर नारदाचा । कदापि यो योगविशारदाचा, ॥
अद्यापि जेथें शुक बैसला, गे; । हा विप्र कोणे लगडेस लागे ? ॥९८॥
तथाइ तो बंधु अकीचनाचा । प्रसिद्ध हे शास्त्रपुराणवाचा ॥
हा येक विश्वास असे मला, गे; । परंतु मार्गीं हरि हा न लागे. ॥९९॥
त्या देवकी आदिकरून राण्या । निषेधिती काय महा शहाण्या ? ॥
कृष्णार्थ कृष्णास पडेत गुंते ? । कीं योगियांच्या हृदयांत गुंते ? ॥१००॥
कीं पूर आला बहु आपगेला ? । कीं आडवा येऊनि साप गेला ? ॥
किंवा रथाचें युग भग्न जालें ? । कीं पांखरूं आजि उडोनि गेलें ? ॥१॥
किंवा जिजे शेषविशेषतल्पीं । कोणे तयानें उठिजेल कल्पीं ? ॥
किति तरी येथुन वाट पाहों ? । आकल्पपर्यंत असीच राहों ? ॥२॥
येकीकडे लौकिक सर्व ठेवूं । निर्लज्ज लोकांत म्हणोन घेवूं ? ॥
कीं द्वारके धाडुन जीव देवूं ? । कीं पक्ष लावून उडोन जाऊं ? ॥३॥
नृपतिकुळकळंका म्यां तुझें काय केलें ?
यथवरि शिशुपाळा का वृथा आणियेलें ? ।
तुजजवळि पडे हे चालि नीचा जनांची.
निपटच हळवारे वृत्ति तूझ्या मनाची. ॥४॥
कळत कळत घेसी जीव या मानवांचे.
तुजजवळि भल्यंचा काय सन्मान कांचे ? ।
अति विमळ कुळीं ये भूत निर्माण होसी.
शिव, शिव ! भगवंता जाब हा काय देशी ? ॥५॥
पदीं श्रीकृष्णाचे अविरत मनोवृत्ति विवरे.
वियोगें त्याच्या हा क्षणभरि मला धीर न धरे. ।
रहावी हे माझीं यथुनि अवघीं हीं व्यवसितें.
कितेकां या देवां विविध नवसांतें नवसितें. ॥६॥
गणाधेशा जे जे स्मरति तुज संकष्टसमयीं,
पहा, ते ते होती मनुजजन आजन्म विजयी. ।
कुमारा गौरीच्या, ह्मणुन विनवीतें तुज बरें.
चतुर्थी तूझ्या मी करिन अवघ्या थोर गजरें. ॥७॥
असो हें काठिण्य क्षितिधरकुळोत्तंसकुल जे.
वदों वारंवार प्रकट तुजसीं काय तुळजे ? ।
न सोसे कांहींही शिवसुरत सप्रेम लतिके,
तुला तों नाहीं हा अनुभव, शरीरार्धपतिके. ॥८॥
उदारा मल्लारी, अति विषय चिंतानल हरीं.
कृपापारावारा, प्रकट करिं कारुण्य लहरी. ।
सहस्त्रा खंडींचा तुजवरिच भंडार उधळीं.
करावे त्वां ऐसें झडकरि पडें यादवकुळीं. ॥९॥
हनूमंता, विश्वप्रणितचरिता, अंजनिसुता,
महावीरा, धीरा, कपिकुळवरा, वायुकुमरा, ।
कृपावंता, आतां वडवडित पावेसि मजला,
वड्यांचीही माला रुचिरतर वाहीन तुजला. ॥११०॥
स्वकीय स्वामीसीं अतिनिकटता केवळ तुझी.
नियोज्या रामाच्या, मज न मनि सीतेहुन दुजी. ।
अयोध्येचा राजा, विभु, अवतरे यादवकुळीं;
तयाचे हें गुंते हृदय सगुणा अंघ्रिकमळीं. ॥११॥
महाभाग्यें रामासदृश तुजला स्वामी गवसे.
तयालाही ऐसा तुजसम दुजा सेवक नसे. ।
अनुज्ञेनें त्याचे झडकरि महासिंधु तरसी.
कसा लंकेमध्यें त्वरित मजसाठीं उतरसी ? ॥१२॥
अशोकाचे मूळीं पतिचरणचिंताकुळ असें
कपटयें तेथें तूं वचन वदसी येऊनि बसें. ।
अभिज्ञे ! रामाचा नियत समजें दूत मजला;
तयाचे हे मुद्रा अभिनव अभिज्ञान तुजला. ॥१३॥
अरे, जे जे काळीं परम मजला संकट पडे,
तुझी ते ते वेळे नियतच उडी येऊन पडे. ।
अनेकां दुःखांचा त्वरित बहु निस्तार करिसी.
कसा ये संकष्टीं बहुतच मला तूं विसरसी ? ॥१४॥
महा विश्वासाचे अति चतुर श्रृंगारकळिके,
सुमध्ये, मध्यस्थे, कुसुमशरनालीकनळिके, ।
प्रसंगीं ये येथें सकळ तुमचा भाव कळला.
दुराचारी रुक्मा निपट, सखिये, हा बिचळला. ॥१५॥
सये हा पुष्पेषु प्रकट निज कोदंड चढवी.
धनुर्विद्या यातें कवण, सखिये, वीर पढवी ? ।
जया या मूढातें निपटच पहा माय न कळे;
शहाणे, हा कैसा अजुनि तुज संबंध नुकले ? ॥१६॥
पहातां हा माझा मजच हृदयीं प्रत्यय न ये.
वदों कोणापाशीं सहज सपनींचें सुख सये ? ।
धरी बाहे, बाहे यदुपति; अये, जे अवसरीं.
पहा तेव्हां दुःखक्षितिधर पडे सर्व विसरीं. ॥१७॥
यिच्या या बोलांनीं मग सहचरी हे दचकली.
म्हणे, “ कांहीं, बाई, तिळभरि नसे चूकि पडली. ।
अभंगक्षोभें या सहज पडसी थोर व्यसनीं.
वदों, पाहें, कांहीं धरिसि जरि विश्वास वचनीं. ॥१८॥
दुराशेच्या, बाई, निरुपम खळाळीं मन पडे.
वितर्कावर्तीं या उमज तुजला कोठु घडे ? ।
अविश्रांते, आतां उठुन, सखिये, बैस सरसी.
अकस्मात स्वीयप्रकृति अवघी हे विसरसी. ॥१९॥
अये, पाहें आहे उपजत मला संगति तुझी.
नसे कांहीं आलें अपरिचित बाहेरुन दुजी. ।
कसा झाला आहे, सखि, उभयत: पाश मजला.
फुकाचें हें होतें विधुर वदतां काय तुजला ? ॥१२०॥
परद्वारी पूर्वींपसुनच महा चाळक असे;
जयाचे ये छाये जवळुनि सती वागत नसे. ।
अवो, तूं कोणाचे उपजसि, सये, आजि उदरीं.
कसा हा बांधेसी प्रकट खदिरांगार पदरीं ? ॥२१॥
गुणज्ञे, रंभोरू, प्रकृतिकमनीये, गुणवती,
तुझ्या या बंधूच्या सकळ तुज हांसेत युवती. ।
पवाडे कृष्णाचे भुवनतळविख्यात असती.
हठें, बाई, कैसी धरूनि बससी गोष्टि नसती. ॥२२॥
अनात्मज्ञे, आतांपसुनच तुला वेड पतिचें.
महासोसाची, गे, गुरुभय न मानीस रतिचें. ।
नरेंद्राचें कन्ये, कवण शिकवी बुद्धि तुजला ?
सुखें आतां रागेजसिल तरि रागेज मजला. ॥२३॥
विचारें या व्हावा निखिल निज राज्यांत वळसा.
चढे, बाळे, कैसी असरळ तुझी बुद्धि कळसा ? ।
कदाचित् हे वार्ता, कमळमुखि, कोठूनहि फुटे;
घरामध्यें तेव्हां अभिनव अनर्थांकुर उठे. ॥२४॥
मिळाले हे पृथ्वीवरिल, सखि, राजन्य अवघे.
कसे वेडे, मूके, बधिर आणि विद्रूप अवघे ? ।
कशाला हा आह्मां अतिशय, सये, आवडि बरी.
बरें जालें हें ही अति चतुर सज्ञान नवरी. ॥२५॥
अवश्यं भावीं हें सहज जरि होणारच असे,
अयत्नेंही तूझ्या करकिसलयीं येउन वसे. ।
महा धीराची तूं; निपट तकवा सोडिसि कसा ?
उतावेळी होसी म्हणवुनि तुटे हा भरंवसा. ” ॥२६॥
सखीच्या वक्त्रें हा गरळमय पर्जन्य पडला;
अहो किंवा उल्काशतपतनसंस्कार घडला. ।
जर्‍ही हे कांहींही विधुर न वदे वारिजमुखी,
महाप्रस्तावीं ते तदपि पडलीसे बहु सखी. ॥२७॥
दगदली वदतां बहु भीमकी. । न समजे कुसुमायुध पातकी. ॥
उपचडे सुटती तिजला बहू; । शयनिचीं सुमनें खुपती मऊ. ॥२८॥
निपट हा तकवा हिजला नसे. । उठुन ते शयनावरती बसे. ॥
बहुत जे बरळे विविधापरी, । सुख नसे सहसा जिस अंतरीं. ॥२९॥
“ भुवननायक, कंजविलोचना, । गरुडवाहन, शोकविमोचना, ॥
रुससि कां मुरलीधर, माधवा, । मदनमोहन, गोकुळबांधवा. ॥१३०॥
व्रजपती, जपती तुज गोपिका । अझुणि तेथुनि, नंदकिशोरका. ॥
नरहंरी, शरणागतवत्सला, । परतसे अथवा निज गोकुळा ? ॥३१॥
अझुनि गुंतसि गोधनदोहना ? । परम व्याकुळ मी, मनमोहना. ॥
मुरलिवादनिं तादृश हे सवे; । परि तुझें वय हें तयिंचें नव्हे. ॥३२॥
उबगती सखिया निजजीविता; । न पवती कुळिंच्या कुळदेवता; ॥
जनक हे जननी मजला नसे; । यदुपती मज आस तुझी असे. ॥३३॥
अवस, रे, बहु होय मला तुझी. । परिणिसी नवरी अथवा दुजौ. ॥
जर्‍हि असें नृपनायककन्यका । तर्‍हि तुझी हरि होइन दासिका. ॥३४॥
जरि तुवां मन येथुन काढिजे । यमपुरा तरि आजचि धाडिजे. ॥
गति नसे तुजवांचुन अन्यथा; । निरसता करिसी नसती वृथा. ॥३५॥
घडिघडी बरळे असि भीमकी, । चतुर जे सकळा गुणिं नेटकी. ॥
यदुपुरीपथ साशय जे पुसे, । न कथितां सखियांवरती रुसे. ॥३६॥
सहचरविचनें सलती जिला । कवण आणिक हे शिकवी तिला ? ॥
घरिंहुनी क्षण येक न हालली । तदपि ते मग बाहिर चालली. ॥३७॥
अति चतुर वयस्या आडवी तीस आली.
धरुन हळुच हातीं भीमकी चालवीली. ।
तदुपरि पथ दावी माधवीमंडपाचा.
हरिविण बहुवारा होय ईच्या जिवाचा. ॥३८॥
प्रमदविपिनगर्भीं वेदिका कांचनाची.
तिजवरि बसविली कन्यका भीमकाची. ।
निजकरकमळीं जे वक्रचंद्रास ठेवी;
व्रत नवजलदाचें लोचनद्वंद्व सेवी. ॥३९॥
मुररिपु, अवतारी, जो महा मूढ तारी,
हरहृदयविहारी, केशव क्लेशहारी, ।
सकळजनविसांवा द्वारकाधीश आहे.
पुनरपि मग त्यास्सी वक्र बोलोन पाहे. ॥१४०॥
सकरुण विलपें मी, माधवा, केधवांची,
त्यजुन सकळ आशा आपुल्या बांधवांची. ।
यदुपति अडल्यांचा सारथी तूंच होसी;
क्षणभरि परि येथें, श्रीहरी, कां न येसी ? ॥४१॥
न समजत गजेंद्रें काय हें काय केलें ?
अढळपद ध्रुवातें काय जाणोन दिल्हें ? ।
दशविध हरि जन्में अंबरीषार्थ घेसी.
झडकरि गणिकेला स्वीय सायुज्य देशी. ॥४२॥
सकळ नृप पहातां पार्थसारथ्य केलें,
यदुपति तुज तेथें काय हातात आलें ? ।
क्षणभरि मजसाठीं येथपर्यंत येतां,
अभिनव पडलें, रे, थोर कोडें, अनंता. ॥४३॥
यदुपति तुजसाठीं मीच मासीण जालें;
अकथित कमठीच्या मीच पोटास आलें; ।
अति विकट वराहा मीच जालें वराही;
तदुपरि नरसिंहा होय मी नारसिंही. ॥४४॥
अभिनव तुज रामा मीच रामावतारीं;
प्रकृतहि तुजसाठीं भीमकाची कुमारी. ।
क्षणभरि मज, कृष्णा, आठव्या, नाठवीसी;
व्रजयुवतिसहस्त्रें अंतरीं सांठवीसी. ॥४५॥
स्वकीयांभक्तांचे निरुपम महा वेड तुजला;
असे, हें, श्रीकृष्णा, अविदित असे काय मजला ? ।
मदीय प्रारब्धें स्मरणहि फुकाचें तुज नव्हे.
कृपाळा, हे लागे अभिनव तुला कुठुन सवे ? ॥४६॥
निजध्यासें तूझ्या न समजति संसाररचना,
सदा वेडे होती, अनुसरति तूझ्याच वचना, ।
तुला गाती, ध्याती, अनिश भजती, भाविकपणें,
तयांचें तूं कृष्णा, क्षणभरि पडों नेदिस उणें. ॥४७॥
महाबाहो कृष्णा, परमपुरुषार्थैकनिलया,
तुझ्या नामें जाती सकळहि महा दोष विलया. ।
रथांच्या कोटींनीं विविध बिरुदें जात नसती,
घनःश्यामा, तेंही प्रकृत मज निःसार दिसती. ॥४८॥
पिता, माता, भ्राता, सखिनिवह वंचून, तुजला,
मुखें या विप्राच्या यथिल अवघा भेद दिधला; ।
अशी मी हे तूझी परम अपराधीणच असें.
न योजे हें, कृष्णा, अझुनि तुज पत्रोत्तर कसे ? ॥४९॥
अति स्नेहाळें हे जनकजननी राहति उगीं.
भयें या बंधूच्या फिरति सुहृदयें आजि अवघीं. ।
वृथा या एकांती सकळ सखिया गांजिति मला.
अवस्था माझी हे यथिल समजे कोठुन तुला ? ॥१५०॥
सदा वेदाभ्यासी द्विजपति तुझा मार्ग चुकला ?
तुला येतां मार्गीं गरुड अथवा काय थकला ? ।
निषेधी हा किंवा हलधर तुझा सोदर तुला ?
कृपापारावारा, परम पडलें संकट मला. ॥५१॥
पृथेच्या पुत्रांचा अससिल हरी केवळ ऋणी.
तयंची हे बाहू तिळभरि पडों नेदिस उणी. ।
अरे धर्माचेथें श्रमसि बहु निष्कारण वृथा.
सदा उच्छिष्टांच्या उचलिसि असंख्यात चळथा. ॥५२॥
प्रतिष्ठा वैकुंठीं निरतिशय तैसी मिरविसी;
रथाचे पार्थाच्या अनवरत घोडे फिरविसी. ।
मुरारे, पार्थाचें श्रमसि बहु सारथ्य करितां
न वाटे हे लज्जा करकिसलयीं दोर धरितां. ॥५३॥
विचारें, श्रीकृष्णा, दिससि मज तूं थोर निकसी.
जनामध्यें येणें करुनि निजधर्मास मुकसी. ।
ऋजुत्वाची कैसी निपटच, हरी, वाट चुकसी.
अरे, कोठें हें तूं परमशठपांडित्य शिकसी ? ॥५४॥
हरे कृष्णा, नारायण, नरहरे, आदिपुरुषा,
तुझ्या तों पायांसीं वचन न वदे पापिणि मृषा. ।
प्रतापी हे राजे मिळति अवघे कुंडिनपुरीं;
नृपव्याघ्रा, कांरे बससि उगला जाउनि घरीं ? ॥५५॥
अवज्ञेनें बोलें कितियक हिणावून वचनें;
अशा या बोलाचा अनुचित मनीं राग धरणें. ।
व्रजस्वामी, आम्ही कपट न पढों राजदुहिता.
विलंबे या तूझ्या बहुत पडला जीव दुचिता. ॥५६॥
तुझ्या या पायांसीं प्रथम सलगीनें वदतसें.
मनामध्यें तूझ्या व्रजयुवति दाठींतहि धसे, ।
मसीं आतां, कृष्णा, तिळभरि दुजाभाव न धरीं.
समीक्षाभिक्षेनें प्रणतजनसंभावन करीं. ॥५७॥
फुकाचे दासीतें अनुचित उदासीन धरणें.
समर्थें रंकासी असदृश असा रोष करणें. ।
अकस्मात स्वामी मन विषयगर्वांतुन उठे.
तुझे भेटीसाठीं निशिदिवस माझा जिव फुटे. ॥५८॥
जिवें-भावें कृष्णा, शरण तुज आलें यदुपती.
न व्हावें हें हांसें म्हणुनि करितें तूज विनती. ।
तुझ्या वेडा लागें, सहज निजकर्तव्य विसरें.
अकर्तव्याची हे प्रकृत पदवी ही अनुसरे ॥५९॥
नये कोण्हा हातीं, यदुपति, समाचारहि तुझा;
असे झाला माझा ह्मणुन मजला जीव अवझा ।
महाप्रस्थानाचे अनुभवुन संक्लेश पुरते
तुझे भेटीसाठीं पुनरपि हरी प्राण परते. ॥१६०॥
अरे, तूझें नाम स्मरण करितें अंतसमयीं.
सुखें राहें, कृष्णा, यथुन पुरता होय विजयी ! ।
वियोगें या तूझ्या नियत जरी लोकांतर मला;
अरे याची पृच्छा सहजच पडे केवळ तुला. ॥६१॥
परित्याग स्त्रीचा कवण पुरुषार्थी नर करी ?
असें हें श्रीकृष्णा, अपयश शिरीं वीर न धरी. ।
उसासा हे टाकी सुकृतरससारांश विघडे,
अनेका हिंसची सहज मुरकुंडी वरि पडे. ॥६२॥
अरण्यीं श्रीरामें अवगणुन सीतेस त्यजिलें,
जगामध्यें कोणें समुचित असें त्यास म्हटिलें ? ।
पदीं श्रीरामाच्या दृढतर महादोष विलगे;
कसा या दोषाचा दशरथकुळीं डाग न लगे ? ॥६३॥
पहातां त्वन्मार्ग, त्रिभुवनपती, नेत्र शिणती.
कृपासिंधू, स्वामी, कवण तुजला लोक म्हणती ? ।
तुझें हें पाषाणें हृदय बहुधा आजि घडिलें.
कठोरत्वें किंवा अतिकठिण आमूळ मछिलें. ॥६४॥
सवे, माझ्या दुःखें उपवन लता या दुखवती.
पहा, हे पक्षी हा वदनगत चारा विसरती. ।
विलापें या माझ्या द्रवति बहु पाषाण, सखिये.
शठांचा, हा बाई, मुकुटमणि अद्यापिहि न ये. ॥६५॥
इच्या बक्रांभोजापसुन सज वाग्वाण सुटती,
मनीं श्रीकृष्णाचे अति तिखट जाऊन बसती. ।
असे जाला तेणें क्षणभरि अति व्याकुळ हरी.
प्रियेच्या आक्रंदें किमपि न सुचे ते असवरीं. ॥६६॥
कथा हे कृष्णाची सकळजगदानंदजननी,
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुमनीं; ।
प्रसंगें श्रोत्यांचे सकळहि महादोष हरती,
यदूत्तंसप्रेमें विषयरसगोडी विसरती. ॥१६७॥
इतिश्रीमद्भगवद्भक्तपदानुरक्तकविसामराजविरचिते रुक्मिणीहरणकाव्ये रुक्मिणीविलापो नाम षष्ठःसर्गः ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP