सर्ग पांचवा

` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.


महापुण्यें राहे जलधिजठरीं हेमनगरी,
धरी जे सद्भावें त्रिभुवननिधानास उदरीं; ।
तिच्या द्वारा आला द्विजवर महासंभ्रमभरें,
कपाटें रत्नांचीं विलसति जयेलागिं रुचिरें. ॥१॥
फरा जिला द्वादश योजनांचा, । आधार जे केवल सज्जनांचा, ।
प्राकार जे सात धरीत आहे, । क्षणेक हा तीजकडेच पाहे. ॥२॥
जे देखिली केवल कांचनाची । कृतार्थता होय विलोचनांची. ॥
प्रवेशही ते नगरींत केला; । जन्मांतरीय श्रम सर्व गेला. ॥३॥
असे तया सप्त पुर्‍यांसमाना; । उत्कृष्ट सर्वांहुनि ईस माना. ॥
प्रत्यक्ष जेथें भगवंत नांदे, । सौभाग्य हे याहुनि काय लाधे ? ॥४॥
वाहे जिचा उत्कट धाक लंका, । धरीत आहे अलका कलंका, ॥
जे लाजवीते अमरावतीला, । हा आदरी यादवराव तीला. ॥५॥
जेथें निधींच्या करिजेत पोती, । कल्पद्रुमांची तरि होय खोती, ॥
घरोघरीं पाळिति कामधेनू, । संपत्ति हे याहुनि काय वानूं ? ॥६॥
लोटांगणीं येति महासमृद्धि, । लोळेति दारीं अणिमादि सिद्धि. ॥
पावोनि अत्युत्कट संपदा या । चुकेतना जे निजसंप्रदाया. ॥७॥
बिदोबिदीं लोटती तें प्रवाळें; । खेळेत मुक्तागण विप्रबाळें. ॥
जेथें नसे आदर माणिकांचा, । विचार कैंचा परि आणिकांचा ? ॥८॥
पाहोनि नानाविध आपणांतें । कृतार्थ मानी द्विज आपणातें. ॥
चहूंकडे केवल जातरूपें; । कदापि दृष्टी न पडेच रूपें. ॥९॥
संपन्न चिंतामणिसंदुकांनीं । बसेत सौदागर ते दुकानीं. ॥
अधिष्ठिती तत्सुदती सज्यांला, । अनेक मुक्ताफळघोंस ज्यांला. ॥१०॥
वाजेत हे ताल मृदंग वीणा; । नाचेत त्या नृत्यकलाप्रवीणा. ॥
सबाळ कृष्णांघ्रिसरोरुहार्चा, । करीत तच्चित्रचरित्र चर्चा. ॥११॥
वाटाबिही नामभरें अटाळ्या, । पौरांगना वाजवितात टाळ्या. ॥
घरोघरीं उत्सव केशवाचा । गोविंद, दामोदर, हेच वाचा. ॥१२॥
संमर्द जेथें भगवत्कथांचे, । जे हे समुत्पादक सत्पथांचे. ॥
उठेत नाना ध्वनि आरत्यांचे, । कळेत ना पार अपार त्यांचे. ॥१३॥
संवाद होती शुकसारिकांचे । अखंड वैदांतिक कारिकांचे. ॥
ठेवूनियां मस्तक योपिदंकीं । कपोत हुं कार करी विटंकीं. ॥१४॥
द्विज नगर पहातां भ्रांत होवोनि गेला;
चुकत चुकत दैवें राजचौकांत आला. ।
सभय यदुपतीच्या पावला द्वारपाळी,
हरिजवळि जयाला नेइंजे द्वारपाळीं; ॥१५॥
निरुपम तंव देखे बाग, पीयूषवापी;
हरिगुण पिक गाती; नाचती ते कलापी; ।
सहजच ऋतु साही होति येकत्र गोळा,
कधिंहि न समजे हा पाउसाळा, उन्हाळा. ॥१६॥
तशी असे अंगणभू नृपाची, । बसेत जेथें अति सज्ज पाची. ॥
उठेत जेथें जलयंत्रधारा, । देवांगना नाचति निर्विकारा. ॥१७॥
गंधर्व जेथें करिताति गानें, । स्वर्लोकवासी धरिती विमानें, ॥
मेळा मिळे उत्कट किन्नरांचा, । करी महा आदर तो नरांचा. ॥१८॥
झुलेत ऐरावतकोटि जेथें । उच्चैःश्रवे काय नसेत तेथें ? ॥
स्थळीं स्थळीं युद्ध करीत जेठी, । नरेंद्रही घेउनि येति भेटी. ॥१९॥
चहूंकडे रत्नजडीत जोतीं; । गोपानशीला अगणीत मोतीं. ॥
अशी असे राजसभा विशाला; । चंद्रासही स्पर्शति चंद्रशाला. ॥२०॥
वातायनें शोभति इंद्रनीलीं, । दिगंतरें भासति सर्व नीळीं. ॥
तशा हिर्‍यांच्या घडितां चिर्‍य़ांच्या । परंपरा शोभति पायर्‍य़ांच्या ॥२१॥
तदुपरि जंव वेंधे विप्र सोपानपंक्ती,
झडकरि तंव चारी आडव्या येति मुक्ती; ।
ढकलुनि परत्या त्या, तो पुढें चाललासे.
हरिचरणसरोजीं जीव हा ठेविलासे. ॥२२॥
जय, विजय उभे हे त्या सभाद्वारदेशीं;
म्हणति, ‘ कवण येतो हा विचारा विदेशी. ’ ।
क्षणभरि परि कांहीं त्यांकडेही न पाहे;
मुनिजनहृदयाचें लक्ष्म लक्षीत आहे. ॥२३॥
सिंहासनीं श्यामल तेज भासे । देखोन जें यास निगूढ हांसे. ॥
द्विजागमाचा हरि हेतु जाणे । अक्रूरहस्तावरि हस्त हाणे. ॥२४॥
सुरासुरांची मग दाटि देखे; । पदप्रणामीं बहु होति बाखे, ॥
घेती किरीटांवरि वेत्रयष्टी । तथापि शौरी न पडेच दृष्टी. ॥२५॥
स्वर्लोकलोकाधिप वज्रपाणी । राहे उभा घेउनि तत्कृपाणी; ॥
तसाच तेथें यम दंडधारी । यथोचितस्थाननिदेशकारी; ॥२६॥
आणीतसे तो मग पाशपाणी । कृष्णास गंडूषविधीस पाणी; ॥
उपायनें धेय मनुष्यधर्मा । कदा चुकेनाच मनुष्यधर्मा; ॥२७॥
कृशानु तांबूलकरंक वाहे; । पतद्गृही नैरृत घेत आहे; ॥
हा वायु जेथें व्यजनास वारी; । ईशान हा राजसभाधिकारी; ॥२८॥
सहस्रपत्र स्फुट होय जैसें । कलाधर च्छत्र धरीच तैसें. ॥
जे सात्यकी उद्धव भक्त भारी, । ते चामरें वारिति निर्विकारी. ॥२९॥
हरीत ज्या इंद्रकिरीटशोभा । त्या पादुकांचा गरुडास डांभा. ।
गणेश घे रत्नजडीत आसा । उभा असे टाकित जो उसासा. ॥३०॥
अमात्यचूडामणि हे हरीचे, । जे येक रत्नाकर चातुरीचे. ॥
चहूंकडे सर्व उभे रहाती, । तटस्थ गोविंद पदें पहाती. ॥३१॥
विलक्षणा तेथिल राजरीती, । देवांसही मानव नादरीती ! ॥
हा विप्र येणें अति भीति वाहे, । मधें मधें थोकत येत आहे. ॥३२॥
कृष्णास दृग्गोचर विप्र झाला; । तत्काल खालें उतरोन आला. ॥
सस्नेह वत्साप्रति गाय धांवे, । तसाच भक्तांप्रति देव पावे. ॥३३॥
पीतांबराचा बहु घोळ लोळे; । आकर्णपर्यंत विशाल डोळे; ॥
आपाद कंठीं वनमाळ घाली; । ते सांवळी सन्मुख मूर्ति आली. ॥३४॥
द्विजास तेव्हां न सुचेच कांहीं । पडे महानंदरसप्रवाहीं; ॥
स्तवी चतुर्वक्त्र जयास बंदी । तो कृष्ण त्याचे मग पाय बंदी. ॥३५॥
अर्धासनीं आणुनि बैसवीला, । यथाविधीनें मधुपर्क केला. ॥
ब्रह्मादिकां जो हरि वोचकेना, । तो आजि याच्या उचिता चुकेना. ॥३६॥
अपूर्व वाटे सनकादिकांला, । तसें वसिष्ठादिक वैदिकांला. ॥
एतत्कृपागर्व महा वहाती, । परस्परें ते वदनें पहाती. ॥३७॥
सुदेव नामा द्विज माज सोडी, । तें भीमकीचें मग पत्र काढी. ॥
म्हणे तया श्रीहरि, ‘ राहवावें; । क्षणांतरीं हें मज दाखवावें. ’ ॥३८॥
द्विज परम शहाणा हा महा बोलकाही,
परि निपट निघेना त्या पुढें बोल कांहीं. ।
घडिघडि जिभ जेथें चावळे वाक्पतीची,
रदबदल न चाले सर्वथा दिक्पतींची. ॥३९॥
तदुपरि मग सायंकाळिंचा तास वाजे,
विविध रुचिरवाद्यध्वान गंभीर गाजे. ।
अगणित मग येती दीपधारी, हिलाली,
यदुपतिनमनीं हे पंक्ति ज्यांची कलाली. ॥४०॥
बहुत जवळि आली हे समुत्थानवेळा
म्हणउनि विनयें हा षण्मुखें अर्ज केला. ।
यदुपति उठतां हे वारि होऊं निघाली,
तदपि कितियकांची दाटि अत्यंत झाली. ॥४१॥
कषति परम जेथें अंगदें अंगदांसीं,
अपरिमित तशीं हे आयुधें आयुधांशीं. ।
विलुठति पदपीठीं देव कोटीनुकोटी,
अहमहमिकतेनें धांवती वीर कोटी. ॥४२॥
क्षणभरि तंव तेथें विप्र साशंक पाहे,
झडकरि कर त्याचा सात्यकी घेत आहे. ।
तदुपरि अवरोधद्वार किंचिद्विलंबें,
यदुपति मग पावे पार्थह्स्तावलंबें. ॥४३॥
दाशार्ह हे अनुसरेत तया नृपातें; । संभाविलें मग यथोचित दृष्टिपातें. ।
अंतःपुर प्रविशतां मधुकैठभारी, । सर्वांसही अति निषेधति वेत्रधारी. ॥४४॥
संध्यामंडपमार्ग दावित असे मुख्य प्रतीहारिका.
‘ यावें, श्रीहरि ! कृष्ण ! यादवपते ! ’ हें बोलती सारिका. ।
संध्यावंदन आदरें करुनि जों गेला असे भोजना,
विप्राची तंव नारदें हळुच ते केली असे सूचना. ॥४५॥
झडाकरि जगदीशें विप्र तो आणवीला,
अति सुरभि फुलेलें आदरें न्हाणवीला, ।
तडप रुचिर लाखी उंच हा नेसवीला,
सविनय मग पंक्ती आपुले बैसवीला. ॥४६॥
तदुपरि मग पंक्ती बैसती यादवांच्या,
द्विजपरिणत जेथें बोलती वेदवाचा. ।
फिरति बहुत तेथें देवदासीसहस्त्रें,
सहजच निजतेजें वारिती जे तमिस्त्रें. ॥४७॥
कितिक मग बसाया देति या हेमपीठें,
कितियक मग तेहें मांडिती रत्नताटें, ।
कितियक तरळा या लाविती दीपमाळा,
कितियक मग तेथें वाडिती त्या सुशीला. ॥४८॥
हलधर हरि दोघे बैसती येक ताटीं,
त्वरित बहुत आली माय हे त्यांजसाठीं; ।
सकल युवतिमान्या देवकी देवमाता,
पुनरपि निजहस्तें वाढिते जे अनंता. ॥४९॥
क्षणभरि मग दारा येति त्या राजदारा,
अति रुचिर पदार्थां वाढिती ज्या उदारा. ।
हळुहळु सकळांचीं भोजनें सांग होती,
कनकघटित तस्तें दासिका आणविती. ॥५०॥
सुरभिसलिल देती कस्तुरी आंचवाया,
स्थविर तदपि लागे मृत्तिका चांचपाया. ।
अभिनव नवलें या हांसती देवदासी,
हळुच मग दटावी ते दरोगीण त्यांसी. ॥५१॥
अति रुचिर विड्यांची प्राप्ति सर्वांस झाली,
द्विजपतिस अनुज्ञा उद्धवें देववीली. ।
यदुपतिजनकाची जे असे होमशाळा,
क्षणभर मग तेथें स्वाप जाऊन केला. ॥५२॥
निजेल्याही रामायण आणि महाभारत पढे,
मधेमध्यें नामस्मरणमहिमा त्यावरि चढे. ।
महाध्यानाभ्यासीं स्थगित मग राहे क्षणभरी,
मनामध्यें येती हरिपदसुखांभोधिलहरी. ॥५३॥
भरें हा निद्रेच्या द्विजपति निजेला जंव असे,
त्यव्हां हा येऊन प्रभुवर तया संनिध बसे. ।
मनस्वी, विश्वात्मा, भुवनपति, विश्वंभर, हरी,
विसांवा भक्तांचा द्विजचरणस्वाहन करी ! ॥५४॥
करस्पर्शें याच्या द्विजतिलक तत्काल उठिला,
म्हणे “ हा श्रीकृष्णा परम मज अन्याय घडला ! ” ।
पदीं माथा ठेवी; झडकरि करें तत्कर धरी,
“ प्रकार स्वामी हा सकल परलोकास अधरी. ॥५५॥
घडे हें प्रत्यक्ष प्रकटच तुझें दर्शन मला,
नसे कांहीं माझा तदपि असदुद्योग शमला; ।
रहातां ही पाहें सुरपतितरूच्या तळवटीं,
जसा भिक्षेसाठीं निशिदिस करंटा कटकटी ! ॥५६॥
प्रयासें संसारीं निजविषयगुंते उगविती,
गुणीं तूझ्या ते तों सहजच सुखें गुंतति यती. ।
अहंबुद्धिस्पर्शें प्रकटच जया वाळित पडे,
तथा त्वत्पंक्तीचें अढळ बसणें कोठुनि घडे ? ॥५७॥
निजानंदें जें कीं स्थळ परमहंसा विचरणें,
कदा जेथें नाहीं नियत निजकर्में निचरणें. ।
तया ठायां जाया हृदय बहुधा तांतडि करी,
जगन्नाथा, आतां क्षणभरि पहा धीर हा धरीं. ॥५८॥
वृथा मायाजाळीं पडुन मन हें धांवति करी,
दुराशेनें गुंते अझुनि विषयीं वीट न धरी. ।
विवेकाच्या मूळें निजनिलयकारागृह सुटे,
ठसा वैराग्याचा तरिच हृदयामाजि उमटे. ॥५९॥
मनामध्यें माझ्या विषयविषवृक्ष प्रकटला,
फलाशेनें जीवाभिधविहग जेथें लिगटला, ।
निराशेनें जेथें शुक, सनक झेंपावति सदा,
यदूत्तंसा, आतां झडकरि तया दाखविं पदा. ॥६०॥
पदस्पर्शें तूझ्या दुरित चयपाथोनिधि जळे,
क्षणार्धें श्रीकृष्णा, सुकृतमय कल्पद्रुम फळे. ।
भवद्बोधाचा हा अनुभव महा होय मजला,
अहो मूढत्वानें अझुनि पुसणें काय तुजला ? ॥६१॥
अहो, या लोहाचा निनस परिसेसीं जरि मिळे,
तयाच्या संसर्गें अखिल मग लोहत्व उधळे. ।
अकस्मात स्वामी, सकलहि अहंकार निरसे,
पदस्पर्शें तूझ्या सहज मजला मीपण नसे. ” ॥६२॥
सदा सद्भावाचा अतिशयित भोक्ता हरि असे,
मनामध्यें ज्याच्या स्वपरजनवैषम्य न वसे. ।
महा प्रेमें त्यासीं तदुपरि जगन्नायक वदे,
जयाचे भक्तीला मन यदुपतीचें बहु बधे. ॥६३॥
“ चहूंमध्यें मुख्य प्रकटच गृहस्थाश्रम असे,
असें विश्रांटीचें निलय दुसरें आणिक नसे. ।
प्रसंगें हे तेथें अतिथिपरिचर्या जरि घडे,
समारंभें अंतीं सुरपतिपुरद्वार उघडे. ॥६४॥
महादोषी मूढप्रवरवर विप्रब्रुव असे,
जया दुष्टा माझी निपट कधिंही चाडाच नसे, ।
तयाही विप्राचा अनुचित असत्कार करणें,
जयाच्या संक्षोभें निजपतन कैसें न घडणें ? ॥६५॥
निजद्र०ओहाग्नीचा कण जरि पडे किंचित मनी,
तयाच्या संसर्गें उठति भडके वंशविपिनींल ।
महांधाचे दृष्टी प्रकटहि महा दोष न दिसे,
पहातां तों याचें फळ तुरुत हातावरि असे. ॥६६॥
यदृच्छालाभें जे द्विज मुदित युष्मद्विध सदा,
तयांच्या पायांचा परिचय सुटेना मज कदा. ।
भृगूची हे लत्ता विमल हृदयीं नित्य मिरवीं,
इच्या लाभें लक्ष्मीप्रणयरस जीवा विसरवीं. ॥६७॥
प्रसादें ज्यांच्या मी यदुपति जगन्नायक असें,
असे हे निर्वाहें अझुणि समजेना जग कसें ? ।
मदीया भक्तांचा अपसद तिरस्कार करिती,
अहो, ते दुष्टात्मे नियत मजशीं वैर धरिती. ॥६८॥
भल्याच्या संतोषें निरतिशय माझें मन निवे,
तयांच्या या दुःखें नियत बहुधा जीव दुखवे. ।
तयां भक्तांसाठीं विविध अवतारांस धरणें,
तदुद्देशें ऐसा विरस मज संसार करणें. ॥६९॥
पहा माझे नाभीकमळिंहुनि वेधे उपजती,
अनंतब्रह्मांडें उदरकुहरीं हे कुहिजती; ।
द्विजाची मर्यादा तदपि अवहेळूंच न शकें,
अहो, तेथें इंद्रप्रभृति विबुधें कोण मशकें ? ॥७०॥
अहो, जेथें माझें स्तवन करितां वेद अडती,
शिरोभागा माझे अपरिमित संदेह पडती. ।
गुणोत्कर्षें माझ्या निपटच धरी शेष लघिमा,
तया जाला पाहें अविषय मला भक्तमहिमा. ॥७१॥
अहो, सद्भक्तांचा परम मज दुष्काळ पडला,
अशामध्यें तूझा अवचट मला लाभ घडला ! ।
द्विजा तूझें आहे अनिश अनुसंधान मजशीं,
घडे कैसा तेथें क्षणभरि तरी भेद तुजशीं ? ॥७२॥
सदा सद्वांच्छेचें हृदयविवरीं बीज उगवे,
अहो, मद्भक्तीचा तरिच बरवा कोंब उधवे. ।
विवेकाचे पाले सहज फुटती कोमल नवे,
मनाचे वृत्तीला अभिनव कसा उत्सव नव्हे ? ॥७३॥
क्रमप्राप्तीनें हे तदुपरि फुले शांति लतिका,
असें हें विश्रांतिस्थल परम जें जीवपथिका. ।
निजानंदामोदें सकल सुखदुःखादि विसरे,
पहातां अद्वैतामृतफळ रसोडेक पसरे ॥७४॥
प्रपंचीं हें माझें भजन जरि कांहीं ( क्षण ) घडे,
महा दोषी तोही निपट अडवाटेस न पडे; ।
प्रतिज्ञा माझी हे नियत समजावी बुध जनीं,
धरावा निर्वाहें अनवरत विश्वास भजनीं. ॥७५॥
अहो जों जों जीवा सगुण भजनाचें पुट चढे,
अनेका जन्मांचा तंव तंव मनाचा मळ झडे. ।
स्वभावें सत्वाचे तदुपरि कसोटीस उतरे,
क्रमप्राप्तीनें हें मनपण मनाचें मग नुरे. ॥७६॥
भवांभोधीमध्यें विषयमय आनाय पसरे,
तयाच्या संसर्गें निजहितमनोमीन विसरे. ।
पहातां या दोघां अणु जिवशिवां भेद नसतां,
स्वबुद्धीनें कल्पी हतमति दुजा भाव नसतां ! ॥७७॥
मतें वेदांताच्या समज निजसंसार लटिका,
करी कोणाची हे कवण लटकी आजि सुटका ? ।
पहातां बंधाचें सहज समजे मूळच नसे,
मुमुक्षा तेथें हे गगनकुसुमाकार विलसे. ॥७८॥
समस्तां शास्त्रांचें मथित कथितों सार तुजला,
नको आतां टाकूं क्षणभर मनांतून मजला. ।
कराया हे सेवा समुचित तुझी सिद्धच असें,
अभिज्ञा, विप्रेंद्रा, प्रकृत तुजला यावरि पुसें. ॥७९॥
समुद्रामध्यें हें स्थळ तरि महा दुर्गम असे,
तुम्हा लोकांचा तो अझुणिवरि संचारच नसे; ।
किमर्थ स्वामी, हा श्रमित बहु आत्मा श्रमविला ?
कळों द्यावें याचें झडकरि तुम्हीं कारण मला. ” ॥८०॥
घनःश्यामाचीम हे सरस वचनें विप्र परिसे,
महा आनंदाचें हुरुप उठती त्याजसरिसे. ।
तुरीयावस्थेचे अनुभवसीं यद्यपि वसे,
तर्‍ही श्रीकृष्णाला प्रतिवचन हें देतच असे. ॥८१॥
विदर्भीं हे आहे प्रथित बहुधा कुंडिनपुरी,
तयेच्या राजाची चतुर विलसे आजि कुमरी. ।
मनोभावें कृष्णा, नियतच जिनें तूज वरिलें,
तुझे पायीं निष्ठा धरुनि तुजला पत्र लिहिलें. ॥८२॥
द्विजें श्रीकृष्णाचे तदुपरि करीं पत्र दिधलें,
तयानें लाखोटा उखळुनि असे जें उकलिलें. ।
तयाला वैदर्भी स्वलिखितबमिषें भेटत असे,
जयेच्या प्रेमाचा अतिशय असाधारण दिसे. ॥८३॥
जेथें वठे रुचिर कुंकुमबिंदु शोभा,
लाजे जिला कनककेतकिगर्भगाभा, ।
आली असे प्रकृत जे प्रतिमा प्रियेची,
ते पत्रिका हळुच यादवराय वाची. ॥८४॥
जैसी असे विमल वोवणि मोतियांची,
तैसी वसे सहज ठेवणि अक्षरांची; ।
ओजःप्रसादमधुरादिक संपदांची,
शोभा धरून विलसे रचना पदांची. ॥८५॥
“ तीर्थस्वरूपचरणा, करुणानिधाना,
प्रौढप्रतापमिहिरा, प्रतिथाभिमाना, ।
सौजन्यसिंधुसदना, मदनाभिरामा,
सर्वोपकारनिरता, समवाप्तकामा, ॥८६॥
राजाधिराज, यदुवंशशिरोवतंसा,
कंसांतका, मुररिपो, कमळानिवासा, ।
राजश्रियासह विराजित राजमान्या,
वंदी तुझे चरण भीमकराजकन्या. ॥८७॥
येथील हें कुशल जाणुन लेखकाला,
आज्ञापिजे निजमहोत्सवलेखनाला. ।
हें लीहिलें प्रकृत केवल संप्रदायें,
मानूं नये परि यथार्थचि देवरायें. ॥८८॥
विज्ञापना परिस यादववंशवीरा,
योगींद्रहृत्कमलपंचरगर्भकीरा, ।
हातास ये त्वरित आजि उडोन माझ्या,
वार्ता मला श्रवणगोचर होति तूझ्या. ॥८९॥
माझा मनोमधुप लुब्ध बहूत झाला,
तूझे पदांबुजयुगीं रहिवास केला. ।
काकूलती बहुत याजनिमित्त येतें,
कृष्णा, तुझे चरणपल्लव हे धरीतें. ॥९०॥
जे आयकेत भवदीय गुणौघ कानीं
त्यांचे निवेति उगलेमग ताप तीन्ही. ।
जे पाहती अति मनोहर रूप देवा,
त्यां डोळसां अखिल लाभ अपूर्व व्हावा. ॥९१॥
जन्मास या तुज निमित्तचि जाण आलें,
आईकतां गुण तुझे सजणा, न धालें. ।
हे अच्युता, मन मला नकळेच तूझें,
तूझे पदीं परि अपत्रप चित्त माझें. ॥९२॥
सर्वां गुणीं तुजसमान महा वदान्या,
ते कोण तूज नवरी नवरील धन्या ? ।
विद्यावयद्रविणरूपगुणौघधामा,
कृष्णा, नृसिंहनरलोकमनोभिरामा. ॥९३॥
याकारणें नियत म्यां वरिलास भावें,
येऊनियां त्वरित त्वां मज आजि न्यावें. ।
हा लागला जिव असे तुजवीण जाया,
तूं आपुली हरि करी मज आजि जाया. ॥९४॥
हा वीरभाग शिशुपाळ जयीं विटाळी,
वीरांमध्यें तुरुत होइल येकि टाळी. ।
लज्जा त्यजून धिट आणिक येक बोलें,
सिंहामिषा हरुनि नेतिल आजि कोल्हे ! ॥९५॥
यागादिदाननियमव्रतदेवपूजा,
केली असे, तरिच होईल लाभ तूझा. ।
येऊनियां त्वरित फार गदाग्रजानें
पाणिग्रहास करिजेच चतुर्भुजानें. ॥९६॥
र्वां असे लगिन निश्चित जाण भावें,
सेनेसमेत अति गुप्त बहुत यावें. ।
मंथून चैद्यमगधेशबळासि धीरा,
रक्षोविवाह विव्हिनें मज नेयिं, वीरा. ॥९७॥
अंतःपुरांतुन वधू न वधून बंधू,
नेऊं  कशी म्हणशि तूं पुरुषार्थसिंधू ? ।
यांचे कुळीं नववधूस असे विचित्रा
लग्नास पूर्व दिवशीं कुलदेवियात्रा. ॥९८॥
ग्रामास संनिध निकेतन अंबिकेचें,
जें हें असे निजमनोरथदायिकेचें; ।
तेथें बसोन घटिकाद्वय वाट पाहें,
मी ही नयें तरि तुझी मज आण आहे. ॥९९॥
तूझ्या पदांबुजरजःस्नपनें शिवाला
अज्ञाननाशमहोत्सव थोर जाला. ।
एतन्निमित्त सनकादिक लुब्ध होती,
तूझा पदांभुजरजःकण इच्छिताती. ॥१००॥
जैं हा तुझा चरणलाभ मला न व्हावा,
म्यां निश्चयें तरि हरी मग जीव द्यावा. ।
घेईन मी तुज निमित्त सहस्र जन्में,
त्वत्प्रायकें करिन नित्य अनेक कर्में. ॥१०१॥
विज्ञापना शपथपूर्वक तूज केली,
येथील तों सकळरीति कळोनि गेली. ।
आणीक काय निपुणाप्रति म्यां लिहावें,
त्वां एक वेळ सगुणा इकडे पहावें. ॥१०२॥
नारायणा, निखिलवृष्णिपते, मुकुंदा,
टाकून दे मज निमित्त समस्त धंदा ।
दासी तुही परम लालस वाट पाहे,
तूझे त्वरेस बहु यावरि मोल आहे. ॥१०३॥
हेजीब हे जीभचि जाण माझी,
येथें नसो किमपि विप्रतिपत्ति तूझी. ।
पत्रांत लेख्य अवशिष्ट असेल कांहीं,
याच्या मुखें विदित होइल तूज तें ही. ” ॥१०४॥
हें भीमकीपत्र समाप्त जालें. । कृष्णास कांहींयक हास्य आलें. ॥
जाणोनि हा आदर माधवाचा । वदे प्रसंगोचित विप वाचा. ॥१०५॥
चतुर्भुजा, नीरदनीलवर्णा, । परावरा, वीरकुलावतीर्णा, ॥
विशेष हा आइक शेषशाई । करीस लोकत्रयपातशाही. ॥१०६॥
ते भीमकी पंकजत्रनेत्रा, । कृशोदरी पूर्णसुधांशुवक्त्रा, ॥
उत्फुल्ल आरक्त सरोरुहांतें । जे लाजवीते करभोरु होतें. ॥१०७॥
जो हा न पावे समता नखाची । तो काय पावे उपमा मुखाची ? ॥
नखप्रभेनें विधु हा उटावा । तरीच हो निर्मल ऊमटावा. ॥१०८॥
असेत हे सुंदर केश काळे, । विशाल तीचे विसलेत डोळे; ॥
जयांपुढें खंजन खंज जालें । प्रत्यक्ष हे मीन जळीं लपाले. ॥१०९॥
तीची असे सज्ज कपाळपाटी; । सौभाग्यरेखा उमटे ललाटीं; ॥
ज्या भूलता श्यामल शोभमाना । त्या कामकोदंडसमान माना; ॥११०॥
अत्यंत हे स्वच्छ कपोल दोन्ही; । सुवर्णशुक्तिभ्रम होय कानीं; ॥
नासा तिची हे उपमा न साहे, । तिलप्रसूनाहुन नीट आहे. ॥१११॥
आली तशी त्या अधरास लाली, । लज्जा प्रवाळांस विशेष जाली. ॥
त्या पक्क हो दाडिमबीजराजी । दंतावलीदास्यविधीस राजी. ॥११२॥
असे गळा मंजुळ हा निसर्गें, । तथापि तीचीं वचनें महर्घें. ॥
तीच्या स्मिताचें जंव तेज फांके । तेणेंहि त्याचें मग ओज झांके. ॥११३॥
न ये मृणालां मृदुता भुजांची, । कन्या महासुंदर भूभुजाची. ॥
अत्यंत शोभा कुचकुड्मलाची । विलासभू त्वन्नयनोत्पलांची. ॥११४॥
नाभीर्‍हदीं या मदनास थारा. । रोमावली तत्तरवारधारा. ॥
तीच्या नितंबास गुरुत्व साजे; । माजे जिच्या सिंहसमाज लाजे. ॥११५॥
दृष्टांत तीच्या जघनास नाहीं, । तथापि भासे मज येक कांहीं. ॥
साम्राज्य जेव्हां मदनास आलें, । सुवर्णसिंहासन सिद्ध केलें; ॥११६॥
असेत त्या मांसल फार ऊरू; । जानुद्वयें सुंदर फार भीरू. ॥
त्या पोटर्‍यांची रुचिर प्रभा ते । कीं मन्मथाचे विलसेत भाते. ॥११७॥
ते पाय तीचे नवपल्लवांनीं । समानसे, मानव कोण वानी ? ।
औदार्य जे नित्य धरीत मोठें । कल्पद्रुमांचें यश होय खोटें. ॥११८॥
नसे बहू पातळ आणि मोठी; । देवांगनांच्या नुपमेति कोटी. ।
नसे बहू उंच तशीच खूजी; । प्रत्यक्ष लक्ष्मीप्रतिमाच दूजी. ॥११९॥
नसे मनांतून कदापि खोटी; । खोट्या करी तप्त सुवर्णकोटी. ।
गंगाप्रवाहोपम शील जीचें; । पवित्रतावर्णन काय तीचें ? ॥१२०॥
पादादिमूर्धांत सुलक्षणांनीं । संपन्न सामुद्रिक लक्षणांनीं. ॥
लक्ष्मीच किंवा अवतीर्ण जाली । या भीमकाच्या उदरास आली. ॥१२१॥
माला स्मराची विलसे जपाची । कीं बोतली मूस तुझ्या तपाची, ॥
लोकत्रयीं मोहनमूलविद्या; । साहित्यसंगीतकलानिषद्या. ॥१२२॥
नसे तुझ्या तों गणना गुणांची । तेही असे मूलि महागुणांची. ॥
ते तूजला हात बहूत जोडी, । केली तिणें आजि तुझीच जोडी. ॥१२३॥
असे स्वभावें बहुफार गोरी । घरांमध्यें कामविकार चोरी. ॥
जीला फुलांची जड होय जाळी । मुक्ताफळांची जिस माळ जाळी. ॥१२४॥
तथापि बहेर उभी न ठांके, । अंतर्गृहांतून कदा न फांके. ॥
थ्याते तुझ्या ते पदनीरजातें; । अखंड नेत्रांतुन नीर जातें. ॥१२५॥
तीचा सदा गद्गद कंठ दाटे, । नेत्रांबुजीं सागरपूर लोटे, ॥
तूझे कृपेचा नसतां जिव्हाळा, । वांछेल कैसी सुकुमार बाळा ? ॥१२६॥
अत्यंत दैनंदिन दैन्य जोडी, । लावण्यलक्ष्मी परि हे न सोडी. ॥
समीप आली दशमी अवस्था । करूं नये या वरि त्वां अनास्था. ॥१२७॥
तूझ्या गुणांची जपमाळ केली । ते वीसरे भोजनही भुकेली. ॥
कृष्णा, तुझीं जें असती चरित्रें । चित्रीं पहा ते लिहिते विचित्रें. ॥१२८॥
दैवें पुरोडाश पवित्र झाला । शिवेल आकस्मित काय याला ? ॥
म्यां काय देवा तुजशीं वदावें ? । थोड्यांत जाणोन बहूत घ्यावें. ॥१२९॥
हें सर्व आहे नटनाट्य तूझें; । चातुर्य हें व्यर्थ समस्त माझें. ॥
तूझ्या प्रकाशें जग हें प्रकाशे, । त्वां नाशिल्या हें जग सर्व नासे, ॥१३०॥
त्वां हालवील्याविण हें न हाले, । त्वदीय सत्तेविण हें न चाले; ॥
अनेच निश्चेतन चित्र जैसें, । हें सर्व आहे तुजवीण तैसें. ॥१३१॥
पाहे तुझी वाट नरेंद्रपुत्री, । दिसेस तूं तो मज दीर्घसूत्री ! ॥
केली तिची येउन हे अनुज्ञा; । आतां असे यावरि काय आज्ञा ? ॥१३२॥
निजेल्या पर्यंकीं किमपि न लगे नीज नयनीं,
वियोगें उद्विग्ना उठत बसते भूमिशयनीं. ।
स्मराचे जे सोशी तिखट शर राजन्यतनुजा,
चकोराक्षी लक्षी त्वरित मुखचंद्रोदय तुझा. ” ॥१३३॥
व्याक्यें अशीं हे जंव आयकिलीं, । श्रोत्रें हरीचीं अति तृप्त झालीं. ॥
धरून हातें मग हात त्याचा । वदे तयासीं स्मितपूर्व वाचा. ॥१३४॥
“ जाली असे हेच मला अवस्था, । दिसेत तद्युक्त दिशा समस्ता. ॥
प्रतिक्षणीं व्याकुल चित्त होतें, । विदर्भदेशाप्रति धांव घेतें. ॥१३५॥
रुक्मीच तो मद्विषयीं निशेधी, । कळोन गेलें तुजहून आधीं. ॥
आतां रणीं सर्व वधून वैरी, । हरीन ते कांचनगर्भगौरी. ॥१३६॥
चंद्रानना, खंजनमंजुळाक्षी, । शीतोदरी, मार्ग मदीय लक्षी. ॥
जाली असे मत्पर पेशलांगी, । तीचें असें शासन कोण लंघी ? ” ॥१३७॥
बोलोन ऐसें पणपूर्व शौरी । प्रस्थान नक्षत्र त्यव्हां विचारी. ॥
तों दैवयोगें गुरुपुष्य साधे, । मुहूर्त अत्युत्तम कृष्ण लाधे. ॥१३८॥
उत्साह तेणें द्विगुणीत झाला. । तत्काळ तेव्हां रथ आणवीला. ॥
आनंदला नंदन देवकीचा, । तेथेंच केला विधि देवकाचा. ॥१३९॥
प्रस्थानकाळीं बहु गौरविलें, । समस्त ते यादव राहवीले. ॥
करी उपस्थान महारथाचें, । जो येक वाहे भय मन्मथाचें. ॥१४०॥
धरून हातें द्विज वेंधवीला. । विशेष हा आदर दाखवीला. ॥
त्यानंतरें आपण पाय टाकी. । तत्काळ तो दारुक अश्व हांकी. ॥१४१॥
धांवेत ते तेथुन फार घोडे, । वाटेत हें ज्यांस दिगंत थोडें. ॥
तों कावळेही उजवे उडावे. । महा इटी चासहि जाति डावे. ॥१४२॥
उल्लंघिलीं ग्राम, पुरें, सहारें, । प्राणप्रियाचारुकथाविहारें. ॥
आनर्तदेशींहून येक रात्रें, । तें पाविजे कुंडिन पद्मनेत्रें. ॥१४३॥
कथा हे कृष्णाची सकल जगदानंदनननी,
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुजनीं; ।
प्रसंगें श्रोत्यांचे सकलहि महादोष हरती,
यदूत्तंसप्रेमें विषयरसगोडी विसरती. ॥१४४॥
इति श्रीमद्भगवद्भक्तपदानुरक्तकविसामराजविरचिते रुक्मिणीहरणकाव्ये कुंडिनाssगमनं नाम पंचमः सर्गः ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP