स्फुट पदें ५१ ते ५८

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


५१.
भाव धरा भजन करा हरिचें । तारूं हें भवसागरिंचें । विविध कटकीं कनक । एक तें जसें ताईत कडें हो सरीचें ॥ध्रु०॥ श्रीहरिभक्तिची मुक्ति दासी अंकिली नव जाय जरी टाकिली । भजनभानुची दीप्ती मुक्ती हे कैसी जाईल ते झांकिली ॥१॥
नवविधा श्रवण कीर्तन स्मरण चरणसेवन । अर्चन वंदन दास्य अनन्य । लवणजाळा सख्य दीपीं कर्पुरें केलें आत्मनिवेदन ॥२॥
या रिती करिति भजन भावभक्तियुक्त ते । पूर्णलक्षणोक्त सहजिं सहज निजानंदें रंगले त्यासि शरन नित्य मुक्त ते ॥३॥

५२.
बाई माझें मानस मोहिलें येणें ॥ध्रु०॥ स्वर्ग मृत्यु पाताळीं । भूमंडळीं जळीं स्थळीं । हरिविण कांहिंच नेणें ॥बाई०॥१॥
संकल्प विकल्प मावळले । स्वस्वरूपीं मीळाले । खुंटलें येणें जाणें ॥बाई०॥२॥
द्वैतसंग भंगला । निजानंद रंगला । देही म्हणावें कोणें । बाई माझें मानस मोहिलें येणें ॥३॥

५३.
मांडी थापटोनी जाण । रिघे देवासीं शरण तरी नरनारायण । तोचि सहज आहे ॥१॥
करील तें नोव्हे काय । विश्व वंदी त्याचे पाय । स्वर्गीम देवसमुदाय । सर्व तटस्थ राहे ॥२॥
स्वयें चारी मुक्ती दासी । होवोनीयां अहर्निशी । दास्य करिताती त्यासी । वक्र कोणी न पाहे ॥३॥
झाला निर्गुण निष्काम । तेव्हां तोचि आत्माराम ॥ दृश्य दृष्टी रूप नाम । परी मनुष्य नोव्हे ॥४॥
विद्वद्वर्य साधुसंत । पूर्ण ब्रह्म मूर्तिमंत । ज्याच्या स्वानंदाचा अंत । ब्रह्मादिकां नाकळे ॥५॥
सत्य वैकुंठ कैलास । जे जे तेथील विलास । त्यांचा नाहीं अभिलाष । जे उदास मोकळे ॥६॥
इंद्रपदींचे जे भोग । मानीती ते क्षय रोग । नित्य निजानंदीं योग । भोगिताती सोहळे ॥७॥
सर्व संगीं जे नि:संग । नित्य अक्षयी अभंग । निजानंदें पूर्ण रंग । वर्म त्यांसीच कळे ॥८॥

५४.
माझ्या भक्तांचीं नामें, वाचे गाऊं सप्रेमें । नामसंकीर्तनीं तांडव कृष्णें, म्यां नाचावें निष्कामें ॥ध्रु०॥
अर्जूनाचीं घोडीं धूतसे आवडी, होवोनियां चतुर्भूज । धर्माचिया घरीं उच्छिष्टें काढी, सोडोनियां सर्व लाज । द्रौपदीचा धांवा ऐकोनिया झालें, काय सांगों तें मी चोज । बळिच्या द्वारीं द्वारपाळ झालों, भक्ताभिमानी मी सहज ॥माझ्या०॥१॥
अंवऋषीसाठीं गर्भवास दहा, सोसिलें म्यां नारायणें । प्रल्हादाकारणें अवतरलों तेव्हां, विश्व झालें सुखी तेणें । अनंत मी माझ्या अनंत विभूती, संख्या केली त्यांची कोणें । कलियुगीं हरिभक्तांच्या नामस्मरणें, पतीतपावन झालों तेणें ॥माझ्या०॥२॥
मुकुंदराज गहिनी निवृत्ति, ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई मुक्त । भानूदास नामा तुकोबा मृत्युंजय, प्रतिष्ठानीं एकनाथ । कृष्णदास जयराम केशवराज आनंदमूर्ति साधु संत । निजानंदें रंग रंगले ते युक्त, भक्त मुक्त ज्ञानवंत । माझ्या भक्तांचीं नामें, वाचे गाऊं सप्रेमें । नामसंकीर्तनीं तांडव कृष्णें, म्या नाचावें निष्कामें ॥३॥

५५.
भज गोविंदा, सांडुनि सकळहि धंदा, रे मतिमंदा ॥ध्रु०॥
नरतनु प्राप्त अकल्पित पाहीं । परि क्षणभंगुर संशय नाहीं । आयुष्य जातसे लवलाहीं । धरिं हरिपदारविंदा ॥भज गोविंदा०॥१॥ आसुरि कामादिक परवीर । मोठे मारक महाशूर । करिती स्वहिताचा चकचूर । तुझिया पेटले द्वंदा ॥भज गोविंदा०॥२॥
निगमाचार्य निजसंमत्तें । विवेकवैराग्याच्या हातें । त्यागुनि विषवत या विषयांतें । सेवीं परमामृतकंदा ॥भज गोविंदा०॥३॥
श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । या प्रिय भक्ति मुकुंदा ॥भज गोविंदा०॥४॥
संशय अवघा हृदयीं आठवीं । अनन्यभावें हरिगुरुपायीं ॥ रंगुनियां शरण जाईं । सहज पूर्ण निजानंदा ॥ भज गोविंदा, सांडुनि सकळहि धंदा, रे मतिमंदा ॥५॥

५६.
लाभालाभीं संतोष खेद न मानिती ॥ध्रु०॥
ज्ञानी निजलाभें संपन्न । जैसें ध्रुवा अक्षय स्थान । क्षीरसागरीं उपमन्य । कांजी न वांछी सहसा ॥लाभालाभीं०॥१॥
दिनमणि सन्निध आलें गेलें । दीप आणिलें वा मालविलें । तेणें न्यून पूर्ण झाले । प्रताप काय रवीचे ॥लाभालाभीं०॥२॥
जग मृगजल हें नसतां दिसे । दृश्य दृष्टी भास भासे । कर्पुरदीपीं जैसा तैसे निजानंदीं रंगलें ॥ लाभालाभीं संतोष खेद न मानिती ॥३॥

५७.
राममय वृत्ती झाली आतां काय उणें । अहंकारदग्ध झाला स्वात्मसुख घेणें ॥ध्रु०॥
ज्ञानदीप लावुनियां तमनाश केला । मजमाजी पाहतांचि स्वप्रकाश झाला ॥राममय०॥१॥
जीवऐक्य जालें जगत् ब्रह्म दिसे । पशु पक्षी नाना याती एकाकार भासे ॥राममय०॥२॥
बोलि बोलुनि मुनि गेले आतां काय बोलूं ॥ पूर्ण शेजेवरि निजरंगी रंगुनि लोळूं ॥ राममय वृत्ती झाली आतां काय उणें । अहंकारदग्ध झाला स्वात्मसुख घेणें ॥३॥

५८.
जडली गुरुचरणीं आवडी । स्वानंदाची उभविली गुडी ॥ध्रु०॥
स्वरूपाची प्राप्ती झाली । ममता गेली समता आली । षड्वर्गाची बोहरी केली । आशा तृष्णेसहीत ॥जडली०॥१॥
भेद झाला पाठीमोरा । गुणदोषांचा नलगे वारा । विश्वीम देखे विश्वंभरा । नाहीं थारा भ्रांतीसी ॥जडली०॥२॥
दया वाढली अपार । निंदा द्वेष झाला भार । विवेक वैराग्य निर्धार । हे साचार बळावले ॥जडली०॥३॥
सदा संतोषेसीं खेळ । नवविधारी गदा रोळ । निरावकाश सुखकल्लोळ । काळ वेळ नाठवे ॥जडली०॥४॥
भोगमोक्षीं वीतरागी । शांति बाणली सर्वांगीं । निजानंदरंगसंगीं । ब्रह्मयोगी विराज तूं ॥ जडली गुरुचरणीं आवडी । स्वानंदाची उभविली गुडी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP