प्रस्तावना आणि चरित्र

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


श्रीरंगनाथमहाराजांची बहुतेक सर्व कविता त्यांच्या वंशजांकडून आल्यात; व काहीं प्रकरणें रा. भगवंतरव पै यांजकडून आली आमचे जवळील कविता आम्हीं त्रुटित कागदांवरून व जुन्या बाडांवरून फार दिवसांपूर्वीं लिहून घेतली होती; व महाराजांचे वंशज रा. अनंत गणेश निगडीकर, आणि रा. भगवंतराव पै, यांजकडून प्रकरणांच्या नकलाच होऊन आल्या. यामुळें या काव्यांच्या अस्सल प्रतींसंबंधीं कांहीं एक माहिती सांगतां येत नाहीं. आम्हीं पुढें छापलेली रंगनाथमहाराजांची कविता ही नकलांच्या नकलांवरून छापली आहे. अस्सल पोथ्या आम्हांस पाहण्यास सांपडल्या नाहींत. तथापि नकलांचें काम चोख व बिनखोड करण्याविषयीं जितकी काळजी घेतां आली तितकी घेतली आहे.
१. रंगनाथाच्या पूर्वजांचें मूळ उपनाव खडके असें होतें. हें नांव यांचे पूर्वजांचें मूळ राहण्याचें ठिकाण जें खडकी नांवाचें गांव त्यावरून पडलें. खडकी हें गांव मोंगलाईंतील चौसाळें महालांत आहे. खडकी येथून पंधराव्या शतकाचे सुमारास राघोपंत खडके हे श्रीक्षेत्रपंढरपुराजवळ नाझरें या गांवी राहण्यास गेले. राघोपंताच्या आंगची शिपाईगिरी व त्यांचें अश्वविद्येचें ज्ञान पाहून यास लोक विनोदानें खडके याच्या ऐवजी घोडके असे म्हणूं लागले. व तेव्हांपासून यांचें उपनांव घोडके असें पडलें. यांचे वंशज अजूनही आपलें आडनांव घोडके असेंच लावतात.
३. राघोपंत घोडके यांनीं नाझरें येथील देशपांडेपणाची वृत्ति विजापुरचे दरबारांतून संपादन केली. परंपरेनें ही वृत्ति याच वंशाकडे चालली. घोडके हे माध्यंदिन शाखेचे वासिष्ठ गोत्री ब्राह्मण; वरील वृत्ति संभाळून या कुटुंबातील पुरुष विजापूर दरबारचीं शिपाईगिरीचीं कामेंही थोडीं फार बजावीत.
४. राघोपंताचया मुलाचें नांव चंद्राजीपंत. या चंद्राजीपंतास दोन पुत्र होते. थोरल्याचें नांव नागेश व धाकट्याचें दत्तात्रय. दत्तात्रयानेम आपल्या उत्तरवयाम्त संन्यासदीक्षा धारण केली. दत्तात्रयास पुत्र एक, रंगोपंत. त्यास पुत्र चा. (१) रामाजी (२) बापाजी (३) कृष्णाजी व (४) दत्तात्रय. या पुत्रचतुष्टयापैकीं द्वितीय पुत्र जो बोपाजी हाच रंगनाथ निगडीकराचा पिता. याच्या बायकोचें म्हणजे रंगनाथाच्या आईचें नांव बयाबाई. बोपाजीपंतानें कलबुर्ग्याजवळील कल्याणमठचे श्रीपूर्णानंदस्वामी यांचा अनुग्रह घेतला. फार दिवस बोपाजीस पुत्रसंतान नव्हतें. परंतु पुढें पूर्णानंदस्वामींच्या प्रसादानें बापाजीपंतास तीन पुत्र झाले. थोरला यादव ( ज. शक १५३१ ) मधला रंगनाथ ( ज. शक १५३४ ) व धाकटा विठ्ठल ( ज. शक १५३८ ).
५. रंगनाथाचा जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. यास लहानपणापासून दांडपट्टा वगैरे सर्व मर्दानी खेळांचा फार नाद असे. व घरची श्रीमंती असल्यामुळें याचे हे लाड सहजासहजीं पुरले जात. हा चौदा वर्षांचा झाला तेव्हां याच्या लग्नाची सर्व तयारी आईबापांनीं केली. परंतु यानें लग्न न करण्यचा हट्ट धरला. आईबाप आपलें म्हणणें ऐकत नाहींत असें पाहून यानें घर सोडलें, व हा तेथून निघून अशनूर, निरानरसिंगपूर वगैरे गांवांकडून श्रीक्षेत्र बदरिकाश्रमी गेला. कांहीं दिवस बदरिकाश्रमीं राहून यानें योगसाधन केलें, व पुढें तेथून परत देशीं येण्यास निघाला. घर सोडल्यापासून याचा सर्व थाट संन्याशाचा असें; परंतु परत देशीं येतांना वाटेंत टेहरी (?) येथील राजानें याचा अनुग्रह घेऊन अश्व, हत्यारें, मंदील वगैरे अलंकार त्यास अर्पण केले. या वेळेपासून रंगनाथ हेच अलंकार लेवून मोठ्या थाटानें राहूं लागला. देशीं आल्यावर हा पंढरपुरीं गेला, तेथें कीर्तन करीत असतां त्याला त्याचे आईबापांनीं पाहिलें, व ओळखून त्याची भेट घेतली व त्यास घरीं नाझरें येथें घेऊन गेले. कांही दिवस नाझरें येथें सर्व कुटुंबासह यथास्थित योगक्षेम चालू असतां बापोजीपंताचे मनांत असें आलें कीं आपले तिन्ही आश्रम पूर्ण झाले, तरी आता सर्वत्रांच्या संमतीनें चतुर्थाश्रम धारण करून जन्माचें सार्थक करावे. याप्रमाणें सर्वत्रांचा निरोप घेऊन बोपाजीपंत रंगनाथासह कल्याणमठीं श्रीपूर्णानंदस्वामींकडे गेले. व तेथून त्यांच्या अनुमोदनानें ॐकारस्वरूपीं कृष्णा जेथे । धन्य करहाटक क्षेत्र तें । तेथें जावोनि पुत्रासहितें । आश्रम चतुर्त संपादिल ॥ व पूर्वाश्रमींचें बोपाजीपंत नांव टाकून देहास निजानंद म्हणवूं लागले. पुढें आपणही अजून कोणाचाच उपदेश घ्यावा असें मनांत आणून रंगनाथादि त्रिवर्ग बंधूंनीं निजानंदाचाच उपदेश घेतला. यापुढें पित्यानेंच पुत्रास उपदेशदीक्षा द्यावी हा क्रम या कुटुंबात चालू झाला. यानंतर ही पितापुत्रांची व गुरुशिष्यांची जोडी कोठेंही त्रिरात्र न राहतां तीर्थयात्रा करूं लागली. याप्रमाणें हिंडत हिंडत कृष्णा व कोयना या नद्यांचे संगमावर आले असतां, लौकिक वाढून या जड जगाची उपाधि होते, व परमेश्वराचे चिंतनांत अंतर पडतें असें जाणून निजानंदस्वामींनीं आपल्या चिरंजीवांच्या अनुमोदनाने या पवित्र जलप्रवाहांत जिवंत जलसमाधि घेतली. ही गोष्ट शके १५६४ साली मार्गशीर्ष वद्य ३० स घडली.
६. वडील नारायणरूपीं मिळाल्यानंतर रंगनाथ हा परत येऊन घरीं न राहत, सर्वकाळ तीर्थयात्रा करीत हिंडूं लागला. एके वेळीं तो कृष्णातीरीं जावयाचे उद्देशानें निघाला असतां कोरेगांवच्या वाटेवर त्यास निर्गुडीचें बन लागलें. या बनांतच एका ओढ्याचे कांठीं रंगनाथाच्या घोड्याचा पाय रुतला, व घोडा पुढें चालेना. हीच परमेश्वराची आज्ञा समजून रंगनाथाच्या घोड्याचा पाय रुतला, व घोडा पुढें चालेना. हीच परमेश्वराची आज्ञा समजून रंगनाथानें आपला मुक्काम केला. व पुढें याच ठिकाणावर आपला मठ बांधला. याच मठास निगडीचा मठ असें म्हणूं लागले, व या ठिकाणाला निर्गुणपुर अथवा निगडी म्हणण्याचा सांप्रदाय पडला. या निगडी गांवापैकीं रंगनाथाचे वंशजांस सालिना पंधराशें रुपयांचें इनाम उत्पन्न अजूनही चालू आहे.
७. लहानपणापासून रंगनाथास शिपाईगिरीचा पेशा मनापासून फार आवडे, व आमरणान्त याचा सर्व थाट ऐश्वर्यसंपन्न असा असे. कोठेंही जाणें तरी आपल्यी ` निळ्या ' घोड्यावर बसून कमरेला तलवार व बरोबर लंगोटबंद शिष्यसमुदाय घेऊन तो जाई येई. मठांत तर याचा थाट याहूनही श्रीमंती असे. शिवाजी राजा प्रथम याच्या भेटीला आला तेव्हां भगवीं वस्त्रें परिधान करून हा पलंगावर पहुडला होता. शिवाजी मठांत जाऊन पाहतो, '' तंव स्वामींनीं भोजन सारून, । तांबूल भक्षिला असे जाण, । मंचकावरी केलें शयन, । पदसंवाहन होतसे; ॥ उभयतं शिष्यिणी दोघीजणी । ` भागम्मा ' ` चंदम्म ' लावण्यखाणी । पाय रगडिती प्रीतीकरोनि । जन्मांतरींच्या मेदिनी अप्सरा त्या. ॥ हा थाट पाहून राजास विस्मय वाटला. तेव्हां रंगनाथानें जरी आपण हे भोग भोगतों तरी या भोगांनीं आपण बद्ध नाहीं, व कोणतीही जडदेहाची उपाधि आपणास नाहीं, अशी त्याची खत्री करून दिली.
९. रंगनाथाच्या अनेक आख्यायिका आधुनिक चरित्रग्रंथांत प्रसिद्ध आहेत. रंगनाथ आपले वयाचे ७२ वे वर्षीं शके १६०६ रक्ताक्षी संवत्सरीं मार्गशीर्ष वद्य १० मीस प्रातःकाळीं समाधिस्त झाला. या संबंधें पुढील श्लोक प्रसिद्ध आहे.
शाके तर्कखशस्त्रचंद्रसुमिते रक्ताक्षिसंवत्सरे
मार्गे कृष्णदिशातिथौ रविदिने प्रातः सतामग्रणी ।
श्रीकृष्णातटसंन्निधौ सुसमये श्रीनिर्गुणाख्ये पुरे
कैवल्यं गतवानकुंठितगतिः श्रीरंगनाथः सुधीः ॥१॥

रंगनाथाची गुरुपरंपरा पुढीलप्रमाणें आहे :-
विष्णु

विधि

अत्रि

दत्त

सदानंद         समाधि         कृष्णातीरीं निंब येथें.

रामानंद             "            काशीस.

अमलानंद             "            पेंबरीं.

गंभीरानंद             "            रामेश्वरीं.

ब्रह्मानंद             "            पंढरपुरीं चंद्रभागेचे कांठी

सहजानंद             "            कलबुर्ग्याजवळ.

पूर्णानंद             "            गोडवण.

निजानंद             "            कर्‍हाड.

रंगनाथ             "            निगडी.

या परंपरेसंबंधानें व सांप्रदायासंबंधें रंगनाथाचे पुढील दोन श्लोक प्रसिद्ध आहेत. :-
श्रीविष्णू, विधि, अत्रि, दत्त नमुनी भावें सदानंद हा
रामानंद, तथामला प्रणमुनी गंभीर ज्ञानी पहा ।
ब्रह्मानंद अवाप्तकाम सहजानंदान्वयें पूर्ण तो
वंदूं श्रीनिजरंग या जगनगीं दैदीप्यचित्स्वर्ण तो. ॥१॥
आनंदाख्य परंपरा, गुरु नमूं श्रीद्त्त दीगंबरा,
मुद्रा खेचरि, सिद्ध आसन, मठोर्ध्वाम्नाय हा साजिरा, ।
बाला मुख्य उपासना, गुरुमठा कल्याण हें नाम हो,
सच्छिष्यासि सुपूज्य हंसपिठिका श्रीरंग विश्राम हो ॥२॥

( रंगनाथस्वामी यांचा वंशवृक्ष पुढें दिला आहे. )

१०. रंगनाथाचे विद्यमान वंशज आपलें कुलदैवत ` दत्त आहे असें सांगतात, व श्रीधराचे वंशज कुलदैवत ` विठ्ठल ' सांगतात.
११. रंगनाथाचा श्रीसमर्थ रामदासस्वामींशीं परिचय फार असे; म्हणूनच त्याची गणना रामदास पंचायतनांत केली जते. रामदासपंचायतनांत [१] श्रीसमर्थ रामदासस्वामी परळीकर, [२] जयरामस्वामी वडगांवकर, [३] रंगनाथस्वामी निमडीकर, [४] केशवस्वामी भागानगरकर आणि [५] आनंदमूर्ति ब्रह्मनाळकर या पांच पुरुषांचा समावेश होतो. या सर्व पुरुषांच्या करवीं शिवकालीन महाराष्ट्रांत ज्या चेतनेचा संसार रामदासानें करविला, ती चेतना रंगनाथाच्या कव्यांत पदोपदीं दृष्टीस पडते.
१२. पुढें छापिलेल्या [१] ' गुरुगीत ' [२] ' रामजन्म, ' [३] ' गजेंद्रमोक्ष, ' [४] ' निजानंदसाधनें, ' [५] ' सुदामचरित्र, ' [६] ' शुकरंभासंवाद ' [७] ' पंचीकरण ' [८]  ' मिथ्यामायास्वरूप, ' [९] ' श्रीएकाखडी ' ओंव्या, [१०] ' बद्धमोक्षविवरण ' [११]  ' स्फुट पदें ' [१२] ' अष्टकें ' या प्रकरनांखेरीज रंगनाथाचें ' भानुदासचरित्र ' योगवासिष्ठसार या ग्रंथावर टीका आणि पदें सुमारें १००० इतकी कविता प्रसिद्ध आहे. याखेरीज आणखीही बरीच रचना, रंगनाथानें केली असावी असा निगडीकरांचा तर्क आहे; परंतु दोन तीन वेळां अग्निप्रळयामुळें निगडी येथील मठांतील बरेच कागदपत्र जळले, त्यांमध्यें ही कृति सर्व नाहींशी झाली. महाराजांच्या हस्ताक्षराचा नमुनाही हल्लीं उपलब्ध नाहीं.
१३. वर रंगनाथस्वामींबद्दल दिलेली माहिती त्यांच्या वंशजांकडून मिळविली असून कांहीं राजारामबोवा यांच्या ' भक्तमंजिरी ' या ग्रंथावरून घेतली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP