दासोपंत चरित्र - पदे ४०१ ते ४२५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


अगाध तुझी अभिनव लीला । जे अगम्य अगोचर वेदादि सकळा । जरी वोसंगा घेसी मज बाळा । हे अभिनव कीं हो जगताते ॥१॥ राजसिंहासनी प्रवेश । कदापि नव्हे की थोरांस । तरी तें राजपुत्रास । सहज असे की सर्वदा ॥२॥ तरी तूं राजेश्वरी  । जगन्माऊली जगदेश्वरी । तरी बाळकचि मी तुझे निर्धारी । कृपावैभव मज द्यावे ॥३। तूंच कृपा करुन मज अनाथकुमर । भेटवी वो श्रीदिगंबर । दिगंबरप्राप्तीचे द्वार । अंबे तुजवीण नमे की ॥४॥ यापरी वाक्यपुष्पांजलि । वाहतां देवीचरणकमळी । पंतासि धणी न पुरे वेळोवेळी । श्रीचरण अवलोकिता ॥५॥ श्रीचरणी प्रवेशिता चित्तवृत्ति । पंतास होतसे प्रसादप्राप्ति । त्या प्रसादें सहजानंद निगुती । प्राप्ति सहज श्रीदिगंबर ॥६॥ लाहून अंबेचे वरदान । पांच रात्र राहिले तेंच स्थान । पुढे काय केले ते महाराज पूर्ण । अवतारपुरुष समर्थ ॥७॥ तेथून निघाले सत्वर । चढते झाले सह्याद्रिशिखर । तें योगेश्वरांचे विश्रांतिमंदिर । स्वानंदेसि सर्वस्व ॥८॥  अंबेचे लाहूनि वरप्रदान । पंत विचार करी निज अंत:करण । आधी अनुसूयाचे घेऊनि दर्शन । मग चढावें सह्याद्रि ॥९॥ ऐसी योजना करुन मनी । काय करिते झाले ते भक्तशिरोमणि । अनुसूयादर्शना जावें ह्मणुनी । सिध्द झाले त्या काळी ॥१०॥ अनुसूया केवळ ज्ञानकळा । पतिव्रतांमाजि आगळा । जिचे उदरी स्वानंदपुतळा । अवतार प्रभु झाला ॥११॥ त्रयमूर्तिरुप दत्तात्रेय । जिचे उदरी अवतरले निश्चये । धन्यच ती आदिमाये । जिचा महिमा वेदपुराणी ॥१२॥ धन्य अनुसुया जननी । पतिव्रतांमाजि अग्रणी । जिचे सत्व पाहण्यालागूनि । ब्रह्मादिक पातले मूर्तिमंत ॥१३॥ तरी ते कथा पुराणोक्त । श्रवण करितात की श्रोते संते । मी वर्णावी निश्चित । ऐसे कांही नसेचि ॥१४॥ जे वेदशास्त्राचे गर्भार्थ । आपणां असतां अवगत । त्यांतील कथा निश्चित । बोल हाणतां मुर्खपण ॥१५॥ श्रीमंतघरी अन्नास नसे उणे । तथापि आमंत्रण देतां दीन जन । ते दीनकैवारी ह्मणून । त्यांचे मनोरथ पूर्ण करिती ॥१६॥ यापरी आपण दयाळू केवळ । मी तो मतिमंद दुर्बळ । लाहून आपले कृपाबळ । बोलू इच्छितो अनुसूयाख्यान ॥१७॥ अनुसूया केवळ ज्ञानखाणी । जिचे मन रंगले पतिचरणी । पति तो वंद्य शास्त्रपुराणी । अत्रि ऋषि प्रसिध्दु ॥१८॥ जीस नसे पतीविण पर दैवत । पतीस भावी परब्रह्म साक्षात । पतिसेविसि सदा रत । जेवि लुब्ध धनासि ॥१९॥ पतिच केवळ निजधन । पति निज प्राणाचे प्राण । पतीसेवेवांचून एक क्षण । राहूंच नये कदापि ॥२०॥ पतिसेविसि घाली उडी । पतिसेवेवीण नसे गोडी । सेवेस्तव करी तांतडी । सकळ विषय टाकूनि ॥२१॥ सेवां करितां प्राप्त मनोरथ । सेवेमाजि परमार्थ । ऐसे असतां श्रुत्यर्थ । तदुनुसार पै करिती ॥२२॥ अवस्थात्रयी पतीस ध्याये । सर्व सुख पतिपाये । पतिवांचून जिला निश्चये । कांहीच धंदा नसेचि ॥२३॥ पतीपाउल उमटे ज्या स्थानी । तेथील होऊं मेदिनी । ऐसी इच्छा जिचे अंत:करणी । ती धन्य जननी जगत्त्रयी ॥२४॥ पतीस असे आवड । आपण तेंच करी तांतड । पतीस पडतां सांकड । प्रापा वेंचून तें वारी ॥४२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP