दासोपंत चरित्र - पदे २७६ ते ३००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


धन्य तूं भक्तराजशिरोमणि । धन्य तूं होसि त्रिभुवनी । तरीच तुजला दंड - पाणि । सहज प्राप्त पै झाला ॥७६॥ तुझेन आह्मी झालो धन्य । प्रारब्ध आमुचे नसे सामान्य । तुझेयोगें जगास मान्य । होऊं आह्मी सर्वस्व ॥७७॥ यापरी ऐकतां पितृवचन । मनीं ह्मणतसे अत्रिनंदन । प्रकटले की मज दीनाकारण । दीनवत्सल दयाळू ॥७८॥ मी मानिले होते मातापिता । त्यांस असतां माझी चिंता । त्यांनीच पाठविले कीं दूता । मम पुत्रमुक्तीकारण ॥७९॥ ते दूतयोगे मी मुक्त । झालो झालों की निश्चित । हे सकळ निरर्थक माते । दिसून आले या काळी ॥८०॥ हे शरीर जन्मले ज्यांचे उदरी । त्यांसीच चिंता माझी भारी । ते वोढितां परोपरी । वाढला की हा पिंड ॥८१॥ यापरी हे मानणॅं । अत्यंत दिसे मूर्खपण । ज्यांनी केले मज मुक्त पूर्ण । त्यांस पाहवें सर्वस्व ॥८२॥ तोच माझी मातापिता । तोच माझी बहिणभ्राता । तोच मज संरक्षिता । त्यास पाहवे सर्वस्व ॥८३॥ ज्यास मी न ध्याता न गाता । ज्यांचे रुपही न आणितां चित्ता । ज्यास माझी चिंता तत्वता । त्या प्रभूस पाहवें अविलंब ॥८४॥ ज्यांनी माझे राखिले द्विजत्व ?। दाऊन आपुले कर्तृत्व । तोच स्वामी सत्यत्व । त्यावीण राहणे वय नासणे ॥८५॥ षोडश वर्षे या देहास । प्राप्त असतां अनायास । नाही पाहिलों की तो जगदीश । कैवारी माझा प्रभुराय ॥८६॥ त्यास टाकून राहतां संसारी । कैचे सुख आह्मां निर्धारी । तो स्वामी माझा सहकारी । त्यावीण राहणे श्लाघ्य काय ॥८७॥ पुढे राहती त्याचे संगती । आह्मा कैची सुखप्राप्ती । आयुष्य जाईल की हातोहाती । नरजन्मकरणी न घडेल ॥८८॥ एक एक योनीत । हजारो फेरा करीत करीत । हा नरदेह असतां प्राप्त । सत्प्राप्त उपावो करावा ॥८९॥ नरदेहाप्राप्तीवीण । कैचे घडेल श्रीदत्तदर्शन । दत्तदर्शनास कारण । हा नरदेह सत्य पै दिसे ॥९०॥ या नरदेहावीण अन्य योनी । स्वदेहाचे ज्ञान नसे त्या स्थानी । मा परमार्थ कैचा त्यांलागुनी । प्राप्त होय सर्वस्व ॥९१॥ परमार्थाचा हाच सार । संपूर्ण वेदांचा हा गाभार । ज्यामध्ये प्राप्ति श्रीदिगंबर । तो उपावो करावा ॥९२॥ घरी राहून त्या प्राप्ति । करुन घ्यावी निश्चिति । हे तो न घडे कल्पांती । दु:खरुप गृहदारा ॥९३॥ यांचे संगती काम क्रोध । अधिक होईल महाभेद । कैची प्राप्ति सच्चिदानंद । स्वामी माझी दिगंबरु ॥९४॥ यांचे संगतीने संसार । दिवसेदिवस वाढेल साचार । यांचे सुख - दु:खाची चिंता निरंतर । वाहणें आह्मा घडेल ॥९५॥ प्रत्यक्ष संसार हे काळसुख । यांत पडून गेले कित्येक । याचा अंत न कळे ब्रह्मादिक । गति काय पै झाली ॥९६॥ कोठून येणे कोठे जाणे । आह्मी कोण कोण आमुचे स्थान । हे आमुचे कैसे होतील पूर्ण । पुत्रकमलत्रादिक सर्व ॥९७॥ हे आमुचे फांसेकार । यांचे संगती पाश दुर्धर । आह्मांस असे साचार । सुटिकेसि सहज पै मुकणे ॥९८॥ जळो जळो यांची संगती । जळो जळो संपूर्ण देहभ्रांति । यांचे संगतीने विश्रांति । कदाकाळी घडेना ॥२९९॥ रचून शेज खादिरांगार । त्यावर सुखनिद्रा निरंतर । करुं पाहे जो नर पामर । तदुपरी यांची पै संगती ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP