पदे ५१ ते १००

ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.


सइंवर ईचे ते काळ नाही गमाया
सकळ सुरवरां हे ब्रह्मिची योगमाया ।
अमुप गुण इयेचे वेदवेदां कळेना
मनुजदनुजदेवां सर्वथा आकळेना ॥५१॥
स्वयंवराचा पण एक माने, आरोपिता जो गुण ये कमाने ।
स्वये वरी हे नवरी तयाला, जो अन्यथा हे न वरी तयाला ॥५२॥
धनुस चढवि जो तो योग्य ईते वराया
परमापुरुष ऐसा जाणिजे भाव राया ।
निजभुजबळशक्ती कार्मुका आंवराया,
कवण पुरुष आहे त्याविणा सांवराया ॥५३॥
अतितर तुज झाला कन्यकालाभ राया,
त्रिभुवन परि थोडें पुण्य तूझें भराया ।
अतुल फळ तयाचें देखसी देवराया,
मग नमन करोनी कन्यका दे वरा या ॥५४॥
परशुराम वदोनि विसांवला
त्वरित तो निजाआश्रम पावला ।
जनक मूळ करी क्षितिराजयां
--------- अति कूलिन राजया ॥५५॥
श्रीसूर्यवंशी नृप सोमवंशी
जे जे महाख्यात कुलावतंसी ।
म्हाराष्ट्र, सौराष्ट्र, चव्हाण, राणे,
सीसोदये, क्षत्रिय बागलाणे. ॥५६॥
तुंगार, वंगार, कुमार, मोरे,
गोरे सराईत अपार तोरे ।
कांती अवंती अति तेज साजे
काशी - निवासी सुरशेन राजे ॥५७॥
तैलंग, वंग, नृप, अंग, कलिंग देशी,
कांभोज, भोज गुरजार अनेकवेशी ।
कर्नाट, लाट, सिरसाट, अचाट पाटे,
संत्काड,द्राविड, गऊड, अमोड काठे ॥५८॥
आले दिशांपासुनि सर्व राजे ,
पुरंदराची रुचि ज्यांस साजे ।
विदेह लीही गजपत्रिकेसी,
स्वयंवरा आदर कौशिकासी ॥५९॥
" नमस्कार विज्ञप्ति माझी तुम्हांला, तुम्ही सर्व या येइजे सैवराला " ।
असी पत्रिका दूत घेवोनि आला, मुनी वाचितां थोर आनंद झाला. ॥६०॥
मुनी म्हणे राघवनायकाला, ’ कल्याण तुम्हां ’ आणि सायकांला ।
संरक्षिले सत्य तुम्ही द्विजांला, तेणे गुणे हा मठ पूर्ण झाला. ॥६१॥
रथावरी सारथियें सजावें,
दोघीजनीं स्वीयगृहासि जावे ।
स्वयंवराचे रचनेसि पाहों,
आह्मी विदेहाप्रति जात आहो ॥६२॥
कृती करी नमस्कृती
तदा वदे मुनीप्रती ।
तुह्मां सवेंचि यावया
स्वयंवरा पहावया ॥६३॥
स्वयंवरीं स्वयंवरा
वरील कोण नोवरा ? ।
कशी असे सुलोचनी ?
पडेल येहि लोचनी ॥६४॥
मुनी तदा निजांतरी, पहात तों सिता बरी ।
रघूत्तमासि नोवरी, परा वरासि नो वरी ॥६५॥
मुन्ही ह्मणे’ रघोत्तमा, नृपाघरी वसे रमा ।
असेल तो रमापती, वरील त्यास ते सती ॥६६॥
वदे तदा महादरे, ’ चला सवें महा बरे ।
मिळेल थोर भातुकें पहाल राज्य कौतुके ॥६७॥
बरें मुहूर्त पाहिले,
रथी तयांसि वाहिलें ।
प्रमाणिका वरी त्वरें
ढळेति छत्र चामरे ॥६८॥
चतुर सारथियें रथ पेलिला,
घडाघडा मग तो क्षिति चालला ।
मुनिहि ते बहुमान विराजले,
सकळही शिबिकारुढ साजले ॥६९॥
कोणी नूतन सृष्टिचा विरचिता ब्रह्म्यासवें स्पर्धता,
कोणी विष्णुउरावरी झडकरी लत्तसही हाणिता ।
कोणी येक क्षिरोदरीं लवकरीं विध्यांसही घालिता,
तैसा आचमिता समुद्र पुरता तो मागुता योजिता ॥७०॥
कोणी चंद्र कलंकिता, सुरवरा कोणी भगें पाडिता,
कोणी वज्रधरासि सर्प करिता, वेदांसही स्थापिता ।
कोणी येक विदेह भूपतिसभे धेनूस संरोधिता,
कोणी येकहि देव दानव पिता इत्यादि भूदेवता ॥७१॥
आणीकही द्विजसमाज कितेक येती,
शिष्योपशिष्य अनुशिष्य सवेंचि घेती ।
खांद्यावरी बहुत धोपटिया गवाळी,
झारी करीं सरस गंध असे कपाळी ॥७२॥
माळा गळां करतळांत विशाळ गांठी,
कक्षापुटीं विमलपुस्तकभार, दाटी ।
टोपी शिरी उपरि उंच विशाळ गोंडा,
संभाषणी प्रिय विराम नसेंचि तोंडा ॥७३॥
येकाक्ष आणिक खुळे तिरळे निराळे,
कुब्जे कुर्‍हे पृथुल दोंदिल वक्र डोळे ।
कित्येक वृध्द करिताति महात्वरेला,
ते धांवती पडति आफटती धरेला ॥७४॥
कित्येक अंध आणि पांगुळ मुख्य आले,
स्कंधाधिरुढ किति शिष्य तुरंग जाले ।
आले पहा बहुत घेउनि थोर दर्भा
कोठून आगमन उत्तर पूर्णगर्भा ॥७५॥
कटीं हस्त ठेवोनिया फोंक मारी,
भटाचें तटू थापटी शिष्य भारी ।
तटें पाडिलें भट्ट पावेति कष्टा
अहो मर्कटा आधिका शिष्यचेष्टा ॥७६॥
मूका खिजे बहुत खाजविताति नाका,
तो हा न तो दगड मारित फार हाका ।
मार्गी करी तरळिया परिहास वाचा,
आह्मां तुह्मां बहुत योग दिसे पुखाचा ॥७७॥
ही यूवतीं ते जरि तूळ पावे,
आह्मा मिमीक्षे तरि फार फावे ।
युवा नवा प्राप्त करील पाही,
हा भेद कांही मकरासि नाही ॥७८॥
भट्टो तुह्मी धोपटि काय केली ?
ते बोलतीं आत्मगृहीच ठेली ।
तूझे घरीं तें शुभकृत्य आहे,
तो बोलतो मंगळवार आहे ॥७९॥
परस्परे हास्यविनोद झाले,
भागीरथीतीरसमीप आले ।
तों कौशिकानें प्रणिपात केला,
करास जोडोनि स्तवी तियेला ॥८०॥
अहो त्रिलोकतारिणी, गिरीशमौलिधारिणी ।
भवैकदु:खहारिणी, सुखानुबंधकारिणी ॥८१॥
तुझ्या जळी निमज्जती, शिवादि देव सज्जती ।
शरीरभाव वर्जती महानुभाव गर्जती ॥८२॥
मदीय दंभ वर्जला, अहं वदो विवर्जला ।
प्रमाणिके नमो तुला, नमोsस्तु माय वो तुला ॥८३॥
असी स्तुती करी मुनी
स्वदेह भाव सोडुनी ।
पडेल तो धरेवरी
ह्मणोनि राम सांवरी ॥८४॥
श्रीराम पृच्छेसि करुं निघाला
हे वंद्य कोणेपरि हो तुह्मांला ? ।
ऐकोनि वाचा मग राघवाची
सांगीतली ख्याति भगीरथाची ॥८५॥
भगीरथे पूर्वज उध्दराया
हे आणिली सर्व जनांत राया ।
परंतु पदोदक होय तुह्मां
याकारणें वंद्य निधान आह्मां ॥८६॥
करुनी तदा स्नानसंध्यादिकर्मा
ऋषी सर्वही चालती नित्यधर्मा ।
असे सर्व तेथोनि मार्गी निघाले
ऋषी गौतमस्थानकालागि आले ॥८७॥
तो देखिला गौतमाचा,
जो देखिल्या नाश गमे तमाचा ।
येका मनुष्याविण सर्व सिध्दि
आहेत तेथे अनुपम्य नीधी ॥८८॥
शोभतात भ्रमरी भ्रमरांनी ।
क्रीडतात अमरी अमरांनी,
पांथ होति विगतश्रम रानी ॥८९॥
अति ससाळ रसाळ विराजती,
वितत माल तमालहि साजती ।
मलयमारुत शीतळ वाजती,
कलरवीं कल कोकिळ गाजती ॥९०॥
विकसिते कसिते अवनी रजे
अति सुगंधित हें अवनीरजे ।
कनककेळि फळासम दाविती
रघुविरा निजवैभव दाविती ॥९१॥
हळूहळू मलयानिल वाजती,
भ्रमरही मधुर ध्वनि योजिती ।
विचरताति वधूसह सारसें
स्वरमयूर करी सहसारसे ॥९२॥
खळखळा जळ सारणि वाहती, श्रमित त्याचि जना बहु बाहती ।
जळ पहा अमृतास समानसें, सुखकरी बहुधा रस मानसें ॥९३॥
फुलभरीं बहु सारस माजती, अति सुगंध तरु बहु साजती ।
अति सुगंधित येत सदा गती, वसति तेथ तयांसि सदा गती ॥९४॥
नारंगरंग अति पिंग कलिंग केळे, जंबूफळें सुविमलें मृदु सोनकेळे ।
आली कशीं बहु रसाळ फळे रसाळे सक्ताळसें ( ? ) अननसें फणसे विशाळे ॥९५॥
जंबीर, अंजिर, तुरंज, करंज, बोरे,
द्राक्षे सुलक्षणिक दाडिम, नारिकेळे ।
खर्जूरिका, कमरखे, हरिखे भजावी
सीताफळे, खिरणिसें उपमे त्यजावी ॥९६॥
तर्जूज, खर्बूज लता उदंडा
कांडोपकांडी रस इक्षुदंडा ।
आक्रोड, बादाम, अपार पेरु,
मेवा नवा काय नसेल मेरु ॥९७॥
तिलक, चंपक, केतक, मालती,
बकुल यूथि अशोकहि शेवती ।
कुरबकें सहबंधुक, मोगरे
बहु कदंबकही फुलले बरे ॥९८॥
श्रीराम येईल भजोनि येथे
ह्मणोनि साही ऋतुवास येथे ।
याकारणे मिश्रित वर्णनांनी
ने देइजें दूषण पंडितानी ॥९९॥
देखोनिया परम सुंदर आश्रमातें
ते सांडिती सकळही गमनश्रमातें ।
प्रश्नासि राम करि कां उगले बसा गा
हे स्थान उध्वस तरी निजभाव सांगा ॥१००॥


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP