अध्याय सहावा

हा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.
मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.


पांडुरंगसमीप षडाक्षर मंत्राचा अनुग्रह घेतला । मस्तक ठेविला चरणांवरि ॥१॥
साष्टांग नमन, चरणवंदन । मानसपूजन केले असे ॥२॥
म्हणती पांडुरंग करी गोदावास । नामाचा विश्वास दृढ धरी ॥३॥
ऐसे बोलियेले रुक्मिणीचे पति । चांगया विनंति करीतसे ॥४॥
कांही देवपूजा मजला सांगावी । कृपा करावी दीनोध्दारा ॥५॥
सुखांतूनि ऐसा शब्द निघतांचि । मूर्ति केशवाची प्रगटली ॥६॥
चतुर्भुज मूर्ति देखिली नयनी । संतोषला मनीं चांगदेव ॥७॥
आलिंगूनि मूर्ति ह्रदयी धरिली । सद्भावे पूजिली एकनिष्ठे ॥८॥
घेऊनियां मूर्ति आले स्वस्थळासि । नारायणडोहसि फिरुनियां ॥९॥
विचारिले मनी हा जावे गोदातीरा । सवें परिवारा घेऊनियां ॥१०॥
पुण्यस्तंभ क्षेत्र गोदातीरी असे । जाऊनि कारणे वास तेथे ॥११॥
विचार हा दृढ केला असे मनी । सर्वासि पुसूनि स्वार झाले ॥१२॥
सवें केशवमूर्ति सहपरिवार । बोळवीत सर्व सुह्रद आले ॥१३॥
ग्रामस्थांनी केले साष्टांग नमन । आम्हां उपेक्षून चाललेति ॥१४॥
कांही पाहिजेल स्वामी हे साक्षा । आमुची उपेक्षा न करावी ॥१५॥
ऐसे ऐकूनि स्वामीनी वचन । मग समाधान त्यांचे केले ॥१६॥
आपुलिये हस्ते स्थापिले प्रस्तर । थोर चमत्कार म्हणती येथे ॥१७॥
पुरती मनोरथ केलिया नवस । संततिसंपत्तीस देईल हा ॥१८॥
माझिये स्वरुपा यासि नाही भेद । याचे नांव सिध्दचांगदेव ॥१९॥
ऐसे वरदान दिले ग्रामीजना । मग पुढे प्रयाणा करिते झाले ॥२०॥
प्रयाण करुनि आले पुण्य स्थळा । देखियेले जळा गौतमीच्या ॥२१॥
देखूनि गौतमी केले दंडवत । म्हणती कृतकृत्य आजी झालो ॥२२॥
करुनिया स्तुति ऐसी सोमतीर्था । वंदिले समर्था सोमेश्वरा ॥२३॥
करुनियां स्नान संध्या देवपूजा केली । भोजने सारिली यथाविधि ॥२४॥
चित्ताची स्वस्थता झाली सोमतीर्था । मठ करिताती गोदातीरी ॥२५॥
मठात स्थापूनि केशवमूर्ति । सेवेसि करिती एकनिष्ठे ॥२६॥
केशवराजाचे स्थापिले मूर्तीस । चांगकेशवदास म्हणोनिया ॥२७॥
षडाक्षर मंत्राचे करित अनुष्ठान । दर्शना दुरुन लोक येती ॥२८॥
प्रकटला म्हणती चांगावटेश्वर । पांडुरंगे वर दिधलासे ॥२९॥
संजीवनी मंत्र दिधला ह्रदयीचा । चमत्कार त्याचा फार असे ॥३०॥
ऐसी फांकली चहूं देशी वार्ता । रामराजा होता देवगिरी ॥३१॥
ऐकूनिया मात आला दर्शनासि । बहुत स्तवनासि करिता झाला ॥३२॥
चांगदेवे तया चमत्कार दाविला । सैन्यसमुदायाला आमंत्रिले ॥३३॥
न होतां स्वयंपाक समुदाय आले । भोजना बैसले सहस्त्रावधि ॥३४॥
ज्यांची पात्रे तयांपुढे विस्तारिली । षड्रस वाढिले पात्री अन्न ॥३५॥
भोजन पै झालें राजा संतोषला । थोर कवतुकाचा दाखविले ॥३६॥
धन्य धन्य स्वामी आजीचा दिवस । देखोनि तुम्हांस पुनीत झालों ॥३७॥
गोदातीरीहूनि बागांत राहणे । तेथे सन्निधाने असे गोदा ॥३८॥
कुटुंबासहित राहिले मळ्यांत । स्नान संध्या नित्य सोमतीर्थी ॥३९॥
करुनियां स्नान संध्या  बैसले ध्यानस्थ । कौतुक तेथे एक झाले ॥४०॥
कल्याणकलबुर्गी गृहस्थ होता एक । शंकरनामक यजुर्वेदी ॥४१॥
धन असे घरी लक्षावधि संख्या । परी पुत्रमुखा देखिले नाही ॥४२॥
वंशी पुत्र नाही चुलत बंधु कोणी । आला सन्निधानी काळ त्याचा ॥४३॥
देहअवसान शंकराचे झाले । ब्राह्मणांनी केले उत्तरकार्य ॥४४॥
तयाची पत्नी घेऊनि मातेसि । गयावर्जनासि मार्गी जात ॥४५॥
तीर्थविधिकारणे आली ते गोदेसि । तंव चांगयासि देखियेले ॥४६॥
देखूनि सिध्दासि उभयतां जनी । नमस्कारालागूनि येते झाले ॥४७॥
सतिद्वय येऊनि नमस्कार केला । सिध्दांनी दिधला आशीर्वाद ॥४८॥
पुत्रवती भव म्हणती चांगदेव । सद्गदित तंव कंठ झाला ॥४९॥
सजळ नयन कोमल वदन । ऐसे देखूनिया पुसते झाले ॥५०॥
बरवे स्वरुप गुण सुलक्षण । तुम्हा काय दु:ख जालें असे ॥५१॥
सिध्दाचे बोलणे ऐकूनिया कानी । तियेची जननी बोलियली ॥५२॥
गतभर्तृ असे कन्या सकेशी । जातो वाराणशी यात्रेलागी ॥५३॥
भ्रताराची अंगे घेऊनि सांगाती । गयावर्जनाते जात असो ॥५४॥
तुम्ही महापुरुषे दिधला आशीर्वाद । म्हणोनिया खेद वाटतसे ॥५५॥
म्हणती चांगदेव आशीर्वाद सत्य । कदा नोहे असत्य जाण माझा ॥५६॥
तेही भ्रताराची आंगे प्रक्षाळूनि । उदकालागूनि आणविले ॥५७॥
उदक मंत्रिले षडाक्षरमंत्रे । तिये प्राशानार्थ दिधलेसे ॥५८॥
नव मासां पुत्र तीसि झाला । विठ्ठल नामासि ठेवियले ॥५९॥
राहिलासे गर्भ तया दिवसापासूनि । आपुले सदनी ठेविलासे ॥६०॥
झालासे लौकिक परी कोणी न बोले । म्हणती आंगिकारिले समर्थानी ॥६१॥
ऐसा पुत्र पांच वरुषांचा झाला । पुढे व्रतबंधाला विचारिले ॥६२॥
आतां सवे चला पंढरपुरा । दीनांचा सोयरा पांडुरंग ॥६३॥
तुझिया पुत्राचा करुं व्रतबंध । शरीरसंबंध तुमचे ग्रामी ॥६४॥
ऐशिया विचारे गेले पंढरपुरा । माघ मास बरा लग्नाश्रय ॥६५॥
महाद्वारा जाऊनि दर्शन घेतले । कुशळ पुसिले पांडुरंगे ॥६६॥
म्हणती तुमचे कृपे सर्व यथास्थित । आशीर्वाद पुत्र झाला असे ॥६७॥
सर्व वर्तमान पायी निवेदिले । ऐकूनि बोलिले पांडुरंग ॥६८॥
तुमचा मनोरथ असे सिध्द । ऐसा आशीर्वाद घेतलासे ॥६९॥
आज्ञा घेऊनिया आले भीमतटी । स्थिर वाळवंटी राहिले ते ॥७०॥
करुनि स्नानसंध्या देव पूजियेला । पाक सिध्द केला आपुल्या हात ॥७१॥
क्षेत्रस्थ ब्राह्मण आले दर्शनासि । नमन तयांसि करिते झाले ॥७२॥
सांगती वर्तमान वरद शिष्याचा । याचे व्रतबंधाचा विचार करा ॥७३॥
ऐकूनि ब्राह्मणे बहुत धि:कारिले । विधवेचे पोटी झाले पोरटे हे ॥७४॥
म्हणती चांगदेव ईश्वरइच्छेने । मूल हे उत्पन्न झालेसे ॥७५॥
बोलती ब्राह्मण मनीची अपेक्षा । असे एक इच्छा पुरवणे ॥७६॥
तुमचा स्वयंपाक जितका जाहला । सर्व क्षेत्रस्थांला पुरवणे ॥७७॥
स्नाने करुनिया यावे सर्व जनी । म्हणती लहान थोर मिळवूनिया ॥७८॥
पुत्र आणि माता वाढतील अन्न । नव्हे तेंचि पूर्ण करील देव ॥७९॥
ऐकूनि वचना आले स्नान करुनि । मंडळी मिळूनि ब्राह्मणांची ॥८०॥
पाहती स्वयंपाक दहा मनुष्याचा । समुदाय सहस्त्रांचा बैसलासे ॥८१॥
चांगदेवे उदक प्रेक्षिले अन्नावरि । म्हणती झडकरी वाढा आता ॥८२॥
विठ्ठलासि म्हणती पात्री भात लवंडी । ब्राह्मण परवडी बोलताती ॥८३॥
म्हणती भातलवंड्या पात्री वाढी भात । नाम हे विख्यात जगी झाले ॥८४॥
भातलवंडे नाम झाले तेपासूनि । चांगयाने दिधले वरदान ॥८५॥
तितुकिया अन्नांत सहस्त्रभोजन । होऊनिया राहे अन्न यथस्थित ॥८६॥
ते ह्मणती स्वामी धन्य कळा ही तुमची । विठ्ठलाची कृपा असे ॥८७॥
विधवेच्या पुत्रा व्रतबंध केला । गायत्री मंत्राला उपदेशिले ॥८८॥
व्रतबंध करुनि घेतलीसे आज्ञा । आले ते कल्याणा गृही त्यांचे ॥८९॥
सर्व वर्तमान ऐकती लोक । म्हणती कौतुक थोर झाले ॥९०॥
सह्रद, इष्ट, मित्र, येती भेटावया । म्हणती थोर कार्या संपादिले ॥९१॥
वंशी शंकराच्या झालासे पुत्र । वरद यथार्थ चांगयाचा ॥९२॥
थोर गॄहस्थ त्याचे पाहती लक्षण । म्हणती हे निधान जन्मलेसे ॥९३॥
शरीरसंबंध झालासे तयाचा । थोर चांगयाचा प्रताप हा ॥९४॥
घेतलीसे आज्ञा चालिले तेथूनि । सर्वांनी येऊनि नमियेले ॥९५॥
विठ्ठलाची माता घाली लोटांगण । सर्व कुळधर्म तूचि माझा ॥९६॥
विठ्ठलाचे वंशी कुळधर्म तूंचि । आमुच्या वंशासि स्थापिले ॥९७॥
आमुचिये वंशी तुज जे पूजिती । संतति संपत्ति पावतील ॥९८॥
तूझिये पूजेचा व्यतिक्रम  करिती । दरिद्र भोगिती जन्मवरि ॥९९॥
चांगदेवे ऐसे ऐकूनिया बोला । तयांचे वंशासि वर दिला ॥१००॥
तेथूनिया पुढे जाती द्वारकेस । बहु यात्रा असे समागमे ॥१॥
यादव नामक यात्रेंत ब्राह्मण । धारुरीचा जाण, देशपांड्या ॥२॥
सवे पत्नी आला द्वारकेचे यात्रे । चांगया सत्पात्र देखियेला ॥३॥
नमूनि चांगयासि अनुग्रह घेतला । सर्वभावे झाला शिष्य त्याचा ॥४॥
पत्नी गरोदर यादवाचे संगे । करुनि तिचा त्याग पुढे गेला ॥५॥
केवळ ब्राह्मरण्य असे महीवरि । राहिली अंतुरी एकली ते ॥६॥
प्रसूतसमय सन्निधीच आला । धांवा करीतसे चांगयाचा ॥७॥
कृपाळू माउले दीनाचे वत्सले । अनाथाचे लळे पाळिसी तुं ॥८॥
चांगया चक्रपाणी सदगुरु जननी । मज ये निदानी पाव आतां ॥९॥
भ्रतार टाकूनि गेला असे मज । आतां सर्व लाज रक्षी माझी ॥११०॥
चांगयाचे नावे धांवा तिने केला । संकटी पावला केशवराज ॥११॥
भक्तांचे संकट पडे देवावरी । तात्काल श्रीहरि पावलेती ॥१२॥
द्वारकेचा कृष्ण आलासे धांवण्या । तेथे एक निर्माण गांव केले ॥१३॥
वृध्द एक विधवा, नांव कृष्णाबाई । आली लवलाही तियेपाशी ॥१४॥
कोठिल तूं बाई, पुसे वर्तमान । ती म्हणे मी दीन यात्रेकरु ॥१५॥
चांगयासांगाते जातो होतो यात्रे । आम्ही स्त्रीपुरुष उभयतां ॥१६॥
गरोदर असे नव मास झाले । भ्रतारे त्यागिले अरण्यांत ॥१७॥
भ्रतार विदेही असे आत्मज्ञानी । मजला टाकूनि गेला असे ॥१८॥
ऐकूनि करुणा कृष्णाबाई बोले । मज पाठविले असे चांगदेवे ॥१९॥
सांगितला तूझा असे प्रसूतकाळ । आलें मी तात्काळ धांवूनिया ॥१२०॥
सत्वर ऊठ, आतां जाऊं गावामध्ये । तुझे जीवाचा वेध कळला असे ॥२१॥
प्रसूतिसमयास जाणूनिया गेली । ते ग्रामांत आपुले गृहासि ॥२२॥
झाली ती प्रसूत, तीस पुत्र झाला । मग कृष्णाबाईला काय बोले ॥२३॥
तूंचि पिता, माय, बहीण, जाण । तूज मी उत्तीर्ण काय होऊं ॥२४॥
म्हणे कृष्णाबाई चिंता तूं न करी । चालवील हरि सर्व तुझे ॥२५॥
ऐसे वर्तमान झालेसे इकडे । पुढे काय झाले ऐकावे ॥२६॥
चांगदेव यात्रेसहवर्तमान । द्वारकेसि जाण पावलेती ॥२७॥
गोमतीचे स्नान करुनियां तीही । राउळांत, पाही, जाते झाले ॥२८॥
गेले राउळांत कृष्णदर्शनासि । मूर्ति हे ध्यानांत आणिताती ॥२९॥
नोहे दर्शन ध्यानासि आणितां । विस्मय हा चित्ता बहुत झाला ॥१३०॥
विस्मय होऊनि पाहे ज्ञानचक्षू । तंव लक्ष तेथे  पावलेसे ॥३१॥
महीचे तटाकीं प्रसूति यादवपत्नी । गेले ते रुक्मिणीपति तेथे ॥३२॥
चांगायाची यात्रा करीन जाणूनि । संकट जाणूनि गेले देव ॥३३॥
तिचे बाळंतपण केले असे देवे । पूर्ण चांगायासि कळो आले ॥३४॥
तेथूनि ध्यानासि आले महीतट । तात्काळ निकट आले असे ॥३५॥
तंव एक मास बाळंतपणी । देखिली अंगणी कृष्णाबाई ॥३६॥
उचलोनि लेकरुं घेतले वोंटिसि । म्हणतसे शिष्यासि पुत्र झाला ॥३७॥
हा शिष्य तुमचा असे निरंतर । वंशपरंपरा तुम्ही गुरु ॥३८॥
ऐसे बोलूनि शिशु वोटिसि घातले । बाळंतिणीने केले दंडवत ॥३९॥
तंव कृष्णाबाई झालीसे अदृश्य । दर्शन चांगदेवासि देऊनियां ॥१४०॥
फिरुनि चांगदेवे बाहिले कृष्णाबाई । तंव ते ठायी न पडे दृष्टी ॥४१॥
म्हणे द्वारकेचा कृष्ण येथे आला । रुपे तोचि झाला कृष्णाबाई ॥४२॥
धन्य तुमचे शिष्यपण स्थापिले श्रीकृष्ण । गुरुत्व दिधले पूर्ण आमुचे वंशी ॥४३॥
निरंतर नाम स्थापिले कृष्णे । वंशी होती बरवे हरिभक्त ॥४४॥
वंशाची उत्पत्ति ऐशी निरंतराची । जालासि देवाची कृपा तया ॥४५॥
यादवपत्नी आणि पुत्रासि घेतले । चांगदेव आले द्वारकेसि ॥४६॥
यादवासि पत्नीपुत्रा भेटविले । नामांसि ठेविले महादेव ॥४७॥
द्वारकेची यात्रा करुनि फिरले । पुनरपि आले पुण्यस्तंभा ॥४८॥
येऊनि पुण्यस्तंभा सोमेश्वरासि नमिले । दंडवत केले गौतमीसि ॥४९॥
केशवराजाचे दर्शन घेतले । सर्वही भेटले इष्टमित्र ॥१५०॥
ग्रामा आल्या पांचसात दिवस झाले । पंढरीचे आले वर्तमान ॥५१॥
बेदरीचा राजा बेदरी पातशहा । ब्राह्मणांसि बहू छळियेले ॥५२॥
हिंदुधर्म जितुके तितुके वर्जियले । राऊळ विध्वंसिले पंढरीचे ॥५३॥
केलीसे मशीद महाद्वार मोडून । सात मास पूर्ण झाले यासि ॥५४॥
मूर्ति सिंहासनाहूनि आच्छादिली । गुप्त हो ठेविली बडव्यांनी ॥५५॥
ऐसे वर्तमान ऐकूनि श्रवणी । पाहिलेसे ज्ञानी ज्ञानचक्षू ॥५६॥
ज्ञानचक्षू पहाती तंव असे सब्ध । उदास तें चित्त बहुत झाले ॥५७॥
पुण्यस्तंभाहूनि जाती बेदरासी । सांगते शिष्यंसि घेऊनिया ॥५८॥
दिंडी टाळ विणे पताका घेऊन । करिती कीर्तन नित्य मार्गी ॥५९॥
जातां क्वतुक झाले एक वाटे । जंगमाचा मठ मार्गी होता ॥१६०॥
मल्लिकार्जुन नाम गुरु जंगमाचा । ऐके चांगयाचा कीर्तिघोष ॥६१॥
येथूनियां पुढे अद्भुत चरित्र । परिसावे सदा संतजनी ॥६२॥
मरुद्गण वंशी कोयेरीचा सुत । भावे शरणांगत संतां पायी. ॥१६३॥
इति श्रीचांगदेवप्रकरणे षष्टोsध्याय:

N/A

References : N/A
Last Updated : August 06, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP