अध्याय चवथा

हा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.
मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.


चतुर्थ अध्यायी कथन ऐसे । चांगया ज्ञाने बोध केला ॥१॥
अनुग्रह मुक्ताईचा होईल चांगदेवा । इतिहास बरवा परिसावा ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव आणि तो सोपान । सांगताती खूण मुक्ताबाई ॥३॥
चांगदेवा ऐसा अनुग्रह करावा । मार्ग दाखवावा ब्रह्मज्ञान ॥४॥
ऐसा हा विचार करुनियां दृढ । मग काय पुढे करिते जाले ॥५॥
विश्रांतिवटाच्या छायेसि बैसती । चांगदेवाप्रति बोलताती ॥६॥
येथूनि बोलणे तयांचे मुखीचे । अभंग बोवीचे कौतुक ॥७॥
निवृत्ति ज्ञानेश्वर बोलती चांगदेवा । स्वात्मसुख अनुभवा दावूनियां ॥८॥
याचे मुखीचे अभंग परिसावे । जयांत बरवें ब्रह्मज्ञान ॥९।
विश्रांतिवटीं चांगदेवाभेटी । परस्परे कसोटी अनुभवाची ॥१०॥
निवृत्ती ज्ञानेश्वर म्हणती, तुम्ही थोर । सर्वज्ञ उदार, आह्मांलागी ॥११॥
षटचक्र भेदूनि साधिले योगासि । ऋध्दि सिध्दि दासी स्वये केल्या ॥१२॥
ऐकूनि उत्तर, जोडूनि दोन्ही कर । केला नमस्कार दीर्घदंडे ॥१३॥
संताचे दर्शन शुध्द झाले मन । गेला अभिमान विरोनिया ॥१४॥
काळ विवंचना वांचले हे शरीर; । पहा योगेश्वर, तुम्हां ऐसे ॥१५॥
वटेश्वर चांगा करीतसे विनंति । तोडा माझी गुंती ससाराची ॥१६॥
चवदा शत वरुषे भूमिगत होती । जगासि दाविती दंभधर्म ॥१७॥
व्याघ्रावरि बैसोनि व्याळ करी धरणे । मीतूपणे जिंकू जाणे तीव्र तेजे ॥१८॥
ऋध्दि सिध्दि नाना साधन बाणल्या । परी त्या लागल्या तुझ्या मुळी ॥१९॥
परिसा माझी मात; ऐकावी महेशा । साक्षात महेश तूंचि होसी ॥२०॥
तुझी तुज शुध्द लागली समाधि । बाउगी उपाधि सांडी, राया ॥२१॥
तुझी माझी भेटी कर्पूर अग्नीसि गोष्टी । पाहतां शेवटी दोन्ही नुरे ॥२२॥
अभिमाने नाशी, तमे नाडिलासि । बोलो ये संतांसि सांगो एक ॥२३॥
कोणते साधन ? कोण तुझे सुख । बोलो सुख दु:ख आपले तुझे ॥२४॥
ऐसेपरि तूते जाण प्रबोधिले । निवृत्ति साधिले आत्मसुख ॥२५॥
ज्ञानदेव म्हणे चांगावटेश्वरा । चाले पां निजधरा निजे निज ॥२६॥
योग तो कठिण साधिता साधन । तेणे गा चिदूघन न पाविजे ॥२७॥
यालागी आतां सुगम हे तूज । माझे निज गूज अंतरीचे ॥२८॥
इंद्रिये कोंडावी, आंबरावे मन । सहज ब्रह्मज्ञान लाधशील ॥२९॥
जेथे जेथे मन धांवूनिया जाय । तेथे तेथे आपण एक पाहे ॥३०॥
ज्ञानदेव म्हणे चांगया होई तूं निर्गुण । कळेल तुज खूण वटेश्वरी ॥३१॥
रजो गुण सांडी, तमोगुण खंडी । सत्वगुण मांडी, चांगया तूं ॥३२॥
काळाचा चोरटा झालासि तूं धीटा । परिआत्मज्ञान चोहाटा कळले नाही. ॥३३॥
तरि हे कर्मठता तामसी उद्भट । न कळे ते वाट योगियांची ॥३४॥
ज्ञानदेव म्हणे, संत तुम्ही खरे । तमोगुणाचे झरे आटवा वेगी ॥३५॥
शब्दज्ञान उदंड करिती कुचाळे । परि ते निराळे अनुभव ॥३६॥
सहा चार, अठरा व्याकरणे पढती । परि ते निराळे स्वयंज्योति रे चांगया ॥३७॥
निराळी म्हणावी तरि तेचि अघवी । डोळा भरुनिया पाहवी ज्ञानदेव म्हणे ॥३८॥
वटाचीये छाये बोलणे हे झाले । माध्यान्हासि आले रविमंडळ ॥३९॥
म्हणती ज्ञानदेव, ग्रामामध्ये चला । स्नानसंध्या करा माध्यान्हिक ॥४०॥
ऐसे बोलूनिया तेथूनि उठत । ग्रामामध्ये येत आश्रमासि ॥४१॥
ज्ञानदेव म्हणती मुक्ताबाई आतां । पाकाची सिध्दता करा वेगीं ॥४२॥
ऐशी आज्ञा ज्ञानदेवाची ऐकिली । मुक्ताबाई उठली स्नानालागीं ॥४३॥
घेऊनियां मृण्मयपात्री स्नानासि उदक । थोर कौतुक तेथे झाले ॥४४॥
तंव चांगदेव लघुशंके जाती । मुक्ता देखती नग्न दृष्टी ॥४५॥
देखतांचि नग्न माघारे फिरत । मुक्ताबाई बोलत तयांप्रति ॥४६॥
सदेह तुमचे जीवीचा नाही गेला । आत्मस्वरुपाला अनोळखी ॥४७॥
तुमचे देहीचा काय आत्मा असे । माझे देही वसे काय आम्ही ॥४८॥
गाई, म्हशी, आणि कुतरीं मांजरी । काय करिती वस्त्रा परिधान ॥४९॥
मृत्तिकेच्या भिंती उदंड कोनाडी । काय ते उघडी न येती दृष्टी ॥५०॥
स्वरुपावरि दृष्टि ठेवा बरव्या रीती । आत्मज्ञान मति विचारुनि ॥५१॥
चांगदेव ऐसे ऐकूनियां बोल । म्हणती सखोल ज्ञान यांचे ॥५२॥
यांचिया ज्ञानाचा न कळे मज पार । विश्वी विश्वंभर जैसा असे  ॥५३॥
म्हणती कांही एक करुं कौतुक । जेणे विश्वलोक टक पडे ॥५४॥
आश्चर्य करुनि स्वस्थानी बैसले । शिष्य बोलियले तयांप्रति ॥५५॥
क्षुधा स्वामी मज बहू लागलीसे । विलंब पाकासि दिसतसे ॥५६॥
धान्य जोंधळ्याचे त्यांनी आणविले । मस्तकीं ठेविले आपुल्या हाते ॥५७॥
तडतडा लाह्या फुटती जोंधळ्याच्या । भुजारी भट्टीच्या जेविं भाजी ॥५८॥
ज्ञानेश्वर म्हणती निवृत्ति, सोपानासि । अजूनि सिध्दाईसि भुललेती ॥५९॥
म्हणती निवृत्ति समागमे तुमच्या । खुणा आध्यात्माच्या कळती जेव्हा ॥६०॥
मिथ्या भासे तेव्हां भास सिध्दाईचा । चवदाशे वर्षाचा देह मिथ्या ॥६१॥
ज्ञानदेव ऐसे म्हणती मुक्ताईस । त्यांही कौतुकास थोर केले ॥६२॥
जोंधळ्याच्या लाह्या होती मस्तकावरि । सिध्दाईची थोरी दाखविली ॥६३॥
सोपानासि तुह्मी जवळी बैसवावे, । कौतुक दाखवावे भोजनकाळी ॥६४॥
तयाचे पृष्ठीवरि करा तुम्ही मांडे । ऐसी परवडी दाखवावी ॥६५॥
बाहेर येऊनि ह्मणता चांगदेवा । स्वयंपाक अघवा झाला असे ॥६६॥
सत्वर उठावें आतां भोजनासि । करावें स्नानासि विलंब झाला ॥६७॥
ऐकूनिया सर्व गेले इंद्रायणी । स्नानासि करुनि येते झाले ॥६८॥
येऊनियां मग गतीसि बैसती । पूज करिताती ज्ञानदेव ॥६९॥
चांगयाची पूजा ब्राह्मणांसहित । करुनि ह्मणती, कृतकृत्य ॥७०॥
संताचे पूजन देवपूजा हेचि । ऐशी हे वेदाची आज्ञा असे ॥७१॥
ब्राह्मणाची पूजा केली बरव्या रीती । मग वाढिताती पात्री अन्न ॥७२॥
शाका आणि भात वाढियेले मांडे । पाहती चहूंकडे पाक कोठे ॥७३॥
चांगदेव पाहतो कोणी कडे पाक । तंव आलोलिक देखियले ॥७४॥
सोपानपृष्ठीचे करुनि खापर । जठराग्नि तीव्र चेतविला ॥७५॥
मांडा करुनि पृष्ठीवरि टाकितांची । क्षण न लागतांची सिध्द होय ॥७६॥
ऐसे कौतुक दृष्टीस देखिले । भोजन केले मौनेकरुनि ॥७७॥
साष्टांग प्रणाम केला मुक्ताईते । म्हणे आता, माते, कृपाकरी ॥७८॥
लिखिताचा अर्थ सांगा यथासांग । जगीं सतसंग थोर असे ॥७९॥
ह्मणती ज्ञानदेवा अर्थ विचारावा । शिष्य एक द्यावा बळी त्यासि ॥८०॥
म्हणती प्रात: काळी करुं हा विचार । निवृत्ति ज्ञानेश्वर उठीयेले ॥८१॥
निद्रा करावया उठले चांगदेव । तेथे शिष्य सर्व करिती सेवा ॥८२॥
आस्तृण घालूनि सेवा करिताती । सुखे पहूडती योगीराज ॥८३॥
लागलोसे निद्रा स्वामीसि जाणूनि । शिष्य विचारसि करिते झाले ॥८४॥
प्रात:काळी बळी मनुष्याचा द्यावा । कवणचीया जीवावरि नेणो ॥८५॥
ज्याचा जीव तया एकाचि हा असे । स्वामीस तो बहु दिसे समुदाय ॥८६॥
येथूनिया आतां गमन करावे । जोंवरि नुगवे दिनकर ॥८७॥
ऐसे विचारुनि गेला सर्व मेळा । आपुल्याला स्थळा, जेथिचा तेथे ॥८८॥
राव ते संपले जाला प्रभातसमय । आले ज्ञानदेव दर्शनासि ॥८९॥
चांगदेव जेथे निद्रिस्त आसनी । त्या स्थळी जाऊनी बैसताती ॥९०॥
तव चांगदेव करिती प्रात:स्मरण । ज्ञानदेवे नमन केले तया ॥९१॥
परस्परे नमन झाले उभयतांचे । सार्थक जीवाचे करणे आता. ॥९२॥
प्रात:काळ झाला सुमुहूर्ते असे । मनुष्य बळीस आणा वेगी ॥९३॥
ऐकूनि चांगदेवे शिष्य पाचारिले । कोणीही न बोले आळविल्या ॥९४॥
चवशत शिष्य रात्रीमध्ये गेले । एकले राहिले चांगदेव ॥९५॥
बोलती ज्ञानदेवा एकला मी असे । मज बळीदाना योजा स्वामी ॥९६॥
ऐकूनि ज्ञानदेव हंसून बोलिले । शरीर दंडिले व्यर्थ तुम्ही ॥९७॥
चवदाशे वरुषे व्यर्थ श्रम केला । शिष्यसमुदायाला मिळवूनि ॥९८॥
शेवटी ते कोणी न येती कामासी । ऐशा निश्चयासि कळो आले ॥९९॥
इतके बोलणे ऐकूनि ज्ञानयाचें । भरे वैराग्याचे वारें अंगी ॥१००॥
साष्टांग नमन केले ज्ञानदेवा । अनुग्रह बरवा करा आता. ॥१०१॥
येथूनिया पुढे अनुग्रह अभंग । जेणे होय सांग ब्रह्मज्ञान ॥१०२॥
निवृत्ति, ज्ञानेश्वर आणि तो सोपान । सांगितली खूण मुक्ताबाई ॥१०३॥
आधीच शुध्द पात्र वैराग्य तापले । गूज सांगितले चांगदेवा ॥१०४॥
मी कोण ते पाहावे, आपणाते ओळखावे । स्वरुपी रमावे रात्रंदिवस ॥१०५॥
त्रिगुणावरुते ज्ञान होई तूं सावध । सांगिजेल बोध पुढील तो ॥१०७॥
ऐसा अनुग्रह मुक्ताईने केला । पूर्ण बोध झाला चांगदेवा ॥१०८॥
चराचरी अवघा भासे विश्वंभर । स्वरुपी सादर मन झाले ॥१०९॥
चौदा विद्येचा चौसष्टी, कळेचा । गळत सिध्दाईचा अभिमान ॥११०॥
ऐसे पूर्ण ज्ञान बिंबलेसें अंगी । अवघा भासे जगी पांडुरंग ॥१११॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी। निरंजनी वनी, पांडुरंग ॥११२॥
अवघे चराचर भासे ब्रह्मरुप । ऐसे गुरुकृपे ज्ञान झाले ॥११३॥
नोहे ब्रह्मज्ञान सदगुरुवांचून । वेदशास्त्र पुराण वेवादती ॥११४॥
म्हणोनि सदगुरुचा अनुग्रह घ्यावा । सद्भाव धरावा एकनिष्ठ ॥११५॥
आळंदीस ऐसे राहिले एक मास । समागमे देख ज्ञानेशाच्या ॥११६॥
पुसती ज्ञानेश्वर तुम्ही येथे येऊनि । गेलासे क्रमूनि मास एक ॥११७॥
येऊनियां येथे काय साधियेले । ते वर्म आम्हां कळले नाही ॥११८॥
आमुच्या पत्राचे द्यावे प्रतिउत्तर । ऐसे ज्ञानेश्वर बोलिलेती ॥११९॥
ऐकूनी प्रणाम केला ज्ञानदेवा । आपुल्या अनुभवा बोलताती ॥१२०॥
वोळना वोळसे पूर आला । तेथे जन बुडाला बाईयांनो ॥१२१॥
बुडाला बुडाला  म्हणती । परि बुडाल्याची शुध्दि न घेती ॥१२२॥
ऐल बुडाला पैल बुडाला । कोरडेचि डोही जन बुडाला ॥१२३॥
निवृत्ति सांगडी; मुक्ताबाई तारु । चांगा पैलपारु उतरला ॥१२४॥
लिखिताचे उत्तर उत्तरपंचविशी । बोलिले ज्ञानेशासि आत्मसुख ॥१२५॥
ऐकूनि ज्ञानेशोच समाधान झाले । सार्थक हे केले म्हणती तुम्ही ॥१२६॥
बोले मुक्ताबाई चवदाशे वरुषांचे । कलेवर तुमचे अजरामर ॥१२७॥
आतां येथूनिया जावे पंढरपूरा । संतांच्या माहेरा, भक्तिभावे ॥१२८॥
मुक्ताबाई ऐसी आज्ञा देत असे । नमन चौघासं करिते झाले ॥१२९॥
साष्टांग प्रणिपात तयांलागी केला । गुरुपूजनाला आरंभिले ॥१३०॥
षोडशोपचारी पूजा वेदमंत्री । सदृढ भावार्थ गुरुचे पायी ॥१३१॥
जेणे हा संसार मृगजळ केला । भवासिंधु तरविला पायवाटे ॥३२॥
ब्रह्मरुप अवघे चराचर भासे । ऐसिया ज्ञानास बोध केला ॥३३॥
धन्य धन्य निवृत्ति आणि हा सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥३४॥
धन्य मुक्ताबाई सदगुरु माउली । कृपेची साउली केली मज ॥३५॥
करुनि पंचारती ऐशी स्तुति केली । मंत्रपुष्पांजली वाहिलीसे ॥३६॥
ऐसे बरव्या रीती करुनि पूजन, । साष्टांग नमन करिता झाला ॥३७॥
करुनि नमन आज्ञा घेत असे । पुसूनि सर्वास स्वार झाले ॥३८॥
निवृत्ति ज्ञानेश्वर बोळवीत आले । लोटांगण झाले परस्परे ॥३९॥
येथूनिया कथा पुढे ऐसी असे । गुप्त देहास करतील ॥४०॥
नरदेह दुसरा होईल निर्माण । ऐसे अनुसंधान पुढे असे ॥४१॥
उत्कृष्ट चरित्र पुढे करतील । भाव धरतील पांडुरंगी ॥४२॥
संजीवनी विद्या मंत्र षडाक्षरी । जाऊनि पंढरी साधतील ॥४३॥
चवदाशे वर्षाचे चरित्र हे केले । शरीर गुप्त झाले वटेश्वरी ॥४४॥
अयोनिसंभव होईल पुन्हा जन्म । ऐसे अनुसंधान पुढे असे. ॥४५॥
शामजी गोसावी मरुद्गणवंशी । करी चरित्रासि जीर्णोध्दार ॥४६॥
इति श्रीचांगदेवप्रकरणे वटेश्वरचरित्र नाम चतुर्थोsध्याय:

N/A

References : N/A
Last Updated : August 06, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP