TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|॥ श्रीभक्तविजय ॥|
अध्याय ३६

अध्याय ३६

संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित


अध्याय ३६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥    
आजिचा दिवस सुमंगल ॥ जे सज्ञान श्रोते पातले प्रेमळ ॥ तेणें सर्व कामना होऊन सफळ ॥ कथा रसाळ चालली ॥१॥
जनजसवंत सावकार ॥ रामउपासक भक्त थोर ॥ त्याचें चरित्र अति प्रियकर ॥ ऐका चतुर भाविक हो ॥२॥
पांच पुत्र लक्षपती ॥ घरीं भरल्या सर्व संपत्ती ॥ परी तो श्रीरामभजन प्रीतीं ॥ अहोरातीं करीतसे ॥३॥
आल्या अतीता देतसे अन्न ॥ साधुजनांचा करी सन्मान ॥ सुखी करी याचकजन ॥ विमुख न होय कोणासी ॥४॥
धर्मवासना असे फार ॥ तंव तयाचे पुत्र जाहले थोर ॥ परम दुष्ट दुराचार ॥ हरिभजनीं विमुख जे ॥५॥
जेवीं पुलस्त्याच्या वंशीं जाण ॥ विष्णुद्रोही जन्मला रावण ॥ कीं सोमवंशी दुर्योधन ॥ अति अवगुण त्यामाजी ॥६॥
तेवीं जनजसवंताचें पोटीं भले ॥ अभक्त दुराचारी जन्मले ॥ उचितानुचित त्यांस न कळे ॥ पापिष्ठ खल अति निंदक ॥७॥
धर्म करितां नावडे त्यांसी ॥ म्हणती वेड लागलें वृद्धासी ॥ आतां काय करावें यासी ॥ विचार तयांसी पडियेला ॥८॥
सुखाचे सांगाती अवघे जन ॥ अंतीं देताती अव्हेरून ॥ यालागीं चित्तीं सावधान ॥ सर्वकाळ असावें ॥९॥
जिव्हा आहे सावधान ॥ तों वर्णावे श्रीहरीचे गुण ॥ हस्त असतां विष्णुपूजन ॥ निजनिष्ठेनें करावें ॥१०॥
पाय असतां हरिरंगणीं ॥ नृत्य करावें निर्लज्ज होऊनी ॥ कर्ण असतां आवडीकरूनी ॥ भक्तचरित्रें ऐकावीं ॥११॥
शरीरीं शक्ति आहे फार ॥ तंव यात्रेसी जावें वारंवार ॥ क्षेत्र असतां रुक्मिणीवर ॥ आवडीकरून पाहावा ॥१२॥
असो जनजसवंत जनीं ॥ यापरी सावध होऊनी ॥ धर्म करितां पुत्र कामिनी ॥ त्यांचिया मनीं नावढे ॥१३॥
म्हणती हा आमुचा वैरी ॥ येणें बुडविली सावकारी ॥ मग कांहीं धन ते अवसरीं ॥ चोरूनियां ठेविलें ॥१४॥
दुर्जनांसी नावडे सज्जन ॥ चोरासी नावडे चांदण ॥ पतिव्रतेची कीर्तिं ऐकून ॥ व्यभिचारीण जाजावे ॥१५॥
कीं सूर्योदय होतांचि जाण ॥ उलूकासी वाटे आलें मरण ॥ कीं सज्ञान पंडित देखोन ॥ मूर्खासी कष्ट वाटती ॥१६॥
नातरी साधुजन ॥ देखोनि दृष्टीं ॥ निंदक होती परम कष्टी ॥ कीं नपुंसकाचे दृष्टीं ॥ प्रतापी शूर नावडे ॥१७॥
ब्राह्मण देखोनि कर्मनिष्ठ ॥ भ्रष्टांसी होती फार कष्ट ॥ जनजसवंताचे पुत्र नष्ट ॥ नानापरी जल्पती ॥१८॥
म्हणती जाऊनि राजद्वारासी ॥ वर्तमान सांगावें तयासी ॥ मारूनि टाकावें पितयासी ॥ विचार मानसीं दृढ केला ॥१९॥
मग राजद्वारासी चौघे जण ॥ जाऊन सांगती गार्‍हाण ॥ म्हणती आमुचा पिता मूर्ख पूर्ण ॥ वांटितो धन स्वइच्छें ॥२०॥
आमुचे पदरीं द्रव्य असतां ॥ तें तुझेंच आहे नृपनाथा ॥ कार्यास येईल संकट पडतां ॥ यांत अन्यथा असेना ॥२१॥
तरी बोलावूनि तयाप्रतीं ॥ शिक्षा करावी भूपती ॥ ऐकोनि दुर्जनांची कुमती ॥ अधम चित्तीं संतापला ॥२२॥
अविवेकी राजा पूर्ण ॥ ऐकोनियां तयांचें वचन ॥ विचार न करितांचि त्यानें ॥ जनजसवंतासी पाचारिलें ॥२३॥
अविवेकी राजा प्रधान खळ ॥ जेथें न दिसे नदीचें जळ ॥ भाविक लोक नसतां प्रेमळ ॥ तेथूनि तत्काळ निघावें ॥२४॥
भले आणि साधुजन ॥ जेथें नसे हरिकीर्तन ॥ आत्मचर्चा पुराणश्रवण ॥ नसतां तेथून निघावें ॥२५॥
जेथें सत्कर्मीं नाहीं प्रीती ॥ नृपवर पाहेना न्यायनीती ॥ अधर्मीं रूढ जाहली प्रवृत्ती ॥ त्याचे संगतीं न बैसावें ॥२६॥
बागाईत सावकार ॥ जेथें नसे विवेकीं नर ॥ तेथें भल्यानें क्षणभर ॥ राहूं नये सर्वथा ॥२७॥
राजा म्हणे जनजसवंतासी ॥ ऐसा उन्मत्त कां जाहलासी ॥ द्रव्य याचकां वांटितोसी ॥ आपुले पुत्रांसी न कळतां ॥२८॥
जनजसवंत तयासी उत्तर देत ॥ मी तरी ऐसाचि आहे उन्मत्त ॥ श्रीरामभजनीं धरूनि प्रीत ॥ साधुसंत पूजीतसें ॥२९॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ राजा जाहला क्रोधायमान ॥ जैसा रावा बोलतां पिंजर्‍यांतून ॥ ससाणा मनीं संतापे ॥३०॥
मग जसजसवंताचे पुत्रांकारण ॥ दुराचारी बोलिला वचन ॥ मी जीवें मारितों याजकारण ॥ तुमचे मतेंकरूनि ॥३१॥
पुत्र म्हणती ते अवसरीं ॥ पिता नव्हे हा आमुचा वैरी ॥ याची मोट बांधूनि सत्वरी ॥ टाका लवकरी उदकांत ॥३२॥
जनजसवंताची मोट बांधून ॥ त्यामाजी घातले पाषाण ॥ पुढें हौद भरला जीवन ॥ तयामाजी टाकिला ॥३३॥
संकट पडतां जानकीवर ॥ भक्तकार्यासी पातला सत्वर ॥ कांसवरूप धरूनि रमावर ॥ पाठीवर धरियेला ॥३४॥
जनजसवंत म्हणे रायासी ॥ मजला रक्षिता हृषीकेशी ॥ स्तंभाविण आकाशासी ॥ जेणें उचलोनि धरियेलें ॥३५॥
रविचंद्रांसी दिधली दीप्ती ॥ जयाचे तेजें ते राहाटती ॥ तो विश्वव्यापक जगत्पती ॥ संरक्षिता भक्तांसी ॥३६॥
रामावतारीं जेणें ॥ उदकीं तारिले पाषाण ॥ तो जानकीजीवन रघुनंदन ॥ संरक्षिता आम्हांसी ॥३७।
कूर्मरूप धरूनि तेणें ॥ जनजसवंतासी उचलून ॥ अंतराळीं धरिलें जाण ॥ प्रत्यक्ष पाहें आतां तूं ॥३८॥
ऐसें वचन ऐकोनी ॥ राजा अनुतापलासे मनीं ॥ उदकांत उडी टाकूनी ॥ जनजसवंतासी काढिलें ॥३९॥
आपुले हातें मोट सोडून ॥ जनजसवंताचे धरिले चरण ॥ म्हणे माझा अपराध जाहला जाण ॥ क्षमा अक्रीं भक्तराया ॥४०॥
शिक्षा करूनियां पुत्रांसी ॥ म्हणे शरण जावें पितयासी ॥ त्यांहीं उत्तर धरूनि मानसीं ॥ लोटांगण घातलें ॥४१॥
दुर्बुद्धि टाकोनियां जीवें ॥ पित्यासी पूजिती निजभावें ॥ श्रीरामभजनीं लागले सवें ॥ निजभक्तलाघव देखोनि ॥४२॥
आणिक ऐका श्रोते जन ॥ दुसरा सुरदास मदनमोहन ॥ त्याचें चरित्र अति पावन ॥ रसाळ गहन अवधारा ॥४३॥
अकबर राजा हस्तनापुरीं ॥ त्याजपासीं करीत होता चाकरी ॥ तो मथुरादेशींचा अधिकारी ॥ केला सत्वरी नृपनाथें ॥४४॥
मथुरा गोकुळ वृंदावन ॥ पुण्यक्षेत्रें हीं पुरातन ॥ जेथें श्रीकृष्णें अवतार धरून ॥ लीला संपूर्ण दाखविली ॥४५॥
म्हणोनि भक्त वैष्णव पुण्यवंत ॥ बैरागी बहुत नांदती तेथ ॥ संसारीं होऊन विरक्त ॥ भजनीं त्वरित लागलें ॥४६॥
वैष्णवांसी देतां वस्त्र अन्न ॥ तृप्त होतसे जगज्जीवन ॥ जेवीं मातेचे डोहाळे पुरतां जाण ॥ गर्भ संपूर्ण तृप्त होय ॥४७॥
कीं पुत्राचा विजय ऐकोनि कानीं ॥ पिता सुखावे आपुलें मनीं ॥ तेवीं निजभक्तांसी पूजितां कोणी ॥ चक्रपाणी संतोषे ॥४८॥
कीं मूळासी जीवन घालितां प्रीतीं ॥ शाखा अवघ्याच टवटवती ॥ तेवीं निजभक्तांसी पूजितां प्रीतीं ॥ वैकुंठपति उल्हासे ॥४९॥
कीं बाळकां लेववितां अलंकार ॥ जननीस कौतुक वाटे थोर ॥ तेवीं वैष्णव पूजितां निरंतर ॥ शारंगधर उल्हासे ॥५०॥
ऐसें जाणोनि सुरदास ॥ भजों लागला वैष्णवांस ॥ पक्वान्नें करूनि सुरस ॥ जेववी संतांस निजप्रीतीं ॥५१॥
मेवा मिठाई दूध पेढे ॥ खाज्या करंज्या साखरमांडे ॥ यांचे सत्वर भरूनि गाडे ॥ संतांकडे पाठवीतसे ॥५२॥
ऐसें सत्पात्रीं द्रव्य वेंचितां ॥ संतोष वाटला रुक्मिणीकांता ॥ म्हणे सुरदास प्रपंचीं असतां ॥ भरूनि गाडे ममभक्तां निजप्रीतीं ॥५३॥
ऐसा वैष्णवीं धरितां भाव ॥ पदरींचें द्रव्य वेंचलें सर्व ॥ सुरदासमानसीं चिंतार्णव ॥ जाहला बहुत तेधवां ॥५४॥
म्हणे पदरींचें वेंचून गेलें धन ॥ आतां संतसेवेसी पडों पाहे उण ॥ वैष्णवांसी न घालितां मिष्टान्न ॥ मग संसारीं वांचणें कासया ॥५५॥
मग विचार करी मानसीं ॥ म्हणे राजद्रव्य आहे मजपासीं ॥ तें वेंचोनियां सद्भावेंसी ॥ भोजन संतांसी घालावें ॥५६॥
राजा कोपूनियां मजवरी ॥ जीवेंच मारूनि टाकील जरी ॥ तरी सार्थक होईल या संसारीं ॥ विचार अंतरीं दृढ केला ॥५७॥
वैष्णवसेवेसी लागतां जाण ॥ जरी वेंचले माझे प्राण ॥ तरी भवरोग अति दारुण ॥ दूर होईल तत्काळ ॥५८॥
ऐसा करूनियां विचार ॥ फोडिलें राजद्रव्यभांडर ॥ वैष्णवसेवेसी अति तत्पर ॥ निश्चय थोर धरियेला ॥५९॥
नानापरींचीं पक्वान्न ॥ करून घाली संतांसी भोजन ॥ मथुरा गोकुळ वृन्दावन ॥ ते स्थळीं संतजन तृप्त केले ॥६०॥
वस्त्रें भूषणें देवतार्चन ॥ करूनि देत संतांकारण ॥ धर्मशाळा बहुत बांधून ॥ सकळांकारण दिधल्या ॥६१॥
ऐशीं लक्ष दाहा सहस्रवरी ॥ द्रव्य वेंचिलें ते अवसरीं ॥ त्याचा दिवाण होता दुराचारी ॥ तो देखोनि अंतरीं क्रोधावला ॥६२॥
मग हस्तनापुरासी जाऊन ॥ रायासी सांगितलें वर्तमान ॥ म्हणे सुरदास मदनमोहन ॥ मथुराप्रांतीं ठेविला ॥६३॥
तेणें तुमचें द्रव्य समस्त ॥ व्यर्थ वेंचिलें अनुचित ॥ अकबरें ऐकोनि ऐसी मात ॥ क्रोधयुक्त जाहला ॥६४॥
जैसें यज्ञांत घृत पडलें ॥ अज्ञान म्हणती वायां गेलें ॥ नातरी तुळसीस जीवन घातलें ॥ मूर्खासी भासलें व्यर्थचि ॥६५॥
कीं याचकांसी करितां अन्नदान ॥ कृपणासी वाटे नागवण ॥ कीं तापसी हिंडतां तीर्थाटन ॥ विलासी भ्रमण मानिती ॥६६॥
नातरी विप्र पवमान पढतां अखंड ॥ अविंधांसी वाटे बडबड ॥ कीं निजभक्तभजनीं धरितां चाड ॥ निंदकां वेड भासतसे ॥६७॥
तेसें वैष्णवांसाठीं द्रव्य वेंचिलें ॥ दुर्बुद्धि म्हणे व्यर्थ गेलें ॥ राजयासी सांगतां ते वेळे ॥ क्रोधें मन खवळलें त्याचें ॥६८॥
मग दूत पाठवूनि नृपनाथ ॥ सुरदासासी बोलावी निश्चित ॥ म्हणे मथुराप्रांतींचें द्रव्य समस्त ॥ यावें त्वरित घेऊनि ॥६९॥
पत्र लिहून ऐशा रीतीं ॥ तत्काळ पाठवी दूतांहातीं ॥ म्हणे ऐशीं लक्ष दहा सहस्र गणतीं ॥ द्रव्य त्याप्रति मागावें ॥७०॥
मग सुरदासाचे वाड्यांत ॥ राजदूत आले अकस्मात ॥ मंदिर वेढोनि सभोंवतें ॥ क्रोधयुक्त बोलती ॥७१॥
म्हणती लोटले दोन संवत्सर ॥ परी त्वां आणिला नाहीं करभार ॥ म्हणोनि क्रोधावला अकबर ॥ तुम्हांसी हुजूर बोलाविलें ॥७२॥
जितुका देश तुमचे स्वाधीन ॥ तें द्रव्य सत्वर चला घेऊन ॥ नाहीं तरी राजाज्ञेकरून ॥ नेऊं बांधोन तुम्हांप्रति ॥७३॥
मग सुरदास बोले प्रत्युत्तर ॥ म्हणे व्यर्थचि कोपला नृपवर ॥ म्यां द्रव्य उकलूनि सत्वर ॥ घेतलें जोहार अमोलिक ॥७४॥
तें दाखवितां रायाकारणें ॥ संतुष्ट होईल निजमनें ॥ परीक्षक मोल करितां जाणें ॥ तरी दुप्पट गुणें होईल ॥७५॥
ऐसें सांगोनि तयाप्रती ॥ सदनांत गेला एकांतीं ॥ दोन संदुका कांतेहातीं ॥ सत्वरगती आणविल्या ॥७६॥
गारा भरूनि तयांआंत ॥ राजयासी पत्र लिहिलें त्वरित ॥ म्हणे साधुसंतींद्रव्य समस्त ॥ वेंचिलें सत्य नृपनाथा ॥७७॥
ऐशीं लक्ष दहा सहस्रवरी ॥ द्रव्य वेंचूनि सत्पात्रीं ॥ सुरदास पळाले अर्धरात्रीं ॥ ऐसें पत्रीं लिहिलें पैं ॥७८॥
संदुकांत पत्र घालूनि सत्वरी ॥ कुलुपें ठोकलीं ते अवसरीं ॥ आपुले नांवाची मोहोर वरी ॥ केली झडकरी ते समयीं ॥७९॥
राजदूत द्वारीं बैसले देखा ॥ त्यांजवळी नेऊनि दिधल्या संदुका ॥ म्हणे अमूल्य वस्तु घेऊनि अनेका ॥ ठेविल्या होत्या मंदिरीं ॥८०॥
राजदर्शनासी यावें त्वरित ॥ हें आमुच्या होतें मनांत ॥ ऐसी ऐकूनि सुरदासाची मात ॥ संतोष चित्तीं तयांचे ॥८१॥
म्हणती तुम्ही सज्ञान नर ॥ स्वामिकार्यासी अति तत्पर ॥ ऐसें असतां साचार ॥ व्यर्थचि नृपवर कोपला ॥८२॥
नानापरींचीं पक्वान्नें करून ॥ सुरदासें दूतांसी घातलें भोजन ॥ सकळांसी वस्त्रें भूषणें देऊन ॥ संतुष्टमन ते केले ॥८३॥
निद्रा करवूनि तयांप्रती ॥ सुरदास पळाले अर्धरातीं ॥ अरण्यांत जाऊनि सत्वरगती ॥ भजन प्रीतीं करीतसे ॥८४॥
सरूनि गेली सकळ यामिनी ॥ तों उदयासी आला वासरमणी ॥ राजदूत सत्वर उठोनी ॥ सुरदास नयनीं विलोकिती ॥८५॥
तंव तो न दिसे मंदिरांत ॥ धुंडोनि पाहाती नगरांत ॥ ग्रामप्रदेशीं अरण्यांत ॥ पाहती समस्त लगबगें ॥८६॥
म्हणती राजयाच्या भयेंकरूनी ॥ सुरदास पळोनि गेला तीर्थाटनीं ॥ आतां नृपवर वृत्तांत ऐकोनी ॥ आपणालागोनि दंडील ॥८७॥
यापरी भय पावूनि मनीं ॥ सवेंचि करिती समाधानी ॥ म्हणती जोहाराची संदुक भरूनी ॥ आपणांपासीं ठेविली ॥८८॥
ते राजयासी दाखवितां सत्वरी ॥ कदापि न कोपे आपणावरी ॥ ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ हस्तनापुरीं चालिले ॥८९॥
जाऊनि अकबररायाजवळी ॥ वृत्तांत निवेदन केला सकळी ॥ संदुक काढूनि तत्काळीं ॥ दिधली ते वेळीं नृपनाथा ॥९०॥
म्हणती धराधीशा ऐक वचन ॥ सुरदास परम विचक्षण ॥ तेणें अमूल्य जोहार घेऊन ॥ ठेविलें होतें निजमंदिरीं ॥९१॥
परी दुर्बुद्धीची ऐकूनि मात ॥ तलफ केली त्यासी त्वरित ॥ तो निर्भय असोनि मनांत ॥ होता येत दर्शना ॥९२॥
परंतु आम्ही जाऊनि बैसलों निकटीं ॥ भय उपजलें त्याचें पोटीं ॥ मग जोहार दाखवूनि उठाउठी ॥ आपण शेवटी पळाला ॥९३॥
ऐसीं दूतवचनें ऐकोनी ॥ कबर विस्मित जाहला मनीं ॥ मग बिरबलासी बोलावूनी ॥ वृत्तांत त्यासी सांगितला ॥९४॥
संदुक घेऊनि ते अवसरा ॥ कुलूप काढोनि पाहाती सत्वरा ॥ जोहार पाहातां निघाल्या गारा ॥ दूत थरथरां कांपती ॥९५॥
तों पत्र देखिलें तयाआंत ॥ वाचितां लोक ऐकती समस्त ॥ राजा सादर देऊनि चित्त ॥ ऐके प्रीत करूनि ॥९६॥
ऐशीं लक्ष दहा सहस्र गणती ॥ द्रव्य वेंचिलें साधुसंतीं ॥ मग सुरदास भय पावूनि चित्तीं ॥ अर्धरातीं पळाला ॥९७॥
पत्र वाचितां त्या अवसरा ॥ आश्चर्य वाटलें नृपवरा ॥ चाहाडासी बोलावूनि सत्वरा ॥ म्हणे असत्य बरा बोलिलासी ॥९८॥
सुरदासें सत्पात्रीं द्रव्य वेंचिलें ॥ तूं आम्हांसी सांगसी वायां दवडिलें ॥ वैष्णवद्वेषी आहेसी कळलें ॥ आतां तुज दंडिलें पाहिजे ॥९९॥
शिक्षा करून त्यासी सत्वर ॥ पत्र वाचिता जाहाला अकबर ॥ तों सुरदासाचें हस्ताक्षर ॥ ओळखिलें साचार तेधवां ॥१००॥
अश्रु पातले नयनीं ॥ प्रधानासी बोले मधुरवचनीं ॥ म्हणे सुरदासाऐसा सेवक जनीं ॥ धुंडिता त्रिभुवनीं मिळेना ॥१॥
मी राजमदें उन्मत्त जाण ॥ त्याणें करविलें परमार्थसाधन ॥ आतां त्यासी देऊनि अभयवचन ॥ आणा धुंडोन भेटावया ॥२॥
पत्रें धाडोनि देशोदेशीं ॥ वेगें आणावें सुरदासासी ॥ राजाज्ञा होतांचि ऐसी ॥ संतोष सकळांसी वाटला ॥३॥
पश्चिमदेशींचे अधिकारी ॥ तयांसी पत्रें पाठविलीं सत्वरी ॥ कीं सुरदास दृष्टीं देखिला जरी ॥ पाठवा लवकरी भेटावया ॥४॥
माझें भय पावूनि मनीं ॥ अनुतापें गेला तीर्थाटनीं ॥ कोणीं अवचित देखिला नयनीं ॥ तरी अभय देऊनि पाठवावा ॥५॥
ऐसीं पत्रें लिहितां त्वरित ॥ देशोदेशीं प्रकटली मात ॥ सुरदास होता मथुरेंत तेणें वृत्तांत ऐकिला ॥६॥
विस्मित जाहला अंतःकरणीं ॥ म्हणे रायासी कृपा उपजली मनीं ॥ न कळे ईश्वराची करणी ॥ चक्रपाणि कृपाळु ॥७॥
जो विश्वव्यापक श्रीहरी ॥ नांदतसे सर्वांतरीं ॥ त्याचे कृपेनें मजवरी ॥ राजा अंतरीं संतोषला ॥८॥
मग समाधान मानूनि स्वस्थ ॥ हस्तनापुरासी गेला त्वरित ॥ राजदर्शन होतांचि तेथ ॥ थोर सन्मान पावला ॥९॥
अकबरें सत्वर उठोन ॥ सुरदासासी दिधलें आलिंगन ॥ म्हणे तुजऐसा सेवक आन ॥ धुंडितां त्रिभुवन नाढळे ॥११०॥
सत्पात्रीं द्रव्य वेंचिलें जाण ॥ हें ठाउकें नाहीं मजलागून ॥ दुर्बुद्धीचे वचनेंकरून ॥ तुझें छळण केलें कीं ॥११॥
आतां निर्भय होऊनि सत्वर ॥ चालवीं मागील अधिकार ॥ ऐसें बोलतां नृपवर ॥ सुरदास उत्तर देतसे ॥१२॥
म्हणे ऐक आतां धराधीशा ॥ म्यां टाकिली प्रपंचआशा ॥ आतां पुन्हां मागुती भवपाशा ॥ वृथा कासया घालिसी ॥१३॥
अकबर बोले वचनोक्ति ॥ तुज तंव पातलीसे विरक्ति ॥ निःशेष टाकिली मायाभ्रांति ॥ हें मजप्रति कळतसे ॥१४।
परि पहिला अधिकार चालवूनी ॥ द्रव्य लाविजे संतांकारणीं ॥ वैष्णवसेवेसी तुजविण कोणी ॥ सज्ञान नयनीं दिसेना ॥१५॥
ऐशीं लक्ष दहा सहस्र जाण ॥ स्वाधिकारें उकलोनि धन ॥ वैष्णवभक्तांसी भोजन ॥ मथुराक्षेत्रीं घालावें ॥१६॥
तुवां अनुताप धरूनि अंतरीं ॥ राजसेवा टाकिली निर्धारीं ॥ परी संतसेवेचा अधिकारी ॥ होईं सत्वरी ममाज्ञा ॥१७॥
ऐकोनि रायाचें नम्र वचन ॥ सुरदास करी मनीं विचारण ॥ म्हणे प्रपंचीं परमार्थ येतां घडोन ॥ तरी सर्वथा टाकून न द्यावा ॥१८॥
मग रायासी म्हणे आज्ञा प्रमाण ॥ संतसेवा द्यवी मजलागून ॥ अकबरें तत्काळ गौरवून ॥ सनदा लिहून दीधल्या ॥१९॥
मग सुरदास मदनमोहन ॥ मथुराक्षेत्रीं आला परतोन ॥ नाना परींचीं दिव्यान्नें ॥ संतांसी भोजन घालीतसे ॥१२०॥
मागें भय होतें अंतरीं ॥ कीं राजा कोपेल मजवरी ॥ तें श्रीहरिकृपेनें जाहलें दूरी ॥ हर्ष अंतरीं न समाये ॥२१॥
संतसेवेची धरूनि प्रीती ॥ ध्यानांत आणी श्रीकृष्णमूर्ती ॥ नामस्मरण अहोरातीं ॥ गात कीर्ति निजप्रेमें ॥२२॥
नानापरींचे प्रबंध गीत ॥ स्वमुखें रचूनियां कवित ॥ सुरदास आळवी रुक्मिणीकांत ॥ चित्तीं भावार्थ धरूनि ॥२३॥
एके दिवसीं मांडितां कीर्तन ॥ करिता जाहला संटस्तवन ॥ प्रेमउल्हासें प्रबंध रचोन ॥ काय बोलिला तें ऐका ॥२४॥
सुरदास संतांचा वाहाणधर ॥ अभंगीं लिहिलें साचार ॥ ऐकतां विस्मित वैष्णववीर ॥ आश्चर्य थोर वाटलें ॥२५॥
एक म्हणती असत्यवाणी ॥ सुरदासें लिहिलें ग्रंथसदनीं ॥ अंगीं करणी नसतां जनीं ॥ व्यर्थ कथनीं कासया ॥२६॥
मेघ न पडतां पृथ्वीवरी ॥ उगाचि आकाशीं गर्जना करी ॥ नातरे जीव नसतां शरीरीं ॥ प्रेत श्रृंगारी लिंगाईत ॥२७॥
सुवास नसतां कस्तूरी ॥ विकावया मांडिली बाजारीं ॥ तेवीं अंगीं करणी नसतां बरी ॥ कवित्वकुसरी कासया ॥२८॥
अवतारवेष धरूनि अंग ॥ रायविनोदी आणिती सोंग ॥ परी करणी नसतां अभंग ॥ न राहे रंग तयाचा ॥२९॥
चित्रीं लिहिला वासरमणी ॥ परी प्रकाश लिहिता नसे कोणी ॥ तेवीं सुरदासाची कवित्वकरणी ॥ आम्हांलागूनि दिसताहे ॥१३०॥
ऐशीं नानापरींचीं दूषणें ॥ शब्द ठेविती त्रिविधजन ॥ कोणी भाविक होते सज्ञान ॥ ते समाधान मानिती ॥३१॥
अति वाचाळ जे विचक्षण ॥ ते म्हणती कवित्व नूतन ॥ अंगीं करणी नसतां जाण ॥ वायांचि लेखन करीतसे ॥३२॥
नूतन शुद्ध असेल नाण ॥ तरी भलताचि वाळी त्याजकारण ॥ तेवीं नूतन कवित्वासी जाण ॥ भलतेंचि दूषण ठेविती ॥३३॥
त्यासीच लोटतां बहु काळ ॥ ऐकोनि मान्य करिती सकळ ॥ ऐसें जनांसी विकल्पजाळ ॥ घातलें केवळ मायेनें ॥३४॥
लोटलें साल पिकाचें ॥ चालतें दुर्भिक्ष असे साचें ॥ मेलें माणुस भाग्याचें ॥ आहाणा वाचे बोलती ॥३५॥
ज्ञानी साक्षात असतां पुढें ॥ त्यासी म्हणती अज्ञान वेडें ॥ निमोनि गेलिया वाडेंकोडें ॥ स्तवन रोकडें करिताती ॥३६॥
आधीं चुकी मग आठवण ॥ ऐसेपरीचे सकळ जन ॥ जाणती सज्ञान विचक्षण ॥ अनुभव खूण आपुली ॥३७॥
असो बहुत बोलोनि वायां ॥ ईश्वराची अनिवार माया ॥ तिनें विकल्पजाळ घालोनियां ॥ संशयकर्दमीं बुडलिलें ॥३८॥
सुरदास भक्त वैष्णववीर ॥ संतसेवेसी अति तत्पर ॥ त्याच्या कवित्वासी साचार ॥ निंदिती विचार न करितां ॥३९॥
म्हणती करणी नसतां अंगीं ॥ दांभिकपणें बोलतो जगीं ॥ सुरदास जातां दर्शनालागीं ॥ तों सन्निध बैरागी एक आला ॥१४०॥
तो म्हणे सुरदासें केलें कथन ॥ परी कसोनि पाहावें याचें मन ॥ ऐसें चित्तीं विचारून ॥ बोलिला वचन तें ऐका ॥४१॥
सुरदासासी म्हणे ते अवसरीं ॥ मी देवदर्शना जातों सत्वरीं ॥ तरी माझ्या वाहाणा घेऊनि करीं ॥ जतन क्षणभरी असों दे ॥४२॥
ऐसें बैरागी बोलिला वचन ॥ ऐकोनि वाटलें समाधान ॥ म्हणे हाच हेत होता बहु दिन ॥ निजमनीं धरून राहिलों ॥४३॥
तो मनोरथ जाहला सुफळ ॥ जीवाची फिटली तळमळ ॥ मग शिबिकेंतून तत्काळ ॥ उतरलासे तेधवां ॥४४॥
वाहाणा मागोनि घेतल्या करीं ॥ उभा ठाकला महाद्वारीं ॥ वस्त्रांत गुंडाळोन ते अवसरीं ॥ हृदयीं धरीं निजप्रीतीं ॥४५॥
आज्ञा देऊनि सेवकांसी ॥ शिबिका पाठविली घरासी ॥ बैरागी विस्मित मानसीं ॥ निजनिष्ठेसी देखोनि ॥४६॥
मग सत्वर जाऊन महाद्वारा ॥ म्हणे उशीर लावूनि पाहावा बरा ॥ कीं सुरदासाच्या अंतरा ॥ उबग सत्वरा येईल ॥४७॥
मग सभामंडपीं जाऊन ॥ करीत बैसला हरिकीर्तन ॥ प्रातःकाळापासोनि जाण ॥ अस्तमानापर्यंत ॥४८॥
दोन घटिका लोटतां यामिनी ॥ बैरागी येऊन पाहे नयनीं ॥ तों हातीं पादुका घेऊनी ॥ सुरदास अंगणीं तिष्ठत ॥४९॥
बैरागी पाहतां दृष्टीं ॥ परम संतोष वाटला पोटीं ॥ मग पुढें होऊनी उठाउठीं ॥ पादुका निकटी ठेविल्या ॥१५०॥
त्याणें मस्तकीं ठेविला कर ॥ म्हणे निष्टावंत तूं वष्णवैवीर ॥ म्यां कसोनि पाहावया अंतर ॥ लाविला उशीर बहुताचि ॥५१॥
तूं संतसेवक म्हणविसी जनीं ॥ बोलसी तैसीच असे करणी ॥ म्हणोनि अहंता मनीं धरूनी ॥ तुज म्यां कसूनि पाहिलें ॥५२॥
परी निजसंतांचा वाहाणधर ॥ बोलिलासीं तें तंव साचार ॥ ऐसें ऐकूनियां उत्तर ॥ द्रवलें अंतर सुरदासाचें ॥५३॥
मग तेणें अनुताप धरूनि चित्तीं ॥ लुटविली तेव्हां सर्व संपत्ती ॥ उपाधिरहित होऊनि निश्चितीं ॥ भजन प्रीतीं आरंभिलें ॥५४॥
संतसेवा केली बहुत ॥ तेणें तुष्टला रुक्मिणीकांत ॥ सुरदासासी साक्षात ॥ दर्शन जाहलें तेधवां ॥५५॥
ऐसे एकाहूनि एक अधिक ॥ वैष्णवभक्त परम भाविक ॥ पुढें रसाळ कथा अलोलिक ॥ ऐकतां निजसुख श्रोतयां ॥५६॥
श्रीभीमातीरवासी रुक्मिणीपति ॥ निरूपण वदवी ग्रंथयुक्ति ॥ तयाचे कृपेनें महीपति ॥ श्रोतयांप्रति सांगत ॥५७॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ भाविक भक्त ॥ षट्त्रिंशाध्याय रसाळ हा ॥१५८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥ अध्याय ॥३६॥    ॥ ओंव्या ॥१५८॥    ॥    ॥    ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:45.6700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सुदास (पैजवन)

  • n. उत्तर पांचाल देश का एक सुविख्यात राजा, जिसने ‘दाशराज्ञ युद्ध’ नामक सुविख्यात रूप में युद्ध में दस सामर्थ्यशाली राआजों पर विजय प्राप्त किया था [ऋ. ७.१८] । दाशराज्ञ में इसके द्वारा प्राप्त किये गये विजय का निर्देश ऋग्वेद में अन्यत्र भी प्राप्त है [ऋ. ७.२०.२, २५.३, ३२.१०] । ‘दाशराज्ञ युद्ध’ सं संबंधित निर्देशों में, इसे सर्वत्र ‘तृत्सुभरतों’ का राजा कहा गया है । 
  • नाम n. ऋग्वेद में सर्वत्र सुदास राजा को ‘पैजवन’ उपाधि दी गयी है [ऋ. ७.१८.२३] । सुदास ‘पैजवन’ का एक सूक्त भी प्राप्त है [ऋ. १०.१३३] । किन्तु ‘पैजवन’ इसका पैतृक नाम है, या कुल नाम है यह कहना कठिन है । निरुक्त में इसे ‘पिजवन’ राजा का पुत्र कहा गया है, एवं इस प्रकार ‘पैजवन’ इसका पैतृक नाम बताया गया है [नि. २.२४] । किन्तु प्रत्यक्ष ऋग्वेद में एक स्थान पर इसे दिवोदास राजा का पुत्र [ऋ. ७.२८.२५], एवं देवदत् राजा का पौत्र [ऋ. ७.१८.२२] कहा गया है । ऐतरेय ब्राह्मण में, दिवोदास को वध्ऱ्श्र्व राजा का पुत्र कहा गया है । संभवतः ‘देववत्’ वध्ऱ्श्र्व राजा की ही एक उपाधि होगी, अथवा वह वध्ऱ्श्र्व का मातामह होगा [ऐ. ब्रा. ८.२१] । आधुनिक अभ्यासक इसे ‘पिजवन’ का पुत्र, एवं दिवोदास का पौत्र मानते है । इसके नाम का ‘सुदास्’ पाठ भी ऋग्वेद में कई स्थानों पर प्राप्त है । 
  • पुरोहित n. वसिष्ठ ऋषि के द्वारा इसके राज्याभिषेक किये जाने का निर्देश ऐतरेय ब्राह्मण में प्राप्त है [ऐ. ब्रा. ८.२१] । किन्तु ऋग्वेद में एक स्थान पर विश्वामित्र को इसका पुरोहित कहा गया है, एवं विपाश (बियास) एवं शुतुद्री (सतलज) नदियों पर इसके विजयी अभियानों के साथ उसके उपस्थित होने का, एवं इसके द्वारा एक अश्वमेध यज्ञ कराने का निर्देश वहाँ प्राप्त है [ऋ. ३.५३. ९-११] । इन सारे निदेंशों से प्रतीत होता है कि, सर्वप्रथम इसका पुरोहित विश्वामित्र था [ऋ. ३.३३.५३] । किंतु उसके इस पद से भ्रष्ट होने के पश्चात्, वसिष्ठ ऋषि भरत राजवंश का एवं सुदास राजा का पुरोहित बन गया । तदुपरांत विश्वामित्र ऋषि इसके शत्रुपक्ष में शामिल हुआ, एवं उससे इसके विरुद्ध दाशराज्ञ युद्ध में भाग लिया (वसिष्ठ मैत्रावरुणि एवं विश्वामित्र देखिये) । उत्तरकालीन वैदिक साहित्य में भी सुदास् एवं विश्वामित्र ऋषि के घनिष्ठ संबंधों के निर्देश पुनः पुनः प्राप्त है । 
  • दाशराज्ञ युद्ध n. ऋग्वेद के सभी मंडलों में दाशराज्ञ युद्ध का निर्देश पुनः पुनः आता है, जिससे प्रतीत होता है कि उक्त ग्रंथरचना काल में, यह युद्ध काफ़ी महत्त्वपूर्ण माना जाता था । ऋग्वेद के सातवें मण्डल में इस युद्ध का सविस्तृत वर्णन करनेवाले अनेक सृक्त प्राप्त है [ऋ. ७.१८] । इस युद्ध में इसने तुर्वश, द्रुह्यु, आदि दस राजाओं से युद्ध किया, एवं इन सारे राजाओं को परास्त कर यह विजयी साबित हुआ । दाशराज्ञ युद्ध में इसके विपक्ष में भाग लेने वाले राजाओं के नाम वैदिक साहित्य में विभिन्न प्रकार से पाये जाते है, जिनकी संख्या १० से कतिपय अधिक प्राप्त होती है, इससे प्रतीत होता है कि, इस युद्ध में ‘दाशराज्ञ’ (दस राजा) शब्द का प्रयोग ‘अनेक’ अर्थ से किया गया होगा । 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

प्रासंगिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.