मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय|
अध्याय १९

अध्याय १९

संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीराधाकृष्णाय नमः ॥    
आज कार्तिकी एकादशी पर्वकाळीं ॥ पंढरीस मिळाली भक्तमंडळी ॥ त्यांसमेवत वनमाळी ॥ भक्तविजयमेळीं पातले ॥१॥
शांति क्षमा नामें निश्चितीं ॥ याचि चंद्रभागा भीमरथी ॥ दया हेचि पुष्पावती ॥ गोपाळपुरीं वाहतसे ॥२॥
उत्साह हाचि वेणुनाद ॥ जेथें क्रीडे आनंदकंद ॥ सद्भाव पुंडलीक प्रसिद्ध ॥ लीला अगाध जयाची ॥३॥
भक्तविजय ग्रंथ रसाळ ॥ हेंच पांडुरंगाचें राउळ ॥ रमणीय देखोनियां स्थळ ॥ उभा घननीळ सांवळा ॥४॥
सात्विकगुण उत्तम जाण ॥ तेचि शोभत वृंदावन ॥ त्यावरी कीर्तीच्या ध्वजा उभारून ॥ शोभायमान दिसती पैं ॥५॥
कळा चातुर्य उत्तमगुणी ॥ तेचि जाणा माता रुक्मिणी ॥ तिच्या प्रसादेंकरूनी ॥ सप्रेम मनीं उल्हास ॥६॥
हें पुण्यक्षेत्र अति पावन ॥ पाहावयासी येती भाविक जन ॥ ते टाकूनियां मानाभिमान ॥ जीवन्मुक्तपणें वर्तती ॥७॥
परळी वैजनाथीं एक ब्राह्मण ॥ जगमित्र नागा नामाभिधान ॥ परम भाविक वैष्णवजन ॥ कुटुंबासहित राहिला ॥८॥
ग्रामांत करून भिक्षाटन ॥ मेळवून आणावें कांहीं धन ॥ ऐशा रीतीं कुटुंबरक्षण ॥ उदरपूर्ती करीतसे ॥९॥
सांडोनियां आशापाश ॥ रात्रीस करीत कीर्तनघोष ॥ ग्रामींचे लोक श्रवणास ॥ येती आवडीकरूनि ॥१०॥
देखोनियां वैराग्यभरित ॥ त्याजवरी कृपा करिती समस्त ॥ म्हणती पांडुरंग अवतरला साक्षात ॥ असे विरक्त संसारीं ॥११॥
ऐसी प्रतिष्ठा होतांचि बहुत ॥ निंदक चरफडती मनांत ॥ अपमान व्हावयालागूनि त्वरित ॥ उपाय करिती निजांगे ॥१२॥
जैसें वासरमणीस देखोनि नयनीं ॥ खद्योत उगेचि जल्पती मनीं ॥ कीं गंगेचा खळाळ ऐकूनी ॥ रजकसौदणी संतापे ॥१३॥
कीं तुळसीवृक्ष पूजितां सांग ॥ देखोनि संतापे जैसी भांग ॥ नातरी कल्पतरूचा प्रताप अभंग ॥ देखोनि सिंदीस कष्ट होती ॥१४॥
तेवीं जगमित्राची ऐकता स्तुती ॥ निंदक उगेचि संतापती ॥ म्हणती याची होईल अपकीर्ती ॥ ऐसा उपाय करावा ॥१५॥
नाना कुतर्क करूनि अंतरीं ॥ अपशब्द बोलती बहुतांपरी ॥ ऐकूनि तयाचे चित्तांतरीं ॥ विकल्प तिळभरी नयेचि ॥१६॥
एके दिवसीं कीर्तन करूनी ॥ जगमित्र नागा निद्रित सदनीं ॥ तंव दुर्जनीं अकस्मात येउनी ॥ खोपटासी अग्नि लाविला ।\१७॥
मुलें लेंकरें अवघीं तेथ ॥ निजली होतीं मंदिरांत ॥ दृष्टीस देखोनि अपधात ॥ मग पंढरीनाथ आठविला ॥१८॥
म्हणे धांव आतां रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ तुजवांचोनि आम्हांसी रक्षिता ॥ कोण असे ये समयीं ॥१९॥
ऐसी करुणा ऐकूनि श्रवणीं ॥ सत्वर पावले चक्रपाणी ॥ सुदर्शन हातीं घेउनी ॥ तयांलागूनि रक्षिलें ॥२०॥
तो बाहेर प्रदीप्त जाहला अग्नी ॥ ग्रामवासी पाहती नयनीं ॥ भाविक भक्त जवळ येऊनी ॥ शोक करिती आक्रोशें ॥२१॥
म्हणती जगमित्र वैष्णवभक्त ॥ कोणीं जाळिला अग्नींत ॥ पावला नाहीं पंढरीनाथ ॥ ऐसा आकांत देखोनी ॥२२॥
मग इंधन तितुकें जळोनि त्वरित ॥ कृशानु तत्काळ जाहला शांत ॥ तंव पूर्वदिशेसी अकस्मात ॥ भास्कर आला उदयासी ॥२३॥
जगमित्र जळाला अग्नींत ॥ नगरांत प्रगटली ऐसी मात ॥ प्रातःकाळीं लोक समस्त ॥ आले त्वरित पाहावया ॥२४॥
तों खोंपट जळूनि वरच्यावरी ॥ अग्नि विझाला ते अवसरीं ॥ राख कोळसे तिळभरी ॥ खालीं पडिलें नसेचि ॥२५॥
आंत कुटुंबासहवर्तमान ॥ करीत बैसला श्रीहरीचें भजन ॥ हें कौतुक दृष्टीं देखोन ॥ आश्चर्य वाटलें सकळांसी ॥२६॥
पांडव घातले लाक्षाजोहरीं ॥ तयांसी रक्षिता जाहला हरी ॥ तेवीं जगमित्रासी मुरारी ॥ तैशाचिपरी पावला ॥२७॥
कीं प्रल्हाद टाकिला अग्नींत ॥ तो न जलतां जैसा वांचला तेथ ॥ तेवीं जगमित्रासी पंढरीनाथ ॥ पावला कीं ये वेळीं ॥२८॥
कीं गाईगोपाळांभोंवता ॥ वणवा लागला अवचिता ॥ श्रीकृष्णें रक्षिलें निजभक्तां ॥ तैसेंचि जाहलें ये काळीं ॥२९॥
ऐसें बोलूनि परस्पर ॥ जगमित्रासी घालिती नमस्कार ॥ म्हणती तूं ईश्वरी अवतार ॥ कळलें साचार आम्हांसी ॥३०॥
मग मिळोनि सकळ ग्रामवासी ॥ विचार करिती एकांतासी ॥ म्हणती इनाम जगमित्रासी ॥ लिहूनि देऊं सकळिक ॥३१॥
त्याचाही चालेल योगक्षेम ॥ आपणांसी घडेल महाधर्म ॥ मग तुष्टोनियां पुरुषोत्तम ॥ हरील भवभ्रम सकळांचा ॥३२॥
ऐसा विचार करूनियां ॥ जगमित्रासी आले पुसावया ॥ त्यानें उत्तर दिधलें तयां ॥ बंधन कासया पाहिजे ॥३३॥
नगरांत करितां भिक्षाटन ॥ तेणें होतसें कुटुंबरक्षण ॥ तुम्हीं देतसां भूमिदान ॥ मजकारणें नलगेचि ॥३४॥
तृषा लागतां चातकांस ॥ मेघ तत्काळ पावे त्यांस ॥ तेवीं अन्न आच्छादन हृषीकेश ॥ आपुले दासांस देतसे ॥३५॥
पक्षियां क्षुधा लागतां जाण ॥ त्यांसी भलते ठायीं सांपडे कण ॥ तेवीं निजदासांचें रक्षण ॥ तैशा रीतीं होतसे ॥३६॥
तो विश्वकुटुंबी जगज्जीवन ॥ त्याच्या अश्रयें असतां जाण ॥ तुमचें कासया भूमिदान ॥ आम्हांकारणें पाहिजे ॥३७॥
नौका असतां बैसावयास ॥ मग पोहणाराची कां धरावी कांस ॥ सांडोनि भानूचा प्रकाश ॥ कासया दीप उजळावे ॥३८॥
गृहीं कामधेनु असतां जाण ॥ कासया करावें अजारक्षण ॥ गंगेचें सन्निध असतां जीवन ॥ कासया कूप खणावा ॥३९॥
तेवीं भिक्षेचें सांडूनि अन्न पवित्र ॥ तुमचें कासया पाहिजे क्षेत्र ॥ ऐसें ऐकतां ग्रामस्थ सर्वत्र ॥ तयाप्रति प्रार्थिती ॥४०॥
तुमचें नांवें देतों लिहूनी ॥ मग निर्वाह करितील भलते कोणी ॥ धान्य पिकेल जें मेदिनीं ॥ तें धर्मकारणीं लागेल ॥४१॥
पत्रीं जगमित्राचें नाम ॥ परळीवैजनाथ ग्राम ॥ एक चाहूर यासी इनाम ॥ ऐसें लिहून दीधलें ॥४२॥
मग अवघे कृषीवल मिळोनी ॥ कष्ट करूनि पिकविती धरणी ॥ धान्य होईल तें आणोनी ॥ धर्माकारणें लाविती ॥४३॥
ऐसें असतां बहुत दिवस ॥ तों विघ्न ओढावलें धर्मास ॥ नूतन हवालदार ग्रामास ॥ आला असे एके दिवसीं ॥४४॥
ग्रामवासी लोक समस्त ॥ त्यासी भेटले येऊनि त्वरित ॥ जगमित्राचें इनाम जप्त ॥ केलें असे तयानें ॥४५॥
लोक विनविती तयासी ॥ आम्ही स्वइच्छेनें दिधलें त्यासी ॥ तूं कासया धर्मकार्यासी ॥ आडवा होसी पापिष्ठा ॥४६॥
ऐसा उपदेश केला बहुत ॥ परी कदा न द्रवे त्याचें चित्त ॥ अविंधयाती अती उन्मत्त ॥ नायकेचि कोणाचें ॥४७॥
मग जाऊनि त्याच्या गृहासी ॥ म्हणे तूं जगमित्र म्हणविसी ॥ तरी व्याघ्राचें दैवत आम्हांसी ॥ देवप्रतिष्ठेसी पाहिजे ॥४८॥
आज अस्तमानपर्यंत जाण ॥ आणून देसील पंचानन ॥ जगमित्र हें नामाभिधान ॥ तरीच येईल प्रत्यया ॥४९॥
हें न होय जरी तुजकारण ॥ तरी भक्षिला इनाम परत घेईन ॥ ऐसें हरिभक्तासी तो वचन ॥ दुराचारी बोलिला ॥५०॥
मग अवश्य म्हणोनि तयाप्रती ॥ अरण्यांत गेला सत्वरगती ॥ ध्यानीं आणोनि रुक्मिणीपती ॥ स्तवन प्रीतीं आरंभिलें ॥५१॥
म्हणे जय जय अनाथबंधो करुणाकरा ॥ भक्तवत्सला कृपासागरा ॥ पतितपावना विश्वंभरा । दीनोद्धारा रामकृष्णा ॥५२॥
जय पंढरीशा रुक्मिणीपती ॥ विश्वचालका चैतन्यमूर्ती ॥ माझी करुणा ऐकोनि चित्तीं ॥ धांव श्रीपते लवलाहें ॥५३॥
हवालदार माझा मित्र जाण ॥ त्याचें कन्येचें आहे लग्न ॥ व्याघ्राचें दैवत प्रतिष्ठेकारण ॥ पाहिजे सत्य तयासी ॥५४॥
त्याच्या कार्यासी ये समयीं ॥ देवाधिदेवा सत्वर येईं ॥ नाहीं तरी तुझे पायीं ॥ देह लवलाहीं ठेवीन ॥५५॥
ऐसी करुणा ऐकूनि कानीं ॥ तत्काळ पावले चक्रपाणी ॥ महाव्याघ्राचें रूप धरूनी ॥ सत्वर आले तेधवां ॥५६॥
जगमित्रासी बोलती मात ॥ कोणें गांजिलें तुजला सत्य ॥ तो दाखवीं माजला त्वरित ॥ भक्षीन निश्चित तयासी ॥५७॥
ऐकोनि म्हणे निजभक्त ॥ हवालदार माझा परम मित्र ॥ लग्नकार्यालागोनि त्वरित ॥ तुम्हांलागीं पाचारिलें ॥५८॥
तरी शांति धरूनि केशवराजा ॥ सत्वर चलावें त्याचें काजा ॥ तूं जिवलग प्राण माझा ॥ आणिक दुजा अन्से कीं ॥५९॥
ऐकोनि म्हणे चक्रपाणी ॥ मजला धरूनि चाल सदनीं ॥ ग्रामांत जाऊनि तुजलागोनी ॥ कौतुक नयनीं दावीन ॥६०॥
मग अंगवस्त्र गळां घालून ॥ कंठीं धरिला पंचानन ॥ ग्रामाकडे परतोन ॥ येत जाहले तेधवां ॥६१॥
गोरक्षकी देखोनि दृष्टीं ॥ गांवांत चालिले उठाउठीं ॥ पळतां धीर न धरवे पोटीं ॥ शब्दगोष्टी न बोलवे ॥६२॥
नगरासी येऊन सत्वरगती ॥ लोकांस वृत्तांत सांगती ॥ म्हणती जगमित्र व्याघ्र धरून हातीं ॥ सदनाप्रति येतसे ॥६३॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ म्हणती व्याघ्र आणिला कोठून ॥ मिथ्या वचन बोलतसां ॥६४॥
एक म्हणती नवल काय ॥ तयासी ईश्वर असे साह्य ॥ गृहासी अग्नि लागतां पाह्य ॥ वांचला कैसा ते वेळीं ॥६५॥
ऐसें लोक परस्परें बोलत ॥ तंव आणिकही आली दुसरी मात ॥ म्हणती महाव्याघ्र घेऊनि त्वरित ॥ जगमित्र ग्रामा येतसे ॥६६॥
भयभीत सकळ नारी नर ॥ मग आड केलें ग्रामद्वार ॥ दुर्गावरून सत्वर ॥ लोक पाहती तेधवां ॥६७॥
तंव व्याघ्र देखोनि सत्वरीं ॥ भयभीत जाहल्या नरनारी ॥ कंपाटें लावून सदनांतरीं ॥ लपोनि बैसती व्याघ्रभयें ॥६८॥
एक उपरीवरीं जाऊनी ॥ दुरून व्याघ्र देखती नयनीं ॥ म्हणती जगमित्रासी भय मनीं ॥ कैसें न वाटे सर्वथा ॥६९॥
ऐसें उत्तर ऐकोनि कानी ॥ सज्ञान म्हणती त्यांलागोनी ॥ अजूनि उमज तुम्हांलागूनी ॥ कैसा न पडे कळेना ॥७०॥
आपणासी व्याघ्र दिसतो नयनीं ॥ परी तो असेल चक्रपाणी ॥ निजभक्तसंकट ऐकूनि कानीं ॥ आला धांवोनि सत्वर ॥७१॥
एक म्हणती असत्य मात ॥ तो व्याघ्रचि दिसतो यथार्थ ॥ हवालदारासी भक्षावया त्वरित ॥ आला निश्चित धांवोनि ॥७२॥
एक म्हणती तैसें न होय ॥ ता आम्हां सकळांचा करील क्षय ॥ हवालदारें करूनियां अन्याय ॥ आणिला काळ सकळांसी ॥७३॥
मग बोलावूनि तया दुर्जनासी ॥ ग्रामवासी म्हणती त्यासी ॥ त्वां छळूनि जगमित्रासी ॥ प्रळय गांवासी मांडिला ॥७४॥
रेणुकेसी गांजितां सहस्रार्जुन ॥ सकळ क्षत्रियांसी ओढवलें विघ्न ॥ तेवीं तुमचे संगतीकरून ॥ आम्हांसी मरण पातलें ॥७५॥
कीं रावणें करितां सीताहरण ॥ सकळ राक्षसां आलें मरण ॥ तेवीं त्वां गांजितां वैष्णवजन ॥ आकांत ग्रामांत ओढवला ॥७६॥
दुर्योधनें छळितां द्रौपदी सती ॥ सकळ राजे क्षय पावती ॥ आम्हांसी जाहली तैसी गती ॥ तुझें संगती लागतां ॥७७॥
नातरी मोहाळीच्या संगतीनें ॥ वृक्षासी लागला कृशान ॥ तेवीं दुर्जना तुझ्या योगेंकरून ॥ ओढवलें विघ्न सकळांसी ॥७८॥
ऐकूनि सकळांची मात ॥ दुर्जन जाहला भयभीत ॥ मुलें लेंकुरें घेऊनि समस्त ॥ लपोनि खोपटांत बैसला ॥७९॥
जैसा वृश्चिक अन्याय करूनी ॥ ढेपुळाआड बैसे लपोनी ॥ तैसाचि तो पापखाणी ॥ भयभीत मनी जाहला ॥८०॥
तंव जगमित्रें घेऊनि व्याघ्रासी ॥ सत्वर पातला ग्रामापासीं ॥ तों आड केल्या देखोनि वेशी ॥ संकट तयासी पडियेलें ॥८१॥
व्याघ्रासी म्हणे ते अवसरीं ॥ कैसें जावें नगरांतरीं ॥ ऐसें ऐकोनि भक्तकैवारी ॥ आश्चर्य करी तेधवां ॥८२॥
एक हांक मारितां गडगडोन ॥ ग्रामद्वार पडिलें जाण ॥ आंत प्रवेशती दोघे जण ॥ नरनारी दुरून पाहती ॥८३॥
एक दीर्घस्वरें रुदन करिती ॥ एक शंखध्वनि करूनि गर्जती ॥ म्हणती क्षोभला कैलासपती ॥ लागतां संगती दुर्जनाचे ॥८४॥
ऐसा देखोनि आकांत ॥ जगमित्र लोकांसी अभय देत ॥ तुम्ही स्वस्थ करूनि चित्त ॥ पाहा कौतुक निजनयनीं ॥८५॥
ज्याचें कर्म तोचि भोगिता ॥ आपण कासया करावी चिंता ॥ मनीं करूनि निर्भयता ॥ रुक्मिणीकांता भजा कीं ॥८६॥
ऐसें वचन ऐकोनि जाणा ॥ संतोष वाटला सकळ जनां ॥ म्हणती हवालदाराच्या घ्यावया प्राणा ॥ पंचानना आणिलें ॥८७॥
जगमित्र आणि व्याघ्र सत्वरीं ॥ पातले हवालदाराचें घरीं ॥ हें देखोनि दुराचारी ॥ थरथरां कांपे तेधवां ॥८८॥
महाव्याघ्र देखोनि दृष्टीं ॥ खोपटासी लाविली मग ताटी ॥ कांता लेंकुरें घेऊनि पाठीं ॥ वागवी मानसीं भयचिंता ॥८९॥
मग जगमित्र म्हणे ते अवसरीं ॥ दैवत घेऊनि आलों सत्वरीं ॥ तुम्ही कां लपतां सदनांतरीं ॥ सांगा लवकरी मजपासीं ॥९०॥
साक्षात दैवत देखोनी दृष्टीं ॥ भ्रांतीची लाविली आड ताटी ॥ पुढें उपाय तुमचे दृष्टीं ॥ कैसा दिसतो मज सांगा ॥९१॥
नाना तीर्थें व्रतें तपें अवघड ॥ करितांही देव दृष्टीआड ॥ तो साक्षात देखोनि तुम्ही मूढ ॥ कपाटें आड लावितां ॥९२॥
अष्टांग योग साधितां जाण ॥ प्राप्त नव्हेचि ज्याचे चरण ॥ तें दैवत दृष्टीस देखोन ॥ तुम्ही कां लपून बैसलां ॥९३॥
नानायोग याग करितां ऋषी ॥ लवकरी प्राप्त नव्हे तयांसी ॥ तें दैवत आलिया गृहासी ॥ भय कां तुम्हांसी वाटतें ॥९४॥
जें चंद्राहूनि शीतळ बहुत ॥ जें अमृतासीही जीववित ॥ तें दृष्टीस देखोनि दैवत ॥ भयभीत मनीं कां होतां ॥९५॥
तों व्याघ्र गर्जोनि ते अवसरीं ॥ पुच्छ आपटी धरणीवरी ॥ दुर्जनें ऐकतांचि अंतरीं ॥ भयभीत होतसे ॥९६॥
बळें उसळोनि वेगेंसीं ॥ भक्षूं पाहे निंदकांसीं ॥ जगमित्र धरी तयासी ॥ जेवीं दरवेसी वानरा ॥९७॥
तैशाच रीतीं जगज्जीवन ॥ जाहला असे भक्ताआधीन ॥ नाठवूनि आपुलें देवपण ॥ लीला दावी जनांत ॥९८॥
मागुती उजळोनि उल्लळ घेत ॥ म्हणे दुर्जनासी भक्षूं दे त्वरित ॥ हवालदार रडे सदनांत ॥ लेंकुरांसमवेत ते समयीं ॥९९॥
कांता म्हणे तयाप्रती ॥ तूं बाहेर जाईं सत्वरगती ॥ मुलें लेंकुरें तुजसंगतीं ॥ मृत्यु पावतील दिसताहें ॥१००॥
तुझें सहज म्हातारपण ॥ असे अखेर एकदां जाण ॥ तरी आतां सत्वर बाहेर होऊन ॥ वांचों दे प्राण आमुचे ॥१॥
ऐसा संवाद पडतां कानीं ॥ सकळ आश्चर्य करिती मनीं ॥ परस्परें टाळीया पिटोनी ॥ हांसों लागले तेधवां ॥२॥
मग जोडोनियां दोनी कर ॥ करुणा भाकीत हवालदार ॥ आतां कृपा करूनि मजवर ॥ वांचवीं सत्वर दयाळा ॥३॥
म्यां जे दुष्टबुद्धि धरिली ॥ ते मज तत्काळ फळा आली ॥ अपकीर्ति जगांत पसरली ॥ ते वर्णिली नवजाय ॥४॥
तूं जगमित्र म्हणविसी आपणा ॥ तें सत्य कळलें माझिया मना ॥ म्हणोनि दीनपणें भाकितों करुणा ॥ दे जीवदाना आम्हांसी ॥५॥
ऐसी ग्लानि ऐकूनि कानीं ॥ जगमित्र चालिला परतोनी ॥ व्याघ्रासी सवें घेऊनी ॥ गेला काननीं सत्वर ॥६॥
मग एकांतीं जाऊन जगज्जीवन ॥ धरिलें चतुर्भुज रूप सगुण ॥ जगमित्रासी आलिंगन ॥ निजप्रीतीनें दिधलें ॥७॥
पुढिले अध्यायीं अद्भुत रस ॥ श्रोतीं स्वस्थ करावें मानस ॥ जैसा कृपण मोजितां धनास ॥ होय तल्लीन निजचित्तीं ॥८॥
तैशा रीतीं अवधान ॥ देऊनि करा ग्रंथश्रवण ॥ भीमातीरवासी रुक्मिणीरमण ॥ तुष्टेल तेणें तुम्हांवरी ॥९॥
तो पुराणपुरुष जगज्जीवन ॥ वदविता ग्रंथनुरूपण ॥ महीपति त्यास अनन्य शरण ॥ वंदी चरण निजप्रीतीं ॥११०॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकोनविंशाध्याय रसाळ हा ॥१११॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥ अध्याय ॥१९॥ ओंव्या ॥१११॥    ॥    ॥    ॥    ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP