प्रवेश तिसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : शहराजवळील एक टेकडी. आसपास काही श्रीमंत लोकांचे बंगले आहेत. टेकडीवर दत्तोपंत व चिंतोपंत सायंकाळची करमणूक करीत व गप्पा मारीत बसले आहेत. इकडे राघोपंत व पक् हे दोघे टेकडीवर चढत आहेत, व हळूहळू बोलत आहेत. ]

राघोपंत : ते दोघे माझ्याविषयीच बोलत आहेत ?
पक् : आता काय सांगावे ! अहो, मी आधी ऐकले म्हणूनच तर इतक्या तातडीने तुम्हाला येथे घेऊन आलो. चला लौकर.
राघोपंत : पण हे बघ पक्, अशी मौज त्या चिंतोपंताला किंवा दत्तोपंताला दाखवायची नाही, बरे का ?
पक् : छे: छे: - भलतेच एकादे ! तुम्हालाच तेवढी एकट्याला ! - हं - आता अगदी बोलू नका. हळूच जवळ जाऊन -
( दोघेही सर्व काही बोलणे ऐकायला येईल इतक्या बेताने दत्तोपंताच्या व चिंतोपंताच्या जवळ जाऊन बसतात. )
चिंतोपंत : मला तरी काय एवढी जरुर पडली आहे म्हणा ! आपले ते सहज माझ्याजवळ बोलत होते, म्हणून मी हे तुम्हाला सांगितले. तेही सांगितले नसते, पण तुम्ही पडलात माझे स्नेही.
दत्तोपंत : नाही सांगितले हेच ठीक केले - असे काय ? बरे आहे म्हणावे !
चिंतोपंत : बाकी एकंदरीतच माणूस बरा असावा.
दत्तोपंत : कशाचा आला आहे ! अगदी पाजी आहे ! माझ्याविषयी जर हा असे बोलतो, तर या राघोपंताचेच घराणे काय मोठेसे चांगले लागून गेले आहे हो ?
चिंतोपंत : नाही बोवा, मला काही विशेष -
दत्तोपंत : तुम्ही मला विचारा सगळे ! मी सांगतो त्याची काय काय कुलंगडी आहेत ती ! हा एवढा गबर झाला आहे कशावर ? कोणाच्या जिवावर येवड्या गाड्यान् घोडे उधळतो आहे ? त्या ट्रस्टीच्या प्रकरणात काही थोडेथोडके पैसे नाही खाल्लेल्ले ! चांगले पन्नाससाठ हजार रुपये खाल्ले आहेत !
चिंतोपंत : खरेच की काय ?
दत्तोपंत : हं, हं, उगीच नाही ? बापाने तर एकदोन विधवांची चांगली भरभक्कम शूद्र स्त्रीशी व्यवहार केला म्हणून कोण मारामार्‍या - कोण हाणाहाण्या ! सगळी फटफजिती !
चिंतोपंत : हं:, अगदीच विलक्षण !
दत्तोपंत : विलक्षण म्हणजे ? किती विलक्षण ! मला तरी काय ठाऊक, तो लेकाचा स्वत:च सगळे हे एक दिवस मजजवळ ओकला ! बापाची ही स्थिती, चुलत्याची ती स्थिती ! बरे, स्वत:च्या पोरांची तर धड असावी ! तर तेही नाही !
चिंतोपंत : ते आहे मला ठाऊक.
दत्तोपंत : सगळेच दिवटे ! पोरे पाहिली तर लेकाच्याला खंडीभर ! पण एकही धड असेल तर शपथ ! थोरले चिरंजीव तर काय मुंबईलाच राहतात, आणि आपले लागेल तसे पैसे उधळीत असतात !
चिंतोपंत : अहो हे व्हायचेच ! आपापाचा माल गपापा !
दत्तोपंत : बाप तर रोज पोरांच्या नावाने माझ्याजवळ बोंबलत असतो ! दुसरे चिरंजीव तर काय पहायलाच नको ! पाचपन्नास वेळा मॅट्रिकला बसले ! पण शेवटी बाजा ! सकाळसंध्याकाळ टेनिस, ब्रिज खेळावे, आणि रात्र झाली, की, सिनेमा नाही तर नाटके, हा धंदा !
चिंतोपंत : हं: आहे ! पठ्ठ्या वाघ आहे !
दत्तोपंत : ही झाली पोरांची रड ! बरे, पोरी तर काय अगदी फुटाण्याच आहेत ! शाळेत काय जातात, तर्‍हा काय करतात, काही विचारु नका ! परवा त्या धाकटीने तर मोठी मौजच केली ! प्रत्यक्ष भाऊ मेलेला, आई, आजी प्रेताजवळ रडत आहेत, बाप उभा आहे, आणि ही आपली ’ फटाके द्या ! फुलबाजी द्या !’ म्हणून रडतच बसली !
चिंतोपंत : वा ! फारच छान !
दत्तोपंत : तुम्ही नुसते उगीच त्याच्या सकाळच्या तासनतास नाक धरुन बसण्यावर जाऊ नका ! असा लेकाचा डांबरट आहे ! एकीकडे नाक धरुन बसतो अन् दुसरीकडे खिडकीत उभे राहून दुर्बिणीने बायकांचे चेहरे न्याहाळीत असतो ! ती ’ ही ’ येते ती ? तिच्याशी दारे लावून तासनतास गुलुगुलु गोष्टी करायला सांगा ! असे वाटते, एक फाडकन् चांगली -
( इतक्यात रागाने लाल झालेला राघोपंत पुढे येतो, व दत्तोपंताच्या फाडकन् तोंडात मारतो. )
दत्तोपंत : ( गाल चोळीत चोळीत ) आ - हा - हा - हा ! काय एकाएकी दाढेतून ठणक निघाली ही !
( इकडे राघोपंत व पक् हे टेकडीमागे नाहीसे होतात. )
चिंतोपंत : ठणक इतकी मोठ्याने कशी हो निघाली !
दत्तोपंत : हो ! निघाली म्हणजे अशीच निघते मधूनमधून. आ - हा - हा, चला आता अंधार पडायला लागला. आ - हा - हा !
( दत्तोपंत गाल चोळीतचोळीत चिंतोपंताबरोबर टेकडीवरुन उतरु लागतो. )


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP