प्रवासी

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ एक खडबडीत रस्ता. बरेचसे प्रवासी रस्त्यांत बोलत उभे आहेत. दाट धुके पडले असल्याकारणाने आसपासचे काही दिसत नाही. प्रवाश्यांपैकी तिघे - चौघे म्हातारे, असून, बाकीचे कोणी मध्यम वयाचे व काही तरुण असे आहेत. दहा बारा वर्षांची दोन मुले इतर वडील माणसांकडे टकमक पहात उभी आहेत. ]

आजोबा, आपल्याला अजून किती लांब जायचे आहे हो ? आमचे पाय की नाही दुखायला लागले आहेत.
आले, जवळ आले अं बाळ.
हो ! असे तुम्ही कितीतरी वेळा म्हणता ! ’ जवळ आले, जवळ आले,’ असे नुसते म्हणता पण ते कधी संपतच नाही ! हे हो काय ? एकदा सांगा ना मग किती जवळ आले आहे ते ? चालण्याचा आम्हांला अगदी कंटाळा आला आहे !
असे काय वेड्यासारखे ! धुके कोण पडले आहे ! आणि मी काय सांगू किती जवळ आले आहे ते !
मग तुम्ही कशावरुन म्हणता हो जवळ आले आहे म्हणून ?
चप् बसा रे ! चारगट कोठली ! मोठ्या माणसांशी कसे बोलावे, हे सुध्दा अजून यांना धड समजत नाही !
हं: ! मुकाट्यानं चालायचं दिले सोडून, आणि लागले वटवट करायला ! बरे, पण आपण आलो आहोत कुठे ?
मला वाटते आपण रस्ता चुकलो.
नाही. नाही ! हाच तो रस्ता !
कशावरुन म्हणतोस, हाच तो रस्ता म्हणून ?
कशावरुन काय ! मला आपले वाटते येवढेच.
सगळाच घोटाळा !वाट बरोबर आहे की चुकली, काहीच धड समजत नाही !
आणि पुन: आलो आहोत कुठे हेही समजत नाही ?
मैल दोन मैल आपण आलो असू नाही ?
येवढ्याने होते आहे ! सहज अडीच तीन मैल झाले असतील !
तीन मैल ? येवढेच हो कसे असतील आजोबा ? मला वाटते की, आपण चांगले चार - पाच मैल आलो !
हं: ! चार - पाच मैल कुठले आले आहोत ! अजून पुरते मैलभर सुध्दा आलो नाहीत, तर म्हणे - !
काय, मैलभर काय नाही ! ते गाव सोडल्याला काही थोडा वेळ झाला नाही ! चांगला तास दीड तास झाला असेल !
इतका कांही नाही म्हणा, फार झाले तर अर्धा किंवा पाऊण तास.
हो, हो, इतकाच.
नाही, नाही ! चांगला बराच वेळ झाला आहे !
बाकी आपण ज्या गावातून आलो, त्या गावाचं नावं मोठे गमतीचे आहे नाही ? मला अजून राहून राहून हसू येते ! काय पहा ? कोणाला आठवते का रे ?
नाही बोवा, आपल्याला काही आठवत नाही. काय पाहा ? - हो, असेच काही तरी आहे. टरगुन - गुडगुडगुड !
हं ! हं ! हं !
छे, छे: ! तसे नाही ! दुसरेच काही तरी आहे !
जाऊ द्या रे ! काय करायचे आहे त्याच्याशी ! अशी किती तरी गावे आपल्याला प्रवासात लागतात ! कोण बसतो नाव आणि गाव विचारीत ! आपले ठराविक जागी एखाद्या धर्मशाळेत नाही तर देवळात उतरावे, स्वयंपाकपाणी करावे, झोप काढावी आणि खुशाल पुढे चालते व्हावे ! गावात आहे काय, नाही काय, पहातो कोण ! आणि इतके करायला येथे वेळ कोणाला आहे !
हो तर काय ! आणि आता आपण कोणत्या गावाला जाऊन पोहचू आणि कोणत्या नाही, हे तरी कोणाला ठाऊक आहे !
हं: ! हं: ! आपले चाललो आहोत झाले.
मग आता चला ना पुढे. येथेच किती वेळ उभे राह्यचे ?
पुढे काय चला ? धुके किती पडले आहे आणि म्हणे पुढे चला !
छत् ! भलतेच एखादे ! नाही आपल्याला बरोबर रस्ता माहीत, आणि उगीच कुठे एखाद्या जंगलात नाहीतर खोल दरीत जाऊन पडलो, तर करा काय !
नको रे बाबा ते पुढे जाणे ! आपले आहे तेथेच -
असे काय करता हो ? ज्या वाटेवर आपण उभे आहो ती ही वाट पुढे कुठे तरी गेली असेलच की नाही ? आणि शिवाय आपण येण्यापूर्वी कोणी तरी माणसे या वाटेने गेलीच असतील !
हो तर चांगलाच हमरस्ता दिसतो आहेन् ! ह्या काय बैलगाड्यांच्या चाकोर्‍या चांगल्या स्पष्ट दिसत आहेत ! आणखी काय पाहिजे ?
काही नाही ! बेलाशाक पुढे चला ! धुके असले म्हणून काय झाले ! उगीच वेळ घालविण्यात काय अर्थ आहे ?
जा ! पुढे जा ! खुशाल चालते व्हा ! आम्ही साफ येथून हालत नाही ! उगीच पुढे कुठे तरी जाऊन मरावयाचे आहे ?
हो ! आजपर्यंत या वाटेने पुढे गेलेली माणसे जशी काही मेलीच असतील नाही ?
कशावरुन नसतील ? सगळेजण एखाद्या खड्ड्यात किंवा खोल दरीत पडून, चांगली टाळकी फुटून कशावरुन मेले नसतील ?
आणि मी म्हणतो दुसरे गेले, म्हणून आपणही गेलेच पाहिजे, हे तरी काय म्हणून ?
हं: ! हं: ! हं: !
माझ्या मताने तर बोवा असे वाटते की, आपण आपले आता परत जावे, आणि खुशाल पुन: त्या धर्मशाळेत जाऊन उतरावे !
हॉ ! हॉ ! काही हरकत नाही ! फार छान ! चला परत चला !
परत जायचे ? नाही बोवा, आपण नाही परत येत.
आणि पुन: आता परत जायचे कुठे ? आणि ते कसे ?
कसे म्हणजे ? आलो त्या वाटेने नीट सरळ पुन: धर्मशाळेत जायचे !
अहो, पण तेच सर - ळ आता दिसते आहे का ? तिकडेसुध्दा धुके किती पडले आहे ! आणि चालेल परत !
म्हणजे ? आपण आपले तसेच गेलो, तर रस्ता चुकू असे वाटते की काय ?
कशावरुन नाही ? रस्ता चुकून एखाद्या खड्डयात - आले का लक्षात ? - किंवा एखाद्या खोल दरीत पडून, चांगली टाळकी फुटून, कशावरुन नाही मरुन जाणार ? बोला आता ?
अरे पण आपण आताच ह्या रस्त्याने आलो ना ?
ते खरे ! पण ज्या रस्त्याने आता आपण आलो, तोच चुकला नसेल कशावरुन ?
हं ! हं ! हं !
हो बाकी तेही खरेच आहे !  मग ?
मग काय ! धुके नाहीसे होईपर्यंत आपण आपले येथेच उभे राहू झाले.
हो हो हो, तसेच करावे झाले !
काय, तसेच काय करावे ? समजा, धुके नाहीसे होईपर्यंत आपण येथे उभे राह्यलो आणि झाला, मधे येथेच धरणीकंप झाला, किंवा दुसरेच एखादे अरिष्ट येऊन आपण मरुन गेलो तर ?
हो ! तेही खरेच !
म्हणून म्हणतो, आपले पुढे चला; मग मरण आले तरी हरकत नाही ! पण पुढे जाता जाता मेलो असे तरी होईल !
नाही बोवा ! आपले त्यापेक्षा परत जाता जाता मेलेले पुरवले !
आणि त्याच्याही पेक्षा जागच्याजागीच मेलेले काय वाईट ?
हं: ! हं: ! हं: !
ठीक आहे ! मी आपला पुढे चालता होतो. ज्यांना माझ्याबरोबर यायचे असेल, त्यांनी खुशाल चलावे !
चला ! हे निघालो आम्ही तुझ्याबरोबर !
अरे ए ! चाललात कुठे ! फिरा आमच्याबरोबर माघारी !
नाही ! नाही आम्ही नाही परत येणार ! तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खुशाल परत जा ! कोणे तुमच्या आड येत नाही !
तुम्ही नसाल आमच्या आड येत ! पण आम्ही तुम्हांला सोडू तेव्हा ना !
असे का ? मग आम्हीही पहातो तुम्ही कसे परत फिरता ते ?
अरे ए मूर्खांनो ! मुकाट्याने येथे उभे रहा ! आमचे ऐका !
नाही ! आम्ही तुम्हाला परत नेणार !
तुम्हाला आम्ही मागे खेचणार !
खबरदार ! पुढे सरकाल तर ! येथल्या येथे तुम्हाला उभे राह्यले पाहिजे ! मूर्ख कोठले !
कोण मूर्ख ?
तुम्ही मूर्ख !
नाही, तुम्हीच मूर्ख !
[ सर्वजण हातघाईवर येतात. एकमेकांना ओढाताण करु लागतात. कोणी काठ्या मारतात, तर काहीजण दगडाचा वर्षाव करतात. बिचारी मुले घाबरुन रडू लागतात मेलो ! ’ डोकी फुटली ! ’ आई ’ ! ’ छातीत दगड बसला !’ अरे तो पुढे पळाला ! ’ धरा धरा ’ असा आरडाओरडा होऊन धावपळ सुरु होते. ]

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP