रिकामी आगपेटी

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


... हायरे दैवा ! सत्तर मुले ! - पण सगळी मला टाकून गेली ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथे असाल तेथून धावत येऊन मला - आपल्या आईला - एकदा तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणता ? माझी सगळी लेकरे मरुन पडली आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पाया पडते ! पण कसेही करुन त्यांची व माझी एकदा तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचे मला शेवटचे चुंबन घेऊ द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडू द्या ! - हाय ! त्यांची व माझी आता मुळीच भेट व्हायची नाही ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठे आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशी जाता जाता दोन शब्द तरी बोला ! -
अगबाई ! एकाएकी हा कसला बरे गोंगाट सुरु झाला ? काय ? माझी मुले आली ? कोठे आहेत ती ? मला नाही का - हो दिसायची ती ? नुसते त्यांचे बोलणेच मला ऐकू येईल ? थांबा बाळांनो ! अरे, असा गलका करु नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेत ? जगामध्ये गेला होता ? अस्से का ? जगामध्ये काय पाहिले ? कसे आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करु नका ! सांगा ! नीट सांगा !
जग कसे आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा  आपल्याला ते जग !
नाही ग आई ! हा काही तरीच सांगत आहे झाले ! मी सांगू का तुला जग कसे आहे ते ! जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवसाने माझा जीव कसा अगदी आनंदाने गुंग होऊन गेला होता !
खरेच ! जगातल्या विड्यांच्या धुराने व शौचकुपातील नरकाच्या घाणीने माझा जीवसुध्दा अगदी गुंग होऊन गेला होता ! ओकून ओकून माझी कोण पुरेवाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासाने भरलेले आहे !
काही नाही ! सगळे खोटे आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्ये एक दीपगृह ! याशिवाय जगात दुसरे तिसरे काहीसुध्दा नाही !
अरे काय सांगत आहात तरी काय तुम्ही ! आई, यांचे तू काहीसुध्दा ऐकू नकोस ! अबब ! काय ती लक्षावधी माणसांची धावपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्या आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्याने व माणसांच्या गोंगाटाने ती प्रचंड इमारत कशी अगदी गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझे डोके तर अगदी फिरुन गेले होते !
ठेवली आहेत लक्षावधी माणसे ! जगामध्ये काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगात जिकडे तिकडे डोंगरच आहेत ! अहाहा !काय ते सुंदर लहानसे देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथे वास करीत आहे !
काही नाही ! जग म्हणजे निव्वळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोंगांनी कुजविलेल्या देहातील घाण उपसणे किंवा प्रेते फाडणे येवढेच काय ते जगामध्ये आहे !
नाही - नाही ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बीभत्स गाणी, हसणे - खिदळणे - नाचणे -
अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरे तिसरे काहीसुध्दा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली की कसे शहारे येतात अंगावर !
आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरिता हसणे खोटे - रडणे खोटे आणि प्रेम करणेही पण खोटे ! समजलीस !
छे ! छे ! भलतेच काही तरी ! सुस्वर वाद्ये - मधुर गायन आणि शुध्द पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापलेले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोवती प्रेमाने आपला उजवा हात टाकून व डाव्या हाताने मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठातून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगू तुला ! आई ! -
संपले की नाही चर्‍हाट अजून तुझे ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळे जग भरले  आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटाकाच्या दुसर्‍या अंकातील दुसरा प्रवेश वाचून पहा. म्हणजे समजेल मी काय म्हणतो ते !
काही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगात दुसरे काही तरी आहे का ? अहाहा ! काय ते भव्य देवालय ! हजारो स्त्रीपुरुषांच्या ह्रदयातून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !
निव्वळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनी - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुपद्रवी पशूंच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणे नको !
हा ! हा ! हा ! अरे वेड्यांनो  ! जग म्हणजे एक सर्कस आहे सर्कस ! पशूंनीच काय, पण माणसांनीसुध्दा, त्या लहानशा वर्तुळामध्ये जगाच्या नियमाप्रमाणे वावरले पाहिजे ! जरा कोठे चुकायचा अवकाश, की बसलेच चाबकाचे फटकारे अंगावर ! तेथे स्वच्छंदीपणाला यत्किंचितसुध्दा वाव नाही ! हो !
काही तरी सांगत आहेस झाले ! सद्गुणी आत्म्यांचा छळ आणि आत्महत्या यांनीच सगळे जग भरले आहे ! नाही रे देवा आता मला हा छळ सोसवत ! असे रडत रडत म्हणून त्या गरीब बिचार्‍या बालविधवेने कशी धाडकन विहिरीमध्ये उडी टाकली पण ! जग म्हणजे छळ, निराशा -
आग ! आग ! अरे बाबा, सगळे जग आगीमध्ये होरपळून - भाजून - मरत आहे ! मनाला - जिवाला - शेवटी देहालासुध्दा आग लागते आग !शिव ! शिव ! केवढा तो भयंकर अग्नीचा डोंब ! - चार पाचशे माणसे कशी ओरडून - ओरडून - तडफडून - अखेरी मेली पण !
नाहीग आई ! ईश्वरभक्तिशिवाय जगात दुसरे काही सुध्दा नाही ! महात्मा ख्राइस्टच्या तसबिरीजवळ गुडघे टेकून - हात जोडून - आणि नेत्र मिटून बसलेली व शांत अशा ईश्वरी प्रेमामध्ये बुडून गेलेली ती चौदा पंधरा वर्षाची बालिका मी पाहिली मात्र ! - अहाहा ! त्या वेळेस मला केवढी धन्यता आणि किती आनंद झाला म्हणून सांगू तुला ! आई -
अहो धावा ! डेस्डिमोनेचा खून झाला ! कॉर्डेलिया फासावर चढली ! पाखरे मेली - वणवा पेटला ! धावा ! धावा !! जगात अन्याय - अन्याय!
नाही ! तू खोटे बोलतोस ! जग आहे ! आम्ही सांगतो जग कसे आहे ते ! ऐका ! ऐका ! गलका करु नका ! ऐका !
बाळांनो ! अरे थांबा ! असा गोंगाट करु नका ! हं ! सांगा ! नीट पुन: एक एक जण सांगा ! कसे आहे म्हटलेस जग ? - सगळाच गोंधळ!
एकाचेही सांगणे दुसर्‍याच्या सांगण्याशी मुळीच जुळत नाही ! खरे तरी कोणाचे मानू ! - आणि खोटे तरी कोणाचे समजू ! काय म्हटलेस ? तू सांगतेस खरे जग कसे आहे ते ? बरे तर, सांग पाहू - आई ! आई ! मेले ! मेले ! कोणी चांडाळाने मला पायाखाली चिरडली ! मी मेले !!....

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP