अध्याय पंधरावा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥
जो प्रपंचाशीं वेगळा ॥ ज्ञानवैराग्यें आगळा ॥ ब्रह्मामृत स्वादि आनंदला ॥ त्या सद्गुरुशीं माझा नमस्कार ॥१॥
कामक्रोधादिकांचे विटाळें ॥ ज्याचें अंतरंग न मळे ॥ भोगिता सदा सचखसोहळे ॥ ब्रह्मसुखाचे ॥२॥
स्त्रीधन सुखाचे डोहळे ॥ उपजती न चित्तीं कवणे वेळे ॥ स्थिरचित्त कदानचंबळे ॥ हर्षेविषादें करूनी ॥३॥
ब्रह्मादिकांपासूनि पिपिलिकांप्रती ॥ क्षुद्र कीटकादि सकल भूत जाती ॥ यांशी जयाची समान चित्तवृत्ती ॥ न धरीं भिन्न भावातें ॥४॥
जो ब्रह्मानंदानें डुल्लतो ॥ करून कांहींच न करितो ॥ दुराग्रह कधीं न धरतो ॥ कवणेविषयीं ॥५॥
त्याजितो तरी नाहीं त्याग ॥ भोगिती परी नाहीं भोग ॥ अतीं नवल हा ज्ञानयोग ॥ ज्याचें ठायीं नांदतो ॥६॥
उठती इंद्रियांचे व्यापार ॥ परी कर्तुत्वीं उदास चतुर ॥ ब्रह्मविद्यामृत ॥ देतां उदार ॥ भाविक जनां होतसे ॥७॥
जो अवस्थात्रयीं अगाध ॥ जयाला अखंड स्वरूपाचा बोध ॥ तो अमूर्त परमानंद ॥ या आकारें वर्ततो ॥८॥
इत्यादि गुणांनीं अलंकृत ॥ ज्याशीं नमस्कार ॥ भावें जोडूनी दोन्ही कर ॥ निरसूनि उपाधी समग्र ॥ तारो मजला भवसागरीं ॥१०॥
रत्नाकर बोले कर जोडून ॥ शिष्याचें गुणदोषलक्षण ॥ सांगितलें जे विस्तारेंकरून ॥ श्रवण करून तृप्त झालों ॥११॥
जो मी प्रपंचागरीं होतों बुडालों ॥ तापत्रय वडवाग्नींत पोळलों ॥ क्रोधादि जळपरीं ग्रासलों ॥ झालों अपवित्र ॥१२॥
तरीं ज्ञानाच्या तारवांत बैसवूनी ॥ कृपेचा पवन वाहवोनी ॥ श्रीगुरु कर्णधार होउनी ॥ तारिले मातें ॥१३॥
भवभय मध्याह्न तेवेळे ॥ पोळलें तात्रय अनळें ॥ श्रीगुरुनीं ज्ञानजळें ॥ निवविलें मातें ॥१४॥
प्रपंचाच्या बंदिशाळे ॥ बंद पावलों अज्ञानश्रृंखळें ॥ तें बंधन तोडूनी स्वामींनीं सगळें ॥ मुक्त केलें मजलागीं ॥१५॥
मनीं आला आनंदाचा पूर ॥ सर्व सरितांहुनी अति थोर ॥ तेणें अविवेक पोव्हाणार ॥ बुडोन गेला ॥१६॥
अहंकारापादप उन्मळिला ॥ तृष्णा पक्षिणीचा घरटा मोडिला ॥ इंद्रियरूपीं ग्राम ॥ बुडाला ॥ चित्तानंदजळीं ॥१७॥
जय जयाची दीनबंधू ॥ जय जयाची करुणासिंधू ॥ तुमचे महिमान प्रसिद्ध ॥ सकल योगीजनांसीं ॥१८॥
जें पूर्वीपासून हारपलें ॥ मी मजची होतें चोरलें ॥ तें मजलागीं दीधलें ॥ दीनतारक श्रीगुरुरायें ॥१९॥
तुझिया कृपादृष्टी ॥ झाली अपरोक्ष वस्तुची भेटी ॥ तुलना नाहीं सृष्टीं ॥ त्या आनंदाशीं ॥२०॥
तुमच्या या उपकारां ॥ कैसा होऊं उत्तीर्ण दातारा ॥ अर्पिल्या नाना वस्तु संभूति संभारा ॥ तरी उत्तीर्ण न होय मी ॥२१॥
ब्रह्म सदोदित शाश्वत ॥ सकल वस्तू त्या नाशिवंत ॥ त्यांनीं होईल उत्तीर्णत्व ॥ ऐसें कैसें घडेल ॥२२॥
म्हणोनि तन मन आणि धन ॥ गुरुशीं करितों अर्पण ॥ तरींच होईळ उत्तीर्ण ॥ अल्प स्वल्प ॥२३॥
श्रीगुरु तुम्हीं कैवल्याचे दानी ॥ अहां निश्चित त्रिभुवनीं ॥ प्रपंचदैन्य तुमचेनी ॥ देशधडी झालें ॥२४॥
प्रपंचमूळी विसरलों ॥ मी सुखसंभारें निवालों ॥ तुमचा उपदेश पावलों ॥ म्हणूनीच घडलें ऐसें जी ॥२५॥
मज महासुख लाधलें ॥ सद्गुरु दास्यत्व फळा आलें ॥ तेणें अनुभवासीं आलें ॥ परब्रह्म ॥२६॥
जेथें चित्ताशीं नाहीं सौरस ॥ वाणीशीं नाहीं प्रवेश ॥ तो मज भेटला स्वयंप्रकाश ॥ ब्रह्मानंद श्रीगुरु ॥२७॥
त्याणें माझे कल्पनेशीं मारिलें ॥ सकळ इंद्रियांतें संहारिलें ॥ पूर्णब्रह्म दाविलें ॥ मजलागीं ॥२८॥
चित्त चक्षुरादिक ॥ इंद्रिये असती अनेक ॥ तीं सुख - क्लेशदायक ॥ प्राणीमात्रांशीं ॥२९॥
म्हणूनी कल्पनेच्या ग्रासीं ॥ नसावी माया समूळींशीं ॥ मग संहार इंद्रियांशीं ॥ आपोआप होईल ॥३०॥
तैशी माझी कल्पना विराली ॥ त्या ठाईंच संस्कृती निमाली ॥ सकल इंद्रियें विकल झालीं ॥ माझे मीपणा नागवलों ॥३१॥
जें शक्तिचक्राला वेगळ ॥ जें ज्ञप्तिमात्र केवळ ॥ तें निजानंद अति निर्मळ ॥ परब्रह्म पावलों ॥३२॥
दृश्य द्रष्टा दर्शन ॥ ह्या त्रिपुटी जेथें होती क्षीण ॥ तें पूर्ण ब्रह्म जाण ॥ अनिर्देश्य पावलों ॥३३॥
ज्ञाता ज्ञान ज्ञेय ॥ हें जेथें नाहीं त्रय ॥ तें परब्रह्म अप्रेमय ॥ सद्गुरुकृपेनें पावलों ॥३४॥
ज्ञान म्हणावें तरी नाहीं जाणिव ॥ अज्ञान म्हणावें तरी नाहीं नेणिव ॥ अभाव म्हणावा तरी असे ठाव ॥ पूर्ण ब्रह्मानंदाचा ॥३५॥
आहे म्हणूं तरी कैसें घ्यावें ॥ नाहीं म्हणूं तरी कैसें त्यागावें ॥ जें ब्रह्म ज्याचें त्याणें अनुभवावें ॥ तेंचि आजी पावतों ॥३६॥
जें निद्रिताला जागवी ॥ जरग्याला जाणवी ॥ जाण्याला भोगवी ॥ परी आपण अक्रिय ॥३७॥
जैसें स्फटिक शिळेचें पोट ॥ सदोदित असतें निघोट ॥ तैसें चैतन्य अती दाट ॥ परब्रह्म ॥३८॥
नातरीं आकाशासारिखें पोकळ ॥ व्यापकपरी व्यानकत्वाशीं वेगळ ॥ परब्रह्म ॥३९॥
जेथें विद्या ना अविद्या ॥ जें अतुल्य स्वसंवेद्या ॥ ती जाणिली सुविद्या ॥ ब्रह्मस्वरूप मी ॥४०॥
मी श्रीगुरूचा अनुग्रहीत ॥ आतां तीं सावितां एकांत ॥ तेथें चिंतितों गुणातीत ॥ परम पुरुष रामचंद्र ॥४१॥
मनासंगें धांवतां ॥ न तुटे प्रपंचाची व्यथा ॥ त्यापासूनि वेगळें होतां ॥ महासुख होतसे ॥४२॥
जो जो विषय उमटेल ॥ तो मिथ्या समजूनि विदारील ॥ तरी सहजीं उपजेल ॥ सुलीनता मजलागीं ॥४३॥
म्हणूनि जो संकल्प उठी ॥ कधीं न जावें तयापाठीं ॥ फिरवावी मागुती दृष्टी ॥ क्षण एक न अविलंबें ॥४५॥
मी ब्रह्म या आकारें ॥ ब्रह्मस्वरूप स्फूर्ति स्फूरे ॥ तें विचारितां तत्त्व निर्धारें ॥ उथे निरालंब ॥४६॥
आपुलिया जन्माभूमिके ॥ वस्ती करूनी पुण्य ठाकें ॥ तेथें मीं जरी चुकें ॥ तरी होय अध:पतन ॥४७॥
शरीर जन्मभूमिकेचें ॥ एवढें मोठेंपण साचें ॥ तरी जन्मस्थान जीवाचें ॥ तें अगाध महिमान कीं ॥४८॥
उगमीं सरिता स्थिरावती ॥ मग तेची सिंधू होती ॥ अधार कां नव्हती ॥ आणिका सरितेशीं ॥४९॥
तैसाचि आपला उगव ॥ जरी न त्यागिता हा जीव ॥ तरी अंगाशीं जडता थोरव ॥ ब्रह्मत्वाचा ॥५०॥
म्हणूनि कल्पनेशीं मारीन ॥ इंद्रियांशीं संहारीन ॥ तरी मज्जीव पावेल ब्रह्मपण ॥ कैसा उरेल ॥५१॥
अनुभवाची ऐक खूण ॥ जेणें भवाचें जाहलें संहरण ॥ हेही कळली मजलागून ॥ श्रीगुरुकृपेनें ॥५२॥
स्वरूपोन्मुख स्फुरण ॥ हेंचि मायामोहाचें चिह्न ॥ अविद्या तोचि पूर्ण ॥ विपरीत कल्पना ॥५३॥
मन नेत्रादिक ॥ इंद्रियेंही असती अनेक ॥ तीं सर्व सुखदु:खदायक ॥ अविद्याजनित ॥५४॥
याकरितां कल्पनेच्या ग्रासीं ॥ नाश माया अविद्येशीं ॥ संहार होईल इंद्रियांशीं ॥ आपोआप ॥५५॥
सुषुप्ती अवस्था कल्पना ॥ नि:शेष जाहली लीना ॥ तरी जीवाची संहारणा ॥ कां न चुकेची ॥५६॥
ऐशा आक्षेपीं उत्तर ॥ बोलिले सद्गुर चतुर ॥ तें मी श्रवण केलें साचार ॥ जेणें संदेह माझा फिटला ॥५७॥
जीवाची सुषुप्तीदशें ॥ कल्पनादीनसे ॥ परी न आन निरसे ॥ तेणें संसृती होय ॥५८॥
आत्मा सुषुप्ती नेणिजे ॥ होऊनि तैसेंचि अशीजे ॥ तेथेंचि स्वानुभव म्हणीजे ॥ कवणेपरी ॥५९॥
आत्म्याविषयीं अज्ञान ॥ जोंवरी नाहीं क्षीण ॥ तोंवरी न चुके जन्ममरण ॥ जिवांशी पैं ॥६०॥
सुषुप्ती वेळीं कल्पना ॥ अज्ञानामध्यें हो लीना ॥ तेणें अज्ञानपण ॥ यातसे आत्म्याशीं ॥६२॥
तेथें अज्ञान न मरे ॥ म्हणूनि प्रपंच सरे ॥ अत्रेपाचीं उत्तरें ॥ निरर्थक असती ॥६३॥
जीवा वृक्ष जातीं ॥ सदोदित वर्ते सुषुप्ती ॥ तेथें कल्पनेसीं वस्ती ॥ अज्ञान गर्भांत ॥६४॥
अनुभवाची खूण ॥ ते आहेचि अन्या ॥ अज्ञानसहित कल्पना ॥ तेथें विरे स्वरूपांत ॥६५॥
करितां ब्रह्माचा अभ्यास ॥ मनाशीं होत रूपीं सौरस ॥ त्यागूनि तो करी हव्यास ॥ प्रापंचिक नर ॥६७॥
चित्त स्वरूपीं लावणें ॥ तेणे तेथेंचि असणें ॥ आनंदें फुंज लागणें ॥ तेचि संश्लिष्टता ॥६८॥
मन ब्रह्मीं नि:शेष मुरे ॥ ज्ञप्तीच केवळ मुरे ॥ ज्ञप्तीच केवळ उरे ॥ फुंज सुखाचा उतरे ॥ सुलीन दशा तेचि मज कळली ॥६९॥
ब्रह्माभ्यास असा करितां ॥ कळल्या मज भूमिका समस्ता ॥ अनायासें मग तत्त्वतां ॥ बनलों योगी मी ॥७०॥
अथवा इंद्रियें मारावीं ॥ जेथें लागती तेथेंचि धरावीं ॥ तरी सुलीनता पावावी ॥ रोकडी मी ॥७१॥
सात्त्विक राजस तामस ॥ अहंकार त्रिविध जाणजस ॥ तेथें शक्तिक्षयाचा विकास ॥ तोही मज कळों आला ॥७२॥
सात्विक अभिमानीं ज्ञानशक्ती ॥ राजसीं राहे क्रियाशक्ती ॥ तामसी वर्ते द्रव्यशक्ती ॥ तेंही मज कळों आलें ॥७३॥
सर्वेश्वर पहात ॥ द्रव्यशक्तीसहीत ॥ तामस अहंकारापासून निर्माण होत ॥ पंच महाभूतें ॥७४॥
तामस अहंकार गगनातें ॥ गगनें व्यापिलें पवनातें ॥ हेंही कळलें मातें ॥ श्रीगुरू तूमचें कृपेनें ॥७५॥
हुताशनें व्यापिलें उदकातें ॥ उदकें व्यापिलें भूमितें ॥ या रितीनें पंच महाभूतें ॥ उत्पन्न झालीं ॥७६॥
शब्दविषय गगनीं ॥ स्पर्शविषय पवनीं ॥ रूप राहें सदनीं ॥ तेंही मज कळों आलें ॥७७॥
आपाचा विषयरस ॥ पृथ्वीचा गंध जाणजस ॥ दिसे जन्यगुणाचा प्रवेश ॥ काय कारणभावें ॥७८॥
व्यान उदान समान ॥ प्राण आणि अपान ॥ एवं पंचतत्त्वांचा गुण ॥ लकत्र संभूत मज कळला ॥७९॥
श्रोत्र त्वक् चक्षु जिव्हा घ्राण ॥ हें ज्ञानेंद्रिय पंचक जाण ॥ कर्मेंद्रिय पंचक मजलागुन ॥ कथन केलें तें कळलें ॥८०॥
ज्ञाता ज्ञान ज्ञेय ॥ भोक्ता भोगणें भोग्य ॥ कर्ता कारण कार्य ॥ हे त्रिपुटी मज कळली ॥८१॥
अंत:करणभोक्ता ॥ इंद्रियांशीं भोगसंघता ॥ पंचभूतांशीं भोग्यता ॥ विषयरूपानें ॥८२॥
भोक्ता एकेक साधक ॥ तिंही साधनाचा मेळापंचक ॥ करूनि प्रवेशला नि:शंक ॥ एकेक भूतीं ॥८३॥
इत्यादि परस्परानुप्रवेश ॥ जें तत्त्वेशीं पंचधा सहवास ॥ हा ईश्वरइच्छा मायाविकास ॥ सद्गुरु मज कळों आला ॥८४॥
मग श्रीपुरुषानें ॥ आपुल्या इच्छेनें ॥ द्विधा केलीं अशेषपणें ॥ तीं पंच महाभूतें ॥८५॥
यामध्यें एका भागाचा ॥ त्या पंचविसां कळशांचा ॥ लिंगदेह सर्वेश्वराचा ॥ उत्पन्न झाला ॥८६॥
तत्त्वें जीं पंचवीस ॥ तीं हिरण्यगर्भाचे अंश ॥ लिंगशरीर साभास ॥ एक ईश्वराचा ॥८७॥
दिशा श्रोत त्वचा पवन ॥ नेत्र अर्क जिव्हा वरुण ॥ अश्विनौ देवते घ्राण ॥ हिरण्यगर्भाचें ॥८८॥
वाचा वह्नी पाणी सुरपती ॥ पाय वामन शिश्न प्रजापती ॥ गुदेंद्रिय तो नैरृती ॥ मजशीं गुरुराया कळों आला ॥८९॥
ब्रह्मांडीं जया विहरण ॥ प्रसिद्ध तेचि पंचप्राण ॥ दशधा भेदांनीं भिन्न ॥ सप्त चक्रें सप्त स्कंध ॥९०॥
सर्वेश्वरें अवलोकिलें ॥ गगन पंचधा विभागिलें ॥ अंत:करणरूपें तें राहिलें ॥ आपणाचि ॥९१॥
व्यानानें वायूशीं ॥ श्रोत्रानीं तेजाशीं ॥ वाचा जलीं शब्दभूमीशीं ॥ आकाश मिळतें झालें ॥९२॥
पवन मनोरूपानें ॥ आकाशीं राहणें ॥ समानें आपणपणें ॥ अधिष्ठिता झाला ॥९३॥
त्वचेनें पावकीं ॥ हस्तानीं उदकीं ॥ स्पर्शानें पृथ्वीस कीं ॥ वायु मिळता झाला ॥९४॥
अहंकारें धरणी ॥ शिणली गगनीं ॥ अपानरूपें पवनीं ॥ मिळती झाली ॥९५॥
इत्यादि पंचीकृपें ॥ स्थूळ पंच महाभूतें ॥ गुणधर्म कर्मसहितें ॥ उपजणीं ॥९६॥
कवण भूताचे कवण ॥ कर्म धर्म गुण ॥ जे मज सर्व सांगीतलें विस्तारेंकरून ॥ ते मज अनुभवा आलें ॥९७॥
श्रीगुरुराया आपुलें कृपेंकरून ॥ मजला झालें ब्रह्मज्ञान ॥ न होई उत्तीर्ण ॥ या उपकारांतुनी ॥९८॥
मजवरी प्रेम केलें अपार ॥ तेणें शांत झालें अंतर ॥ स्मरण होतें वारंवार ॥ तुमचे बोधाचें ॥९९॥
दयानिधे गुरुराया ॥ केली मजवर जी माया ॥ हृदयीं राहील सदया ॥ जन्मोजन्मीं ॥१००॥
देवलोकीं आहे अमृत ॥ तें पिऊन एकचि होतो तृप्त ॥ परी आपुलें बोधमृत ॥ सकल जगांसीं तृप्त कारक ॥१॥
अधर्माचा नाश करून ॥ सद्धर्माचें करावया स्थापन ॥ अवतरलेत तुम्हीं निधान ॥ मूढजन तारावया ॥२॥
सद्गुरु तुम्हीं मजशीं अंगिकारिलें ॥ आणि मज पूर्ण ब्रह्मचि केलें ॥ निर्विकल्प करूनि ठेविलें ॥ सुखी केले अपार ॥३॥
मजशीं नव्हती ज्ञानमती ॥ म्हणूनि केली काकुळती ॥ अनाथ पाहूनी हातीं ॥ सद्गुरु तुम्हीं धरिलें मज ॥४॥
जपतपादि बहुत साधनें केलीं ॥ तेणें स्वहिताशीं भूल पडली ॥ चित्तवृत्ती भांबावून गेली ॥ हितगोष्टी आठवेना ॥५॥
पूर्वजन्मींचें पुण्य फळलें ॥ म्हणून सद्गुरु तुमचें दर्शन झालें ॥ तुम्हीं मला म्हटले आपुलें ॥ भाग्य उदेलें सत्यची ॥६॥
तुमचे सुबोधेंकरून ॥ मज अज्ञाना झालें ज्ञान ॥ मी काय वर्णूं तुमचें महिमान ॥ वेदांहीं मौन पडतसे ॥७॥
सद्गुरु तुम्हां कृपासिंधु अवलोकुन ॥ प्रार्थिलें तव पदालागुन ॥ तुम्ही पूर्ण दयघन ॥ केलें तृप्त शिष्यचातकाशीं ॥८॥
जननीचा देखुनि लाड ॥ बाळक हट्टानें करी बडबड ॥ कारण ती पुरवीतसे त्याचें कोड ॥ जें मागें तें त्या देई ॥९॥
त्याप्रमाणें मी भीड सांडुन ॥ झालों त्वत्पदीं लीन ॥ माझें केलेंत समाधान ॥ शांत झालों अंतर्बाह्य ॥११०॥
मी निजकार्या कारण ॥ लाज सोडून केले प्रश्न ॥ स्वामीनीं केलें समाधान ॥ शांता झालों अंतर्बाह्य ॥११॥
तुमचें होतांचि दर्शन ॥ मी वैरागी बनलों पूर्ण ॥ बोधिलें जेव्हा मजलागुन ॥ शांत झालों अंतर्बाह्य ॥१२॥
या प्रपंचसागरीं ॥ मी बुडालों होतों निर्धारीं ॥ मजला धरोनी कीं ॥ काढिलेंत बाहेरी गुरुराया ॥१३॥
दीन दुर्बळ पाहिलें ॥ मज अनाथातें तारिलें ॥ अनुभवाए कासे लाविलें ॥ गुह्य सांगीतलें जीवीचें ॥१४॥
शब्दब्रह्मातें निरसून ॥ सांगितली अनिर्वाच्य खूण ॥ माझें तुटलें भवबंधन ॥ मुक्त झालों दु:खांतुनी ॥१५॥
कमलासनादिकांचें जें जिव्हार ॥ मनबुद्धीतें अगोचर ॥ व्यापोनि उरलें साचार ॥ तें गुज तुम्हीं सांगीतलें ॥१६॥
ज्यामाजी हें सर्व राहे ॥ ज्याच्यापासून हें आहे ॥ ज्याच्या सत्तेनें चालताहे ॥ तें गोप्य तुम्हीं सांगितलें ॥१७॥
श्रुति वदती नेति नेति ॥ नाना शास्त्रें वादरिती ॥ जें नकळे नाना मती ॥ ते तुम्ही मजशीं सांगीतलें ॥१८॥
जपतपादि होम ॥ तीर्थयात्रादि व्रत नियम ॥ ह्या सर्वांशीं जें दुर्गम ॥ तें मजलागीं बोधिलें ॥१९॥
जेथें चित्तबुद्ध्यादिक हरपली ॥ परावाचा परतली ॥ शीतोष्णेंविना जी प्रकाशली ॥ ती गुह्य गोष्ट कथिली मजलागीं ॥१२०॥
तंव सद्गुरु बोलिले आपण ॥ रत्नाकरा झालासि सावधान ॥ पाहिलेंस माघारें वळोन ॥ पूर्णब्रह्म बनलाशी ॥२१॥
तूं ब्रह्म स्वतां सिद्ध होताशी ॥ परी कायेसंगें बद्ध मानिलेंशी ॥ बद्ध होतास तो मुक्त झालाशी ॥अनुसरलाशी स्वहिताला ॥२२॥
आतां तूं आपणा आपण ॥ मानिलेंस ब्रह्मचि पूर्ण ॥ राहिलास निर्विकल्प होऊन ॥ तेणें पावन झालास तूं ॥२३॥
अनाम तूं रूपातीत ॥ नाहीं तुज जात आणि गोत ॥ स्वप्रकाश अखंडित ॥ सर्वत्रीं नांदत असशी तें ॥२४॥
अरे मुक्त म्हणतां बद्धता होते ॥ बद्ध म्हणतां मुक्तता येते ॥ तूं सोडूनीही दोघांतें ॥ ऐक्यता ती साधिली ॥२५॥
तुजमध्यें आत्मप्रकाश झाला ॥ नाना मतांचा विसर पडला ॥ संशयतम नसे उरला ॥ रत्नाकरा तव चित्तीं ॥२६॥
ज्ञानदेवायनीं आपण ॥ सांगीतली मजलागून ॥ तीच खूण रत्नाकरा जाण ॥ तुजलागीं सांगीतली ॥२७॥
मज त्यांचीं आज्ञा प्रमाण ॥ म्हणून तुज सांगितलें बोधवचन ॥ तेणें तुझें झालें समाधान ॥ निवालास अंतरंगीं ॥२८॥
निर्विकार ब्रह्म जाणोन ॥ ब्रह्मस्वरूप झालासि आपण ॥ केलेंस कल्पनेचें छेदन ॥ पूर्ण वैरागी झालाशी ॥२९॥
जे शुद्ध वैराग्याची स्थिती ॥ वेदशास्त्रें जीं वर्णिती ॥ तींच वैराग्यरीती ॥ बाणली तुजशीं शिष्यवर्या ॥१३०॥
शब्द काडितांच मुखातून ॥ वरचेवर घेतलास झेलून ॥ चकोर जैसा चंद्रामृतालागुन ॥ अति आवडीनें घेतसे ॥३१॥
शशी सर्वत्र प्रकाशत ॥ सर्वां शीतळया लागत ॥ परी चकोराशींच अमृत प्राप्त ॥ तेंवी ब्रह्मप्राप्ती तुज झाली ॥३२॥
शब्दचातुर्येकरून ॥ सर्वांचें होईल समाधान ॥ परी आर्त तुला म्हणून ॥ अर्थप्राप्ती झाली असे ॥३३॥
हा संसार मिथ्या आहे ॥ मृगजळापरी भासताहे ॥ तरी प्रपंचिक मायामोहें ॥ गुंतून त्यांत राहताती ॥३४॥
त्यांस नावडे कथाकीर्तन ॥ दारापुत्रादिकांस मानिती चीवप्राण ॥ कासया त्यांस देवाचें भान ॥ प्रपंचापुढें राहील ॥३५॥
स्त्रीस मानिती देवासमान ॥ पुत्रांस मानिती ब्रह्मपूर्ण ॥ आई - बापास देती घालवून ॥ देशांतरीं ॥३६॥
स्त्री समागमें अंध होती ॥ म्हणून ग्रंथ - पुराणें न पाहती ॥ तिच्याच अनुसंगें रहाती ॥ धरिती प्रीती अपार ॥३७॥
करील ती आज्ञा प्रमाण ॥ वाग्बाणें छळिती तरी मानिती भूषण ॥ प्राणप्रिये जिवलगे म्हणून ॥ कोडग्यापरी आर्जविती ॥३८॥
जरी ती राहिली रुसून ॥ कासावीस होती पतीचे प्राण ॥ सिद्ध होती दुष्कृती करावया जाण ॥ समजावया तिजलागीं ॥३९॥
ऐसे जे कां मूर्खजन ॥ पाहूं नये तयांचें दन ॥ तयांचा संग सोडून ॥ दूर देशीं पैं जावें ॥१४०॥
आद्यकवींनीं निर्मिलें ग्रंथ ॥ दावावया अज्ञांना पंथ ॥ परी ते स्त्रीसंगें अनाथ ॥ होऊन राहती या गीं ॥४१॥
कासया तयां हरिभक्ती ॥ स्त्रींसंगें त्याची भ्रष्टली मती ॥ अंतीं त्यांची दुर्धर गती ॥ हें त्यांचें चित्तीं वसेना ॥४२॥
हे आहेत जरी मानव ॥ तरी कृतीनें शुद्ध गाढव ॥ बोलणें नव्हें माझें वाव ॥ सत्य सांगतों रत्नाकरा ॥४३॥
असत्य बोलती कार्य साधिती ॥ परी असत्य तेंचि राहे अंतीं ॥ दुर्धर त्यांची गती होतसे रे ॥४४॥
ऐशी जनांची रीती ॥ म्हणून आली काकूळती ॥ सांगतों त्यांना हित वचनोक्ती ॥ ऐकती तरी हित त्यांचें ॥४५॥
रत्नाकरा तूं चतुर ॥ ज्ञान संपदिलें थोर ॥ जाणिलेंस ब्रह्म अगोचर ॥ आतां ज्ञानी बनलास ॥४६॥
राहें ब्रह्मीं लेन होऊन ॥ हेंचि कथितों तुजलागुन । ऐकिलेंस जैएं माझें वचन ॥ राहें तूं तैसाची ॥४७॥
वनामाजी नलगे जाणें ॥ खटाटोप वायां न करणें ॥ सुखें मठांत राहणें ॥ ब्रह्मीं लीन होउनी ॥४८॥
जिवंती एक तोच जगीं ॥ जो बह्म अखंड भोगी ॥ सतत मरणोत्मुख रोगी ॥ जिवंत असूनी मेल्यासमन ॥४९॥
विद्यावैभव हेंचि थोर ॥ जाणाणें ब्रह्म अगोचर ॥ नातरी ग्रंथसंभार ॥ व्यर्थची ॥५०॥
षड्वैरी गांजिती अपार ॥ त्याचा वैराग्यें करावा संहार ॥ मन चंचल अपार ॥ तेंहीं स्थिर करावें ॥५१॥
नुकतेंच तुज हें कथिलें ॥ तुजलाही तें सर्व कळलें ॥ सर्व तुझे चित्तीं राहिलें ॥ मी जाणें तें ॥५१॥
सद्गद जाहलें अंतर ॥ समाधाना झालें थोर ॥ ग्रंथ कथन झालें साचार ॥ तुजलागीं रत्नाकरा ॥५३॥
दधी घुसळुनीयां नववीत काढिती ॥ तेंवीं हा ग्रंथ ब्रह्मतत्त्वाचें सार निश्चितीं ॥ प्राप्त होईल जानाप्रती ॥ तुझ्याद्वारें ॥५४॥
रे रत्नाकरा शिष्यनिधाना ॥ तुज निमित्त करुनी गोष्टी नाना ॥ कथिल्या समजावया सकल जना ॥ या ग्रंथीं ॥५५॥
गीताभागवत कथिती ॥ यदुपती पार्थोद्धवा बोधिती ॥ ज्ञानोबा एकनाथ बहु यति वदती ॥ तेंचि तुज कथियेलें ॥५६॥
गूढ नेणेंचि भ्रांती ॥ मदांधा चंद्रज्योती ॥ उजळली निगुती ॥ दीपरत्नाकर ॥५७॥
चिद्वस्तु देत नाहीं ती ॥ उदयो करी मती ॥ हो उदंडासिं प्राप्ति ॥ होय तयार सद्गुरुस्वामी विजयानंदें ॥५८॥
अनाथालागीं केला प्रबोध ॥ तेणेंयोगें ग्रंथप्रबोध ॥ सकळही सुलभ ॥ झाला असे ॥५९॥
आधीं मळिन होती वृत्ती ॥ ते क्षाळिली सद्गुरुमूर्ती ॥ उजळली आत्मज्योती ॥ स्वयंप्रकश चहूंकडे ॥१६०॥
ग्रंथीं प्रवेश सहजचि झाला ॥ कृपेनें भावार्थ उमजल ॥ गुध गुह्यार्थ नाहीं उरला ॥ ऐसें कृपेचें महिमान ॥६१॥
म्हणवोनी अध्यात्म ग्रंथीं ॥ लागलीसे अत्यंत प्रीती संग्रह करावयाची युक्ती ॥ रचिली जाणा ॥६२॥
तन मन आणि धन ॥ याचा वेच करोन ॥ आदरें करी जो ग्रंथलेखन ॥ प्रतिदिवसाचे ठायीं ॥६३॥
परोपकार आणि स्वार्थ ॥ दोन्ही गडती यथार्थ ॥ विवेकवृद्धि नित्य नित्य ॥ बुद्धि मलिन नव्हेचि ॥६४॥
स्वामी आज्ञा वंदोनि शिरीं ॥ लेखणी घतली करीं ॥ सिद्धी पावली निर्धारीं ॥ कृपावलोकनें ॥६५॥
दीपरत्नाकर ग्रंथ ॥  आजी लेखन झालें समाप्त ॥ पुढें अन्य ग्रंथी स्फूर्त ॥ द्यावी दीनालागोनी ॥६६॥
जातिकुळाचा उद्धार व्हावा ऐसें जरी मनीं ॥ तरी प्रेम द्यावें रामनाम स्मरणीं ॥ उल्हास असो साधुपूजनीं ॥ सार्थक होय जन्मोंजन्मीं नरदेहाचें ॥६७॥
सद्गुरु आणि साधु ॥ म्हणतां आला पृथग्भेदु ॥ निरंतर अद्वैतबोधु ॥ असो सर्वांठायीं ॥६८॥
हेंचि मागतों पुढतापुढती ॥ हेत पूर्ण कीजे गुरुमूर्ती ॥ रामचंद्रचरणीं गुरुनती ॥ करती असे सर्वदां ॥६९॥
येथोनी जाहलें ग्रंथकथन ॥ प्रीति पावो सद्गुरुनिधान ॥ ईश्वरइच्छा म्हणतां अनुमान ॥ श्रोतेजन करितील ॥१७०॥
जो निर्गुण निराकार ॥ तोचि ईश्वर साचार ॥ तेथ इच्छेशीं कैसा थार ॥ देह साचार असे कीं गा ॥७१॥
जार झाला ब्रह्म पूर्ण ॥ तरी सांडों नये सेवकपण ॥ म्हणवोन इच्छा म्हणतां जाण ॥ आपुली हाण म्हणू नये ॥७२॥
आपण देहभावनेतें सांडावें ॥ मग हा ईश्वरचि स्वभावें ॥ म्हणवोन ईश्वरइच्छा म्हणतांचि समजावें ॥ मज विचारावें श्रोत्यांहीं ॥७३॥
हें सर्वसाधनांचें साधन ॥ सर्व गुह्यांचें गुह्य जाण ॥ हें हाता आलिया जाण खूण ॥ तोचि धन्य त्रिलोकीं ॥७४॥
त्याचा पिता - माता धन्य ॥ तयाचें कुळगोत्र जाण धन्य ॥ पुण्यवंत तेथींचे जन ॥ त्यांशीं दर्शन नित्य त्यांचें ॥७५॥
संतदर्शनीं पावन होई ॥ जे स्मरणें कळिकाळाचें भय नाहीं ॥ कां जे ते गुरुरूपचि झाले देहीं ॥ म्हणवोनी नसे कांहीं संदेह ॥७६॥
सर्वभावाचे आपण ॥ अवयवापरि मानावे जन ॥ जैसे नग आणि सचवर्ण ॥ यां भिन्नपण नसेच कीं ॥७७॥
जैसें पट आणि सूत ॥ हें बोलणेंचि भासे द्वैत ॥ तरी तें एकपणेंचि असे नांदत ॥ तैसें मज आंत जग भासे ॥७८॥
म्हणवोनि मीच अवघा असें ॥ माझें मजलाचि स्वप्नवत् भासे ॥ जागृतीं स्वप्न नासे ॥ दृश्य दिसे ऐसें जया ॥७९॥
जोंवरी तो स्वप्नीं राहे ॥ तोंवरी तें सत्यचि पाहे ॥ तैसा जोंवरी हा देह आहे ॥ तोंवरीच राहे स्वधर्मीं ॥१८०॥
स्वधर्म असतां कांहीं ॥ त्याचिया कर्मासी लिप्त नाहीं ॥ जैसें सूर्यासंगें जग सर्वही ॥ चाले परी नाहीं लिप्त तेथें ॥८१॥
जैशी भिंत तरि एक ॥ वरी चित्रें जैशीं अनेक ॥ तैसें आत्मत्व देख ॥ जीवलोक विस्तारिलें ॥८२॥
हे कल्पना चितारिण ॥ तिने चित्रें केलीं निर्माण ॥ म्हणोन कल्पनेनेंच जीव जाण ॥ निर्विकल्प पूर्ण असे ॥८३॥
जैसे कापुसाचे ठाईं ॥ कापसाच्या घड्या भरल्या नाहीं ॥ परि विनावणीसंगें पाहें ॥ एकीं अनेकी सोई भासती ॥८४॥
जैसे मुळींहूनि कांहीं ॥ सागरीं तरंग नाहीं ॥ परी वायूचे संगें पाहीं ॥ तया ठाईं भासती ॥८५॥
सुवर्णीं नग नाहींत ॥ परी सोनार निर्माण करित ॥ तैसी ब्रह्मीं नाहीं जीव जात ॥ असे भासत कल्पनेसंगें ॥८६॥
आपणामाजी सर्व जाणोन ॥ सर्व होइजे आपण ॥ तेव्हां कल्पनेंचें भान ॥ सहज जाण हारपे ॥८७॥
करतळावरी आंवळा जाण ॥ तैसें या ग्रंथीं कथिलें ब्रह्मज्ञान ॥ हा सद्गुरुचा आशीर्वाद पूर्ण ॥ ग्रंथ अवसान आलें असे ॥८८॥
आतां स्तुतिस्तवनास प्राशोन ॥ पडलें मुळींच मौन ॥ पुढें दृष्टांत वाहिली आण ॥ ग्रंथ संपूर्ण झाला असे ॥८९॥
संवत् अठराशे पन्नास ॥ शके सत्राशें पंचेचाळीस ॥ समाप्त झालें ग्रंथलेखन नि:शेष ॥ यथामति जाणिजे ॥१९०॥
कार्तिक कृष्ण चतुर्दशीसी ॥ इंदुवासर विशेषीं ॥ त्या दिवशीं ग्रंथ सिद्धीसीं ॥ सद्गुरुकृपें पावला ॥९१॥
ग्रंथसंग्रहितोसत्यजलोकमलदुबेन ॥ यजमानकृत्यजाफराबादेन ॥ सन बाराशें तेतिसेन ॥ ग्रंथसमाप्ति पावला ॥९२॥
सिद्धांनंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥१९३॥
इति श्री चिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकर - ग्रंथे विशेष अद्वैतबोधगुरुभक्तिवर्णनो नाम पंचदशोsध्याय गोड हा ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ॐ॥ ॥ ओंव्या ॥१९३॥
इति दीपरत्नाकर पंचदशोsध्याय: समाप्त: ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP