अध्याय पहिला

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


अत्यंत नम्रपणे रत्नाकरने गुरुचरणी लोटांगण घातले व म्हणाला, “ हे पूर्णबोधा, अनादिसिद्धा, पूर्ण ब्रह्मव्यापक निर्गुण निराकारा, अनाथनाथा, स्वामी समर्थागुरुनाथा, अज्ञ जनांचा उद्धार व धर्म - प्रतिपालनासाठीच आपण देह धारण केलेला आहे. आपल्या अनुग्रहामुळेच पूर्णब्रह्म प्राप्त होते, म्हणून मी आपणास शरण आलो आहे. मला मार्ग दाखवा. अभय द्या ”.
“ मी केलेल्या अनेक साधनांमुळे माझी चित्तवृत्ती भांबावून, स्वहिताची भूल पडली. चांगल्या गोष्टींची आठवण राहिली नाही. स्वामी आपण दयावंत होऊन माझे अपराथ पोटात घालून, माझे समाधान करा. साधूसंतांनी तुमची खूण सांगितल्याने मी शरण आलो आहे. मला पावन करून या संसाराची ओझी उतरून मुक्ती द्या.
“ जे ब्रह्म व्यापून दशांगुळे उरते, वेदसुद्धा, ‘ नेति नेति ’, म्हणतात, नाना शास्त्रे, पुराणे, वादविवाद करूनही ज्याच्या ठायी मन, वाचा व बुद्धी स्थिर रहातात्त, ज्याच्या सत्तेने सर्व चालते, असे गुप्रज्ञान त्याची खूण मला सांगावी. ”
रामानंद स्वामी म्हणाले, “रत्नाकरा, तू स्वत: देहसंगामुळे बद्ध झाला असलास तरी ब्रह्मच आहेस. मुक्तच आहेस. तू स्वत:स बद्ध मानल्याने स्वहितास दुरावला आहेस. तू निर्विकल्प होऊन रहा. तू अनाम आहेस. रूपातीत आहेस. तुला धर्म नाही. तुझीच सत्ता सर्वत्र चालते. तू मायामोहास भूलला आहेस. अनंत ब्रह्मांडे तुझ्या पोटात आहेत. तू अनादी सिद्ध आहेस, हे तू चांगले जाणून घे. तुझ्या मनातला मी - तूपणा गेल्याशिवाय तुला स्वहित कळणार नाही. भ्रमाने देहाभिमान, अहंभाव, ममता वाढून प्राण्यास प्रपंचाचा फास पडला आहे; पण प्रपंच मृगजळासारखा आहे. त्यातील सुख - दु:खे खोटीच असतात. बद्धमुक्ततेने शोक वाढला आहे. आपण आपल्याला जाणणे म्हणजेच सद्भाव भाव नसता करणे ते मायिक. भावाशिवाय ऐकल्यास अर्थ कळत नाही. अर्थाशिवय अनुभव व त्याशिवाय स्वहित नाही. या संसारातून मुक्त हो. तू जे विचारशील ते मी तुला सांगेन. ”
रत्नाकर म्हणाला, “ तूच ब्रह्म आहेस, असे आपण म्हणता; पण ब्रह्म अनाम, रूपातीत, शाश्वत, निर्गुण, निराकार, आजन्म, सर्वव्यापक आहे; पण मी कर्तव्यकर्म, धर्म, जात गोत्र यांत बांधला गेलेलो. मी अशास्वत, आकारबद्ध, मातेच्या उदरी जन्मलेला; मग मी ब्रह्मासारखा कसा असेन ? ”
गुरु म्हणाले, “ तुला विचार करण्याचे ज्ञान असूनसुद्धा, जगाच्या कल्याणासाठी अज्ञान धारण करून तू हा ग्रंथ निर्माण करीत आहेस, कलियुगात नास्तिकपणा वाढला, भक्तिभाव गेला. देहाभिमान वाढला, माया, ब्रह्म, जीव, शिव, ईश्वर, परमेश्वर अशा मतांचा पसारा वाढून, निरर्थक भ्रम वाढून, आपसातील वाद - विवाद व परस्परांची निंदा करणे वाढले. हे वेदद्रोही असून नरकात पडतात. या देहातील सार तुला सांगतो, ते नीट ऐक.
“ या ग्रंथाविषयी जे लोक आपल्या मनात अत्यंत शुद्ध असा भाव ठेवतील, त्यांची भव - भय - भ्रांती इ. संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. या ग्रंथावर विश्वास, श्रद्दा, निष्ठा ठेवणार्‍यांना ब्रह्मस्थिती प्राप्त होईल. या ग्रंथाचे वाचन करणारांना हा ग्रंथ असे वरदान देतो. जोपर्यंत प्रत्येक मनुष्यप्राणी स्वत: ब्रह्मरूप धारण करीत नाही, तोपर्यंत त्याच्या ठायी ब्रह्म पडणार नाही. म्हणून ज्या व्यक्तीच्या मनात आपण पूर्ण ब्रह्म व्हावे, अशी आस लागून राहिलेली असेल त्या प्रत्येकाने या ग्रंथाचे ठायी आपल्या पवित्र मनाने आणि अतिशय शुद्ध अंत:करणाने आवडे धरणे आवश्यक आहे. दीपरत्नाकर हा ग्रंथ जे कोणी आपल्या मनात शुद्ध भाव ठेवून नित्यनेमाने वाचतील किंवा या ग्रंथाचे श्रवण करतील, त्या प्रत्येकास आपल्या मनात धारण केलेल्या इच्छेचे सुफल त्वरीत प्राप्त होऊन जाईल. अज्ञानाच्या अंधारात हरवून बसलेले सुफल, जीवनाचे यश हे या ग्रंथावरील श्रद्धेच्या प्रकाशात हस्तगत करावे. प्रपंचात विस्मरण पडलेले आत्मानुभव या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने प्राप्त करून घ्यावेत. अनेक ग्रंथ धुंडाळून न सापडणारी वस्तू ज्याची त्याला या ग्रंथात मिळेल. माणसाला जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत नाना मते पडतात; म्हणून तू आता सावध हो आणि आपली स्वत:ची चांगली सोय पहा, असे गुरूजींनी रत्नाकरला सांगितले.

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ नमोजी गुरुनाथा ॥ दीनदयाळा समर्था ॥ कृपा करीं मज अनाथा ॥ लावीं पंथा आपुल्या ॥१॥
तूं गुणातीत निर्गुण ॥ व्यापकत्वें परिपूर्ण ॥ वर्तविशी साक्षित्वें करून ॥ असशी आपण वेगळा ॥२॥
ऐसिया सद्गुरु अनादि सिद्धा ॥ परात्परा पूर्णबोधा ॥ नमन माझें सच्चिदानंदा ॥ दावीं शूध मार्ग मज ॥३॥
स्वामी तुमचे अवतरणें ॥ तें आम्हां मूढां कारणें ॥ आतं तुम्हीं आपुले म्हणनें ॥ कसे लावणे दीनासी ॥४॥
निर्गुणाचें धरिलें सगुण ॥ जैसा कर्पूर झाला गोठून ॥ किं गोडी तेची शर्करा आपण ॥ तैसें अवतरणें तुमचें ॥५॥
अधर्माचा उच्छेद करून ॥ धर्माचें करावया प्रतिपाळणा ॥ अवतरले सद्गुरु निधान ॥ शिष्यजन तारावया ॥६॥
सद्गुरूंनी ज्यासी अंगिकारलें ॥ त्यासी पूर्ण ब्रह्मचि केलें ॥ निर्विकल्प करूनी ठेविलें ॥ सुख दिधलें अपार ॥७॥
ऐसें वेदशास्त्रें वर्णिती ॥ म्हणोनि येतसें काकुळती ॥ अनाथ जाणोनियां हातीं ॥ कृपामूर्ति धरावें ॥८॥
पूर्वी बहुत साधनें केलीं ॥ तेणें चित्तवृत्ति भांबावली ॥ स्वहिताची भूल पडली ॥ नाठवे आपली हितगोष्टी ॥९॥
आतां पूर्वींल पुण्य वोढवलें ॥ जें स्वामींचें दर्शन झालें ॥ आतां तुम्ही म्हणा आपुलें ॥ भाग्य उदेलें तेव्हां माझे ॥१०॥
तुमचे कृपावलोकनें करून ॥ अज्ञाना होय परम ज्ञान ॥ वेदाशीं नकळे महिमान ॥ मी कोण वर्णावया ॥११॥
परि स्वामी दयावंत म्हणून ॥ मी प्रार्थित असें दीन होऊन ॥ तूं दयानिधि परिपूर्ण ॥ करीं पावन अनाथा ॥१२॥
जैसा माउलीचा देखूनि लाड ॥ बाळक करी लुडबुड ॥ जे ते पुरवी कोड ॥ म्हणोनि भीड सांडिय्ली ॥१३॥
येथें जरी भीड धरून ॥ उगाच राहों आपण ॥ तरी माझें समाधान ॥ पुढें कोण करील पैं ॥१४॥
यास्तव सद्गुरुराया ॥ काय करूं भीड धरूनियां ॥ मी लौकिक लाजु सांडोनियां ॥ विनटलों पायां एकनिष्ठें ॥१५॥
लौकिक लाज धरितां ॥ तों अधिकचि वाटे ममता ॥ ममतेनें आत्महिता ॥ करूं जातां घातकीं ॥१६॥
ऐंसे मज कळों आलें ॥ म्हणोनि ममते तें सोडिलें ॥ निर्विकार करूनी पाउलें ॥ म्यां धरिलीं गुरूराया ॥१७॥
मी आपुलिया कार्याकारण ॥ निर्लज्ज होऊनी करितों प्रश्न ॥ स्वामी करितील समाधान ॥ साक्ष मन देतसे ॥१८॥
ज्ञानदेव नामदेव येऊण ॥ तुमची सांगितली खूण ॥ भरंवसा येतो त्यावरून ॥ मी पावन होईन कीं ॥१९॥
कां जैं होतांचि दर्शन ॥ मज वैराग्य झालें पूर्ण ॥ मातें बोधिती जेव्हां आपण ॥ तेव्हांच ज्ञान होय कीं ॥२०॥
ज्याचे दर्शनेंनि न धाइजे ॥ त्याचे बोध काय लाहिजे ॥ समाधान करावें माझें ॥ फेडावें वोझें संसाराचें ॥२१॥
या संसारसागरीं ॥ मी बुडालों निर्धारीं ॥ वेगी धरूनियां करीं ॥ काढीं बाहेर गुरूराया ॥२२॥
अज्ञानजळीं वाहावलों ॥ वासनासुसरीनें गिळिला गेलों ॥ कल्पनाभोवरी पडलों ॥ आवर्ती पडलों जन्म मरणाच्या ॥२३॥
आतां त्वरेनें यावे ॥ मज अनाथातें तारावें ॥ अनुभवाचे कांसे लावावें ॥ गुह्य सांगावें जीवींचें ॥२४॥
शब्दब्रह्मातें निरसून ॥ सांगा अनिर्वाच्य खूण ॥ जेणें तुटेल भवबंधन ॥ तेंचि आपण करावें ॥२५॥
जें ब्रह्मादिकांचें जिव्हार ॥ मन बुद्धि चित्त अगोचर ॥ व्यापोनि उरलें साचार ॥ तें गुज सत्वर सांगिजे ॥२६॥
ज्यामाजीं हें सर्व आहे ॥ ज्यापासोन हें सर्व होये ॥ ज्याच्या सत्तेनें चालताहे ॥ ती गोष्ट गुह्य सांगिजे ॥२७॥
श्रुति म्हणती नेति नेति ॥ नाना शास्त्रें वाद करिती ॥ जें न येचि नाना मतीं ॥ तें मजप्रती सांगिजे ॥२८॥
नाना जपतपादि होम ॥ तीर्थयात्रादि व्रत नियम ॥ परि जें सर्वांस दुर्गम ॥ तें सूक्ष्म सांगिजे ॥२९॥
जेथें पारा वाचा परतली ॥ मनबुद्ध्यादि चित्तें हरपलीं ॥ जे शीतोष्णाविना प्रकाशली ॥ ते जोडी आपुली सांगिजे ॥३०॥
मनकल्पना सांडोन ॥ वर्ततां साक्षी होऊन ॥ जेणें आलें निराशपण ॥ तेची खूण सांगिजे ॥३१॥
कोणाची ती चाड नाहीं ॥ प्रेम तें असे सर्वांठायीं ॥ नाहींपणेंचि असतें देहीं ॥ तें गुह्य  सोई सांगिजे ॥३२॥
ऐसें म्हणूनि रत्नाकर ॥ लोटांगण घाली चरणांवर ॥ चालिला अश्रुपातपूर ॥ त्या सुखाचा पार नेणेवेचि ॥३३॥
ज्ञानाचें वेंची भांडार ॥ अणुमात्र न दिसे अहंकार ॥ अज्ञान हे चिन्ह साचार ॥ निर्विकाराचें जाणिजे ॥३४॥
मनाचें झालें उन्मळण ॥ सर्वांग कांपतसे जाण ॥ तंव सद्गुरू बोलिले आपण ॥ भला म्हणोन आश्वासिलें ॥३५॥
रत्नाकरा सावधान ॥ पाहें माघारां फिरोन ॥ तुझा तूंचि ब्रह्मपूर्ण ॥ सांडीं अभिमान देहींचा ॥३६॥
तूं ब्रह्मं स्वत:सिद्ध आहेशी ॥ परी देहसंगें बद्ध झालाशी ॥ मुक्त असतां बद्ध मानिशी ॥ तेणेंचि वंचिशी हिता तूं ॥३७॥
जैसा शुक नळकेशीं बद्ध झाला ॥ परी मुक्तचि असे पहिला ॥ तैसा तुज प्रसंग घडला ॥ देहसंग धरितां रे ॥३८॥
तरी तूं आतां आपणा आपण ॥ मानीं मीच ब्रह्मपूर्ण ॥ राहें निर्विकल्प होऊन ॥ तेणें पावन तूं होशी ॥३९॥
अरें तूं अनाम रूपातीत ॥ तुज नाहीं जातगोत ॥ स्वयंप्रकाश सदोदित ॥ असशी वर्तत सर्वत्रीं ॥४०॥
त्वां पुशिली अनिर्वाच्याची खूण ॥ तरी तूंचि ते असशी आपण ॥ श्रुतींसी पडलें जेथें मौन्य ॥ तेंचि पूर्ण तूंचि तुझा ॥४१॥
तुजमाची सर्व आहे ॥ तुझे सत्तेनें चालताहे ॥ परी तूं भूललास मायामोहें ॥ म्हणोनी सोय न कळेचि ॥४२॥
तुजपासूनि सर्व झालें ॥ सर्वांशी त्वांचि प्रकाशिलें ॥ अनामरूप संचलें ॥ ऐसें पाहिलें रूप तुझें ॥४३॥
अनंत ब्रह्मांडे तुझ पोटीं ॥ तूं ब्रह्मांडा पाठींपोटीं ॥ तूं आदि मध्य शेवटीं ॥ जैसा पटीं तंतू येक ॥४४॥
जैसे सुताचे पट अनेक झाले ॥ परी तें सूताचि असें संचलें ॥ कीं हेमचि नगत्वा आलें ॥ परी भिन्न बोलिलें नवजाय ॥४५॥
तूं प्रकृतिपुरुषांचे आधीं ॥ आणि मनबुद्धीची अवधी ॥ जाणों जातां नकळे त्रिशुद्धी ॥ असशी अनादि स्वत: सिद्ध ॥४६॥
परि तुझें तुज ज्ञान नाहीं ॥ म्हणोनि भूल पडली पाहीं ॥ आतां तूं सावध होईं ॥ धरीं सोई मुळींची ॥४७॥
तूं आपणाआपण विचारशील ॥ तेव्हां तुझें तुज कळों येईल ॥ तुझें तुज कळतांचि जाईल ॥ मीतूंशी पडेल बिंदुले कीं ॥४८॥
मीतूं असतांचि देहीं ॥ स्वहित नोहे कदा काहीं ॥ म्हणोनियां परतोन पाहीं ॥ तुझा तूंचि होईं मुक्त बापा ॥४९॥
मुक्त म्हणता बद्धता आली ॥ बद्ध म्हणता मुक्तता गेली ॥ बद्धमुक्ततेचि सांडोनि बोली ॥ साधीं पहिली ऐक्यता ॥५०॥
ऐक्यता म्हणतां भेद असावा ॥ परि तो नाहींच गा सदैवा ॥ जैसा मृगजळाचा हेलावा ॥ शब्दगौरवता तैसी जाण ॥५१॥
बद्धमुक्तता शब्दें केली ॥ क्षराक्षरें शब्दें झाली ॥ सगुणनिर्गुणाची बोली ॥ मिथ्या वाटली भ्रमगुणें ॥५२॥
अरे हा भ्रमें भ्रम वाढला ॥ भ्रमेंच देहाभिमान आला ॥ भ्रमें शब्दब्रह्मीं प्रवर्तला ॥ म्हणोनि झाला अभावो ॥५३॥
अभावें केली हाण ॥ अहंभावेंचि द्वैतभान ॥ अहंभावेंचि पडें खाण ॥ स्वहित जाण निश्चित ॥५४॥
अहंभावेंचि ममता वाढे ॥ अहंभावेंचि स्वहिता नाडे ॥ ममतेनें प्रपंचबिरडें ॥ बळेंच पडे प्राण्यासी ॥५५॥
प्रपंच म्हणजे कायी ॥ तेंही सांगतों सावध होईं ॥ मीतूंपण वसे ज्या ठाईं ॥ प्रपंच पाहीं तोचि रे ॥५६॥
एकीं अनेक पाहणें ॥ त्यासी प्रपंचचि म्हणणें ॥ परि हे मृगजळापरि जाणणें ॥ मिथ्या भास अभ्रापरि ॥५७॥
अभ्रापरिच्छन्न भासे ॥ परि तें कांहीं सत्य नसे ॥ शिपीचे रूपें दुरोनी जैसें ॥ नसतेंचि दिसे खर्‍यापरि ॥५८॥
हें सत्यापरि दिसताहे ॥ परि हें असत्यचि आहे ॥ वांझपुत्रास दिली पाहें ॥ कन्या मोहें नपुंसकें ॥५९॥
स्वप्नीं देखिलें सुखदु:ख ॥ परिं अवघेंचि मायिक ॥ तैसी बद्धमुक्ता देख ॥ नसताचि शोक वाढलासे ॥६०॥
तरी हे मिथ्याचि जाणोन ॥ कल्पना देईं रे सोडूनि ॥ तुझा तूंचि ब्रह्म पूर्ण ॥ मीतूंपण सांडिताचि ॥६१॥
मीतूंपणाचा अभाव ॥ तेंचि परमार्थाचें वैभव ॥ ऐसें जाणोनि मिथ्या सर्व ॥ धरीं भाव स्वरूपाचा ॥६२॥
आपण आपणासी जाणणें ॥ त्यासीच सद्भाव म्हणणें ॥ भावेंवीण जें जें करणें ॥ तें तें जाणणें मायिक ॥६३॥
भावेंवीण करितां श्रवण ॥ अर्थी कदा न लागे मन ॥ अर्थानुभव झाल्याविण ॥ स्वहित जाण नोहेचि ॥६४॥
शब्द निशब्द दावित ॥ जेथें शब्दाचा होत अंत ॥ म्हणोनि तूं शब्दातीत ॥ अससी सदोदित भरला पैं ॥६५॥
तरी त्वां अभाव सांडून ॥ मनीं मींच ब्रह्मा आपण ॥ तेणे तूं होसी पावन ॥ धरीं खूण जीवीं हे ॥६६॥
संदेह असेल जरी कांहीं ॥ तरी बोलावें लवलाहीं ॥ आपुलें स्वहित करूनि घेईं ॥ पुसेसी तेंही सांगेन ॥६७॥
स्वामी म्हणती तूंचि पूर्णब्रह्म ॥ परी नकळे आम्हांसीं वर्म ॥ ब्रह्म रूपातीत अनाम ॥ मज कर्माकर्मे लागली ॥६८॥
ब्रह्म रूपातीत ॥ मज नाम आणि गोत ॥ ब्रह्म स्वत:सिद्ध शाश्वत ॥ मी अनित्य असें कीं ॥६९॥
ब्रह्म निर्गुण निर्विकार ॥ मज भासतो आकार ॥ हाचि झालासे भ्रम फार ॥ न सुचे विचार स्वहिताचा ॥७०॥
ब्रह्म तो असे अप्रमाण ॥ मज औट हातांचें प्रमाण ॥ ब्रह्म व्याप परिपूर्ण ॥ मी जाण एकदेशी ॥७१॥
ब्रह्म अजन्म व्यापक चराचरीं ॥ मी जन्मलों जननीजठरीं ॥ मी ब्रह्मनिर्धारीं ॥ कैशापरी होईन ॥७२॥
ब्रह्म सर्वगत शाश्वत ॥ मी तों असें नाशिवंत ॥ स्वामीची ऐकोनि मात ॥ चित्त भ्रमित कीं ॥७३॥
ब्रह्म अनिर्वाच्य अमन ॥ मज वाचा आणि मन ॥ ब्रह्मीं नाहीं स्थान मान ॥ मज सदन गृह दारा ॥७४॥
ब्रह्मीं नाहीं दिनरात ॥ मी दिवसरात्रीमाजी वर्तत ॥ ब्रह्मीं नाहीं काळगत ॥ मज तो काळ भोगीतसे ॥७५॥
ब्रह्म स्वप्रकाश ज्ञानघन ॥ मी असें जी अज्ञान ॥ ब्रह्म निरावयव अवघें पूर्ण ॥ मज जाण अवयव असती ॥७६॥
स्वामी पदोपदीं आपण ॥ म्हणती ब्रह्म तें तूंचि पूर्ण ॥ हें ऐकोनियां जाण ॥ भ्रमभान झालें असे ॥७७॥
आतां या भ्रमांचे हरण ॥ स्वामीच करतील आपण ॥ मी आहें देह कीं कोण ॥ तेचि खूण सांगावी ॥७८॥
तंव सद्गुरू म्हणती धन्य धन्य ॥ बरवा केलासि प्रश्न ॥ जेणें तुटे देहाभिमान ॥ तेचि खूण आपली ॥७९॥
रत्नाकरा तुज प्रकाश झाला ॥ म्यां नानापरी बोध केला ॥ तुवां जाणोनि पुसिलें मजला ॥ तरी वहिला सावधान ॥८०॥
तुज तंव आहे रे पूर्ण ज्ञान ॥ जाणोनि नेणता होसी अज्ञान ॥ जग उद्धरावयास्तव जाण ॥ ग्रंथ निर्माण करितोसी ॥८१॥
कलींत पाखंडे चालिलीं ॥ तेणेंचि भक्तिभावा वंचली ॥ देहाभिमानें भांबावली ॥ चुकी पडली ज्याची त्याशीं ॥८२॥
नाना जप तप अनुष्ठान ॥ देहाभिमानें करिती जन ॥ तेणें वंचले आपणाआपण ॥ मीतूंपण धरितांचि ॥८३॥
देहनास्ति किंचन ॥ हें वेदाचें आहे वचन ॥ ब्रह्मास्मि परिपूर्ण ॥ ऐशी खूण सांगितली ॥८४॥
एकमेवाद्वितीयं नास्ति ॥ ऐसि गर्जतसे श्रुती ॥ ऐसें असोनि नाना मतीं ॥ मिथ्या भ्रमती पाखांडी ॥८५॥
जीव शिव माया ब्रह्म ॥ हा मिथ्याचि वाढविला भ्रम ॥ सांडूनिया सुगम ॥ धरिती प्रेम अद्वैतवादीं ॥८६॥
परस्परें वाद करिती ॥ येक येकासीं निंदिती ॥ ते वेदद्रोही जाण चित्तीं ॥ बळें जाती नरकालया ॥८७॥
त्याचें कराया निर्गुण ॥ ग्रंथ करितोसी निर्माण ॥ हें उपनिषदाचें दोहन ॥ तुजलागोनी सांगतों ॥८८॥
या ग्रंथीं जे भाव धरिती ॥ त्यांची हरे भवभयभ्रांती ॥ बाणे स्वयें ब्रह्मस्थिति ॥ वर हा ग्रंथ असें पैं ॥८९॥
स्वयें ब्रह्म जों झाला नाहीं ॥ तोंवरी ब्रह्म न पडे ठाईं ॥ ब्रह्म न होतां करी जें कांहीं ॥ तें तें पाहों नागवण ॥९०॥
ब्रह्म व्हावयाची आवडी ॥ ज्यासी असेल धडफुटी ॥ तेणें या ग्रंथाची अति तातडीं ॥ धरिजे पैं ॥९१॥
हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ पुरवीत श्रोतयांचे आर्त ॥ तेथें घालुनियां चित ॥ सावधपणें ऐकावा ॥९२॥
जैसे अंधारामाजी रत्न । पडिलें हातींचें गळोन ॥ तें घेईजे दीपकरून ॥ तैसा जाण ग्रंथ हा ॥९३॥
आत्मानुभव निधान ॥ पडिलें प्रपंचरजनीमाजी जाण ॥ तें या दीपरत्नाकरें पाहून ॥ घेईजे आपण वेंचुनी ॥९४॥
वस्तु विखरली जेथिची तेथें ॥ नातुडे ते नाना मतें ॥ ती दीपरत्नाकर ग्रंथें ॥ ज्याची त्याला सांपडे ॥९५॥
हाचि आकाशींचा दीप असे ॥ जेणें चंद्र सूर्य प्रकाशे ॥ नाना मतांचा अंधार नासे ॥ आत्मा भासे स्वत:सिद्ध ॥९६॥
ऐसा आत्मप्रकाश झाला नाहीं ॥ नाना मतें तोंवरींच पाहीं ॥ म्हणोन तूं सावध होईं ॥ चित्त देईं ग्रंथीं या ॥९७॥
तुवां जैसी पृच्छा केली कांहीं ॥ तें सर्वं सांगेन पुढिले अध्यायीं ॥ तूं सावध होउनियां राहीं ॥ सांडीं सोई देहाची ॥९८॥
प्रथम अध्याय पूर्ण झाला ॥ दुसरा अध्याय आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नाकराला ॥ चित्त कथेला दीजे बापा ॥९९॥
इति श्री दीपरत्नाकर - ॥ ग्रंथ गुह्यांत गुह्य सार ॥ हा उपनिषदांचे भांडार ॥ संत चतुर संतोषिती ॥१००॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकरचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥१०१॥
इति श्रीचिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकर ग्रंथे शिष्यअभययोगोनाम प्रथमोध्याय: ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP