मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २६ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २६ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे दीपकासी । कुंडला प्रार्थी नृपासी ।
तरी नृपाचे मानसीं । न ये इसी वरावें हें ॥१॥
तोचि जितेंद्रिय जाणावा । तोचि धर्मभीरु ह्मणावा ।
कामिनीनें गांठितां ज्याच्या स्वभावा । विकार किमपि न पडेची ॥२॥
राजा म्हणे सर्व ऐकिलें । जरी इणें मला इच्छिलें ।
तरी माझ्या मना न आलें । साशंकित झालें मन माझें ॥३॥
मी असे धर्मशील । मजपासूनी अधर्म न घडेल ।
इचें दान कोण करील । केवी होईल माझी पत्नी ॥४॥
द्विजदेवाग्निसमीप । कन्येला वरती भूप ।
एकांतीं वरितां लागेल पाप । मग अनुताप होईल ॥५॥
कुंडला वदे हा काय विचार । कन्येनें करूनी स्वयंवर ।
धरितां इष्टपतीचा कर । कोण पामर दोष दे ॥६॥
इचा पिता गंधर्व । इणें विवाह गांधर्व ।
करितां मानतील सर्व । न दवडा अपूर्व रत्न हें ॥७॥
तुम्ही पहा तुमच्या कुळा । मेनकाकन्या शकुंतला ।
धरिलें तिच्या करकमला । गांधर्वविधीनें दुष्यंतें ॥८॥
सोमवंशीं आणि सूर्यवंशीं । करितात स्वयंवरासी ।
तेव्हां हे गुणराशी । स्वयंवरासी योग्य असे ॥९॥
तुम्हां साक्षी पाहिजे तरी । गुरुशी आणितें क्षणांतरीं ।
परी इचा कर धरी । शंका अंतरीं न ठेवावी ॥१०॥
राजा म्हणे गुरु येतां । मग इचा कर धरितां ।
समाधान वाटेल चित्ता । तसें होतां बरवें असे ॥११॥
असें राजाचें वचन । कुंडलेनें ऐकोन ।
पावूनियां समाधान । गुरुचें ध्यान आरंभिलें ॥१२॥
तंव तकाळ गुरु आले । कुंडलेनें सर्व कथिलें ।
गुरु म्हणे बरें लग्न आलें । ये वेळे अनायासें ॥१३॥
षष्ठाष्टद्वादशस्थानीं । वास केला खलग्रहांनीं ।
केंद्रत्रिकोणलाभस्थानीं । शुभ ग्रहांनीं वास केला ॥१४॥
एक सप्तम शुभ दुर्बल । तो कदाचित शोक देईल ।
तरी इतर ग्रह सबळ । शोक वारितील निश्चयें ॥१५॥
गुरु असें बोलूनी । यथाविधी करूनी ।
योजकाग्नी स्थापूनी । पाणिग्रहण करविलें ॥१६॥
कर धरितां मदालसेला । परमानंद जाहला ।
आशीर्वाद देऊनी त्यांला । गुरु चालिला स्वस्थाना ॥१७॥
मदालसा म्हणे कुंडलेसी । ह्या तुझ्या उपकारासी ।
तुलना अन्से निश्चयेंसी । प्रत्युपकारासी काय देऊं ॥१८॥
न योजी आतां प्रत्युपकार । हा माझे ठायीं जिरो उपकार ।
कुंडला म्हणे ईश्वर । आजी करुणाकर प्रसन्न झाला ॥१९॥
मनासारखें साधलें । आतां माझें मन धालें ।
तुज पतीचे करीं दिधलें । आतां मी चालिलें तपासी ॥२०॥
आपुलें मन सांवरूनी । धर्म धैर्य धरूनी ।
पातिव्रत्यें करूनी । सुखी होऊनी तूं राहे ॥२१॥
मदालसा गहिंवरें । म्हणे माता पिता अंतरे ।
परि तूं हें खरें । केलें बरें हित माझें ॥२२॥
असें म्हणूनी मिठी घाली । कुंडलाही गहिंवरली ।
म्हणे तुझी उदेली । हे भली दैवदशा ॥२३॥
तूं नको करूं चिंता । धरी पतिच्या चित्तवृत्ता ।
मी तपा जातें आतां । म्हणोनी त्वरिता निधाली ॥२४॥
ती हिमाचळीं येवून । राहिली तप करून ।
इकडे भार्येस घेऊन । अश्वारोहण करी नृप ॥२५॥
तंव सैन्य घेऊन । पातालकेतु येऊन ।
पुढें बोले गर्जून । माझें स्त्रीरत्न नेसी चोरा ॥२६॥
मी नसतां येऊन । माझे घरीं घुसोन ।
माझी स्त्री चोरून । घेऊन जासी चोरा रे ॥२७॥
मी दैत्य प्रबळ । मला नेणसी तूं खळ ।
न लागतां एक पळ । तुझें कुळ संहारीन ॥२८॥
राजा म्हणे चोर कोण । पोटा लागतां बाण ।
राखावया कीं प्राण । त्वां पलायन कां केलें ॥२९॥
गंधर्वाची कन्या चोरून । आपण चोर होऊन ।
दुसर्‍याला चोर म्हणवून । बोलतां लाज न वाटे कीं ॥३०॥
इणें मजसीं केलें स्वयंवर । याविषयीं साक्षीदार ।
असती ब्राह्मण वैश्वानर । तूं असूर काय करसी ॥३१॥
असें राजाचें वचन । ऐकतां दैत्य कोपून ।
म्हणे युद्ध करून । माझें स्त्रीरत्न घेईन मी ॥३२॥
असें म्हणूनी भूपावर । सैन्य लोटी तो असुर ।
रायें सोडूनी शर । जर्जर केलें तें सैन्य ॥३३॥
किती पडले किती मोडले । किती वीर घायाळ झाले ।
कित्येक मेले मूर्च्छित झाले । किती पळाले जीव घेऊनी ॥३४॥
सोडूनी तीक्ष्ण बाण । पातालकेतुचा शोषिला प्राण ।
देऊनी दुष्टा शिक्षण । राजनंदन चालिला ॥३५॥
पातालकेतुचा सहोदर । तालकेतु नाम असुर ।
सोडूनियां समर । लपूनी गेला पाताळीं ॥३६॥
महालसेस घेऊन । अश्वावरी बसोन ।
गालवाश्रमीं येऊन । वर्तमान सर्व सांगे ॥३७॥
गालव प्रसन्न होऊन । देई आशीर्वचन ।
म्हणे आतां निर्विघ्न । सर्व यज्ञ होतील ॥३८॥
त्वां माझें केलें हित । आतां त्वां जावें स्वस्थ ।
ह्मणूनी तया बोळवीत । प्रेमभरित होऊनी ॥३९॥
पुत्र आला जय घेऊन । हें राजासी कळलें वर्तमान ।
नगर अलंकृत करून । बळ घेऊन समोर ये ॥४०॥
पाहोनी सुनेचें मुख । राजासी झाला हरिख ।
सोडूनी विरहदु:ख । महासुख पावला ॥४१॥
वाद्यगजरें करून । नगरीं पुत्र आणून ।
कुवलयाश्व हें नांव ठेवून । वांटी धन विप्रांसी ॥४२॥
सर्वा झाला आनंद थोर । नागरिक करती जयजयकार ।
नगरीं वाटली साखर । हर्षोद्गार न मावे ॥४३॥
मदालसेसहीत । नृपा वंदीतसे सुत ।
सविस्तर सांगे समस्त । राजा मात मानी ती ॥४४॥
म्हणे देवलोकींचें कन्यारत्न । मिळालें न करितां यत्न ।
हें भूमंडळीं नूत्न । आज एक नवल झालें ॥४५॥
असा राजा हृष्ट झाला । मदालसा गंधर्वबाला ।
पतिव्रता सुशीला । वागे धर्माला अनुसरूनी ॥४६॥
मानी पतीस देवता । धरी त्याच्या चित्तवृत्ता ।
प्रेम ठेवूनियां अश्रांता । जीची शांतता न वर्णवे ॥४७॥
त्या परस्परांचें प्रेम । वाढलें असे नि:सीम ।
तें केवळ निरुपम । चक्रवाकासम न म्हणवे ॥४८॥
असें असतां प्रेमभरित । वनीं एकला राजसुत ।
गेला मृगया हिंडत । तें जाणत शत्रु तो ॥४९॥
पातालकेतुचा सोदर । समोर झुंजाया मानी दर ।
परी राहे सादर । सहोदरऋण फेडावया ॥५०॥
तो वनीं येतो असें देखून । मायेनें तपोवन ।
तेथें तत्काळ कल्पुन । मौनी होऊनी आपण बसे ॥५१॥
जटाजूट बांधूनी । अंगीं भस्म चर्चूनी ।
हातीं गोमुखी घेऊनी । नासाग्रनयनीं जप करी ॥५२॥
जसा कंवडळाचा रंग । बाहेर दिसे चांग ।
जसें गोजिरें दिसे सोंग । अंतरंग नेणवे ॥५३॥
तसा तो दैत्य कपटी । होऊनियां जटी ।
राहे साधुसा मठीं । कपट पोटीं ठेवूनी ॥५४॥
राजा चालतां मार्गावर । आश्रम देखे मनोहर ।
म्हणे कोण नवा ऋषेश्वर । करी सुंदर आश्रम हा ॥५५॥
श्वापदें शांत फिरती । वैर नये कोणाप्रती ।
सर्व वृक्ष फळित दिसती । झरे वाहती सर्वत्र ॥५६॥
पाहावें आंत जाऊन । मुनीचें दर्शन घेऊन ।
मग निघावें येथोन । असें म्हणून राजा आला ॥५७॥
पाहूनियां मुनीतें । हर्ष झाला रायातें ।
भावें वंदूनी तयातें । म्हणे मातें कृतार्थ केलें ॥५८॥
झालें आपुलें दर्शन । सफल झालें जीवन ।
मला केलें पावन । कृपावलोकन करूनी ॥५९॥
म्हणोनी नमन करी । कपटी म्हणे त्या अवसरीं ।
तूं या वनांतरीं । कोण कोठून आलास ॥६०॥
तया म्हणे नृपसुत । जो राजा शत्रुजित ।
कुवलयाश्व मी त्याचा सुत । मृगया करितां येथें पातलों ॥६१॥
धन्य आजिचा सुदिन । झालें आपुलें दर्शन ।
कपटी म्हणे एक सांगेन । तें वचन अवधारीं ॥६२॥
म्यां आरंभिला यज्ञ । नाहीं दक्षिणेसी धन ।
दक्षिणेविण तामसयज्ञ । असें प्राज्ञ बोलती ॥६३॥
राजा म्हणे नगरांत । मिळेल धन बहुत ।
मी बरोबर वनांत । धनरहित पातलों ॥६४॥
आपली आज्ञा झाल्यावरी । मी जाऊन नगरीं ।
द्रव्य आणीन निर्धारीं । कृतार्थ करी मजला तूं ॥६५॥
कपटी म्हणे तयास । कां करवावा सायास ।
मी निरपेक्ष खास । नाहीं सोस धनाचा ॥६६॥
तुझे गळां कंठी असे । ती मिळतां सर्व भागतसे ।
विशेष मी न मागतसें । तुज वाटतसें तसें करी ॥६७॥
कुमार म्हणे काय शाश्वत । द्यावी कंठी हे निश्चित ।
असें म्हणोनी त्वरित । कंठी तया देतसे ॥६८॥
कंठी हातीं घेऊन । म्हणे मी शीघ्र जाऊन ।
वरुणाचें दर्शन । घेऊन येतों लवकर ॥६९॥
तंवर तूं येथें राहून । करी यज्ञाचें रक्षण ।
भूप तथास्तु म्हणून । तेथें बसून राहिला ॥७०॥
कपटी नगरी जाऊन । मदालसेस बोलावून ।
राजाच्या सन्निधान । हाहाकार करूनी बोलत ॥७१॥
कुलवयाश्व वनीं गेला । तें कळलें तालकेतुला ।
त्याला पाहूनी एकला । दैत्य आला युद्धार्थ ॥७२॥
म्हणे माझ्या बंधूस मारून । आलास नारी घेऊन ।
आतां करीन कदन । म्हणोन युद्ध आरंभिलें ॥७३॥
कुवलयाश्व पडला । दैत्य अश्व घेऊनी गेला ।
मी पातलों त्या काळाला । राजा मला बोलावी ॥७४॥
मी त्याचे अंतकाळीं । गेलों त्याचे जवळी ।
ही कंठी त्या वेळीं । देऊन बोलिला तें ऐक ॥७५॥
ही कंठी मदालसेला । देई आश्वासन हें तिला ।
असें सांगोनि तो मेला । तया जाळिला वनस्थानीं ॥७६॥
हें कळवावया तुम्हांसी । मी आलों त्वरेंसी ।
पुन: जातों वनासी । कंठी तुम्हांसी देऊनी ॥७७॥
असें कपटी बोलूनी । कंथी तेथें ठेवूनी ।
पुन: आला परतोनी । ताच वनीं दुरात्मा ॥७८॥
पुत्रवार्ता ऐकोनी । राजा रडे भुंकोनी ।
शिर घे आपटोनी । आठवून पुत्रगुण ॥७९॥
मदालसा धडफोडी । उंच स्वरें हंबरडी ।
आतां थारा नसे ब्रह्मांडीं । अग्नींत उडी द्यावी ह्मणे ॥८०॥
पतिचे गुण आठवून । ती रडे गळा फोडून ।
ह्मणे मला सोडून । प्राणजीवन कोठें गेला ॥८१॥
मासा जसा जळावीण । तसी मी पतीवीण ।
येथें आतां तडफदोन । मरोन जाईन सर्वथा ॥८२॥
काय करावें लावण्यसंपत्ती । काय करावे पत्ती हत्ती ।
प्राणेश्वर माझी गती । कासया संपत्ती विपत्ती हे ॥८३॥
पतीसवें साम्राज्य । पुत्रासवें धर्मराज्य ।
इतरांसवें यमराज्य । जें प्राज्य कष्ट दे ॥८४॥
नको नको रांडपण । पदोपदीं जें दे शीण ।
विरहदु:ख दारुण । आतां तें कोण सोसील ॥८५॥
आतां करावें सहगमन । तेणें कुळ होईल पावन ।
पतीशीं परलोकीं जाऊन । मी पावेन परमानंद ॥८६॥
असा निर्धांर करोनी । चित्तीं पती आठवूनी ।
हातीं कंठी घेऊनी । अग्निप्रवेश केला तीणें ॥८७॥
तें पाहूनी सासरा । म्हणे आतां या असारा ।
देऊं सोडूनी संसारा । मी खरा अभागी ॥८८॥
ज्याची बाळपणीं मरे माता । तारुण्यीं मरे कांता ।
वृद्धपणीं मृति ये सुता । यापरता पापी नाहीं ॥८९॥
लेंक सून गेले मरून । आतां काय वांचून ।
मीही जाईन मरून । कासया जीवन दु:खरूप ॥९०॥
पुत्राचे गुण सकळ । आठवूनि तो नृपाळ ।
फोडी आपुलें कपाळ । पडे व्याकुळ होऊनी ॥९१॥
इकडे कपटी आश्रमासी । येऊनी म्हणे रायासी ।
राजपुत्रा तूं धन्य होसी । उदार अससी महात्मा ॥९२॥
माझें त्वां कार्य केलें । मनोरथ सिद्ध झाले ।
सर्वं हेतू पुरले । मन धालें माझें आतां ॥९३॥
तुझी इच्छा असेल तरी । तूं येथें निवास करी ।
राजा म्हणे त्या अवसरीं । आतां नगरीं जातों मी ॥९४॥
मी आलों एकला । येथें बहु विलंब लागला ।
आतां आज्ञा द्यावी मला । जाऊनि ताताला भेटेन ॥९५॥
कपटी म्हणे धन्य तूं । पुरविला माझा हेतू ।
आतां नगरा जा तूं । आशीर्वाद घेऊनी ॥९६॥
राजा कपट नेणून । तयाप्रती वंदून ।
सोडूनियां वन । निजभवन लक्षीतसे ॥९७॥
समोर ओरडती दिवा भीत । राजाचें चित्त झालें भीत ।
वामांग असे स्फुरत । म्हणे उत्पाद येतो कीं ॥९८॥
माझा पिता असो सुखी । म्हणोनी हरिनाम घे मुखीं ।
मार्गीं चाले एकाकी । तो विवेकी राजपुत्र ॥९९॥
नगर तें शून्य दिसे । मार्गही घोळट नसे ।
कोठें उत्सव न होतसे । दु:ख करितसे कुवलयाश्व ॥१००॥
असा तो दु:ख करीत । वेगें पातला राजवाड्यांत ।
तंव ऐकूनी आकांत । तेथें धांवत पातला ॥१०१॥
तातापुढें येऊन । धरी तयाचे चरण ।
तेणें पुत्रा पाहून । दृढ आलिंगन घेतलें ॥१०२॥
मनीं म्हणे हें काय । हा भूत होऊनी आला काय ।
किंवा हें स्वप्न होय । नकळे अभिप्राय यथार्थ ॥१०३॥
किंवा मददु:ख जाणुनी । शंकरें दिधला परतोनी ।
किंवा कपटी आला कोणी । मुनी होउनी भलताची ॥१०४॥
जरी कपटी म्हणों मुनी । तरी कंठी आणिली कोठूनी ।
हा संशय माझे मनीं । होऊनी आश्चर्य वाटतें ॥१०५॥
जरी हा खरा पुत्र । तरी याचें जळालें कलत्र ।
जें सतीरत्न पवित्र । तें दु:ख कसें सांगावें ॥१०६॥
असा चिंतातुर तात । तयासी बोलतसे सुत ।
म्हणे बापा तुझें चित्त । कां दु:खित जाहलें ॥१०७॥
राजा ह्मणे सुता । तुझा वियोग होतां ।
दु:ख झालें सुता । तुज पाहतां निवालें ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये षड्विंशोsध्याय: ॥२६॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP