मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ११ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ११ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्त समर्थ ॥
गुरु म्हणे इंद्रासी । शास्त्रें न घालवी जो भ्रमासी ।
मुक्ती न मिळे तयासी । गर्भवासीं पडे तो ॥१॥
भूलोकांतूनी पर्जन्यांत । पर्जन्यांतूनी अन्नांत ।
अन्नद्वारा पितृशरीरांत । येऊनी राहे तीन मास ॥२॥
राही रेत होऊन । कामाग्नीनें तापून ।
ऋतुकाळीं होतां मैथुन । स्त्रीयोनींत प्रविष्ट होई ॥३॥
योनिरक्त विमिश्रित । राही गर्भाशयांत ।
दैवे वाडे वारेनें वेष्टित । न मरे कष्ट होतांही ॥४॥
अस्थि - स्नायु मज्जारेतानें । होती त्वचा मांस रक्त रक्तानें ।
मोदका उकडती त्या तर्‍हेनें । हा देह बने अमंगळ ॥५॥
मूत्राचें आधण विष्ठेचा दाथर । रेत रक्ताची उकड थोर ।
मातेची कूस हेंच पात्र । तयामाजी जथराग्नी उकडी ॥६॥
शुक्र अधिक असे जर । तरी उपजे खास नर ।
रक्त अधिक असे जर । नारीशरीर उपजेल ॥७॥
रक्त रेत समान होतां । खास ये नपुंसकता ।
शुक्र वायूनें भिन्न होतां । आवळे जुळे देह होती ॥८॥
अमंगळाहूनी अमंगळ । रजस्वलेचा विटाळ ।
तेथेंच उपजे बाळ । तो निर्मळ धुवूनी होय कीं ॥९॥
रेत रक्त जें एकत्र मिळतें । पांच रात्रीनें बुद्बुद होतें ।
सात दिवसांनीं पिशवी होते । पक्षानें फुगते तीच पैं ॥१०॥
महिन्यानें होई कठीण । दों मासांनीं मस्तक निर्माण ।
तिसरे मासीं पोट होवून । हस्तपादांकुर फुटती ॥११॥
चौथे मासीं त्वचा । पांचवे मासीं उद्गम नखांचा ।
साहावे मासीं नवछिद्रांचा । उद्भव होय अनुक्रमें ॥१२॥
वायू पायापासून । अंतरीं राहे प्राण होऊन ।
सातवे मासीं ताळू फोडुनी । अंतरीं चेतन प्रवेश करी ॥१३॥
मातेनें खातां अन्न । त्याचा रस नाभिछिद्रांतून ।
पोंचें पोटांत जाऊन । तेंचि जीवन गर्भासी ॥१४॥
दोन्हीं हृदयें एक होती । तेव्हां डोहाळे उठती ।
अजीर्ण कृशता वांती । मातेला सुस्ती येतसे ॥१५॥
निजकर्में भोगी हा नरक । परी तेथेंही ईश्वर संरक्षक ।
स्तन होती पुष्ट कृष्ण मुख । ही पूर्वें योजना दुग्धाची ॥१६॥
दक्षिण कूस होतां थोर । समजावा जन्मेल पुत्र ।
वामकुक्षी होतां थोर । कन्या निर्धार जाणावी ॥१७॥
लोटतां नवमास । पूर्णत्व ये गर्भास ।
स्मरोनी पूर्वं कर्मास । प्रार्थी ईश्वरास पीडूनी ॥१८॥
सातवे मासापासून । होवूनियां चलायमान ।
अवाड्मुख पीडून । वंदून बोले परमेश्वरा ॥१९॥
देवा कर्म केलें गहन । त्याचें हें दु:ख दारुण ।
भोगविलें त्वां मजलागून । पुरे शिक्षण आतां हें ॥२०॥
दुर्गंधीनें कंटाळलों । जठराग्नीनें पोळलों ।
ह्या नरकांत लोळलों । शिणलों आतां सोडवी मज ॥२१॥
निजकर्में नानायोनी । येथें आलों भोगूनी ।
वाटे मला नारकाहूनी । गर्भवास हा महा कष्ट दे ॥२२॥
आतां सोडवी येथून । यावरी पाप न करीन ।
देवा तुझें भजन करीन । तुला विसरें न कधींही ॥२३॥
असी स्तुति करितां । दशम मास प्राप्त होतां ।
सूतीदायूची लहरी उठतां । पडे योनिद्वारें किडा जसा ॥२४॥
उपजतां स्पर्शे वात । ती स्मृती जाई अकस्मात ।
सोहं विसरूनियां पोत । राहे रडत कोहं कोहं ॥२५॥
बोलो नये पराधीना । न जाणती त्याच्या मना ।
विपरीत होती सर्व योजना । शयन पानादिकांच्या ॥२६॥
बाल्यावस्था खेळांत जाय । विषयभोगीं तारुण्य जाय ।
तेव्हां धर्माधर्म दिसेल काय । संतांचे पाय न धरवती ॥२७॥
स्त्री सांगेल तें प्रमाण । माता वाटे कीं वैरिण ।
ऐकाया शास्त्रपुराण । मनीं शीण येतसे ॥२८॥
जसें मोगरीचें फूल । मावळे न लागतां वेळ ।
मनीं विषयांचा मांडितां खेळ । तारुण्य तत्काळ मावळे ॥२९॥
ईश्वरभजनीं उतावेळ । न केली त्यांचें हें फळ ।
जरेस पाठवी काळ । काना जवळ ये ती टवळी ॥३०॥
जरा हळू कानीं सांगत । मान हालउनी हातें नाहीं म्हणत ।
मग ती पाडूनियां दांत । कान डोळे आंत ओढीतसे ॥३१॥
तसें पाहुनी तें बेरूप । पोरें जवळ घालिती दूप ।
त्याच्या मनीं ये कोप । आपोआप अपमान होतां ॥३२॥
मग म्हणूं जाई राम राम । तों होई लाम लाम ।
जवळी ज्याला न पडे दाम । तो निकाम दुरावे ॥३३॥
पुन्हा काळचक्रीं पडे । परिभ्रमण पूर्ववत घडे ।
जेव्हां मनींचा भ्रम उडे । तेव्हां सांकडे कडे पडाती ॥३४॥
पूर्व संस्कारें जी प्रकृती । तदनुसार कर्में घडती ।
शास्त्राविनें न पालटे ती । म्हणूनी शास्त्रयुक्ती आदरावी ॥३५॥
शास्त्रें होतां भ्रमनिरसन । जरी हातीं येईल ज्ञान ।
स्थिरबोध न हो तंव जाण । भय दारुण वाटे कीं ॥३६॥
ऐक इंद्रा तूं आतां । सांगतों सातवी गाथा ।
प्रतिष्ठानीं विप्र होता । झाला सूत तयासी ॥३७॥
योगभ्रष्ट तो पूर्वींचा भय मानूनी द्वैताचा ।
उन्मत्त झाला असोन साचा । व्यर्थ वाचाळपण करी ॥३८॥
लोकसंगा डरे तो । विषयां विष मानी तो ।
मान न व्हावा म्हणूनी तो । राहे जडमूढ होवूनी ॥३९॥
माता म्हणे नायके सुत । विष्टामूत्रीं लोळत ।
पिता म्हणे खचित । ग्रहग्रस्त हा होय ॥४०॥
मग व्रतें करिती । नियमें देवा पूजिती ।
हातीं रक्षा बांधिती । दानें देती विप्रांला ॥४१॥
वैद्यही औषध देती । तीर्थयात्रा जप शांति ।
करिती आंगारे लाविती । भूतभीती मानूनी ॥४२॥
कांही नोहे उपयुक्त । लागलें महाभूत ।
जें जगा चेष्टवित । तें बंधांत केंवी ये ॥४३॥
अहं ब्रह्मास्मि उच्चारी । स्वयें झाला पंचाक्षरी ।
यापुढें बापुडा मंत्रीं । भागवतावांचुनी ॥४४॥
करितां उपाय फार । तो नये प्रकृतीवर ।
तो लोळे भूमीवर । मळमूत्र नेणे तो ॥४५॥
हगे मुते उभ्यानें । काय खाणें काय पिणें ।
हेंही तो मुळींच नेणे । त्याचें बोलणें न समजे ॥४६॥
न जाणे हिताहित । असीं जातां वर्षें आठ ।
मौजीबंध करी तात । सांगे कानांत गायत्री ॥४७॥
संध्यावंदन न करी । जरी तया पिता मारी ।
तरी न जपे गायत्री । मैत्री न ठेवी कोणासी ॥४८॥
विष्णुदत्ता ऐकून । तया पुत्रा घेऊन ।
त्याचे घरीं जाऊन । बोलती वंदून मायबाप ॥४९॥
हा जन्मापासून । पडें जडसा होवून ।
यासी उपाय योजून । पुत्रदान द्या आम्हां ॥५०॥
आम्हा एकचि सूत । झाला कीं रोगग्रस्त ।
भूतत्रस्त कीं उन्मत्त । ग्रहग्रस्त कीं न कळे हा ॥५१॥
विष्णुदत्त तें ऐकून । तया पुत्रा पाहून ।
ब्रम्हनिष्ठ ओळखून । म्हणे पुत्रा ठेऊनी चला ॥५२॥
पिता म्हणे हा सुत । मुतेल ह्या यज्ञशाळेंत ।
तया म्हणे विष्णुदत्त । चला निश्चिंत आपुले घरी ॥५३॥
बरें म्हणूनी ते जाती । विष्णुदत्त तयाप्रती ।
म्हणे कां घेसी ही भीति । काय चिंती चित्त तुझें ॥५४॥
तूं कोणाचा कोण । येथें येण्याचें काय कारण ।
कां दाविसी हे दुर्गुण । तुज कोण मोहवील ॥५५॥
त्वां घरीं जावें आनंदें । मायबापा सुख दे ।
लोकसंग्रह सोडून न दे । या स्वच्छंदें काय लाभ ॥५६॥
सोडूनी दे ह्या चेष्टा । तुझें काय करूं आतां ।
हें सांग तूं तत्वता । म्हणूनी माथा हात ठेवी ॥५७॥
हंसुनिया पुत्र बोले । विप्रा काय हें ऐकविलें ।
निजरूप माझें भलें । तें एकलें तूं जाणसी ॥५८॥
मूळीं न माझी उत्पत्ती । मायबाप कसे असती ।
कर्में ही अक्रिया हातीं । केवी केवी घडती बोल बापा ॥५९॥
मी सच्चिदानंद व्यापक । प्रळयजळापरी एक ।
मी कोणाचा होवूं लेक । जावूं कुठें कसा ॥६०॥
मी अन्न आणि अन्नाद । नाहीं भोग्य भोगस्वाद ।
मुळींच नाहीं भेद । परि छेद केवीं घडे ॥६१॥
जरी असतों परिच्छिन्न । तरी हा तुझा प्रश्न ।
मानितों मी समीचीन । सर्वंथा न घडे असें ॥६२॥
देशकाल वस्तु व्यापून । मी असे संपूर्ण ।
मला परिच्छेद न । भेद न सर्वथा ॥६३॥
ऐकून हें वचन । विष्णुदत्त हर्षून ।
प्रेमें तया अलिंगून । गाढ वचन बोलतसे ॥६४॥
बापा तूं साच धन्य । अससी सर्व देवमान्य ।
तुझ्यासारिखा कोण अन्य । तूं संन्यस्त साच मानी ॥६५॥
कोणीही पुरुष पाहे । कधींही अकर्मा न राहे ।
प्रकृतीस्वभावप्रवाहे । कर्म करिती हें निश्चित ॥६६॥
तरी करावें शास्त्राचरण । दुसर्‍यालाही तें शिक्षण ।
मिळेल त्याणें दूषण । कीं भूषण येईल ॥६७॥
जे वशिष्टादिक । ते ज्ञानी सम्यक ।
परंतु ते लौकिक । सर्वथा न टाकिती ॥६८॥
स्वयें आचरूनी । अन्या मार्ग दावूनी ।
ज्ञानभूमी धरूनी । पहिले मुनी राहिले ॥६९॥
पहिल्या योगभूमी तीन । योगी यांचे जागरण ।
मानिती चौथी स्वप्न । तेथें जाण ब्रह्मवेत्ता ॥७०॥
भूमी धरितां पांचवी । ब्रह्मविद्वर पदवी ।
मिळे घेई जो सहावी । तो ब्रम्हविद्वरीयान ॥७१॥
पांचवी स्वल्प निद्रा । सहावी गाढ निद्रा ।
ही स्वयें न सोडी योगमुद्रा । परत: उत्थान होय जेणें ॥७२॥
तुर्या ते सातवी । स्वत: परत: न उठवी ।
इच्या योगें ये पदवी । ब्रम्हविद्वरिष्ठसंज्ञक ॥७३॥
तो विधिनिषेधातीत । अजूनी तूं ती मात ।
नेणसी म्हणूनी भीत । करिसी व्यर्थ ह्या चेष्टा ॥७४॥
सुखी राहे जीवन्मुक्त । वागूनियां अनासक्त ।
करी कर्म शास्त्रोक्त । मुक्तसंग होवूनी ॥७५॥
येणें ज्ञान होय स्थीर । घडे लोकोपकार ।
ढिला होई अहंकार । शास्त्राधार असा असे ॥७६॥
अभिमान हाची बंध । सोडी त्याचा संमंध ।
हीच युक्ती म्हणती वुध । आत्मबोध होई जेणें ॥७७॥
ठेवितां स्वात्मदृष्टी । नोहे अहंममता भेटी ।
मानापमानाच्या गोष्टी । केंवी पोटीं येती मग ॥७८॥
असी बाणतां स्थिती । विषयवासना नुठवी ।
मना विकार केवीं होती । निरंहकृती राहतां ॥७९॥
असा जो समाहित । तोची मानिजे मुक्त ।
त्याची दृष्टी जेथें जात । तेथें होत समाधी ॥८०॥
जो कर्मफळ सोडी । अहंकारा न जोडी ।
हो कां तो अज्ञ अनाडी । बंध तोडी निश्चयें ॥८१॥
आतां तूं तरी ज्ञाता । बंधाची नसे वार्ता ।
यापरी वागतां । केवी बद्धता येईल ॥८२॥
ज्याचें अवश चित्त । होई विषयसक्त ।
तो न होई मुक्त । घेई गुप्त मार तो ॥८३॥
ज्याचें स्वात्मनिष्ठ मन । तो विषयां भोगून ।
अलिप्त असे नित्य जाण । तया कोण बद्ध म्हणे ॥८४॥
परव्यसनीं जी नारी । घरधंदा करी जरी ।
जारसंग अंतरीं । ती घरीं वावरतांही ॥८५॥
तेवीं रूपीं विश्रांत । बाहेर वावरे मुक्त ।
तसा तूं अनासक्त । होई मुक्त बाळका ॥८६॥
मोक्ष नाहीं स्वर्गावरी । खालीं किंवा भूमीवरी ।
जो अहंकारा मारी । त्याचे अंतरी मोक्ष वसे ॥८७॥
जाईचेंही फूल । चोळतां श्रम होईल ।
त्याहुनी सुखें करवेल । अहंकारत्याग तो ॥८८॥
मीतूंपणाची गती । जी उठे स्फूर्ती भ्रांती ।
ह्या मनाच्या चेष्टा निश्चिती । त्या न शिवती ज्ञात्याला ॥८९॥
चित्तीं ठेवी हा बोध । न बाधेल मग संबंध ।
तुटेल तो कर्मबंध । हा निर्बंध न मानी ॥९०॥
मग ज्ञान स्थिरावेल । शांती अंगीं बाणेल ।
मुक्तिपदीं डोलशील । माझा बोल साच मानी ॥९१॥
असें वचन ऐकून । बाळ चेष्टा दे सोडून ।
विष्णुदत्ताचे घरीं जाऊन । करी भोजन स्वस्थचित्तें ॥९२॥
सतीचे हातानें मिळतां अन्न । तयाचा भ्रम गेला निघोन ।
त्याची शांत वृत्ती पाहून । झालें समाधान मायबापा ॥९३॥
म्हणती जन्मापासून । जो धड न बोले वचन ।
त्याला न लागतां क्षण । सावधान केला विप्रें ॥९४॥
ते म्हणती विष्णुदत्ता । आम्हांवरी दया केली आतां ।
काय उपाय योजला सुता । जेणें स्वस्थता शीघ्र आली ॥९५॥
आम्हां दिलें जीवदान । म्हणोनि घालिती लोटांगण ।
घरीं जाती आज्ञा घेऊन । बाळही सावधान वागे तो ॥९६॥
शास्त्राचें एक तात्पर्य । अज्ञा पदोपदीं भय ।
संसार असतां ब्रम्हमय । वाटे मायामय तयासी ॥९७॥
स्वरूपातें भुलोनी । कर्तृत्व भोक्तृत्व वाडूनी ।
व्यर्थ जाते शिणूनी । हे अज्ञानी मूढपणें ॥९८॥
नथ गळसरींत खोंविली । तिची विसर पडली ।
तसे असे ही बोली । चतुरीं जाणिली पाहिजे ॥९९॥
नथ गळ्यांत दावितां । ती म्हणे मिळाली आतां ।
तेवीं शास्त्रीं स्वात्मा कळतां । म्हणती आतां मिळाला ॥१००॥
शास्त्रें लहान थोर । सर्व असती बोधपर ।
असें गुरूचें उत्तर । ऐकोनी इंद्र नमन करी ॥१०१॥
करा जी अपराध क्षमा । चित्तीं न ठेवा अतिक्रमा ।
असें म्हणूनी सुत्रामा । नमोनी स्वधामा चालिला ॥१०२॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । ठेवी शास्त्रसारांशीं मना ।
शास्त्रापासुनी परोक्षज्ञाना । घेवूनि विज्ञाना पावसी ॥१०३॥
जीं कर्मांचीं फळें बोलती । अणिमादी सिद्ध असती ।
तिकडे न द्यावी चित्तवृत्ती । नश्वर होती अंतीं ज्या ॥१०४॥
सर्व शास्त्रें पाहून । स्वार्थ घ्यावा शोधून ।
हंस जेवीं पाणी टाकून । दुग्ध पिवून जाई तेवीं ॥१०५॥
असें श्रीदत्ताचें वचन । सविस्तर ऐकून ।
तो कार्तवीर्य अर्जुन । बोले वंदून श्रीदत्ता ॥१०६॥
सह्याद्रीवर येवून । किंचित् जटांनीं आच्छन्न ।
जें पाहिलें हें श्रीवदन । तेणें सदन समृद्ध झालें ॥१०७॥
हें वैराग्यही झालें । शास्त्रतत्व ऐकिलें ।
आतां ज्ञान विज्ञान भलें । कृपेनें कळलें पाहिजे ॥१०८॥
इति श्रीदत्तचरिते एकादशोsध्याय: ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP